सारांश शून्य
सारांश शून्य
या पुस्तकांचे मनोगत व्यक्त करताना लेखक संजय कळमकर म्हणतात की, ' अनेक शिक्षकतज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहून शिक्षणात अमूक बदल झाला पाहिजे, शिक्षकांने तमूक केले पाहिजे, असं सांगून मोकळा होता. बहुतेक वेळा तो शिक्षण पद्धतीवर टिका करतो. परंतु सुधारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे मात्र सांगत नाही.'
लेख लिहिणं, चर्चासत्रात मोठ्या मोठ्या गप्पा मारणं, सल्ले देणं वेगळी गोष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष वर्गावर जाऊन शिकवणं ही वेगळं आहे.
याचे समर्थ करताना लेखक म्हणतो की, ' पहिलीच्या मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतेचा अभ्यास करून त्यावर लेख लिहिणारा प्रत्यक्ष पहिलीच्या वर्गावर दहा मिनिटे सुध्दा टिकणार नाही. बाराखडीतील अमुक एक अक्षर लिही असं सांगेपर्यंत तर एखादं पोरगं चड्डीत शू करते तेव्हा अशा अचानक आलेल्या संकटाला फक्त शिक्षकच तोंड देऊ शकतो.'
या पुस्तकात लेखकाने अगदी शिक्षणमंत्र्यापासून ते जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या कामाच्या पद्धती, त्रुटी व उपाययोजना सुचविल्या आहेत.
या पुस्तकाचा हिरो आहे 'नारायण जगदाळे' नावाचा एक तरूण शिक्षक. सुरूवातीचा कालावधी शिक्षणसेवक व नंतर शिक्षक. हा सातत्याने प्रत्येक विद्यार्थी सुधारला पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. यात नारायणला आडवे येणारे त्याचे सहकारी, अधिकारी, गावातील तथाकथित पुढारी व त्यांचे फुटकळ कार्यकर्ते.
कधी प्रशिक्षण तर कधी अधिवेशन, कधी अधिकाऱ्यांची शाळेला भेट तर कधी कुठल्या शिक्षकांवर अन्याय झाला म्हणून शाळा सोडून त्याच्या निषेधार्थ मोर्चा, अशा गोष्टी मुळे निराश होणारा नारायण वर्गात मात्र चांगलाच खुलतो.
कधी विनोदी ढंगाने तर कधी गांभिर्याने काळजाला हात घालणारे वर्णन या पुस्तकात केले आहे.
यात नारायण शंकर जगदाळे नावाचा एक तरूण मंगळापूर ता. भांबोरी या गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षणसेवक म्हणून नोकरी लागतो.
घरची परिस्थिती अतिशय नाजूक असते. घरात म्हातारी आई, कॅन्सर झालेली दुर्गा नावाची बहीण, बाप दारूच्या व्यसनामुळे मेला म्हणून त्याच्या तडख्यातून शिल्लक राहिलेली दोन एकर कोरडवाहू जमीन.
नारायणाने परिस्थितीचे प्रचंड चटके सहन केल्यामुळे त्याला वाटत राहते की, तो ज्या पोरांना शिकवतो ती पोरं चांगली शिकली पाहिजेत. यासाठी तो जिवापाड मेहनत करायला तयार असतो.
वर्ग सजावट, कृतीतून शिक्षण, अवांतर तास, परंतु याच्या तळमळीचा त्रास त्याच्या सहकार्यांना होत असतो. कारण, नारायणाच्या शिकण्याची तुलना इतरांशी होत रहाते. नारायणाला पुस्तकं वाचण्याची आवड असल्याने त्याची वैचारीक बैठक ही चांगली असते.
एकदा गावात काही कारणांमुळे किर्तनाला महाराज आला नाही म्हणून गावकऱ्यांनी नारायणाला बळंच प्रवचन करायला सांगितले, तेव्हा त्यांने मृत्यूंजय कादंबरीतील कथा लोकांना सांगितली. दीड-दोन तास लोकं चांगलीच खिळवून ठेवली, त्यामुळे गावात त्याच्या विषयी एक आदर निर्माण झाला.
नारायणाला, या प्रवासात त्याला काही अजब गजब नमुने भेटतात...
त्यात पहिले आहेत ते त्याच्याच शाळेचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड सर, वरवर भित्रा वाटतो, परंतु खिचडीतून पैसे, शाळेच्या बांधकामातून पैसे, हडपण्याचा धंदा मात्र साळसूद पणे करत असतो. यात वाटेकरी सरपंच, त्याचे ठरलेले बांधकाम सामानाचे दुकानदार, वाळू व्यवसायिक व कमिशन या सगळ्यांची साखळी याचं वर्णन चांगल्याप्रकारे केलं आहे.
