प्रेरणादायी मृत्युंजय


प्रेरणादायी  मृत्युंजय

        शिवाजी सावंत यांच्या लेखणीतुन साकारलेली भव्य दिव्य कादंबरी. लहानपणापासुनच त्यांना महाभारताविषयी असलेले आकर्षण व त्याला असलेली अभ्यास संशाेधनाच्या तपस्येची जाेड यातुन खरतरं मृत्युंजयाचा प्रवास सुरु झाला. मृत्युंजयसाठी सतत सहा सात वर्ष त्यांनी अभ्यास केला. संपुर्ण भारतभर प्रवास करून मनन चिंतनाने ही कथा त्यांनी डाेळस बनविली 
      खरतर हि सु्र्यपुत्र कर्णाची जीवणगाथा. कुंतीभाेज नगरातुन सुरु झालेली ही गाथा संपते ती कुरुक्षेञावर कितीतरी चित्तथरारक, रंजक, वादग्रस्त आणी दु:खद प्रसंगांनी भरलेलं आणि भारलेलं हाेत कर्णाचं जीवन. अंगराज कर्ण, दानशुर कर्ण, दिग्वीजयी कर्ण,जेॆष्ठ पांडवपूञ कर्ण,महारथी कर्ण,श्रे्ष्ट धनु्र्धर कर्ण अश्या ह्या कर्णावर नियतीने माञ अविरत घाव केले. त्याला सुतपुञ म्हणून जगाने हिनवले, कवच कुंडलांविना शापीत कर्ण म्हणून थाेरांनी त्याला डिवचले पण अशा सर्व प्रसंगांना निर्धारानं तोंड देत, मरणालाही हसत हसत कवटाळनारा हा मृत्युंजय म्हणुनच प्रेरणादायी ठरताे.
       शिवाजी सावंतांची भाषा खरोखर अदभुत आणि रसाळ आहे. पुस्तक एकदा वाचण्यासाठी हाती घेतल्यानंतर खाली ठेवु वाटत नाही. वर्णन इतकं छान आहे कि आपण कर्णाबरोबरच ते सारं जणु अनुभवत आहोत अस वाटतं म्हणुनच हे अनुभवण्यासाठी मृत्युंजय सर्वांनी एकदा तरी वाचलच पाहिजे...!.

     तुम्हाला मृत्युंजय पुस्तक वाचून मला आलेला अनुभव नि त्यामुळे झालेला कर्णाचा माझ्या जीवनावरील प्रभाव सांगणार आहे. कर्णाबद्दल प्रत्येकाची मत वेगळी वेगळी असली तरी त्याच्याबद्दल सर्वाना आदरच वाटतो याबाबतीत दुमत नसावं, .

       मला सर्वप्रथम कर्ण भेटला, प्रकर्षानं जाणवला अस हे पुस्तक आहे, पुस्तक वाचताना कुठेही कर्णाचा द्वेष करावा असं चुकूनही वाटत नाही. उलटपक्षी कर्णाकडून घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्याला मिळतात. कर्ण कादंबरीतून मांडताना त्याच महत्व कधीच लेखकानं कमी होऊ नाही दिल. प्रत्येक भागात कर्ण आपल्याला नवीन रूपात भेटत राहतो आणि नवीन काहीतरी देत राहतो.

       त्याच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले, किंबहुना खडतर परिस्थितीतूनच तो जीवन जगत गेला, पण प्रत्येक वेळी हार न मानता तो त्या प्रसंगाला सामोरा गेला. आयुष्यात दुःख, वेदनारूपी खाच खळग्यांच्या वाटेतून चालत जाताना आपण पडतो तेव्हा ते आपलं जीवन असत पण खाली पडूनही आपण परत त्वेषाने उठून उभे राहतो ते "जगणं" असत, आणि असं जगणं त्या मृत्युंजयी कर्णालाच जमलं. कर्णाच जीवन फक्त जीवन नाही तर ते आपल्यासारख्यांसाठी एक जगण्याचा स्रोत आहे, काय नाही शिकवलं आपल्याला कर्णान. त्याला दानवीर म्हणतात ते उगाच नाही, आजही कर्ण आपल्याला दान देतोच आहे, विचारांचं दान, जगण्याचं मार्गदर्शन. त्याचा मित्र मग भलेही तो चुकीचा वागला असला तरी त्यानं शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही. भीष्मांना ठाऊक असणारे ब्रम्हास्त्र मित्राच्या एका सांगण्यावरून तो परशुरामांच्याकडून शिकून आला. मित्रप्रेमाचा एक आगळा वेगळा इतिहास त्यानं रचला. उगीच नाही म्हणतं जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल तर दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

