धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी 'ताई मी कलेक्टर व्हयनू '
धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी 'ताई मी कलेक्टर व्हयनू '
या पुस्तकात एका सामान्य कुटुंबाततील श्री.राजेश पाटील हा विद्यार्थी कसा IAS पदापर्यंत पोहोचतो,यासंदर्भात त्यांनी केलेली धडपड याचे यथार्थ वर्णन त्यांनी या पुस्तकात केलेले आहे. सुरुवातीला सामान्य खेड्यातील कसे वातावरण, राहणीमान, त्यांचे वर्तन याविषयी वर्णन केले आहे.
ते त्यांच्या आईला 'ताई' म्हणत आणि वडिलांना 'अण्णा'.. आपल्या परिवाराची परिस्थिती सुधारण्यासाठी, परिस्थिती शी त्या दोघांनी केलेले दोन हात लेखकाने पुस्तकात मांडले आहे. गावात असलेल्या शेतकऱ्यांची किती नाजूक परिस्थिती असते तसेच तो वेळोवेळी कसा तो सावकार, बी-बियाणे खरेदी दुकानदार तसेच व्यापाऱ्यांच्या कडून कसा नाडला जातो, अडचणीत ओढला जातो.. प्रसंगी गहाण ठेवलेली शेती कशी सावकारच्या घशात जाते हे अशोक व तुकाराम यांच्या उदाहरणासहित वर्णन केलेले आहे.. शेतकरी खोट्या प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्न, बारसे, तेरावा, गावजेवान असे विविध धार्मिक कार्य मोठा खर्च करून साजरे केल्याने कसा कर्जाच्या जाळ्यात ओढला जातो व शेवटी त्याची शेतीतला कशी सावकाराच्या घशात जाते याचे यथार्थ चित्रण त्यांनी या पुस्तकात केलेला आहे.लेखक च्या गावात वाढला त्या त्या गावात मुलांनी शिकले पाहिजे या संदर्भात कुणाचीच आस्था नसल्याने गावातील मुले जास्तीत जास्त 5वी पर्यंत शिकत किंवा खूपच झालं तर दहावीपर्यंत शिकत त्याच्या पुढे शिकण्याची आस्था नव्हती कारण बऱ्याच लोकांची मानसिकता अशी होती की शिकून नोकरी मिळत नाही आणि जर नोकरी मिळवायची असेल तर त्याच्याबरोबर पैसा किंवा वशिला या गोष्टी लागतात. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुले यांचा शिक्षणाकडे ओढा कमी होता.
लेखकाच्या आईची इच्छा होती की आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे तसेच लेखकाचे आई-वडील मुलं आणि मुली असे फारकत करत नव्हते त्यांनी आपल्या मुलीलाही शिक्षणासाठी पाठवलं होतं पण घरच्या परिस्थितीमुळे अक्का हुशार असूनही तिला नववीतून शाळेतून काढून टाकावे लागले याचे लेखका ला खूप वाईट वाटलं. लेखक लहानपणी खूपच उनाड असल्याचे त्यांनी प्रामाणिक पणे नमूद केले आहे, लेखकाला पण क्रिकेट, गोट्या,विटी-दांडू यासारखे खेळ खेळायला आवडे. लेखकाचे घरात कमी लक्ष असे आणि बाहेर उनाडक्या करण्यावर जास्त लक्ष असते.पण त्याची आई म्हणजे ताई मात्र चांगले संस्कार देण्यात कुठेच कमी पडू देत नव्हती. लेखक सकाळी शाळा सुरू व्हायच्या अगोदर गावात पाव विकत असे तसेच आपल्या बहिणीबरोबर भाजीपाला देखील विकत असे याचे लेखकाला कधीही चुकीचं वाटलं नाही तसेच लेखक मोठा झाल्यानंतर तो विहीर खुदाई, वाळू भरणे यासारखी कामे करत असे तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीत लेखक आपल्या पुस्तकासाठी तसेच शाळेतील गणवेश साठी पैसे जमा करत असे. लेखक कापूस वेचणीला सुद्धा जाई,जेणेकरून आपल्या कुटुंबाला हातभार लागेल. लहानपणी लेखक जास्त अभ्यास किंवा पुढच्या आपल्या भविष्याबद्दल त्याची चिंता नसायची दिवसभर खेळून काढणे किंवा आपण मोठे व्हावे या संदर्भात त्यांना काही वाटत नव्हते.पण लेखकात खरा बदल ते दहावीत पास झाल्यानंतर व त्या काळात संग्राम नावाचा एक सज्जन,हुशार मित्र त्याच्या जीवनात आल्यानंतर लेखका त बदल होऊ लागला.लेखकात बदल होण्यासाठी,लेखकाने नमूद केले आहे की त्यांनी स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज महात्मा फुले यांची चरित्र व रामायण, महाभारत वाचल्यामुळे लेखकाचा जीवनाबद्दल विचार करायचा दृष्टिकोन बदलला. बारावीत लेखकाला चांगले मार्क पडून ही केवळ पैसे नसल्यामुळे किंवा नातेवाईक यांनी मदत न केल्यामुळे इंजीनियरींग किंवा मेडिकल ला जाऊ शकला नाही पण लेखकाने बीएससी ला ऍडमिशन घेऊन, आक्काचा तसेच मामांचा आधार घेऊन बीएससी चांगल्या मार्काने पास केल्यानंतर लेखक आयएएस कडे वळला.त्या अगोदर लेखकाने इंडियन स्टॅटिस्टिक्स सर्विस सेवा ही उत्तीर्ण केली होती पण लेखकाला आयएएस बनुन समाज सेवा करण्याची इच्छा होती.लेखक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊ शकला नाही पण लेखकाने जिद्द सोडली नाही आणि तिसऱ्या चौथ्या प्रयत्नानंतर आयएएस बनू शकले.
