"द अल्केमिस्ट

"द अल्केमिस्ट"

मला वाटतं, जवळपास प्रत्येकानेच हे पुस्तक वाचलेलं असावं. मुळ लेखकाने लिहीलेलं पुस्तक आणि अनुवादित पुस्तक यामध्ये खुप फरक असतो, कारण मुळ पुस्तक लिहीताना लेखकाने सर्वस्व, त्याचं सर्वोत्तम मांडलेलं असतं तर अनुवाद किंवा भाषांतर करताना लेखकाला जसे आकलन होईल त्यानुसार मांडलेलं असतं. पण हे "द अल्केमिस्ट" (किमयागार) याला अपवाद आहे, कारण ज्या मुळ भाषेत (पोर्तुगिज) हे लिहीलं आणि ज्या ७० हुन अधिक भाषेत अनुवादित झाले त्या सर्व भाषेत हे पुस्तक सारखेच समजते. खरंतर या पुस्तकाचा गाभाच आहे की- "सर्वांना समजणारी विश्वाची एक भाषा आहे, एक अशी भाषा जिला कोणतेही शब्द नाहीत, कसलाही उच्चार नसलेली भाषा-प्रेमाची भाषा."
     पाउलो कोएलो या लेखकाने लिहिलेली ही कादंबरी पानांमध्ये मोजली तर खुप छोटी आहे, पक्का वाचक ही एका दिवसात वाचुन मोकळा होतो. पण जिथे शेवटचं पान बंद होईल तिथुन पुढे ही कादंबरी वाचकाचा पिच्छा सोडत नाही. 

अॅन्डालुसिया इथल्या सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळाची ही कथा आहे.
स्पेन मधल्या त्याच्या जन्मभूमी पासून इजिप्तच्या वाळवंटापर्यतचा त्याचा हा प्रवास आपल्या मनाचा तळ ढवळून काढतो. कथेतील साधेपणा मुळे आपल्या मनाचा वेध घेतो. पिरॅमिड्सजवळ लपवलेल्या खजिन्याच्या शोधात निघालेल्या सॅन्टिआगोला प्रवासात एक किमयागार भेटतो.
प्रत्येक जण या तरुणाला योग्य दिशा दाखवतो. तथापि, खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहित नसतं. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर तरुण यशस्वीपणे मात करू शकेल का हे सुद्धा कोणाला सांगता येत नाही. भौतिक वस्तूंच्या शोधार्थ निघालेल्या सॅन्टिआगोला स्वत:च्या अंतरंगात दडलेल्या खजिन्याच्या शोध लागतो. 
मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारी अशी ही उत्कट आणि प्रेरक कथा. आतला आवाज ऐकत महत्त्वाचं कसं आहे, याचा शाश्वत आलेख म्हणजे सॅन्टिआगोची ही कथा.
   "तुम्ही जर एखादं काम मनापासुन करायचं ठरवलं तर ते काम पुर्ण करण्यासाठी संपुर्ण विश्व तुमची मदत करण्यासाठी उभे राहते" या थीमभोवती पुर्ण कथा गुंफलेली आहे. 'सेन्तियागो' नावाचा एक मेंढपाळ मुलगा ज्याचा स्वप्नांवर विश्वास असतो, ज्याला धर्मगुरू होण्यापेक्षा किवा शाळेत जाऊन तेच ते शिकण्यापेक्षा जग फिरण्याची आकांक्षा असते. तो निघतो प्रवासाला, एका स्वप्नाचा पाठपुरावा करत, शकुनांचा शोध घेत, त्याचे अर्थ लावत. पण हा मुलगा खरंतर एकटा फिरतच नाही, तो सोबतीला आपल्यालाही घेऊन जातो. वाचक अल्पसंतोषी असेल तर ठीक पण जर जास्त विचार करणारा, 'सेन्तियागो' म्हणजे मीच असा विचार करणारा असेल तर मग खुप फरफट होते. 
      लेखकाने ही कादंबरी फक्त पंधरा दिवसात लिहीलेली आहे. कुठल्यातरी छोट्या प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे छोटेखानी पुस्तक कोणाच्या हिशोबातही नव्हतं, याकडे कोणी ढुंकुनही पाहत नव्हते पण 'पाउलो कोएलो' नाराज झाले नाही. कारण त्यांनीच लिहीलंय की, 'जेंव्हा आपल्याला जाणीव होते की आपलं जीवन आणि जगाचा इतिहास हा एकाच हाताने लिहीला आहे तेंव्हा कसलीच भिती राहात नाही.'
    याचा पहिला अनुवाद इंग्रजीमध्ये झाला आणि बघता बघता हे जगातील बेस्टसेलर बुक म्हणुन नावाजले. ७० हुन अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेलं हे  पुस्तक अाहे
 
     या कादंबरीवर वॉर्नर ब्रदर्स ही कंपनी चित्रपट काढणार होती पण ते शक्य झालं नाही, यावर लिहीलेलं पहिलं नाटक 'भारतामध्ये' दाखविण्यात आलेलं आहे. आज हॉलिवुड मधील दिग्गज कलाकार या कादंबरीला आपले स्फुर्तीस्थान मानतात अर्थातच बॉलिवुडकरही स्टेटस दाखविण्साठी या कादंबरीला आपले स्पिरीट मानतात. 
      या पुस्तकाचं एक खास वैशिष्ट्य आहे, असं म्हणतात की जो कोणी हे पुस्तक विकत घेतात त्यांच्याकडुन एकतर हे हरवते तरी किंवा चोरीला तरी जाते. हे कदाचित याच्यातच या कादंबरीचं यश असावं...
    शेवटी एवढंच...स्वत: छोटंसंच पुस्तक लिहिणारा पाउलो कोएलो म्हणतो, "जाडजुड पुस्तकंच वाचायला पाहिजेत. ती खुप दिवस वाचता येतात आणि उशाला घ्यायलाही बरी असतात."
       मराठीत 'नितीन कोत्तापल्ले' यानी अतिशय सुंदर अनुवाद केलेला आहे.
  हे पुस्तक सहज उपलब्ध होते. ज्या पुस्तकाच्या दुकानात हे मिळणार नाही तिथे समजुन जायचं कि इथे फक्त स्पर्धा परिक्षांची पुस्तके मिळतात.

टीप: पाउलो कोएलोला लहाणपणी ठार वेडा ठरवुन तीन वेळेस वेड्यांच्या इस्पितळात ठेवण्यात आलेले होते. आज त्यांची नऊ पुस्तके जगातील बेस्टसेलर आहेत. 



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*