कोंडुरा
चिं.त्र्यं.खानोलकर यांची 'कोंडुरा' छोटेखानी कादंबरी आहे. आयुष्याला वैतागलेला एक ज्येष्ठ माणूस घर सोडून बाहेर पडतो. त्याच्या मताला घरात काहीएक महत्व राहिलेलं नसतं. घराचा त्याग करू, स्वत:ला सिद्ध करु आणि मगच परत येऊ असं त्यानं ठरवलेलं असतं. वाट फुटेल तिकडे तणतणत चालताना त्याला एका वाटेवर एक जोगी भेटतो. 'माघारी जा' असा संदेश तो जोगी देतो. संदेशासोबत एक विचित्र वस्तूदेखील. जोग्यावर विश्वास बसल्यानं ज्येष्ठ माणूस परत फिरतो. घरी आल्यावर त्याचं स्वागत भावाच्या अपशब्दांनी होतं. सततचा अपमान व अवहेलना सहन होईनाशी होते. विचार आणि कृतीत असणारा प्रचंड अंतर्विरोध ठायीठायी दिसू लागतो. हा अंतर्विरोध, हे अंतर्द्वंद्व जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असतं. ते, या कादंबरीत अतिशय परिणामकारकपणे दर्शवलं जातं.
विचारात सुसूत्रता नसणे, त्यातून घेतले गेलेले विचित्र निर्णय, त्यामुळे होणारे परिणाम, विचित्र कृतींमागे असणारे विचित्र अनुभवांचे भास, आहे एक, वाटतंय दुसरंच आणि होतंय तिसरंच अश्या स्वरुपांचे प्रसंग, ब्रिटिश पारतंत्र्याखाली असणारं कोकणातलं अगदी छोटं गाव, तिथं धर्म नावाच्या गोष्टीचा लोकांवर असणारा पगडा, पैशाच्या बळावर चालणारे गैरप्रकार, पसरत जाणाऱ्या अफवा, थोतांडे,या सगळ्यांतून कादंबरीचं व्यामिश्र वातावरण आपला नियोजित आकार धारण करतं . १९६६ साली ही कादंबरी जेव्हा लिहिली गेली, तेव्हा ती निश्चितपणे काळाच्या पुढची कादंबरी आहे असं म्हणावं लागेल. अनेक गोष्टी अगदी थेटपणे मांडल्या आहेत यात शंका नाही. आज ५४ वर्षांनंतरही ही कादंबरी वाचताना,एखाद्या गोष्टीशी आपण विशेष जोडले जात नाही, असं होत नाही. खानोलकर हे नाव याचकरता महत्वाचं आहे. पूर्ण कादंबरीचं वाचन झाल्यानंतर असं लक्षात येतं, की साधारण ज्या बिंदूवर कादंबरीची सुरुवात झाली होती, त्याच ठिकाणी आपण येऊन पोहोचतो आहोत. दरम्यानच्या काळात, तात्या या ज्येष्ठ मुख्य पात्राचं सामाजिक स्थान सुरवातीपेक्षा उंचावलेलं आहे, पण व्यक्तीगत पातळीवर मात्र त्याची घडी अधिकच बिनसलेली आहे. कौटुंबिक पातळीवरचे व्यवहार अधिकच क्लिष्ट बनले आहेत.
गावानं जरी तात्यांना देव मानला असला; तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचं नैतिक अध:पतन झाल्याचं ठळकपणे दिसतं. हे सगळं, पूर्ण कथानकाची व्याप्ती आणि घटना विचारात घेता चक्क अर्थहीन भासतं. हे सगळं जे आपण वाचलं, ते नेमकं कशाकरता असंही वाटू शकतं. कारण सगळं वाचन झाल्यानंतर ठोस असं काहीही हाती लागत नाही. पण, आयुष्याचा एकंदर फोलपणाच लेखकाला अधोरेखित करायचा असावा. मानसिक पातळीवर चाललेली अंतर्द्वंद्वे आणि त्यातून निर्माण होणारे विचित्र पेच दाखवून देणे, हाच मानस असावा. खानोलकरांची ही कादंबरी अगदी साध्यासरळ भाषेत लिहिलेली आहे. साध्यासुध्या शब्दांतूनही, ते, प्रसंग परिणामकारकरित्या उभे करतात. वाचताना दृष्ये डोळ्यांसमोर तरळतात. उपमायोजन जबरदस्त आहे. कथानक निव्वळ काही ओळींत सांगण्यासारखं असूनही त्याचा विस्तार देखणेपणी व नेटकेपणी केला गेला आहे. भाषेवर आणि शब्दांवर असणारं प्रभुत्व, वेगळ्या शब्दांचा वापर, वाक्यातली शब्दांची वेगळी रचना, व्याकरणात जाणीवपूर्वक केलेले बदल, भाषेचा बोजडपणा टाळूनही जपलेली सघनता या सर्वच बाबी अभ्यासण्याजोग्या.
