शोध ' - रहस्यमयी कादंबरी.
शोध ' - रहस्यमयी कादंबरी.
खूप वर्षानंतर असे पुस्तक हातात आले . एखादा चित्रपट पुढे सरकतो त्याप्रमाणे अतिशय वेगवान आणि उत्कंठावर्धक अशी ऐतिहासिक तथ्यांवर आधारीत स्व. मुरलीधर खैरनार लिखित 'शोध 'कादंबरी आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर १६७० साली दुसरी स्वारी केली व प्रचंड संपत्ती लुटून आणली. ही संपत्ती रायगडावर न्यायची होती. परंतु वाटेत राजांना मुघल सरदारांशी लढाई करावी लागली व संपूर्ण खजिना रायगडावर नेणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी त्याचे दोन भाग केले. एक भाग स्वराज्यात सुखरूप पोहचला. दुसरा भाग गोंदाजी नारायण या सरदारांकडे देऊन तो नाशिक जिल्हयातील साल्हेरच्या मार्गाने रायगडावर पोहचवावा अशी योजना केली. परंतु गोंदाजी नारायण मुघलांच्या ताब्यात सापडले . सापडण्या अगोदर त्यांनीे खजिना कोठेतरी लपवून ठेवला.(बागलाण ,सातमाळा भागात हा खजिना असल्याच अजून समज आहे.त्यावर आधारीत ही कादंबरी आहे )खजिना हरवल्याची हकिकत ज्यांना माहीत होती त्यांनी वेळोवेळी या संपत्तीचा शोध नाशिक जिल्ह्यातील साल्हेर, मुल्हेर, चांदवड डोंगररांग यातून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पासून सातत्याने या खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मुघल, मोरोपंत पिंगळे ,छत्रपती संभाजीराजे, पेशवे, इग्रंज या सर्वांनी केला पण हा खजिना शोधण्यात कोणालाही यश आले नाही.
त्यानंतर जवळपास ३५० वर्षांनंतर हा खजिना शोधण्याचा दोन गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली या शोधाची कहाणी मुरलीधर खैरनार यांनी या ४९७ पानांच्या कादंबरीत सांगितली आहे.
गोंदाजी नारायण यांना मुघलांनी कैद करून औरंगाबादला तुरुंगात ठेवले होते. त्याच्या कोठडीत रिचर्ड ग्रेंजर नावाचा ब्रिटिश मनुष्य होता. गोंदाजींनी या रिचर्डला एक गुप्त संदेश कापडाच्या तुकड्यावर लिहून दिला होता व तो त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावा असे सांगितले होते. गोंदाजी लढाईतील जखमांमुळे तुरुंगातच मेले. रिचर्ड ग्रेंजर मात्र सुटला. पण गोंदाजींचा निरोप तो त्याच्या वैयक्तिक अडचणींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पोहचवू शकला नाही. संदेशाचा कापडी तुकडा घेऊन तो इंग्लंडला परत गेला. त्याच्या वंशातील भारताच्या इतिहासात रस घेणारी मुलगी क्लारा ग्रेंजर हिच्या हाती तो तुकडा लागला.
नाशिकचा शौनक शिंगणे हा इतिहासाचा अभ्यासक आणि डोंगरदऱ्यांतून हिंडणारा कणखर शरीराचा तरुण यालाही इतिहास संशोधनाची आवड होती. त्याची मैत्रीण केतकी देशपांडे हिचा तर खजिन्याचा शोध हा ध्यासच होता. क्लारा आणि शौनक या दोघांची फेसबुकवरून मैत्री झाली होती. क्लाराला हा महत्त्वाचा दस्तऐवज सापडल्याबरोबर क्लारा आणि शौनक यांनी ठरवले, की क्लाराने हिंदुस्थानात यावे व त्या गुप्त संदेशाचा अभ्यास दोघांनी मिळून करावा.
क्लारा मुंबईला आल्यावर तिने एका हॉटेलात खोली घेतली. त्या हॉटेलात शौनक व केतकी क्लाराला भेटले आणि क्लाराने गोंदाजीच्या संदेश दोघांसमोर उलगडून ठेवला. त्यांनी त्या मजकुराचे लागलीच फोटो काढले. कापडावरील मजकूर मोडी लिपीत होता. शौनकला मोडी लिपी वाचण्याची सवय असल्याने त्याने ताबडतोब त्या मजकुराची देवनागरीत आवृत्ती केली. इथून खजिन्याच्या शोधाला मोठी गती मिळाली.क्लारा खोलीत गेल्यावर तिचा खून झाला व तिच्या सामानातील तो निरोप खुनी माणसाने काढून घेतला आणि तो तिथून निघून गेला.
