क्रौंचवध
क्रौंचवध
स्वातंत्र्य पुर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील शेती, शेतकरी स्थिती व त्यांची अवस्था..
वाल्मिकी कोणी बनाव....?
[क्रौंचवधकादंबरी यातील श्रमिक व शेतकरी]
(काळ बदला पण शेतकऱ्यांच्या रूपाने होणारे क्रौंचवध थांबले नाहीत ...)
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः|यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीःकाममोहितम्ः ||
क्रौंचपक्षाचे एक जोडपे आनंदाने झाडावर प्रणयक्रीडा करित बसले होते. एका पारध्याने बाणाने त्यातले नर पाखरू मारले. ते मरून खाली पडल्यावर जोडीदारणीने जो आक्रोश केला,तो वाल्मीकी ऋषींच्या ह्र्दयाला जाऊन भीडला. वाल्मीकीचा शोक अनावर झाला.व वरील श्लोकाच्या रूपाने प्रगट झाला. एका पक्षीणीच्या दुःखाने त्या महर्षीचे अंतःकरण व्याकुळ झाले. खरी कला अशीच सह्रदय असते. जगातले कुठलेही दुःख तिला पाहवत नाही. उत्तर रामायणातील या काव्यात्मकतेचा आधार घेऊन वि. स. खांडेकर यांनी "क्रौंचवध" ही कादंबरीची निर्मिती केली.
ही कादंबरी सर्वप्रथम १९४२ या साली प्रकाशित झाली. तो कालखंड स्वातंत्र्यपूर्व भारतीय कालखंड होता. इंग्रज अधिपत्याखालील कालखंड म्हणजे भारतीय गुलामीचा काळ, तेव्हा भारतमाता व सर्व भारतीय यांचे हाल पाहून वि. स. खांडेकर यांची स्थिती ऋषीमुनी वाल्मीकी सारखी झाली यात दुमत नाही. भारत परकीयांच्या तावडीतून मुक्त झाला पाहिजे ही तळमळ कादंबरीच्या ठायी-ठायी दिसून येते, म्हणून कादंबरीनिर्मिती झाली त्रिकाल सत्य आहे. येथील कष्टकरी, शेतमजूर व शेतकरी यांचे हाल, त्यांची उपासमारी व शारीरिक हाल त्यांचे रोजचेच मरण! हे त्यावेळेसच्या व्यवस्थेचे निषाद रूप क्रौंचवध करणाऱ्या पारध्यापेक्षा वेगळे नाही. हे लक्षात येऊन "क्रौंचवध" या कादंबरीचा जन्म त्यांच्या हातून झाला. त्यावेळेसच्या व्यवस्थेविरूध्द हे एक छुपं आणि कारगर अस्त्र व हत्यार होतं.
ही कादंबरी देशप्रेमाचे मुर्तीमंत उदाहरण आहे. देशप्रेम हा आत्मा घेऊन, कादंबरी चार मुख्य पात्राभोवती फिरते. दादासाहेब दातार संस्कृत पंडित. एक प्राध्यापक, सुलोचना आईविना वाडलेली दादासाहेबांची एकूलती एक हुशार मुलगी. दिनकर सरदेसाई दादासाहेबांच्या मित्राचा मेहुणा. भगवंतराव हे विदेशी विधाविभूशित संस्थानचे डॉक्टर.संदर्भ पात्र संस्थानिक राजसाहेब, दिनकरची आई आणि दिनकरचे वडील.
सोन होऊ नका लोखंड व्हा! मनुष्य नुसत्या भाकरीवर जगत नाही, पण तो भाकरीवाचून ही जगणार नाही. आज मालमत्तेचा महत्त्व आहे , पण मनुष्यास नाही. जीवन ही मानवतेची पुजा आहे. मानवतेच्या आयोजी आपण दगडाची पूजा करतो. जिथं ऋषींमुनीचं रूपांतर भिक्षुकात झाले आहे. शुरविरांची जागा गुलामगिरीने घेतली आहे. जिथे गुलामगिरीच्या बळावर चैन करणे, दलालाशिवाय व्यापार नाही. बेगडी सौंदर्याशिवाय कशाचीच उपासना नाही. अशा देशात गांधीजी जन्माला आले. काय त्यांचा गुन्हा? कृतीतून अमानूस अत्याचार दूर करण्यासाठी सस्थानिकाविरोधात बंड करणारा आणि त्यासाठी तुरूंगात जाऊन तुरुंगवास भोगणारा दिनकर! मानवतेचा उपासक आणि प्रस्थापिता विरोधात बंडखोर!
