शिक्षक – विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त "प्रिय मुख्याध्यापक"

शिक्षक – विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त  "प्रिय मुख्याध्यापक"

 
आपण जे शाळेत शिकतो आणि आपण जी काही नोकरी करतो त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, असं म्हणतात.

आपण जे शाळेत शिकतो आणि आपण जी काही नोकरी करतो त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, असं म्हणतात. उदहारणच द्यायचं झालं तर कॉमर्स शाखा असलेली मुलं शाळेत किंवा आर्ट्स शाखेचे विद्यार्थी बँकेत नोकरी करतात.

म्हणजे मुलं आज शाळांमधून जे काही शिकत आहेत, त्या शिक्षणाचे त्यांच्या आयुष्यात काय महत्त्व आहे, काय उपयोग आहे, शिक्षण अर्थपूर्ण करण्यासाठी त्यात काय बदल करावे लागतील, शिक्षणाचा मुलांच्या स्वातंत्र्याशी आणि देशाच्या हिताशी काही संबंध आहे का? शाळांनी त्यासाठी काय करायला हवं, शिक्षणाशी संबंधित छोटया पण महत्त्वाच्या गोष्टींचा मुलांच्या मनावर कसा परिणाम होतो, असे अनेक प्रश्न आपल्या मनात डोकावतात.

पण आपण त्याचा पुढे काहीही उपयोग करत नाही. केवळ विचार करतो आणि सोडून देतो. मात्र नेमक्या याच प्रश्नांकडे लेखक शंकर मुसाफिर यांनी ‘प्रिय मुख्याध्यापक’ या त्यांच्या पुस्तकातून लक्ष वेधले आहे. या पुस्तकाचा अनुवाद डॉ. प्रदीप गोटुस्कर यांनी केला आहे. शाळेच्या रोजच्या वातावणात छोटे-छोटे बदल केले तर मुलांचं शिक्षण अतिशय सुखद आणि अर्थपूर्ण कसं होईल याबाबत त्यांनी आपल्या पुस्तकातून अनेक सूचना आणि कल्पना त्यांनी मुख्याध्यापकांसमोर मांडल्या आहेत.

या कल्पना मुलांच्या भावविश्वाशी आणि त्यांच्या अनुभवाशी निगडित आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर पावसाचं पाणी कसं वाचवावं, ऊर्जेची बचत कशी करावी, भाजीपाल्याचा बगीचा आणि टाकाऊ वस्तूंचं भांडार कसं करावं आदी गोष्टी त्यांनी अतिशय सोप्या शब्दांत मांडल्या आहेत. याचबरोबर त्यांनी शाळेचं वाचनालय मुलांसाठी उपयोगी कसं असावं, प्रयोगशाळा कशी असावी, तिथे कोणते कार्यक्रम घ्यावेत, तसंच वर्ग आणि शाळेच्या भिंती मुलांच्या कलाकृतींनी कशा जिवंत करता येतील, कलादालनं कशी असतील, वार्षिक संमेलनं कशी असतील, इतकंच नाही तर परीक्षा आणि शाळेच्या सहली आदींविषयी अनेक कल्पना या पुस्तकात मांडल्या आहेत.

अर्थात शाळा जे काही करते ते मुलांसाठीच करते. पण तरीही शाळेचं वेळापत्रक आखताना आणि विविध कार्यक्रम घेताना कधी कधी मुलांचा विसर पडतो. म्हणून त्यांनी पुस्तकात मांडलेल्या कल्पनांचा विचार करून काही बदल करायचे असतील तर ते मुख्याध्यापकांनाच करावे लागतील. म्हणून त्यांनी मुख्याधापकांना उद्देशूनच या पुस्तकाचं शीर्षक दिलं असून प्रत्येक प्रकरणाची सुरुवात ही ‘प्रिय मुख्याध्यापक’ म्हणजे मुख्याध्यापकांना उद्देशून केली आहे. मात्र असं असलं तरी मुख्याध्यापकांवर कुठेही टीका केलेली नाही. उलट या पुस्तकाच्या द्वारे लेखक तुम्हाला कोणताही बदल किंवा नवीन काही करायचं असेल तर विचार करायला भाग पाडतात.

थोडक्यात वरची उदाहरणं वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की शाळेशी निगडित अशा काही गोष्टी यात मांडल्या आहेत की ज्यापासून शिक्षणात मोठे बदल घडू शकतात. पण हे सांगताना त्यांनी काही सिद्धांत मांडलेले नाही, तर शिक्षकांना जमतील आणि विद्यार्थ्यांना समजतील अशा साध्या गोष्टी सांगितल्या आहेत.

मुळात लेखक याच पेशात असल्यामुळे ज्या गोष्टी त्यांना प्रखरतेने जाणवल्या याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. कारण शिक्षकांवर तास शिकवणे, वह्या तपासणे, रिपोर्ट लिहिणे, ट्रेनिंगला जाणे, रोज पाच तास शिकवणे, प्रयोग करणे, असं अनेक गोष्टींचं ओझं डोक्यावर असतं. म्हणून त्यांनी मांडलेल्या कल्पनांचा शिक्षकांवर बोजा पडणार नाही याची काळजी घेतली आहे.

उलट कल्पनांमधून शिक्षकांवरील भार कमी कसा होईल याचाच प्रयत्न केला आहे. आजच्या शिक्षणपद्धतीवर या पुस्तकात जरी टीका केली असली तरी त्यापलीकडे जाऊन सहज करता येण्यासारखे उपाय आणि कल्पना सुचवल्या आहेत. काही सोप्या उपायांतून शाळेचा परिसर आणि शाळेतील कार्यक्रम बदलता येतील आणि त्याचा शिक्षकांना फायदा होईल हे बघितलं आहे. हे प्रयोग केवळ एका वर्गापुरते मर्यादित नसून शाळेच्या स्तरावरीलही आहेत. हे सगळं सांगताना अतिशय सोप्या शब्दांत त्यांनी मांडणी केली असून मधून मधून काढलेल्या चित्रांमुळे हे पुस्तक वाचावंसं वाटलं.

 तसंच या पुस्तकाचा अनुवाद डॉ. प्रदीप गोटुस्कर यांनी केला असला  तरी ते  अनुवादित अजिबात वाटत नाही, पुस्तकाचं मुखपृष्ठही अतिशय समर्पक असं आहे. थोडक्यात शिक्षकांनी आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या प्रत्येकानेच आवर्जून वाचावं आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असं हेच पुस्तक आहे.



सौ.मनिषा राजन कडव 
मुख्य ग्रंथपाल डी.एस. हायस्कूल ,शीव , मुंबई - २२

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*