तो खुनी आबाजी चा हस्तक होता. तो गुप्त संदेश अर्थातच आबाजींकडे पोहचला त्यांनीही त्या कापडावरील संदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. शौनक आणि आबाजी दोघेही त्या मजकुरावरून काही अंदाजावर पोहचले.हा संघर्ष दोन गटातील पुरातन संघर्ष आहे. त्यापैकी ‘उद्धारक’ गटाचा आताचा वारसदार म्हणजे आबाजी. दुसरा गट ‘नागरिक’ गट . शौनकला ज्यांनी इतिहासाचे धडे दिले ते प्रा. गायधनी व प्रा. अभोणकर हे ‘नागरिक’ परंपरेतले होते. केतकी देशपांडे ही शौनक ची मैत्रीण देशपांडे नव्हतीच. ती मूळची गुजराथी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी सुरत लुटताना केतकीच्या पूर्वजांचा सर्व पैसा व देवघरातील त्यांचा नशीबवान खडा लुटला होता. त्यानंतर त्या सावकार घराण्यात दर पिढीला या लुटलेल्या खड्याचा शोध घेण्यासाठी एक माणूस नेमण्यात येई. त्याला ‘खोजनार’ असे म्हणत. केतकी या पिढीतील ‘खोजनार’ होती.
आबाजींनी खजिन्याच्या शोधासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.धातुशोधक यंत्र घेऊन त्यांचे माणस नाशिक जिल्हयातील डोंगरातून हिंडत होते. जलद हालचाली करण्यासाठी त्यांनी एक हेलिकॉप्टर बाळगले होते. त्याशिवाय दोन ड्रोन विमाने त्यांच्या जवळ होती. ड्रोनमध्ये धातुशोधक यंत्रे बसवून ते ड्रोन डोंगरावर फेऱ्या मारत असताना डोंगराच्या पोटात कुठे सोन्या-चांदीसारखे किंवा शिशा लोखंडासारखे धातू असतील तर ताबडतोब त्यांची सूचना धातुशोधक यंत्राकडे यायची. परंतु खजिना काही सापडत नव्हता.
एका बाजूला शौनक व केतकी आणि दुसऱ्या बाजूला आबाजी व त्यांचे मित्र यांना क्लाराने आणलेल्या गोंदाजीच्या निरोपावरून खजिन्याचे वेगवेगळे माग मिळत गेले. ही सर्व घडामोड अतिशय गुंतागुंतीची असून, ती कै. मुरलीधर खैरनार यांनी चांगलीच रंगवली आहे. आबाजींनी क्लाराच्या खुनाचा आरोप शौनक व केतकी या जोडीवर टाकला आणि पोलिसांनी दोघांचा पाठलाग चालवला. पण पोलिसांना गुंगारा देऊन ते दोघेही नाशिक जिल्हयातील सातमाळा डोंगररांगेपर्यंत पोचले. पोलिसांचा हा पाठलाग मुंबई शहर, कसारा घाट, नाशिक शहर आणि डोंगरी भाग या सर्व ठिकाणी चाललाच होता.नाशिक शहरातील गल्ल्याबोळांची वर्णन हे नाशिक माहित असणा-यांना जून्या नाशिकमध्ये फिरवून आणतात. आपले नाशिक देखील व्हीनस, रोम सारखे आहे अस वाटायला लागत. हातगड, साल्हेर, इंद्राई ,सप्तशृंगी, कांचना,रवळया - जावळ्या,अहिवंतगड या किल्लांचे वर्णन प्रत्यक्ष आपल्याला त्यावर घेऊन जातात. आपण फिरतांना अनुभवलेले हे किल्ले डोळ्यासमोर उभे राहतात.
अखेरीस हजारो थैल्यांत भरलेला व आजच्या दराने २५ लाख कोटी रुपये किमतीचा प्रचंड खजिना कोणाला सापडला.हे वाचण्याचा थरार आपण प्रत्यक्ष अनुभववा .कथेत इतके चकवे आहेत, की या चकव्यांमुळे उत्कंठा वाढतच जाते आणि पुस्तक खाली ठेववत नाही. पुस्तकाच्या मागील वेष्टणावर ‘अनपुट डाऊनेबल’ असे कौतुक छापले आहे.ते वास्तव आहे. अवघ्या चार महिण्यात दुसरी आवृत्ती काढावी लागलेली ही कादंबरी आहे. दुर्दैवाने मुरलीधर खैरनार यांची ही पहिली आणि शेवटची कादंबरी ठरली.
उत्कंठावर्धक वाचण्यासारखी कादंबरी ,या कादंबरीचे दोन भाग आहेत . पुर्वार्ध व उत्तरार्धध यात पुर्वार्ध सत्यघटनेवर आहे . व उत्तरार्ध काल्पनिक आहे पण फार सुंदर लिहिलेली आहे , त्याची छान ओळख वाचकांना ब्लॉगवर करवून दिलीत 💐💐💐
ReplyDelete