परीघ - स्ञीयांसाठी संदेश
परीघ - स्ञीयांसाठी संदेश
पुस्तक नेहमीप्रमाणे कौटुंबिक आहे ही कादंबरी. माणसाची विशेषत: स्त्रियांची नाती आणि त्यातून दिसणारे स्त्री स्वभावाचे विविध पैलू हे वैशिष्ट्य आहे ह्या कादंबरीचं. सुधा मूर्ती इतकं सविस्तर वर्णन करतात आणि प्रत्येक गोष्ट इतकी उलगडून सांगतात की त्याचा प्रभाव नक्कीच राहतो. तसं बघायला गेलं तर अगदी साधी कथा पण वास्तव दर्शन घडवणारी. "लिहायला माणूस काहीही लिहू शकतो किंवा लेखक वेगळा माणूस वेगळा" असं त्यांच्या बाबतीत बोलणंच नको. कारण उत्तम निरीक्षण आणि मानवी जीवनाचा दांडगा अनुभव आहे. या लेखिका सुधा मुर्ती यांच्या कादंबरीचा सुंदर अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे.
कथेची नायिका मृदुला सर्वसामान्य स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. खेडेगावात राहणाऱ्या, सरकारी शाळेची शिक्षिका असणाऱ्या, ह्या सुंदर तरुणीचं लग्न संजय नावाच्या एका हातात व्यंग असलेल्या डॉक्टरशी होतं आणि पुढे त्यांचा संसार कसा सगळी संकटं पार करून बहरतो हे तर प्रत्येक घराचं चित्र, पण प्रत्येकाची केस वेगळी कारण प्रत्येकाची तत्व, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा. प्रत्येक दाम्पत्याची एकमेकांशी जुळवून घेण्याची पद्धत वेगळी.
वेगळेपण हे आहे कथानकाच की एके काळी आनंदी , उत्साही आणि समरसून संसार करणारी मृदुला, मनोविकाराने त्रस्त होते. कारण तिचा साधा , सरळ स्वभाव ह्या व्यवहारी जगात बावळटपणा ठरतो. कुणावरही पटकन विश्वास ठेवणं, मनमोकळ बोलण हे तिचे दुर्गुण आहेत की काय, असं वाटायला लावणारे अनुभव तिला येतात. एकीकडे माझा संसार, माझा नवरा, मुलगा अशी गुंतलेली मृदुला ज्यावेळी त्यांच्यातले बदल अनुभवते त्यावेळी पार कोलमडून जाते. संजय ने तिच्या अपरोक्ष केलेले पैशांचे व्यवहार तिच्या समोर येतात आणि तिच्या विश्वासाला तडा जातो परिणामी तिला डिप्रेशन येतं. त्या परिस्थितीत सुध्दा एका प्रथितयश डॉक्टरची बायको दुसऱ्या डॉक्टरकडे मानसोपचार घेते आहे हे बरं दिसणार नाही म्हणून एकटीच कुणालाही न सांगता उपचार घेते नवऱ्याचा विचार तिथे सुध्दा. तरीही प्रयत्नांती तिचा आत्मविश्वास तिला परत मिळतो.
संजय तिच्याकडे दुर्लक्ष का करतो? तर तिचा आदर्शवाद त्याला पटत नाही. त्याला सुंदर , गृहकृत्यदक्ष बायकोपेक्षा ती सुध्दा डॉक्टर असती तर.. असं वाटायला लागतं आणि तिथे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. हा विचार करताना तो तिच्याच शाळेच्या कमाईमळे एक हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकला, कर्जाची रिस्क घेऊ शकला हे मात्र सोयीस्करपणे विसरून जातो. संवेदनशील मन असल्यामुळे तिला लोकांना मदत करायची इच्छा असते, व्यवहारातील अफरा तफर तिला सहन होत नाही. तरुण मुलगा सुध्दा स्वतः चे निर्णय स्वतः घेतो.
थोडक्यात तिच्या भावविश्वात काय घडलय ह्याची कुणालाही पर्वा नसते. पण मानसोपचार घेऊन स्वतः ची सकारात्मक विचार शक्ती आणि मन:शांती परत मिळवलेली मृदुला घर सोडून गावी जाण्याचा धाडसी निर्णय घेते. पुन्हा आपल्या गावी बदली करून घेते आणि जाण्याआधी संजयला सांगून निघून जाते, अशा ठिकाणी जिथे ती एकटी असली तरी तिला मनोरुग्ण म्हणणार कुणी नसत. तिची ती स्वतंत्र, आनंदी जीवन जगणार असते. खूप शांतता, खूप उत्साह कारण मोठ्या कष्टाने तिने हा आत्मविश्वास परत मिळवलेला असतो.
ही पूर्ण कथा सांगावीशी वाटली कारण पुस्तक वाचाल तेव्हा वाचाल, मृदुला गावी स्वतः च घर विकत घेते, माहेरी रहात नाही, कारण लग्न झाल्यानंतर सासूने दिलेला सल्ला तिने अमलात आणलेला असतो, स्वतः च्या कमाईतून स्वतः साठी दर महिना पैसे बाजूला ठेवते. इतकी वर्ष जमवलेले पैसे तिच्या असे उपयोगी येतात.
काही झालं तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम रहा, स्वतः च्या सुरक्षेसाठी पैसे राखून ठेवा. माझा संसार म्हणून भाबडेपणाने सगळा खर्च स्वतः करू नका. माणूस कोणत्याही क्षणी बदलू शकतो हे कायम लक्षात असू द्या. व्यवहारी जगात टिकून राहायचं असेल तर भावनिकदृष्ट्या सुध्दा स्वावलंबी व्हा , नाहीतर मनाचा आजार तात्कालिक असला तरी लोकं त्याचा फायदा घेऊन तुम्हाला हिणवू शकतात. स्वतः च्याच संसारात सजग रहा, संयम ठेवा, प्रेमाने संसार सांभाळायचा प्रयत्न नक्कीच करा पण अन्याय होत असेल धाडसी निर्णय जरूर घ्या कारण प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा आहे. लेखिका सुधा मुर्तीनीं हाच संदेश या कादंबरीतून दिला आहे .
सौ.मनिषा राजन कडव
छान लिहिले ,सुधा मुर्तींच्या पुस्तकाविषयी ...!
ReplyDelete