गावास पत्र
प्रिय साळगाव --
तुला लिहिताना मला आज ही आठवतयं , तुझं गाव कुठलं ? असा लहानपणी दुसऱ्या इयत्तेत असताना बाईंनी प्रश्न विचारला. मी म्हटलं आडेली ,सावंतवाडी घरी येउन आईला सांगितलं तेव्हा ती हसून म्हणाली, 'अगं ते माझं आजोळ आहे. आपलं गाव साळगाव , कुडाळ मध्ये, यापुढे कुणी विचारलं तर लक्षात ठेव.
कोकणातलं गाव माझं
ओढ लावतेय अशी जीवाला गावाकडची माती
प्रेमळ आहे माझे गाव साळगाव त्याचे नाव
साद घालतात पुन्हा नव्याने माझ्या रक्ताची नाती ...
सुंदर माझ्या कोकणात घर आहे माझे कौलारू
परतुनी निघता मला अंगण सोडत नाही
ही वाट दूर जाते पण मागे काढल्या खुणा कशी विसरू...
गाव .. आपलं घर
आपलं गाव , आपल घर हे आपलंच असतं पण आपण कधी त्याच्याकडे नीट डोळे भरून पहात नाही. आपण त्याला गृहित धरून जगत असतो. घराबाहेर नोकरीच्या निमित्ताने मुंबईत असलो तरी कितीही वेळ घालवला तरीही गावाची व घराची ओढ मला घेऊन येतेच. पण त्यासाठी आपण त्या वास्तूशी जिवाभावानी जोडलेले असावे लागते. बरेचदा आपण त्या घराला विसरून जातो पण कधीतरी असा एखादा क्षण येतो की आपल्याला अचानकपणे आपल्या घराची आठवण येते. लोहचुंबकाने लोखंडाला खेचून घ्यावे तसे आपले मन आपल्या घराकडे, त्याच्याशी जोडलेल्या आठवणींकडे खेचले जाते. तिथेच चिकटून बसते. गावापासून घरापासून दूर राहिलो की घराचे अस्तित्व साद घालत राहते. घरी परत खेचून आणते. जास्त दिवस गावापासून घरापासून दूर राहिले आठवण अधिक तीव्र होत जाते.
म्हणून तर गावचा निसर्ग ,आमची ग्रामदेवता माऊलीच मंदिर , आमच हिरवगार शेत ,यातून वाहणार पाटाच पाणी. सुरंगी ,आबोलीचे गजरे व माझे नातेवाईक हे सार लिहिताना माझ्या डोळ्यासमोर उभं राहतय.
घरात खूप वस्तु आहेत. काही हौसेनी जमवलेल्या, काही आठवण म्हणून जपलेल्या तर काही उगाचच साठलेल्या. काही भेट आलेल्या तर काही विकत घेतलेल्या. या वस्तू सजीव असाव्यात असं कधीकधी वाटतं. दूर गावाला जाऊन घरी परत आलो की सारं घर जीव एकवटून वाट पहात असतं. दरवाज्यावर लटकणार कुलूप किल्लीची वाट पहात नाक फेंदारून बसलेलं असतं. दाराच्या बिजागऱ्या उघडताना कुरकुरतात, आपण इतके दिवस दूर राहिल्याची तक्रार करत. घरातल्या प्रत्येक वस्तूला जीव आलेला असतो. आपली रोजची बसायची जागा आपल्या स्पर्शासाठी आसुसलेली असते. घरातल्या चादरी आपल्या आठवणींची जमवलेली ऊब पांघरून बसलेल्या असतात. घड्याळ चालत असतं आपण किती काळ दूर होतो ते मोजत, आपलीच वाट पहात . अंगणात लावलेली प्राजक्ताच , अनंताच , आबोलीच झाडं वाट पहात असतात आपण येऊन त्यांना न्हाऊमाखू घालायची. डबेडुबे झाकणाच्या आत आठवणी सांभाळत बसलेले असतात. भांडी एकमेकांवर रुसल्यासारखी होऊन बसलेली असतात आपण येऊन भांडण मिटवलं की पुन्हा गळ्यात गळे घालून बसायच्या तयारीत. आपला चहाचा कप खूप दिवस चहा न मिळाल्यामुळे आळसावून आपली जागा सोडायचा कंटाळा येऊन मांडी ठोकून झोपलेला असतो, मठ्ठ असल्यासारखा. . .दुधाचं पातेलं सायीची वाट पाहत असतं. स्वयंपाकघर वाट पाहत असतं फोडणीच्या वासाची आणि मंद गरम होणाऱ्या दुधाच्या वासाची. चहा साखरेचे डबे खुडखुडायला उत्सुक होऊन बसलेले असतात. दिवे वाट पहात असतात पुन्हा लावण्याची. आपण घरात वावरत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टी जाणवत नाहीत. आपण त्या गृहीत दरलेल्या असतात. खिडक्यांचे, दरवाजांचे पडदे बाजूला सरकवायची वाट बघत खोळंबलेले असतात. खिडक्या उघडायच्या प्रतीक्षेत असतात. सगळ्या घराला जीव फुटलेला असतो. मनापासून आपल्याला साद घालत असते आपली वास्तू. आपली प्रत्येक वस्तू आपल्या स्पर्शसुखासाठी तहानलेली असते. हे मला आज गावाला उद्देशून पत्र लिहिताना माझ्या घराबद्दल जाणवत आहे.
आई म्हणायची वास्तू नेहमी अस्तु म्हणत असते. ज्या घरात चांगल्या संकल्पांचा सतत उच्चार होत असतो ती वास्तु आनंदी असते. तिथे केलेले सर्व चांगले संकल्प वास्तूच्या आशीर्वादाने फळाला येतात. चांगले विचार हे वास्तूलाच नव्हे तर संपूर्ण आसमंताला शुभंकराचे स्वरूप देतात. त्यात तुम्ही आनंदयात्री असाल तर वास्तू पण आनंदाने स्वागत करणारच. कडकडून भेटा घराला. विठ्ठलाच्या भेटीचा आनंद मिळेल. तोही असाच भक्तांसाठी युगे अठ्ठावीस उभा आहे वाट पाहत. आणि ते ही माझ्या साळगावात. येईन मी परत गावात लवकरच माझ्या घराला माझ्या गावातल्या निसर्गाला भेटायायला
तुझीच मनिषा
Comments
Post a Comment