या शाळेत वनिकांत शिंगटे नावाचा एक शिक्षक की जो मुळचा विदर्भातला, डी.एड. मराठवाड्यात अन् आता नोकरी करत आहे पश्चिम महाराष्ट्रात. त्यामुळे यांच्या स्वभावाची अन् भाषेची बी पार मोडतोड झालेली आहे.
" दुसरा शिक्षक घालमोडे, हा जिथं जातो तिथं दिवस मजेत काढतो, पण पोरांना काही शिकवत नाही. प्रशासकीय बदली चा राग पोरांवर काढतो व त्यांचं नुकसान करतो. तसेच लोकांच्या शेतावर फिरायला म्हणून जातो अन् भाजीपाला घेऊन येतो. एवढंच काय पण हा घालमोडे जेवणाच्या वेळी लोकांची घरी जाऊन जेऊन सुध्दा येतो. कधी टाचण काढत नाही, कधी कशाचेही रजिस्टर लिहीत नाही. साहेबांनी जर काही दाखवा असं म्हटलं तर चक्क चोरीला गेलं म्हणून बिनधास्त ठोकून देतो. या घालमोडे मास्तरला ना विद्यार्थ्यांना शिकवण्याची फिकीर आहे ना कसल रेकाॅर्ड तयार करायची काळजी आहे. असा हा बेफिकीर अन् निष्काळजी वृत्तीचा घालमोडे सर."
"हा तिसरा सायबंर सर, बायकोनं ताब्यात ठेवलाय म्हणून नीट आहे. दोघांनाही नोकरी त्यामुळं पैशाची चंगळ आहे. तो आपला कामाशी काम अन् घराशी घर असा रहातो."
( एकदा ह्या सायबंरला शिक्षक संघटनेच्या नेत्यांने उसकावले म्हणून 'आदर्श शिक्षक पुरस्कार' ची तयारीला लागला अन् यासाठी त्याने आपल्या शाळेतील सहकारी, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह जे नाही ते प्रयत्न केले. परंतु पुरस्कारातील राजकारणामुळे तो काही मिळाला नाही.
हे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरण वाचण्यासारखे लिहिले आहे. )
"मंगळापूरच्या शाळेतील चौथी व्यक्ती आहे ती मंजी सानप बाई. बाईचा नवरा इंजिनिअर हाय. पैशाला काही कमी नाही, रोज शाळेत पाट्या टाकणे एवढाच काय तो उद्योग. शिकवण्याच्या नावाने बोंब पण पोरांनाच काय येत नाही म्हणून नेहमी कुरकुर. लई वैतागल्या की आठवड्यातून एकदा तरी म्हणणार, ' मी आता स्वेच्छा निवृत्तीच घेते.' पण धाडस काही करत नाही. कारण सातवा वेतन आयोग येत आहे."
" पाचवी बाई म्हंजे कौस्तुके मॅडम, आपला वर्ग भला अन् आपण भलं. कविता करणार, कांदबऱ्या वाचणार म्हणून विनाकारण विचारात एक पोक्तपणा. आपल्याच विश्वात मग्न असणारी, यात कुणी प्रवेश केलेला आवडणार नाही."
"शेवटची आहे शिल्पा गद्रे, ही आहे शिक्षण सेविका. दिसायला सुंदर. म्हणूनच की काय कधी कुणाशी बोलणार नाय."
केंद्र प्रमुख पठारे, साधनव्यक्ती धुळवडे, यांनी घेतलेलं प्रशिक्षण अन् यात सामील झालेल्या शिक्षकांनी प्रशिक्षणाची उडवलेली टर अन् या सगळ्याचा झालेला खेळखंडोबा.
या पुस्तकात एक जिल्हा परिषद सदस्य त्याच्या गावातील शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने चारचाकी गाडी घेतली म्हणून एका पत्रकाराच्या मदतीने त्याच्या विरोधात खोटी बातमी करतो. पण तो शिक्षक ही त्याला पुरून उरतो.
पुढे आरक्षणामुळे तो सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनतो अन् शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव आणून त्या शिक्षकाची बदली लांब करतो.
अत्यल्प शिक्षण झालेला एक सदस्य जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती असतो. त्यानं मर्जीतील माणसाला विज्ञान पेटीचे काॅन्ट्रक्ट देतो त्याच्यातील घोटाळा.
राजकीय पुढारी - शिक्षणाधिकारी - शिक्षण यांच्यातील संबंध अन् त्यामुळे निर्माण होत असलेल्या शिक्षणातील त्रुटी व उपाययोजना चांगल्याप्रकारे या पुस्तकात आहेत.
शिक्षकांच्या मागे लागलेले अशैक्षणिक कामं ती कामं करून वैतागलेला शिक्षक पुन्हा लेकरांना कसल्या मानसिकतेने शिकवणारा बरं?
या मुळे होत असलेले नुकसान.
