बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी '
'
बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी
मुलांच्या संस्काराचा पाया हा मूलत: लहान वयातच रचणे गरजेचे असते. कुंभार ज्याप्रमाणे ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुरेख मडक्याची घडण बनवतो अगदी त्याचप्रमाणे लहान वयातच मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणे गरजेचे आहे. बालपणीच त्यांच्या मनावर संस्कारांचे बीज रोवले तर त्यानुसार त्यांची पुढील वाटचाल यशस्वीपणे योग्य दिशेस चालू रहात असते. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक पालकांना कामाच्या प्रचंड व्यापामुळे, मुलांकडे संपूर्ण लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांना खेळणी, मोबाईल अशा भौतिक वस्तूंमध्ये गुंतवून ठेवले जाते. मोबाईलचे नाविन्य हे नेहमीच मुलांसाठी आकर्षणाचे केंद्रस्थान राहिले आहे . मोबाईलच्या याच आकर्षणाचे व्यसनात रुपांतर होते आणि यांचे दुष्परिणाम आपल्याला ज्ञातच आहेत. आपल्या मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे की , अतिशयोक्ती, अंधश्रद्धेवर आधारित अशा गोष्टी ज्या मुलांची बौद्धिक ज्ञानाची पातळी खालावतील अशा साहित्यापासून त्याना दुर ठेवणे. मुलांच्या विरंगुळ्यासाठी केवळ मनोरंजनापेक्षा , ज्या गोष्टीतून त्यांच्यावर चांगले विचार, ज्ञान ,सकारात्मक तात्पर्य , नैतिकतेचे संस्करण होईल अशा साहित्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्या मुलांसाठी थोडा वेळ काढून ,त्यांना संस्कारक्षम मार्गदर्शन मिळेल अशा गोष्टींची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी थोडे परिश्रम घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. कारण संस्कार हा व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे जो बालपणीच मुलांच्या मनावर बिंबवला पाहिजे.
लहान मुलांचे मनोरंजन होईल व त्यांच्या मनावर चांगले संस्कारही होतील असे माझ्या वाचनात आलेले पुस्तक म्हणजे 'बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी'. प्रस्तुत पुस्तक हे डॉ.आ. ह. साळुंखे यांच्या 'सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध' या प्रसिद्ध ग्रंथातील निवडक व संस्कारक्षम अकरा गोष्टींचे संपादन केलेले पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक सागर शिंगणे यांनी तथागत बुद्ध या आपल्या जिवलग पूर्वजाला समजून घेऊन त्यांच्या जीवनप्रसंगातील गोष्टीतून पुढील पिढीस योग्य मार्गदर्शन व्हावे ,चांगल्या संस्काराचे पुढे मार्गक्रमण व्हावे म्हणून हे पुस्तक आपल्या समोर सादर केले आहे. या पुस्तकातील आशय हा सरळ, साध्या ,सोप्या भाषेत मांडलेला आहे जो लहान मुलांना ही वाचायला सोपे जाईल. तसेच गोष्टींमधील कठीण शब्दप्रयोगाचे अर्थ देखील नमूद करण्यात आलेले आहेत. जेणेकरून त्या शब्दाचा अर्थ माहित नसल्यास त्या शब्दाचा अर्थ बोध होऊन आपल्या ज्ञानात भर पडावी.
सर्व प्रथम बुद्धांची ओळख करून दिली आहे. यामध्ये बुद्धांचा जन्म, बुद्धांच्या वडिलांनी केलेली शिक्षणाची व्यवस्था, मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यास घराचा त्याग करून बाहेर पडलेले तथागत बुद्ध, बोधप्राप्ती, लोकांचं दुःख मुक्त करण्यासाठी ४५ वर्ष केलेला प्रवास असे बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून थोडक्यात बुद्धांची ओळख करून दिली आहे.
पुढे 'सात आंधळे आणि हत्ती' या गोष्टी मध्ये नेहमी आपलेच म्हणणे खरे करू नये. इतरांचे न ऐकता मी म्हणेन तेच खरं असा हट्ट न धरता समोरच्याचं म्हणणं ही ऐकून घेऊन त्याच्या मतांचा आदर करावा. कोणत्याही अपुर्या माहितीच्या आधारे काहीही निष्कर्ष काढू नये. असा बोध देणारी ही गोष्ट दिली आहे. तसेच 'कष्टाला पर्याय नाही', 'राग हा माणसाचा शत्रू आहे' अशा नावाच्या उत्कृष्ट गोष्टी दिलेल्या आहेत. यात क्रोध हा माणसाचा शत्रू आहे क्रोधामुळे माणूस आपली विवेक बुद्धी हरवून बसतो आणि चिडणं, वाईट बोलणं, इतरांना शत्रू समजायला लागणं यासारख्या गोष्टींच्या आहारी जाऊ लागतो हे पटवून दिले आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव माणसाने क्रोधित होऊन अपशब्द उदगारून नये. हा बोध देणारी गोष्ट दिली आहे. यानंतर पाचव्या क्रमांकावर 'एकता ही शक्ती आहे', 'अंगुलीमाल कसा बदलला'?, 'मौल्यवान काय?', 'उपाली आणि शाक्य तरुणांची दीक्षा' अशा उत्तमोत्तम बोध देणाऱ्या कथा दिल्या आहेत. पुढे 'निंदा ही सुधारण्याची संधी ' अशी गोष्ट क्रमांक नऊ वर दिलेली आहे. यामध्ये निंदा ही सुधारण्याची एक संधी आहे. निंदे मुळे माणसाने निराश न होता त्याचा खरे खोटेपणा तपासून त्यानुसार स्वतःमध्ये योग्य त्या सुधारणा कराव्यात असा या गोष्टीतून बोध दिला आहे.
पुढे 'मालुंक्यपुत्ताचा प्रश्न', 'ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे आणि 'मुलगा मुलगी एक समान' या गोष्टीने शेवट करत मुलगा आणि मुलगी दोघेही समान आहेत. निसर्गाने त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा भेद केलेला नाही. आपण ही त्यांच्यात भेदभाव करू नये. संधी मिळाली तर मुलांप्रमाणे मुली सुद्धा कर्तृत्व गाजवू शकतात. असा संदेश देणारी गोष्ट दिली आहे.
आजच्या पिढीला बालवयात बुद्ध विचारांची ओळख झाली तर त्यांचे जीवन नक्कीच प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. कोणत्याही काल्पनिक ,जादुई चमत्कारांनी न भरलेल्या गोष्टींचे फक्त ५६ पानी असणारे लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलले हे पुस्तक आपण वाचावे आणि आपल्या मुलांना या गोष्टी नक्की समजावून सांगाव्या. या पुस्तकामुळे बुद्धांच्या मार्गदर्शनाच्या दिशेने चालण्यास थोड्याफार प्रमाणात का होईना नक्की मदत होईल यात शंका नाही.मुलांच्या विचारसरणीमध्ये सकारात्मक बदल केल्याशिवाय राहणार नाही असे हे पुस्तक आहे.
छान लिहिले .💐💐💐
ReplyDeleteपुस्तकाची छान ओळख करवून दिलीत .
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete