एका स्त्रीची संर्घषगाथा - नाॅट विदाउट माय डाॅटर"
एका स्त्रीची संर्घषगाथा - नाॅट विदाउट माय डाॅटर"
इराण मध्ये १५ दिवस राहून पुन्हा अमेरीकेला परतू ह्या पतीद्वारे कुराण वर हात ठेऊन दिलेल्या खोट्या अश्वासनाला बळी पडून इराण मध्ये अडकलेल्या आई आणि तीच्या ५ वर्षाच्या मुलीची ही सत्य कथा लिहिली आहे बेट्टी महमूदी व सहलेखक विल्यम हाँफर या दोघांनी याचा मराठीत अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी .
इराण या मायभूमीतून एक तरुण अमेरीकेला आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी येतो, आपल्या हुशारीने यशस्वी होऊन अमेरिकेत स्थायिक ही होतो. पुढे तो एका अमेरिकन तरुणीच्या प्रेमात पडतो. निट विचारविनिमय करुन ते ह्यूस्टन मधील मशिदीत लग्न करतात. त्यांचा सुखद संसार सुरु असताना पुढे ते एका गोंडस मुलीला जन्म देतात.
तो तरुण म्हणजे डाॅ. सय्यद बोजहोर्ग महमूदी (टोपणनाव मूडी), ती अमेरिकन तरुणी म्हणजे ह्या पुस्तकाची लेखिका बेट्टी महमूदी, आणि त्यांच्या सुखात भर घालणारी जन्मास आलेली ती गोंडस मुलगी म्हणजे माहतोब.
मूडी आपली पत्नी बेट्टी आणि मुलगी माहतोब ह्यांना घेऊन फक्त १५ दिवसांसाठी इराण मध्ये आपल्या नातेवाईकांना भेटायला येतो. येथे तो आपली मोठी बहीण आमे बोझोर्ग हिच्या घरी राहतो. अमेरीकेत उच्च राहणीमानात राहीलेली बेट्टी, अामे बोझोर्ग च्या गलिच्छ आणि घाणेरड्या घरात १५ दिवसांनी पुन्हा अमेरिकेत जाण्याची आस अाणि नाइलाजाखातर राहते. मुलीसह ती एकेक क्षण ह्याच आशेवर मोजत काढते की काही दिवसांनी एकदा अमेरीकेला परत जायचा क्षण येईलच.
इराण मध्ये येताच मूडी चा आवाज, बोलण्याची पद्धत सगळ काही बदलून जाते. बेट्टी बरोबर तो अाैपचारीक वागू लागतो. पुढे बेट्टी ला हे कळून चुकते की आपली फसवणूक झाली आहे. आणि आपण कायमचे येथे नजरकैदेत राहणार आहोत.
"आता जन्मभर इथेच राहायच, समजलं? आता मरेपर्यंत इराण सोडायचा नाही." हे मूडी चे शब्द बेट्टीसाठी जितके भयानक होते तेवढेच वाचतानाही ते भयानक वाटतात.
इराणी लोकांचे गचाळ राहणीमान, इराण चे न पटणारे स्त्रिविरोधी कडक कायदे, पुरुषप्रधान संस्कृती, असह्य असे इराणी रितीरिवाज, इराणचा अमेरिकेविषयी तिरस्कार आणि हे कमी की काय म्हणून मूडीद्वारे बेट्टी आणि माहतोब चा होणारा अमानुष छळ सहन करीत ह्या कचाट्यातून निघून आपल्या मायदेशी अमेरीकेला सुखरुप पोहोचण्याचा बेट्टी येणार्या प्रत्येक दिवशी नियोजन करत राहते. तिचा होणारा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ वाचताना मन छिन्न होते.
दरम्यान तिला काही लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतही करतात. प्रत्येक वेळी प्रयत्न यशस्वी होण्याच्या मर्गावर असतात आणि नेमकी काहीनाकाही अडचण निर्माण होते. कंटळवाणे, दुखद स्वप्नांसारखे, उकाडा, घाम,चिकचिकाट यांनी भरलेले दिवस पुढे पुढे सरकत होते. बेट्टी दिवसेंदिवस मनाने अधिकाधिक खचत चालली होती. परंतु तरीही तिने बाळगलेला संयम अविश्वसनीय होता.
बेट्टीला बर्याच प्रयत्नांतून २-३ वेळा अमेरीकेला पळून जाण्याची संधी मिळते. परंतु त्यात मुलगी माहतोब ला सोबत नेऊ शकत नाही अशी परीस्थिती निर्माण होते. परंतु बेट्टीला हे मान्य नसते. मग जरी आयुष्यभर इराणमध्येच त्रासदायक जिवन घालवावे लागले तरी चालेल. परंतु माहतोबशिवाय अमेरीकेला पळून जाण्याचा ती स्वप्नातही विचार करु शकत नव्हती.
बेट्टीने पुस्तकामध्ये उल्लेख केल्या प्रमाणे इराणमधील कायद्यानुसार जर पतीच्या सहमती शिवाय पत्नीने मुल होऊ नये म्हणुन शास्त्रकिया (copper T Pin) केल्यास पत्नीला मृत्यु दंडाची शिक्षा आहे. जर आपल्या पतीला हे समजले तर आपल्या मुली पासुन आपण कायमची दुर होऊ, म्हणुन बेट्टी महमूदी गर्भाशयात घट्ट बसलेला तो IUD हळूहळू पण ताकत लावून स्वतः अोढून काढते. ते वाचतेवेळी अंगावर काटा येतो.