लेखकाच्या शिक्षकाचे एक वाक्य इथे नमूद करावेसे वाटते 'जीवनात तोच माणूस यशस्वी होतो, ज्याला यशाची प्रचंड गरज असते किंवा तो ह्यासाठी खुप चिकाटीने प्रयत्न करतो '
माणूस कुठल्याही परिस्थितीचा बाऊ करून माझ्याकडे ह्या गोष्टी नाहीत, माझ्याकडे त्या गोष्टी नाही त्या गोष्टी मिळाल्या असता तर मी हे केलं असतं, थोडक्यात अनुकूल परिस्थिती तच माणूस पुढं जाऊ शकतो, हे लेखकाने चुकीचं ठरवलं आहे.
लेखकांनी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीत जयकर ग्रंथालय,पुणे येथील उल्लेख केलेला आहे. तिथेही मुलांचा आपल्या आयुष्याबद्दल किंवा स्पर्धा परीक्षा बद्दल असलेला दृष्टिकोण,यशस्वी व काही timepass साठी आलेल्या व्यक्ती ची समर्पक उदाहरणे देऊन नमूद केलेला आहे,म्हणजे विशिष्ट हेतू घेऊन साध्य करण्यासाठी मेहनत करणारी मुलं यशस्वी होतात. काही वेळेला प्रयत्न करुन ही यशस्वी न झालेली मुले, या ना त्या क्षेत्रात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासा मुळे जीवनाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेल्याने यामुळे कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होतात याचे लेखकाने त्याच्या मित्राच्या उदाहरणासहित नमूद केलेला आहे.
लेखक जेव्हा आपल्या आई-वडिलांना ताई व अण्णांना ज्यावेळेस दिल्ली दर्शन करून आणतो, त्यावेळेस डोळ्यात पाणी येतं.. कारण लेखकाच्या आई-वडिलांनी महाराष्ट्र पली कडे काहीच पाहिलेलं नसतं पण परिस्थिती बदलते.
लेखक आयएएस झाल्यानंतर गावात जंगी सत्कार होतो.पण लेखकाला मागचे दिवस नेहमी आठवत असतात लेखकाकडून गावाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, IAS झाल्यानंतर तो कोणतीही समस्या सोडवू शकतो असा भाबड्या लोकांचा समज असतो.
लेखकाने आपल्या जीवन प्रवासा दरम्यान त्यांनी केलेल्या बालपणातील चुका,तसेच कुमारावस्थेत होणाऱ्या चुका प्रामाणिक पणे नमूद केलेले आहे याचे कौतुक वाटते.तसेच लेखकाने त्याच्यावर कशी मात केली हे सुद्धा वर्णन केलेले आहे.
एखादा माणूस जर आपण ठरवलं तर काहीही करू शकतो याच मूर्ती मंत उदाहरण आहे.
लेखकाच्या आईचा, गिरणीवाल्या बाई कडून झालेला अपमान, लेखकाच्या जिव्हारी लागतो आणि लेखकाची तिथूनच खरी प्रगती व्हायला सुरुवात होते. तिथून पुढे पाठीमागं वळून तो बघत नाही.लेखकाने या काळात केलेले प्रयत्न व त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो. लेखकाचा हा प्रवास बघता एकंदरीत लक्षात येते की स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे ही कोण्या एका घराण्याची, व्यक्तीची मक्तेदारी नसून,जो व्यक्ती प्रामाणिकपणे, चिकाटीने योग्य दिशेने प्रयत्न करेल तो यशस्वी होईल.स्पर्धा परीक्षेच्या तयारी करताना कोणत्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा सुद्धा लेखकांने उहापोह केलेला आहे. तसेच स्पर्धा परीक्षा संबधी चालणाऱ्या क्लासेस व त्याची तयारी करताना त्याची खरंच व कितपत गरज आहे याची ही त्यांनी योग्य शब्दात चर्चा केलेली आहे.निश्चितच हे पुस्तक स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, प्रतिकूल परिस्थितीत ही यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या विदयार्थ्यांसाठी दीपस्तंभ आहे.
सौ.मनिषा राजन कडव
मुख्य ग्रंथपाल, डी.एस.हायस्कूल, शीव,मुंबई -२२
फारच सुंदर लेखन केले आहे.
ReplyDeleteप्रेरणादायी पुस्तकाचा परीचय..💐💐💐
ReplyDelete