याचबरोबर काही शिक्षकांचे प्लाटिंग, विमा पॉलिसी, शेती, प्लाॅट- जमिनी ची खरेदी विक्रीच्या व्यवहारातील दलाली असे एक ना अनेक उद्योग, शिक्षक संघटना, त्यातील पुढारी यामुळे शिक्षणावर होणारे परिणाम ही यात सांगितले आहेत.
शिक्षकांना, मुख्याध्यापकांना शाळेचे बांधकाम, खिचडी असे अनेक पैशाच्या संबंधित काम करावी लागतात म्हणून चार-पाच शाळे मागे एक क्लार्क असला पाहिजे.
डिलिव्हरी रजेवर एखादी मॅडम गेल्यावर त्या जागी काही कालावधी साठी शिक्षक नेमावा अशाही सूचना केल्या गेल्या आहेत.
परंतु, शासनास सरकारी शाळा बंद पाडून खाजगीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी हे सर्व करत आहेत असा ही सूर या पुस्तकातून येतोय.
एका ठिकाण शिंगटे च्या तोंडून लेखक म्हणतो की, ' असं किती दिवस फसवून गरिबांच्या पोरांच्या आयुष्याशी खेळणार भौ आपण. ही पोर म्हणजे आपणच की रे लहानपणीचे. बहुतेक शिक्षक बहुजनांचे; त्यात सरकारी शाळा सुध्दा बहुजनांनी खचाखच. बामण बहुजनांना ज्ञान देत नाही म्हणता, आता बहुजनांची तोंडं धरलीयेत कुणी?' हे वाक्य अंगावर येतं.
दिगंबर महाडिक, नारायण सारखाच एक ध्येयवादी शिक्षक ( याचा बी एक घोटाळा त्याच्या चांगलाच अंगलट आला होता.)
सहशिक्षक ते अधिकारी हा प्रवास केला बिडीओ आजबे एक कडक अधिकारी. बेशिस्त व कामचुकार शिक्षकांचा तर क्रुरकर्मा असा वर्णन केले आहे.
शिक्षणतज्ज्ञ हेरंब साने, बिडीओ आजबे, दिगंबर महाडिक व नारायण यांच्यातील चर्चा ही सर्वोत्तम लिहिली आहे.
यात साने म्हणतात, " आज शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर धाक नाही. सुपरव्हिजन करणाऱ्या यंत्रणेचा शिक्षकांवर धाक नाही. सरकारचा यंत्रणेवर धाक नाही. सरकारवर समाजाचा धाक नाही. सारं कसं लगाम सुटलेल्या घोड्यासारखं स्वैर चाललंय. प्रत्येकाची घोंगडी प्रत्येकाखाली गुंतलेली आहे. त्यापेक्षा गल्ल्यात पैसा असो वा नसो तू मला शेठ म्हण, मी तुला शेठ म्हणतो, असाच पोकळपणा चाललाय सारा..."
एका ठिकाणी तर 'शिक्षणांचे व्हाऊचर' म्हणजे शिक्षकांना सरकारने पगार न देता शिक्षणासाठीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर टाकायचे आणि विद्यार्थ्यांने जिथं समजत तिथं जाऊन शिक्षण घ्यायचं अशी संकल्पना सुध्दा आली आहे.
या पुस्तकातील अशा काही ओळी आहेत की ज्या थोड्यावेळ थांबवतात, ज्या ओळी विचार करायला भाग पाडतात.
त्या ओळी अशा...
" आई -बहिणीची साधी विटलेली साडी डोळ्यासमोर घेऊन वावरणाऱ्या पोरांना भपकेबाज साडी, गळ्यात मणभर सोनं घालून आलेल्या बाई आपल्या अशा वाटतील?
बापाचे जीर्ण फाटके धोतर, तुकडा तुकडा लावून जोडलेला नेहरू पाहण्याची सवय असलेल्या पोरांना अंगठ्या, चेन, मलमली कपडे घालून आलेला गुरूजी आपले कसे वाटतील? शिक्षण आणि शिक्षक ही व्रताची दोन रूपे आहेत... भोगवादाची नव्हे."
खरंच,
यात सगळ्या शेवटी ज्याच्या साठी हा सगळा अट्टाहास करायचा आहे तो विद्यार्थी या सगळ्या यंत्रणेत मध्यभागी असायला हवा. परंतु तो सगळ्यात शेवटी आहे. अन् या शेवटी असणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्ततेची हाक पहिल्या माणसापर्यंत पोहचत नाही किंवा हेतूपुरस्सर पोहचू दिली जात नाही. असं हे पुस्तक वाचताना वाटत.
म्हणजेच सगळ्यांचा शेवट काय तर, 'सारांश शून्य'.
अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारं पुस्तक.
सौ.मनिषा राजन कडव
मार्मिक परीक्षण ...!
ReplyDelete