प्रबळ इच्छाशक्ती, प्राणावर बेतलेली परिस्थिती असतानाही स्वतःला काय मिळवायचं आहे, जगण्याचा उद्देश काय आहे हे न विसरणे काय असते ते हे पुस्तक वाचून समजते.
रोमांच आणि प्रत्येक पानांसरशी उत्कंठा वाढवणारे हे पुस्तक जेव्हा शेवटाकडे येतो तेव्हा आलम नावाच्या एका इसमाच्या मदतीने बेट्टी आणि माहतोब चा इराणमधून पळून जाण्याचा प्रवास चालू होतो. ह्या प्रवासाचे वर्णन एवढे उत्कंठा वाढवणारे आहे की ते वाचताना वाचक पुस्तक बाजूला ठेऊच शकत नाही. आलम च्या माणसांची बेट्टी आणि माहतोब ला पळून नेतानाची रचना अविश्वसनीय आहे. ठराविक अंतरांवर सतत गाड्या आणि ड्रायवर बदलणे, त्या ठिकाणांप्रमाणे पोषाख बदलणे, गाडीत स्त्रीया पुरुषांची संख्या हे सर्व सर्व नियोजित होते. पुढे डोंगर दर्यांचा प्रवास जो घोड्यांवरुन होत असतो तो वाचताना मन विषण्ण होतो. असंख्य वेदनांनी भरलेला तो प्रवास वाचकालाही वेदनांचा अनुभव देऊन जातो.
मूडी आणि इराणच्या कचाट्यातू सुटून एक आठवड्याचा जीव धोक्यात टाकणारा प्रवास करत बेट्टी आणि माहतोब अखेर तुर्कस्तानच्या अमेरीकन एंबसीत पोहोचतात आणि एंबसीच्या इमारतीवर फडकणारा अमेरीकेचा झेंडा बघून छोटी माहतोब टाळ्या पिटत नाचू लागते. त्या झेंड्याला बघून बेट्टीचा गळाही दाटून येतो.
यात लेखिकेचे मन अंतर्मुख करणारे एक वाक्य आहे, "स्वातंत्र्याचा खरा अर्थ पारतंत्र्य उपभोगून आल्यावरच माणसाला नीट समजतो". एक आई किंवा एखादी स्त्री काय करू शकते याचे उत्तम दर्शन घडवणारी ही सत्यकथा एक आदर्श आहे.
या पुस्तकामधील लेखन हे केवळ वाचन नाही, ते प्रत्यक्ष तुम्हाला त्या परिस्थितीचा अनुभव देणारं आहे. तसेच हे पुस्तक म्हणजे एका स्त्रीने अडचणींतून स्वतःच्या सुटकेचा वर्णन केलेली केवळ एक पलायन कथा नसून, एका स्त्री ने इराणसारख्या स्त्रियांसाठी नरक असलेल्या देशात दिलेल्या लढ्याचा, वेळोवेळी बाळगलेल्या संयमाचा, सोसलेल्या असंख्य शारीरिक व मानसिक वेदनांचा, कथा स्वरूपात मांडलेला डोळे पाणावतील असा अनुभव आहे. जी लोक जीवनात खुप यातना सहन करत आलेत, अनेक समस्यांमधून योग्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न करताहेत, अश्या लोकांकरिता हे पुस्तक नक्कीच स्फूर्ती देणारे असेल. अशा लोकांना हे पुस्तक जगण्याचे आणि लढण्याचे सामर्थ्य देईल.
बेटी आणि तिची ६ वर्षाची (सुटकेच्या वेळी) मुलगी माहतोब यांच्या वास्तव जीवनावर, सत्य घटणेवर आधारित हे पुस्तक. अक्षरशः चित्त हेलवणारे आहे. बेटी आणि माहतोब यांची फसवणूक करून बेटीचा नवरा मूडी त्यांना युद्धाच्या तोंडी आलेल्या एक माथेफिरू लोकांच्या देशात म्हणजे इराण मध्ये कायमचे नेन्याचा प्रयत्न करतो. आणि मग एक माता आपल्या मुलीसाठी किती पराकोटीच्या यातना सहन करते आणि एका क्रूर पति व अतिशय विक्षिप्त लोकांमधुन दोघी कश्या सुटून आपल्या मायदेशी अमेरिकेत परततात ते खरच अचंबित करणारे आहे. पहाडा सरखे धैर्य आणि तिव्र इच्छाशक्ति यातूनच त्यांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य केली.
तेव्हा प्रत्येक स्त्रीने "एका धाडसी आईच्या संघर्षाची कथा" सांगणारे हे पुस्तक तर वाचले पाहिजेच. परंतु एका आईची इच्छा शक्ती किती मोठी असते हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक पुरुषानेसुद्धा हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
सौ. मनिषा राजन कडव
छान लिहिले , एका आईची संघर्ष गाथा मार्मिक शब्दात पुस्तक परीक्षणातून मांडली ..!
ReplyDeleteखूप छान विश्लेषण..
ReplyDelete