बाप्पा येता कोकण फुलते.*
*बाप्पा येता कोकण फुलते.* कोकणात गणपतीच्या वेळी असणारं वातावरण कोकण आणि गणपती हे जणू एकाच मातीचे, एकाच सुगंधाचे आणि एकाच भावविश्वाचे दोन शब्द! गणेशोत्सव जवळ आला की कोकणातील वातावरणालाच एक वेगळे चैतन्य प्राप्त होते. पावसाने न्हाऊन निघालेली धरती, हिरवागार शालू नेसलेले डोंगर, लाल मातीचे रस्ते आणि नारळ-पोफळीच्या बागांतून वाहणारा मंद वारा—या सगळ्यांच्या साक्षीने बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. श्रावण संपता संपता आणि भाद्रपदाची चाहूल लागताच प्रत्येक कोकणी घरात गणपतीची लगबग सुरू होते. वर्षभर बंद असलेली घरे साफ केली जातात. अंगण झाडून सारवले जाते. घराच्या भिंतींवर पावसाच्या सरींनी आपली वेगळीच चित्रे रेखाटलेली असतात. शहरात नोकरी-व्यवसायासाठी गेलेली माणसे गणपतीसाठी गावाकडे परतू लागतात. एस.टी.च्या गाड्या, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढते. कित्येक महिन्यांनी भेटणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा गणपतीच्या आगमनाइतकाच मंगल असतो. कोकणात गणपती म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही; तो माणसांना एकत्र आणणारा स्नेहसोहळा आहे. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या ...