एक दिवस दिनकर सुलूला घेऊन रामगडच्या बाजारात फिरतो. धुळीने मळालेले कपडे घालून लाकूड विकायला आलेले गाडीवान दिनकरला येऊन भेटतात. व्यापाऱ्यांनी केलेल्या आडवनूकिबाबतची कैफियत सांगतात. त्याच्या लाकडाचा मोबदला म्हणजे आमच्या कष्टाचे ही दाम नाही. वयाच्या अवघ्या पाच वर्षांपासून कामे करणारी हे कष्टकरी शेतकरी जगावे तरी कसे? पुढे गेल्यावर मिरच्या विकणाऱ्या बाया एका झाडाखाली बसून कोरड्या मिरचीबरोबर भाकर खात असलेल्या दिसल्या. कुटक्यासाठी आयुष्याचं मोल किती फक्की असाव? हे भोगल्याशिवाय फक्की गरीबी कशी कळेल? मिरच्या विकत खो - खो खोकलणाऱ्या डोळे खोल गेलेल्या व शरीराचे कातोडे लोबणाऱ्या आजीबाईचा क्षय व गरिबी सारखी नव्हे काय? हे सर्व पाहून त्यांना मदत करणारा दिनकर हा रघुच्या सर्गातील दानशूर, वेळप्रसंगी आपली मांडी कापून पक्षाना खाऊ देणारा राजा दिलीप! दिनकरचं नाव सुलोचनाने दिलीप ठेवलं हे सार्थ आहे.
आई हो! अशा दिलीपने सुलूला दिलेल्या रिमार्क हा सुलूला योग्य वाटू लागला. सार दैन्य पाहात असताना ती गोरगरीबाची आई झाली. कृतीने आई बाळासाठी डोळ्याचा दिवा करते, हाताचा पाळणा करते, गोरगरीबासाठी श्रमिक व शेतकरी यांच्यासाठी मी हे करु शकेल का हा प्रश्न तिला पडतो? दिनकरला, गरिबांसाठी संस्थानिकांच्या विरोधात बंडाचा मुख्य सूत्रधार म्हणून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावळेस तो म्हणतो "सुलूचा मलगा म्हणून जन्माला येईन तेव्हा हा आपला प्रिय भारत स्वतंत्र झालेला असेल. आजचा आडाणी अर्धपोटी राहाणारा शेतकरी आपल्या मायबोलीचा सुखी सेवक आणि शुर सैनिक झालेला असेल!"
भारत स्वतंत्र होउन आज ७३ वर्षे पूर्ण झाली आहेत तरी भारतीय श्रमिक व शेतकरी आजही कादंबरीत १९४२ साली वि. स. खांडेकर यांनी वर्णिलेला भारत आज जशास तसा आहे. शेतकरी यांच्यारुपाने हजारो क्रौंचवध होत आहेत. यावधाचा पारधी कोण?
वाघ आपले सावज पकडल्या - पकडल्या ठार मारत नाही. तो त्याला खेळवतो. त्यात त्याला खरी मजा वाटते. राजकिय इच्छाशक्तीच असच आहे. ती वाघ आहे. श्रमिक व शेतकरी यांच्यासाठी सावजच नाहित का?
सारी राजधानी जळत असताना रोमचा नीरो राजा सारंगी वाजत बसला होता. सुशिक्षित, संपन्न व राजकीय मानसे नीरो राजासारखी म्हणावी लागेल. ज्यांच्या जीवावर आपण जगत आहोत त्यांचे जीने किती कष्टप्रद आहे, हे आपणास समजत नाही का? खरे पारधी आपणच आहोत. राजकिय इच्छाशक्ती हे मुळ पारध्याचे रूपक आहे. यावर अशीच डोळेझाक होत राहिली तर शेतकरी आत्महत्या रुपाने असेच अनैक "क्रौंचवध" देशात होत राहातील. मग खरा प्रश्न आहे वाल्मीकी बनण्याचा आणि तो बनाव कोण?खरी गरज आहे, शेतकरी व श्रमिकांच्या हीताशी खेळणाऱ्या हर एक घटकास व व्यवस्थेस शाप देणारा... एक वाल्मीकी!
