हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' -भालचंद्र नेमाडे*****

'


हिंदू:  जगण्याची समृद्ध अडगळ' -भालचंद्र नेमाडे
*****

कोण आहे?
मी मी आहे. खंडेराव.
ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तू कोण?
मी तू आहेस, खंडेराव.
..
इथून सुरू होणारी या 'मी' ऊर्फ 'खंडेराव'ची, खरं तर 'मी आणि खंडेराव'ची कथा सांगणारी 'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ' नावाची कादंबरी आपल्या पुढ्यात पेश करते- तब्बल सहाशे पानांचे एक समृद्ध पाल्हाळ आणि तरीही शेवटी काही तरी राहून गेल्याची, काहीतरी अधुरेच असल्याची एक अस्वस्थ टोचणीही. आपल्या जातीजमातींच्या एकमेकांत अडकलेल्या अपुर्‍या-अधुर्‍या आयुष्यांच्या कहाण्या आणि त्यांचे एकमेकांवरचे, एकमेकांच्या जन्मांनाच संपूर्णत्व देणारे समृद्धसुंदर परावलंबित्वही. हिंदू म्हणून जन्माला आल्याचा, आयुष्यभर तोंडाची चवच बनून बसलेला कडवट विखार आणि या धर्मातल्या कधीही नीट न उमगलेल्या नितांतसुंदर गोष्टींचे मधाळ चवीचे निरूपणही. वारसा म्हणून पदरी पडलेल्या रीतीभातीपद्धतींतला निराशाजनक फोलपणा आणि पूर्वापार, बापजाद्यांपासून चालत आलेल्या अनंत आचाराविचारांतलं सौंदर्य आणि अर्थपूर्ण परिपूर्णपणही. आपल्या जातिव्यवस्थेतल्या सार्‍या जगाने धिक्कारलेल्या आणि आपल्या प्रगतीच्या रस्त्यातली कायमची धोंड बनून बसलेल्या करंट्या उतरंडीचा भयानक वास्तवपट आणि या उतरंडीमुळेच सहजसुलभ झालेल्या आपल्या जगण्याच्या प्रक्रियेचा मनमोहक चित्रपटही. स्वतंत्र-वेगळा विचार नाकारणारे, सतत दिवाभीतासारखे आणि मन मारून जगायला भाग पाडणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीचे जाणीवा विकसित-समृद्ध करण्यातले नाकर्तेपण आणि ग्रामीण समाजव्यवस्थेची वीण-एकजीवपण कायमस्वरूपी घट्ट ठेवणारे त्याच कुटुंबव्यवस्थेतल्या संस्कृतीचे असंख्य नयनमनोहर रंग दाखवणारे पीळही. नात्यानात्यांतले स्वतंत्रपणे ओळखू येऊ नयेत इतके बेमालूम मिसळलेले, लोण्या-तुपाचा संपन्न वास असलेले, जगण्यातल्या प्रत्येक वळणावर नव्या अर्थाने सामोरे येणारे, जगण्याला नवी ऊर्मी-उभारी देणारे पदर आणि त्याच नात्यांनी ठायीठायी व्यक्त केलेल्या अवाजवी अपेक्षांच्या ओझ्याचे पायांत बेड्या टाकणारे अनावश्यक रानटी लादलेपणही. नुसत्या श्रद्धांच्या बळावर उभ्या राहिलेल्या या हजारो वर्षांच्या एकूण व्यवस्थेच्या प्रचंड डोलार्‍यावरचे मार्मिक भाष्य आणि जातिजमातींसकट अख्ख्या संस्कृतीलाच पाषाणयुगाकडे नेऊ शकणार्‍या अंधश्रद्धांच्या जाळ्याजळमट्यांच्या भयप्रद वास्तवाचा आरसाही. थेट मोहेनजो-दडोचा संपन्नसमृद्ध वारसा सांगणारी सप्तसिंधु भूप्रदेशाची प्रतीकात्मक कडूगोड कहाणी आणि शतकानुशतके माणसाचे अवघे जीवन व्यापून शिल्लक राहिलेल्या रुढीपरंपरांच्या बर्‍यावाईटाची उभीआडवी वीण असलेल्या महावस्त्राच्या अवकाशाचे अंतरंगही.
***
तर, 'युनेस्को-मोहेनजो-दडो १९६३' या प्रकल्पांतर्गत 'दक्षिण भारतातल्या पश्चिम किनार्‍याजवळील उत्तर महाराष्ट्रातल्या पूर्व खानदेशात मोरगाव खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेला' आणि आता पुरातत्वज्ञ बनलेला 'श्री. खंडेराव विठ्ठल' पाकिस्तानात आपला शोधनिबंध सादर करतो- हीच खंडेरावच्या गोष्टीची सुरूवात.
आदि-वन्य-कृषी-नागरी-आधुनिक-उद्योग-इलेक्ट्रॉनिक- अशा बर्‍यावाईट क्रमाने झालेल्या, नैसर्गिक पद्धतीने किंवा नाईलाजाने किंवा बळ वापरून झालेल्या निरनिराळ्या संस्कृतींतल्या उत्क्रांतींवर धक्कादायक विधाने करत खंडेराव भाषण करतो, आणि हजारो वर्षांपूर्वीच्या मोहेनजो-दडो पासून गांधार-हडप्पाच्या ऐतिहासिक अवकाशावर हिंदूंचा, त्यांच्या जाणीवांचा अधिकार सांगतो, तेव्हा एकच गोंधळ उडतो.
त्यानंतर शेकडो फूट खोल खणून शोधून काढलेल्या त्या ऐसपैस रस्त्यांच्या मधून 'हिंदू संस्कृतीचा एक प्रतिनिधी' म्हणून चालत निर्मनुष्य चव्हाट्या-वाड्या-ढेलजांकडे बघत असताना 'नाहीसं झालेल्या माहेरा'सारखा या नगरीचा त्याला अभिमान वाटतो. 'पृथ्वीवर कोणत्या लोकांना एवढा समृद्ध वारसा नुस्ता बेंबीच्या बळावर मिळतो?' असं स्वतःलाच विचारून तो स्वतःला नशीबवान ठरवतो आणि त्याच वेळेला 'अनेकवचनी भूतकाळी' हा परवलीचा शब्दच ठरून गेलेल्या प्राचीन सिंधू संस्कृतीबद्दल वैषम्य बाळगत, सूतक 'साजरं' करत खंडेराव मनाने पोचतो तो थेट त्याच्या खानदेशातल्या मोरगावात. दोन्ही ठिकाणची लाखो साम्यस्थळं आणि त्याच त्या एकसारख्या ओळखीच्या जाणीवांचा अभूतपूर्व साक्षात्कार! सिंधू प्रदेशभर हाहाकार माजवलेल्या प्रलयाचा, चक्रीवादळाचा, उत्पाताचा जणू त्याला भास होतो, किंवा पुनःप्रत्यय. त्याला सिंधुचं पात्र या चंडवातात अचानक अनेक मैल पूर्वेकडे सरकलेलं जाणवतं. तिच्या महापुरातून गुजराथच्या किनार्‍यावर, आणि मग तापीच्या मुखातून उलटा प्रवास करत मोरनदीच्या पात्रातून मोरगावच्या वाळूवर येऊन पडल्यागत जाणवतं. आणि मग समोर गावच्या वेशीवरचा ढसळता बुरूज, त्यावरचा पिंपळ आणि आकाशात घिरट्या घालणारे कावळे बघून तो संभ्रमात पडतो- हा भान, शुद्ध आणि भ्रमाच्या अलीकडे-पलीकडे कुठेतरी असलेला हा गृहस्थ म्हणजे- मोरगावचा पंचविशीचा 'मी खंडेराव', की पाच हजार वर्षांपूर्वीच्या याच संस्कृतीतला-पितरांतला 'तो खंडेराव', की संस्कृतीची ही अनाकलनीय, अत्यावश्यक, अर्थपूर्ण स्थित्यंतरे हजारो वर्षांपासून बघत आलेला, त्या सगळ्याचा एक भाग होत आलेला नुसताच एक 'प्रतिनिधी खंडेराव'?
***
पाकिस्तानच्या आता त्या परक्या झालेल्या भूमीतही खंडेरावला त्याच्याच संस्कृतीची पाळंमुळं सापडतात- हे तर एक आहेच, पण त्याला या भूमीशी जोडणारा आणखी एक धागा आहे. जिने खंडेरावला तान्हा असताना अंगाखांद्यावर खेळवलं, ती- लहाणपणीच दीक्षा घेऊन संन्याशीण व्हायला भाग पडलेली अप्सरेसारखी दिसणारी त्याची त्रिवेणी ऊर्फ 'तिरोनी' आत्या फाळणीनंतर इकडेच अडकली आहे. तिथल्या कुठेशा महानुभावी मठांत सापडेल ही आशा. मुलतान, लाहोर, पेशावर, वजिराबाद, रावळपिंडी.. वणवण फिरूनही कुठेच सापडत नाही. तशातल्या सैरभैर अवस्थेतच तार येते- वडील मृत्युशय्येवर. मृदंगे विठ्ठलराव. वारकरीपण प्राणपणानं जपणारे. मोरगावात आब राखून असलेले. भल्या मोठ्या शेतीमळ्याखळ्याचा गाडा आणि भला मोठा कुटुंबकबिला चालवण्याचा भार सतत डोक्यावर घेऊन वावरणारे. शंभर लोकांचे पोट सांभाळणारे, शेकडो लोकांना आधार वाटणारे. भाऊबंदांच्या वाट्याचे, उत्पन्नाचे, खर्चाचे, सालदारांच्या-कामगारांच्या मजूरीचे, ट्रस्टचे हिशेब सतत करणारे. हे 'हरितक्रांतीमुळे पदरात पडलेलं पुढारपण' करत करत स्वतःला पार झिजवून टाकलेले. आणि आता शेवटचं अंथरूण धरलेले. आयुष्य संपवून टाकण्याइतकं काहीच महत्वाचं नसतं- हे या प्राचीन लाहोरपेक्षाही अतिप्राचीन तत्वज्ञान शिकवणार्‍या वडीलांशी खंडेराव कळत्या वयापासून सतत फटकून वागत राहिला. शेवटचं पाहिलं पाहिजे त्यांना लवकर आता. हिंदू परंपरेप्रमाणे मांडी दिली पाहिजे. हिंदू प्रथेप्रमाणे अग्नी दिला पाहिजे.
***
भावडू म्हणजे खंडेरावचा मोठा भाऊ. ह्याच्याइतकाच हुशार. सार्‍या गोष्टीत रस असलेला. गोठ्यातल्या मोत्या-मुत्या जोडीसारखी, खरं तर खंडेरावसारखी बाणेदारपणे शिंगे रोखून बंड केलं असतं, घराबाहेर पडला असता तर काहीतरी मोठा झाला असता. पण कितीही जणांनी कितीही जनावरागत राबलं, तरी कमीच पडावं अशा शेतीगाड्याच्या वाईट चिखलात वडिलांनी त्याला फसवला, रुतवला. या दुष्ट शेतीच्या रामरगाड्यात काळी ढेकळं, पाणी, औजारं, मनुष्यबळ, खतं, बियाणं- ही तर संपत्ती आहेच, पण 'उपणणी' सारख्या कामात 'वारा' देखील सोन्याच्या मोलाचा. तो सोन्यासारखा वारा आहे तेवढ्यात धान्याची उपणणी केली पाहिजे नाही तर सोन्यासारखा वेळ वाया. सूर्याचा उजेड पण किंमती. अंधार पडायच्या आत आवरा.. किती कामं पडलीत. रात्रही किंमतीच. लवकर खाऊन झोपा. नीट झोप झाली पाहिजे. कारण भल्या पहाटे पुन्हा तिफणी, गुरं, पेरण्या, औतं. रामप्रहर वाया गेला तरी तब्बल अर्ध्या दिवसाची लांबण.. कशी परवडणार शेतकर्‍याला? पहाटे पाचपर्यंत झोपून राहणं म्हणजे चंगळवाद समजणारे हे जिवंतपणी काबाडकष्टात मरणारे शेतकरी लोक म्हणजे खंडेरावला भुताच्या जातीचे वाटतात. स्वतःच्या बायकोकडेही नीट बघू न शकलेला भावडू राबत राबत आधीच गेलेला. खंडेराव अपरंपार द्वेष करत असलेल्या त्या करंट्या कृषीसंस्कृतीने त्याचा बळी घेतला- ही खंडेरावची पक्की धारणा.
आता खंडेरावच वंशाचा दिवा आणि घरदार-शेतीमळ्या-सालदारांसकटच्या, बलुत्या-गावगाड्यासकटच्या, जातिजमातींच्या कोळीष्टकांसकटच्या, ट्रस्ट-सोसायट्यांच्या कायम आतबट्ट्याचा व्यवहार ठरलेल्या फुकटपुढारपणासकटच्या, वारकरी संप्रदायातल्या भक्ती परंपरेचे प्रतीक बनलेल्या मृदंगासकटच्या- विठ्ठलरावांनी मागे सोडलेल्या त्या भल्यामोठ्या झेंगटाचा वारसदारही. चार बहिणी आहेतच. पण त्यांचा काय उपयोग? बोरीबाभळी कशाही वाढतात. भावडू गेला. आता राहिला खंडेरावच. आंबेराव. घराचा खांब. खांबेराव. हीच पद्धत आहे हिंदू धर्मात. खंडेरावच्या मराठा-कुणबी जातीत आणि मोरगावातही.
