नटरंग




नटरंग
 नटरंग म्हणजे कलेचा ध्यास, कलेसाठी तळमळणारा जीव नि याच कलेपायी वेचलेलं जीवन. ग्रामीण भागातील जीवनावर आधारलेली हि कादंबरी म्हणजे एका सामान्य माणसाची कलेच्या संघर्षासाठी असलेली असामान्य कथा.

   कथेचा नायक म्हणजे कोल्हापुरातील, कागल गावातील गुणा मांग. जिथे मांगवाडा म्हणजे दरिद्री, दुःखानं गांजलेली, परिस्थितीशी कसबस दोन हात करत पोटापुरतं मिळवणारी लोक राहत तो भाग. अशाच मांगवाड्यात राहणारा, घरादारासाठी कष्ट करत, दुसऱ्यांच्या शेतात राबणारा शेतमजूर गुणा.
   आखाड्यात कुस्त्या खेळून मिरवणारा पैलवान वीर, पण सामान्य माणसांमध्ये देखील असामान्यत्व असतंच कि, किंबहुना सामान्य माणसांच्या स्वप्नांना कष्टाची जोड मिळाली कि त्यांची स्वप्न पुरी होतात आणि तीच सामान्य माणसं मग असामान्य म्हणून ओळखली जातात. गरिबी नि हलाखीत जीवन काढलेल्या, साधं-सरळ आयुष्य जगणाऱ्या गुणाचं देखील असच एक स्वप्न असत. आणि ते म्हणजे "तमाशा".

   तमाशा म्हणजे एक लोककला. आजच्या काळात जिथे समाज इतका पुढे गेलेला आहे, तिथे सुद्धा तमाशाला नाव ठेवणारे सुशिक्षित लोक आहेतच कि. पण त्या काळातही तमाशाकडे फक्त आणि फक्त लोककला म्हणून बघणारा गुणा. तमाशा म्हणजे त्याच स्वप्न, स्वतःचा तमाशाचा फड काढून त्यात आपण मुक्तपणे राजा म्हणून वावरायचं, जी स्वप्न खऱ्या आयुष्यात कदाचित कधीच सत्यात उतरणार नाहीत, तीच या कलेच्या रूपानं मनसोक्त जगायची, प्रत्यक्षातल्या नाही तर नको पण निदान या जगात तरी मी एक स्वतंत्र व्यक्ती असेन, माझं राजाच अस्तित्व असेल. या कलेच्या जगातील सार्वभौम असलेला राजा असेन मी. असं स्वप्न घेऊनच तो जगतो आणि तेच स्वप्न उराशी घेऊन तो संपतो.

   एकीकडे डोळ्यात असलेला तमाशाचा फड, तर दुसरीकडे असलेली सत्य परिस्थिती, अशा दोन दगडांवर पाय ठेवून जीवन जगतानाची त्याची होणारी कुचंबणा आनंद यादव यांनी खूपच समर्पक रेखाटली आहे. मांगवाड्याच्या हलाखीच्या जगात राहणारा गुणा, त्याच्या सर्व वाईट परिस्थितीवर, सर्व दुःखांवर उपाय म्हणून जीवानिशी जपलेला छंद तो जवळ करतो. त्याच स्वप्न प्रत्यक्षात उतरताना कितीतरी गोष्टींचा सामना त्याला करावा लागतो. वर वर बघताना तमाशा जरी घटकाभराची करमणूक वाटली तरी त्यामागे किती कष्ट घ्यावे लागतात याची बघणाऱ्या लोकांना जाणीव नसते. पण आपल्या कलेला आपलं जीवन बनवणारा गुणा, जिद्दीनं एक एक गोष्ट जुळवत जातो, अगदी ढोलकी-हलगी पासून ते तमाशात नाच-गाणं करणाऱ्या मुलींपर्यंत सर्व जुळणी होते, नि गाडी अडते ती तमाशात नाच्याच काम कोण करणार यावर. सर्व ठिकाणांहून नकार आल्यावर ती जबादारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुणावरच येऊन पडते. तमाशातील राजा होण्याचं स्वप्न पाहणारा गुणा, तमाशातील नाच्या बनतो, नि त्या नाच्याच्या पायाखालीच त्याच्या मनातील राजा गुदमरून जीव दिल्यासारखा मरून पडतो.