या पुस्तकातून काय घेण्यासारख आहे -- आणि का वाचाव ...?
विशेषता – संवेदनशील मनाचा उत्कट अविष्कार
कॉलेजाचं वेध लागलेल्या / नुकत्याच कॉलेजात प्रवेश घेतलेल्या कुमारवयीन मुलामुलींसाठी मी हे पुस्तक नक्कीच सूचवेन .
विषय-वस्तु –
बुद्धी आणि भावना.. यांचा समतोल साधता आला तर.. आयुष्य खरंच सुंदर आहे.
प्रेम.... कोवळ्या वयाची तरल भावना...
आणि हेच वय.. आपली बौद्धीक क्षमता सिद्ध करण्याचं.
बऱ्याचदा काही मिळवण्यासाठी काहीतरी सोडून द्यावं लागतं.. आणि मग तिथेच गल्लत होते.
प्रेम मिळालं नाही म्हणून आपलं आयुष्य संपवणारे किंवा यशाच्या पायऱ्या चढत जाण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रेमाचा बळी देणारे.. यांच्यात तसा काही फरक नाही.
.... कारण, "समतोल " दोघांनाही साधता आलेला नसतो.
हा समतोल कसा साधावा? याचे काही गणिती ठोकताळे या पुस्तकात दिलेले नाहीत. पण, अशी पुस्तकं वाचल्याने आपल्या आतल्या संतुलनासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू होते.
गांधीवाद.
विरोधकांनी टिका केलेला नाही.. समर्थकांनी पायदळी तुडवलेलाही नाही.. खराखुरा गांधीवाद.
...
मानवी मनाची सर्वोच्च पातळीवरची आदर्श जडणघडण. कदाचीत इतकी आदर्श की आपल्या कक्षेत अजिबात बसत नाही.
कारण?
आपण बौद्धत्वाच्या इतक्या वरच्या पातळीवर जगत नाही.
पण शेवटी हे ही खरंच आहे की करूणेची ती पातळी गाठल्याशिवाय आपण पुढेही जाऊ शकत नाही. आजचा चलतीचा शब्द "विकास " म्हणा हवं तर.
गांधींचं समर्थन आहे मानवाच्या आतल्या विकासाला. ह्रदयाने जगण्याला..
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधींच्या मार्गाने जाऊ पहाणारा एक मुलगा वैचारीक संघर्षातून क्रांतीकारी मार्गाकडे कसा पोहोचतो.
ह्रदयहीन जिवनपद्धीत गुदमरून गेलेली एक मुलगी प्रेमाच्या सर्वोच्च आदर्शांना जपून ठेऊ शकेल? चला पाहूयात.
आसमंतभर पंख पसरून उडू पहाणाऱ्या हळव्या तारूण्याला जपायला हवं. प्रौढत्वाचे वज्राघात होऊन जगाच्या क्रूर रहाटगाडग्यात अडकून पडण्याआधी.
आदर्श फार गुडी गुडी असतात हे खरं.. पण या आदर्श कल्पना पुर्ण होण्याची स्वप्न पहाणारांनीच सशक्त समाज उभा करण्याचा प्रयत्न केलेला असतो हे ही तितकंच खरं.
चला ,इतकं गंभीर नका होऊ. थोडसं स्मित करा आणि "क्रौंचवध " वाचायला घ्या. कारण,
गांधींचे सारे तत्वज्ञान त्यांच्या स्मितात प्रकट झाले आहे. मानवधर्माची ती उज्ज्वल पताका आहे. गांधींचे स्मित म्हणते - सारे जग आपले आहे. आपण सारे भाऊभाऊ आहोत.
सौ.मनिषा राजन कडव
छान परीक्षण केलय ,आवडल 💐💐💐
ReplyDeleteSuprbb
ReplyDelete