गोठ्यातल्या मोत्या-मुत्याची डौलदार कंसाकार शिंगे गणिताचे असंख्य कंस बनून खंडेरावच्या मनात. इतकी वर्षे टाळलेले समीकरण आता मांडायलाच लागणार आहे त्याला. बौद्धिक-शिक्षण-विद्यापीठ-पीएचडी-पुस्तकं-लेख-संशोधन-शोधनिबंध-उत्खनन-वाचनलेखन-सांस्कृतिकभानगडी-महानगरातलं वेगवान सुखासीन जीवन हे सारं यापुढे तसंच जगत राहायचं; की माजलेल्या खोंडांची शिंगे पकडून मोडून टाकावीत तसे हे सारे मोडून खुडून विसरून जाऊन नाहीसे करून विठ्ठलरावांचा एकुलता एक वंशज म्हणून आणि जन्मापासून चिकटलेल्या परंपरेचा, संस्कृतीचा प्रतिनिधी बनून शेतीवाडी-घरदार-गुर्‍हाळं-नातीगोती-सोयरिकी-शाळा-गावातली नेतेगिरी नि राजकारण-लोकसेवा-विठ्ठलविठ्ठल-ग्यानदेव तुकाराम- हे सारं सांभाळायचं?
लाहोर-अमृतसर-जालंधर-दिल्ली-भुसावळ-मोरगाव.
बापाला शेवटचे भेटायला निघालेल्या पोराच्या दोन दिवसातल्या या प्रवासात खंडेरावने जागवलेल्या स्मृतींचा अख्खा पट आणि त्याच्याभोवतीची 'त्या' खंडेरावला बुद्धिबळाच्या विरूद्ध बाजूला बसवून त्याच्याकडून वदवून घेतलेल्या तत्वज्ञानाची आणि त्याच्या 'विचारांच्या कृती'ची, त्याच्या मार्मिक भाष्यांची गुंफण- म्हणजेच 'हिंदू'तले उरलेले काहीशे पानांचे समृद्ध पाल्हाळ. समीकरणांशी-प्रश्नांशी झुंज. संस्कृती-समाजाशी झुंज. गावगाडा-बलुते-जातिजमातींच्या उतरंडीशी झुंज. नात्यांच्या तुटू पाहणार्‍या आणि अतूट धाग्यांशी झुंज. खंडेरावची स्वतःशी झुंज.
***
'साहित्यातले देशीपण' आणि 'साहित्यातली नैतिकता' हे नेमाडे गेल्या काही दशकांपासून अटीतटीने साहित्यिक आणि समीक्षाजगताला सांगत असलेले खास सिद्धांत, तत्वज्ञान- हे सर्वश्रुत आहे. हीच तत्वे त्यांनी त्यांच्या थेट पहिल्या पुस्तकापासून कसोशीने पाळलेली आढळतात. 'हिंदू'मध्ये पुन्हा एकदा या तत्वांचा सुंदर साक्षात्कार आपल्याला पानापानातून घडतो.
साहित्यातून खास त्या त्या प्रदेशाची वैशिष्ठ्ये म्हणता येतील अशा 'देशी जाणीवा' (संगीत, उत्सव, समारंभ, शिल्पकला, परंपरा, पद्धती, भाषा, म्हणी आणि वाक्प्रचार, प्रतीके, कथनतंत्रे, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक इ. मधून) व्यक्त होणे; त्या त्या साहित्यकृतीतली पात्रे, आशय, शैली, मूल्ये हे सारे त्या त्या भूमीशी, मातीशी जोडलेले असणे; त्या त्या समाज-संस्कृती-प्रदेशा-समूहाशी एकूणच त्या साहित्यकृतीची पाळेमुळे घट्ट रूजलेली असणे- हे देशीयतेचे तत्व. 'हिंदू'तले- भावडू असो की विठ्ठलराव, झेंडीगणिका असो की तिरोनीआत्या, हुनाकाका असो की निळूकाका, यारू असो की रघू नायक, उंटमारे देशमुख असोत की खंडेरावचे सातवे पूर्वज नागोराव, सोनावहिनी असो की सिंधुमावशी, खंडेरावच्या चार बहिणी असोत की चारही मेहुणे, चिंधुआत्या असो की खंडेरावची आई- ही सारी पात्रे आपल्याला अत्यंत जवळची ओळखीची वाटतील अशी खास वैशिष्ठ्ये, भाषा, लहेजा, वागण्याची पद्धत घेऊन आपल्यासमोर उभे ठाकतात. सतत नात्यांना भावनांनी पक्कं करत जाणारं स्थिर जग. नेमाडेंची इथली निवेदनशैलीही खास आपल्या ग्रामीण मातीतली- बहिणाबाईशी नाते सांगणारी आहे. 



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*