एका समृद्ध शाळेचा प्रवास
एका समृद्ध शाळेचा प्रवास
शाळेचा संपूर्ण परिसरच एक शैक्षणिक साधन बनावे म्हणून मुलांच्या अवतीभवती अनेकविध कल्पकतापूर्ण गोष्टी अंतर्भूत कराव्यात, यासाठी वाचकांना उत्स्फूर्त करण्याचे काम हे पुस्तक करते. मुलांचा तसेच शिक्षकांचाही विचार करून या सर्व कल्पना साध्या-सोप्या प्रकारे, हसत-खेळत वापरता येतील अशा असून, त्या महागड्या नाहीत.
कल्पक शिक्षक, इंजिनियर, आर्किटेक्ट तसेच संस्थाचालकांच्या व अधिकार्यांच्या सहाय्याने अस्तित्वात असलेल्या शाळेच्या वास्तूतसुद्धा ‘बाला’च्या कल्पनांचा अंतर्भाव करता येईल. शिक्षणपद्धतीतील भौतिक, तांत्रिक, संस्थेच्या अधिकारक्षेत्रातील विचारपरिवर्तनामुळे हे शक्य होऊ शकते. या कबीर वाजपेयी लिखित या पुस्तकात भौतिक क्षेत्रावर भर देण्यात आलेला असून, वाचक व इतर संबंधित याचा मतितार्थ व इतर क्षेत्रातील संबंध समजून स्वत:च्या परिने त्याचा वापर करतील.
कुठलीही शाळा, मग ती खेड्यातील असो, गावातील असो वा शहरातील असो, त्याच्या निर्मितीप्रक्रियेत अनेक लोकांचा सहभाग असतो. सरकार शाळेला परवानगी देते, संस्था त्यासाठी जागा उपलब्ध करते, आर्किटेक्ट तिचा आराखडा तयार करतात, मजूर व गवंडी ती बांधतात, इंजिनियर कामाची देखरेख ठेवतात, शिक्षण खाते त्याची पाहणी करते, व्यावसायिक प्रशिक्षक प्रशिक्षण देतात, अभ्यासक्रम आखला जातो, पुस्तके छापली जातात व मगच शिक्षक प्रत्यक्ष वर्गात शिकवतात.
बर्याच वेळा या वेगळ्यावेगळ्या यंत्रणा व व्यक्ती स्वतंत्रपणे काम करतात. त्यामुळे मुलांसाठी आवश्यक असलेला शिक्षणातील सुखद अनुभव हिरावून घेतला जातो. या सर्व संबंधितांना शाळेच्या कामाकडे सर्वंकष दृष्टीने पाहून सहकार्याने काम करण्याची संधी या पुस्तकामुळे मिळेल.
या पुस्तकाचा हेतू व उपयोग
प्राथमिक शिक्षणाबाबत कोणतेही नियोजन करताना व अमलात आणताना मुले व शिक्षक यांचा प्रामुख्याने विचार करावा, असे हे पुस्तक सांगते. प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती व संस्थांनी या पुस्तकातील संकल्पना पाहून त्यात गरजेनुसार बदल करावा. या व्यक्ती व संस्था म्हणजे :
* शाळेतील शिक्षक, पालक व खासगी शाळांचे संचालक.
* आर्किटेक्ट व इंजिनियर (आराखडा व बांधकाम संदर्भात).
* संस्था, गाव व जिल्हा पातळीवरचे शिक्षण समन्वयक.
* राज्य वा जिल्हा स्तरावरचे नियोजक व अधिकारी.
* राज्य वा राष्ट्रीय स्तरावरचे शिक्षणविषयक धोरण ठरवणारे अधिकारी.
हे सर्व मिळून आपल्या कार्यक्षेत्राच्या अखत्यारित, शिक्षणाला पूरक अशा योजना तयार करून शाळेच्या परिसराचा बाह्यांगीण विकास करून ते एक शैक्षणिक साधन बनवू शकतात.
उदाहरणार्थ, राज्य वा राष्ट्र पातळीवरील धोरण ठरवताना शाळेच्या बाह्यांगीण विकासाचा विचार करून आवश्यक बदल घडवावेत. योग्य शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी व शाळेच्या परिसरातील कोणत्या घटकांचा विकास करता येईल याचे मार्गदर्शन हे पुस्तक करेल. शाळेच्या परिसराचा अर्थपूर्ण व शिक्षणाला पूरक उपयोग होण्यासाठी व त्याला साकार करण्यासाठी आर्किटेक्ट व इंजिनिअर यांचीही मदत होईल. पालक व शिक्षण-संस्थाचालकांना या पुस्तकात त्यांच्या शाळेसाठी वापरता येतील अशा असंख्य कल्पना सापडतील. शिक्षकांना तर उपलब्ध जागेचा व साधनांचा योग्य वापर करण्यासाठी कल्पनांचे भांडारच या पुस्तकात सापडेल.
या पुस्तकात अभिनव कल्पनांचा खजिनाच आहे. वेगवेगळ्या प्रकारे योजना करून त्या अमलात आणण्याच्या पद्धतींचाही येथे परामर्श घेतला आहे. राष्ट्र व राज्य पातळीवरील सरकारी योजनांची यादी जी ‘बाला’च्या संकल्पना राबवताना उपयोगी पडेल व त्यासाठी आवश्यक संस्था व तांत्रिक सहाय्याची ही यादी यात दिली आहे.
सौ.मनिषा राजन कडव
१६/ए ओमशिवमकूपा को-हौ- सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग -४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
Comments
Post a Comment