   राजा आणि नाच्या अश्या दोन पात्रांची त्याच्या मनात लढाई सुरु होते, नि शेवटी तो नाच्याची भूमिका करायला तयार होतो. एक आंतरिक संवेदना, एक आतला आवाज जणू काही त्याला प्रेरणा देतो. कारण तमाशा हा त्याच्यासाठी घटकाभराची करमणूक कधीच नसतो. ते त्याच जीवन असत, म्हणून नाच्याची भूमिका देखील तो एक कला म्हणून, एक जिद्द म्हणूनच करतो. राजाची भूमिका करणारे कितीतरी असतील, राण्या-प्रधान देखील अनेकजण साकारू शकतात, पण आपण करत असलेली नाच्याची भूमिका हि जगावेगळी आहे, ना धड स्त्री ना धड पुरुष. अशी भूमिका साकरतानाच कलाकाराचा खरा कस लागतो. या विचारांनी प्रेरित होऊनच तो जणू रंगभूमीचा आगळा-वेगळा राजा बनण्यासाठी तयार होतो.
   जेव्हा आपल्या ध्येयासाठी झटण्याची वेळ येते तेव्हा वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांचा आपण ती एक संधी आहे, एक होकारार्थी परीक्षा आहे, असं समजून तिचा स्वीकार करावा. ही या पुस्तकातून मिळणारी फार मोठी शिकवण आहे, आता हेच पहा ना रस्त्यावरून गाडी चालवत असताना, स्पीड ब्रेकर आले कि बहुतांशी लोक त्यांना गाडी चालवताना येणारे अडथळे असच समजतात नि कपाळावर आठ्यांचं जाळं पसरवत ते स्पीड ब्रेकर पार पाडतात. फार थोडी माणसं अशी असतात ज्यांना हे समजत कि ते स्पीड ब्रेकर आपल्याच धावत्या वेगाला लगाम घालण्यासाठी आहेत. प्रत्येक गोष्टीत असा होकारार्थी विचार केला कि पुढचं सर्व सुरळीत पार पडत. असो हे थोडं विषयांतरच झालं. सांगायचा मुद्दा इतकाच कि, आपण येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना ती पुढे जाण्याची संधी आहे असच मानलं पाहिजे, अगदी हेच गुणा देखील करतो. नाच्याच्या रुपाला तो फक्त ती एक कला म्हणून सादर करतो. त्या कलेसाठी स्वतःमधील असलेल्या अभिनयक्षमतेला एका स्त्रीरूपात बाहेर काढतो. बाकीचे सगळे लोक पोटासाठी कला जवळ करतात पण गुणा कलेसाठी जगतो. यामध्ये कधी त्याला यश मिळते तर कधी अपयश.
   कादंबरीतील गुणाच्या आयुष्यातील प्रत्येक पात्र, कुठेतरी त्यांच्या त्यांच्या जगात बरोबर वाटतात पण ती पात्र गुणाच्या आयुष्यात मात्र अपयशी माणसं बनून राहतात. गावातील जुने रीतिरिवाज, संसार, नवरा नि मुलं-बाळ यांच्या पलीकडे स्वतःच असं कोणतंच जग न मानणारी गुणाची बायको दारकी. कुठेतरी गुणासाठी तळमळणारा जीव नि प्रापंचिक जबाबदाऱ्या यात तिची चालू असणारी ओढाताण मनाला चटका लावून जाते. थोडा समंजस नि थोडा कठोर, निश्चयी असा त्याचा बाप बाळू. यांचं व्यक्तिचित्रण, त्यांच्या मनीच्या उलाघाली लेखकानी इतक्या जिवंत मांडल्या आहेत कि ते वाचताना मनावर खोल जखमा होत जातात.
   गुणाचा तमाशा नावारूपाला आल्यावर, त्याचा झालेला मान-सन्मान, भेट म्हणून मिळणारी एक नटराजाची मूर्ती. त्याच्यासाठी ती मूर्ती म्हणजे जणू जीवन संजीवनी ठरते, सदा सर्वकाळ तो त्याच जीवन लोककलेसाठी जगायचं ठरवतो, नाच्या बनून तमाशात वावरणारा गुणा, वग-नाट्यांसाठी वेगवेगळी पुस्तक चाळणारा गुणा, स्वतःच्या अभ्यासातून स्वतःच वेगवेगळ्या विषयांवर वग लिहणारा गुणा कादंबरीभर मुक्तपणे वावरत राहतो, तमाशातील लोकांचे होणारे हाल पाहून त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ठरवतो, सर्वकाही ठीक चालू झालं आहे असं वाटतानाच, यशाच्या शिखरावर असताना जणू, त्याच्या तमाशाचा राजकारण बळी घेत. राजकीय नेत्यांच्या रोषाला सामोरा जाताना त्यांच्या द्वेषात होरपळून गेलेल्या गुणाचा खूप मोठा ठसा उमटला माझ्या मनावर. लोककलेसाठी जीवन जगलेल्या त्या कलावेड्या माणसाचा जेव्हा बलात्कार होतो, तेव्हा त्याला जाणीव होते कि ज्या कलेला त्यानं स्वतःच आयुष्य अर्पण केलं, तीच कला आता त्याच्यातून त्याच आयुष्य हिरावून घेऊन बसली होती. आगीत जळून खाक झालेला त्याच्या तमाशाचा फड नि आयुष्यावर लागलेला बलात्काराचा एक न विसरता येणारा आघात. त्याची स्वप्न त्याच्या डोळ्यादेखत विझून जातात. पण त्या तशा आगीत होरपळून निघून देखील चमकून उठलेल्या नटराजाच्या मूर्तीकडे बघून कुठेतरी त्याच्या मनात असलेली कलेची चेतना पुन्हा जिवंत होते.

   नाचेपणाची कला अंगाअंगात भिनलेला गुणा मग तशा अवस्थेतच त्या नटराजाशी एकरूप होतो, नि गुणा आणि तो नटराज एकमेकात मिसळून कधी एक होतात हे त्याच त्यालाच समजत नाही. त्याला जाणवते ती फक्त त्याच्यात असलेल्या नाच्याच्या कलेची जाणीव, त्या जाणिवेत आखाड्यात कुस्ती खेळणारा पैलवान गुणा, घरा-दारासाठी काबाडकष्ट करणारा गुणा, तमाशासाठी आपला जीव गहाण टाकणारा गुणा, नाच्याच्या रूपात स्वतःला तमाशाचा राजा म्हणून मान्यता पावलेला गुणा, अशी त्याच्यातल्या मुळ गुणाची सर्व रूपं लोप पावतात. शेवटी कादंबरीभर पुरून उरतो तो नाच्या असलेल्या गुणा मांगातल्या रुपातला "नटरंग"

सौ.मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*