भारतीय राष्ट्रजीवनाचा आधारस्तंभ - विवेकानंद यांचे शिक्षणविषयक विचार....

भारतीय राष्ट्रजीवनाचा आधारस्तंभ - विवेकानंद यांचे शिक्षणविषयक  विचार....

या विश्वात असे फार थोडे महापुरुष जन्माला येतात की ज्यांचे विचार एखाद्या अतिप्रचंड झंझावाती वादळाप्रमाणे सर्व दिशांना प्रसारित होऊन अवघं विश्व व्यापतात. जगाला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागतं. वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधून प्रवास करीत असताना रस्ता भरकटलेल्या मानवजातीला मार्गदर्शन करणारे ते दीपस्तंभ ठरतात. पथदर्शक ठरतात. अशा असंख्य मालिकेमध्ये स्वामी विवेकानंद नावाच्या तेजस्वी संन्याशाचं एक आगळंवेगळं स्थान आहे.

विवेकानंदांच्या जीवनध्येयात केंद्रस्थानी भारत आहे ; पण भारताकडे बघण्याचा वैश्विक दृष्टिकोण हे त्यांचं वेगळेपण आहे. एका फार मोठ्या सामाजिक स्थित्यंतराच्या काळात त्यांचा जन्म झाला. राजा राममोहन राय यांच्यापासून भारतवर्षात परिवर्तनयुगास प्रारंभ झाला. त्यानंतरच्या काळात सुधारकांनी सुधारणांच्या नावाखाली चालविलेला धर्माचा ध्वंस, युरोपीय सभ्यतेच्या संकल्पनांची नव्याने झालेली ओळख, जगात चाललेला साम्राज्यवादी भस्मासुरांचा हैदोस आणि जिला आपल्या भविष्याची कल्पना करण्यासही उसंत नाही अशी परकीयांच्या गुलामगिरीत काळ कंठणारी आपली भारतमाता, अशी स्थिती निर्माण झालेली होती. अशा भीषण परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर नियतीने भारतमातेच्या पदरात टाकलेलं 'विवेकानंद' नावाचं दान - येणाऱ्या पिढ्यांकरिता वरदान ठरलं.. विवेकानंदांचं अवतरण हा आधुनिक भारताचा उषःकाल होता...

एका अधिकारी महात्म्याच्या पायाजवळ बसून आपलं जीवनध्येय समजावून घेण्याचं लाभलेलं भाग्य, आपल्या मातृभूमीविषयीची प्रचंड तळमळ आणि क्रांतिकारी विचारधारा हे विवेकानंदांच्या विश्वजयी व्यक्तित्वाचे मुख्य पैलू आहेत. समग्र विश्वाचं कल्याण हे त्यांचं जीवनध्येय असलं तरी भारत हे त्यांचे आत्मतत्त्व आहे. हिमालयाच्या गिरीशिखरांपासून ते कन्याकुमारीच्या सागरतटांपर्यंत पसरलेला हा माझा विशाल देश संपूर्ण विश्वाला शांति आणि प्रेमाचा संदेश देण्याकरिता आपल्या प्रचंड सामर्थ्यानिशी सिध्द व्हायला हवा, या एकमात्र ध्येयाला स्वामीजींनी जीवन वाहिलं.

प्रत्येक काळाला लागू होणाऱ्या विवेकानंदांच्या विचारांचा आधार हा त्या विचारांमागील वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोण हा आहे. रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेल्या 'शिक्षण' या पुस्तकात विवेकानंदांच्या शिक्षणविषयक विचारांचा संग्रह आहे. हे पुस्तक वाचताना माझ्या अल्पबुध्दीप्रमाणे मला आकलन झालेल्या विचारांबद्दल सांगण्याची इच्छा याठिकाणी होतेय, याचा आनंद वाटतो.

पुस्तकाच्या प्रारंभीच 'शिक्षण' या मूलभूत संकल्पनेवर विवेचन असून त्याची व्याख्या करताना 'शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण', असे म्हटले आहे. या पहिल्या वाक्यातच स्वामीजींच्या क्रांतिकारी विचारांचं दर्शन आपल्याला घडतं. या ज्ञानाचा साक्षात्कार करवून देण्यात शिक्षकाच्या असलेल्या भूमिकेविषयी ते म्हणतात -' ज्ञान सारे आतच वसत असते. त्याला जागे करणे एवढेच शिक्षकाचे काम.'