       द्रोणाचार्यानी गुरुविद्या नाकारल्यावर त्यानं प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला प्रमाण मानून सर्व धनुर्विद्या आत्मसात केली. तो अर्जुनाहूनही श्रेष्ठ धनुर्धारी बनला. अथक प्रयत्न केले तर जगात काहीही अश्यक्य नसते हे त्याने सर्वाना दाखवून दिले. पहिला पांडव असूनही मातेसाठी सहावा पांडव होणं त्यानं पसंत केलं. कुंतीला दिलेलं वचन त्यानं स्वतःच्या जीवनाचं दान देऊन पाळलं. खरंच आपल्या आई बाबांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही हेच तर शिकवलं त्यानं आपल्याला. श्रीकृष्णानं देखील महाभारताच श्रेय एक स्वतःला तर दुसरं कर्णाला दिल.

       प्रत्यक्ष इंद्रालाही त्याच्या दारी याचक बनून यावं लागलं ते तो अंगराज होता म्हणून नाही, दुर्योधनाचा मित्र होता म्हणूनही नाही तर तो दानवीर होता, दिलेल्या शब्दाला जागणारा होता म्हणून. तो दिलेलं वचन पाळतो म्हणून देवांच्या राजालाही स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी याचकाच रूप घेऊन त्याच्याकडे यावं लागलं. पण कर्ण तिथेही डगमगला नाही, त्यानं कवच कुंडलांचं दान देखील हसत हसत दिल. त्याच्या याच विचारांची गरज समाजाला आज आहे, छोट्या छोट्या गोष्टींबद्दल नात्यांमध्ये, समाजामध्ये कटुता निर्माण करण्यापेक्षा आपल्याजवळच जे काही आहे ते गरज पडता दुसऱ्याला आनंदानं द्यावं. आजही लोक याचक इंद्राला लक्षात ठेवण्यापेक्षा कर्णाचा दानवीरपणा लक्षात ठेवतात. यामागे कदाचित हेच कारण असू शकत कि त्याने कधीच कुणाला आपल्यापेक्षा लहान, कनिष्ठ मानलं नाही. जात-पात, गरीब-श्रीमंत, हा भेदभाव त्यानं कधीच मानला नाही. त्याच्या लेखी सर्व सारखेच होते. तो फक्त त्याच कर्तव्य करीत राहिला. आणि त्याच्या या विचारांची समाजाला आज सगळ्यात जास्त गरज आहे असं मला वाटत. जातीच्या, गरीब श्रीमंतीच्या भेदभावात अडकण्यापेक्षा माणुसकीला महत्व दिल तर समाजाचं जास्त भलं होईल. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहायला मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागत, आपल्याजवळची एखादी वस्तू आनंदानं दुसऱ्याला द्यायला मनाचा मोठेपणा असावा लागतो, आणि एकदा का तो मोठेपणा आपल्यात आला तर मनाची हरवलेली शांती सुद्धा आपसूकच मिळून जाते.

       आपण कर्णाएवढे महान नाही बनू शकत हे जरी सत्य असल तरी त्यानं जे काही विचाररूपी दान आपल्याला दिलय ते नक्कीच आचरणात आणू शकतो. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता आपण आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. आपल्यासोबत कोणी नाही हा विचार करून रडण्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत त्यांना तरी आपण योग्य न्याय देऊ शकतो का हे पाहिलं पाहिजे. कर्णाच मित्रप्रेम, त्याची कुंतीप्रती असलेली निष्ठा याला तोडच नाही. मातृऋण कधीही फिटत नाही याची जाणीव त्याला होती म्हणून त्यानं कुंतीला अशक्यप्राय असं पाच पांडवांच्या जीवनाचं दान दिल. आपल्या आई बाबांसाठी, आपल्या लोकांसाठी सुद्धा आपल्या मनात कायम आपलेपणाची अशीच भावना राहावी. एखाद्या गोष्टीत त्याग करायची वेळ आली तरी मी ते का करू असं म्हणण्यापेक्षा मी ती गोष्ट समोरच्या माणसाला दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला त्यापुढे मी माझा अहंभाव विसरून गेलो अशी वृत्ती जोपसावी. ही शिकवण  कर्णाकडून मिळते
सौ.मनिषा राजन कडव

Comments

  1. नव्याने ही कादंबरी वाचावीशी वाटते...!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*