गिरीश कुलकर्णी लिखित व उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'देऊळ' या सिनेमाची कथा, 'कोंडुरा' वरूनच सुचली असावी असं मला प्रकर्षानं वाटलं. दोहोंचा घटनाक्रम अर्थातच वेगळा आहे. प्रसंगांमधेही साधर्म्य कमी ठिकाणी आहे. दोहोंचा कथाविस्तार पू्र्ण वेगळा आहे. पण मांडलेला विचार आणि केंद्रस्थानी असलेल्या पात्राचा प्रवास बरेच जागी आश्चर्य वाटावं इतका सारखा आहे. धर्म ही अफूची गोळी कशी आहे, हे या दोनही कृती परिणामकारकपणे अधोरेखित करतात. सुरवातीपासून शेवटापर्यंत होणारा दोहोंचा प्रवास बऱ्यापैकी समांतर रेषांवरून चालतो. 'कोंडुरा' मधले तात्या आणि 'देऊळ' मधला केशा, हे बरेचसे एकसारखे म्हणता येतील. त्यांचा एकूण प्रवास अर्थातच वेगवेगळा आहे. पण आदि, अंत, आणि मधले काही मुक्काम प्रचंड प्रमाणात सारखे आहेत. खेडेगावातलं वातावरण, 'देव'/देवी' यासारख्या संकल्पनांबाबत गावातल्या जनतेचा एकूण विचार, पैशाच्या मदतीनं हलणारी सूत्रं, लोकांच्या लेखी असणारं कुणाचं महात्म्य एका रात्रीत वाढणं ह्या सगळ्या गोष्टी कादंबरी आणि सिनेमा दोहोंतही ठळकपणे पहायला मिळतात. 'देऊळ'मधे विषयाभोवती असणारं राजकारणाचं अस्तर मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांचा स्वार्थीपणा व हितसंबंधांची गुंतागुंत त्यात विशेषत्वानं येते. तर, 'कोंडुरा'मधली तात्यांची घालमेल, त्यांची बदलत जाणारी मानसिक स्थिती आणि केवळ विचार व कृतींतल्या विरोधाभासातून उभं राहणारं कोडं चितारलं गेलं आहे. देऊळ मधे केशा आणि कोंडुरा मधे तात्या या व्यक्तिरेखा केंद्रभागी आहेत. पूर्ण कथा या पात्रांच्या दृष्टीकोणातून घडते. पण, देऊळची कथा बरीचशी बाहेरच्या जगातही डोकावते. या जगाचा परीघ किंचित मोठा आहे. सामाजिक व राजकीय वळणं यामधे अधिक ठळकपणे अधोरेखित होतात.
कोंडुराची कथा मात्र अधिक व्यक्तिगत पातळीवरची, व्यक्तिगत अनुभवांधारित व कृतींवर केंद्रित असणारी आहे. या कथेत असणारे इतर सामाजिक आयाम अतिशय वेगळे व महत्वाचे आहेत. पण, एकूण पटाचा विचार करता, कोंडुराची व्याप्ती ही देऊळ इतकी मोठ्या घेराची नाही. अर्थात, हे म्हणताना काळाचा फरकही लक्षात घ्यायला हवा. माणसाची वृत्ती कशी अधिकाधिक बदलत गेली ही गोष्ट देखील. तसं पहायला गेलं तर केशा आणि तात्या त्यांच्या उद्देशात सफल होतात. पण, त्या बदल्यात ते काय गमावतात त्या गोष्टी एकमेकांहून प्रचंडच वेगवेगळ्या आहेत. त्यातून आपल्या हाती नेमकं काय लागतं, ते ही ! केशाचं पात्र भोळं आहे तर तात्यांचं गोंधळलेलं. येशाचा पात्रस्वभाव काळानुसार बदलत जात नाही. तो बराचसा कायम राहतो. तर, तात्यांचा स्वभाव मात्र पूर्ण अंतर्विरोधी आणि गोंधळलेला आहे, जो काळानुसार विचित्र होत जातो आणि निबर बनतो. जर तुम्ही, कथानक नेमक्या अथवा ठोस स्वरूपाचं असेल अशी अपेक्षा करत असाल आणि शेवटी हाती नेमकं काही लागणार का, अश्या अपेक्षेनं वाचाल, तर कोंडुरा तुम्हाला निराश करेल. अर्थहीन, कंटाळवाणी वाटू शकेल. पण, कथानकाचा विस्तार, पात्रयोजना, तात्यांच्या पात्राचा एकूण प्रवास आणि कादंबरीच्या निमित्ताने स्वत:ला तपासून पाहणे, त्यातल्या कथानकाच्या अनुषंगाने स्वत:शी विचार करणे, तत्कालिन सामाजिक घटना व तत्कालिन वातावरणाचा अदमास घेणे, त्या काळापासून ते आजतागायत आस्तित्वात असणाऱ्या सामाजिक समस्यांवर विचार करणे, त्यांच्या प्रवासाचा आलेख तपासत एकूण धांडोळा घेणे, इत्यादी गोष्टी करायला जर तुम्हाला आवडत असतील, तरच कोंडुरा आवडू शकेल.
सौ.मनिषा राजन कडव.
छान लिहिले 💐💐💐
ReplyDeleteअप्रतिम परीक्षण
ReplyDelete