आजकाल बरेच आई वडील आपल्या मुलांवर आपली स्वप्ने लादू पाहतात. त्यामुळे त्यांच्या मुळ स्वभावास विकसीत होण्यास वाव मिळत नाही. आजची शिक्षणप्रणाली यास कारणीभूत आहे. स्वामीजी सांगतात की, 'गाढवाचा घोडा होईल अशा अपेक्षेने गाढवाला बेदम मारणाऱ्या माणसाच्या पध्दतीप्रमाणे असणाऱ्या आपल्या शिक्षणपद्धतीला आपण एकदम तिलांजली दिली पाहिजे. जबरदस्तीने सुधारणेचा केलेला प्रयत्न हा सुधारणेलाच अडथळा आणतो. सिंह होण्याच्या एखाद्याच्या मार्गात आपण जर अडथळा आणला तर तो मात्र कोल्हा होईल.' हे विचार वर्तमानकाळाशी सुसंगत असल्याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही.

पुस्तकात पुढे व्यक्तिस्वातंत्र्याची विकासातील भूमिका, शिक्षण व माहिती यांमधील भेद आणि 'माणूस' निर्माण करणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता यावर प्रकाश टाकला आहे. एकाग्रतेचं शिक्षणातील महत्व, आत्मविश्वासाचा प्रभाव, विचारांचे सामर्थ्य, व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक पैलू, महापुरुषांचा आदर्श यावर स्वामीजींनी मांडलेले विचार वाचनीय आहेत. आपली प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती आणि गुरू-शिष्य संबंध, त्या शिक्षणपद्धतीची उपयुक्तता, यावरील स्वामीजींचं विवेचन आपल्याला भारताच्या उन्नत जीवनप्रणालीच्या प्रेरणांचा शोध घेण्यास प्रवृत्त करतं. सहिष्णुता आणि स्वीकृति यामधील भेद समजावून सांगताना त्यांनी आपल्या नकळत आजच्या सामाजिक संघर्षावरील उपायही समोर ठेवलेला असतो.

स्त्री शिक्षणाविषयी विवेकानंदांनीं मांडलेले विचार इतर कोणाही समाजसुधारकापेक्षा अधिक तर्कसंगत वाटतात. समाजशिक्षणाचा त्यांचा विचारही परिवर्तनाची उद्घोषणा करणारा आहे. धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञानाधिष्ठित शिक्षणाचा पुरस्कार करणारे स्वामी विवेकानंद हे पहिले महापुरुष ठरतील. भारत हा या विचारांचा मध्यबिंदू आहे आणि म्हणूनच स्वामीजींचे विचार हे नव्या भारताचे विचार आहेत, असे मानणे क्रमप्राप्त आहे.

स्वामी विवेकानंदांचे हे तेजस्वी विचार मंदिरातल्या घंटानादाप्रमाणे कानात घुमत राहतात - "आज आपल्या देशाला लोखंडी स्नायूंची व पोलादी नसांची गरज आहे ; आज आवश्यकता आहे या विश्वाच्या गूढांचा व रहस्यांचा भेद करणाऱ्या, वाटेल त्या रीतीने आपले इष्ट साध्य करून घेणाऱ्या, वेळी गरज पडल्यास अगाध समुद्राच्या तळाशी जाऊन मृत्यूशी मुकाबला करणाऱ्या व जिला कोणीही रोखू शकणार नाही अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची. 'माणूस' घडविणारा धर्म आपल्याला हवा आहे. 'माणूस' निर्माण करणारे सिध्दान्त आपल्याला हवे आहेत. 'माणूस' निर्माण करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे."

या विचारांचा आवाका आणि सामर्थ्य प्रचंड आहे. एका साध्या वाक्यात अनेक प्रकारचे अर्थ सामावलेले असतात. स्वामीजींच्या विचारांचं संपूर्ण आकलन अशक्य आहे. माझ्या अल्पबुध्दीने अनुभवलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा लहानसा प्रयत्न (खरंतर धाडसच) मी केलंय. प्रत्येकाने अभ्यासावे असे हे पुस्तक असून त्यातील विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण नव्या भारतीय विचारधारेचं (आणि त्याअनुषंगाने वैश्विक विचारधारेचं) प्रतिनिधीत्व करतात...

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*