आठवणीत राहणारा - 'गोट्या’
‘गोट्या’ हे पात्र ना.धो. ताम्हनकर यांनी ते शब्दचित्र रेखाटले तेव्हाच मराठी रसिकांच्या मनावर ठळकपणे छबी उठवून गेले होते. मुलांच्या मराठी वाचनात ‘गोट्या’ला अग्रस्थान असे. १९४० च्या दशकात टीव्ही सोडाच रेडिओही दुर्मीळ होता. सुशिक्षित माणसे त्यांचा वेळ वाचनात घालवत. तरुण-तरुणींसाठी आणि प्रौढांसाठीही विविध प्रकारचे वाङ्मय सहजतेने उपलब्ध होत असे. मात्र लहान मुलांसाठी फारसे काही वाचण्यास उपलब्ध नसे. तशा परिस्थितीत 'खेळगडी' नावाचे मासिक सुरू झाले. ते भा.ल. तथा काका पालवणकर यांनी चालवले होते. त्याच मासिकातून 'गोट्या' मालिका नियमितपणे अक्षरसाहित्य रूपात प्रसिद्ध झाली. ताम्हनकर यांनी गोट्याची व्यक्तिरेखा अकृत्रिम शैलीत साकार केली होती. 'गोट्या' हा मुलगा बघता बघता सर्वसामान्य घरातलाच एक होऊन गेला. खरे तर, तो कोणाच्याच घरातला नसतो. तो अवमानित जिणे जगत असताना एकुलती एक सुमा नावाची मुलगी असलेल्या एका कुटुंबाला सापडतो. ते ‘दादा-वहिनी’ गोट्याला घरी आणतात. सुमाला तर भाऊ मिळतोच पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मुलामुलींना त्यांच्या हक्काचा असा एक सवंगडी खेळण्यासाठी उपलब्ध होतो. गोट्या हा चतुर तर असतोच, त्याचबरोबर विनयशीलही. त्याला नाना प्रकारचे खेळ आणि बौद्धिक करामती अवगत असतात. त्यामुळेच तो केवळ दादा-वहिनी आणि सुमा यांचे त्रिकोणी कुटुंब चौकोनी करून सोडतो, असे नाही, तर सर्वसामान्य घरांतही आनंदाचे निधान घेऊन येतो. त्यातील व्यक्तिरेखा सुमा, गोट्या, दादा, माई, दगडूमामा, वासूनाना, काका, काकू, राधा, आजी, मधू, केसकर गुरुजी, वकिलीण बाई, वकीलसाहेब अशा आहेत.
ताम्हनकर यांचा त्या लेखनामागील हेतू स्पष्ट आहे. ‘खेळगडी’ मासिकातील ‘गोट्या’ ही कथामाला पुस्तक रूपाने तीन भागांत प्रकाशित झाली. ताम्हनकर यांनी पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या प्रस्तावनेत त्यांचा हेतू उघड केला आहे. ‘बालजनांशी हसून खेळून त्यांच्या मनोविकासाला मदत करणारा एखादा सवंगडी त्यांना मिळवून द्यावा, ही मनातील इच्छा गोट्याच्या रूपाने मूर्त स्वरूपास गेली...’
काय करतो हा गोट्या नेमके? तो शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून गणला तर जात असतोच, पण त्याच वेळी तो गुरूजनांना अडचणीत आणणाऱ्या शिक्षकवर्गाला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांची खोड जिरवण्याचे कामही मोठ्या कौशल्याने करत असतो. ते करताना तो लहानपणी शाळेत मुले ज्या युक्त्या-प्रयुक्त्या योजतात, त्याच योजत जातो. प्रसंगी तो धांगडधिंगाही घालतो, पण त्याचा ते सारे करतानाचा हेतू स्पष्ट असतो. त्याच वेळी तो घरातील सुमावर म्हणजे त्याच्या बहिणीवर मनापासून माया करत असतो. सुमा आणि तिच्या मैत्रिणी यांची कोणी छेड काढत असेल तर तो त्या मवाल्यांना चांगला इंगा दाखवतो. दिवाळीत तो आकाशकंदिल तर करणारच, पण त्याच वेळी सुट्टीत थोडेफार काम करून मिळणारा अल्पस्वल्प मोबदलाही गरीब विद्यार्थ्यांच्या कामी लावणार! मग असा हा सत्शील गोट्या आमजनांच्या संस्कारशील मनांवर गारूड घालून न गेला तरच नवल.
सौ. मनिषा राजन कडव.
छानच , आज परत गोट्या आठवला ....!
ReplyDeleteलहानपणी पाहिलेली गोट्या मालिकेचा चित्रपट पुन्हा डोळ्यासमोर आला
ReplyDelete