वाटेवरल्या सावल्या

वाटेवरल्या सावल्या

'वाटेवरल्या सावल्या' वाचायच्या आधीच व्यंकटेश माडगूळकर यांचे 'करुणाष्टक' वाचलं होतं त्यामुळे गदिमांचे आई वडील, भावंडे, घरातील खडतर परिस्थिती त्यांचे बालपण याबद्दल माहिती होती, तरीही कविवर्यांच्या लेखणीतून त्यांचे आत्मचरित्र वाचण्याची उत्सुकता होती.
गदिमांची गीते आणि त्यांची प्रतिभा यांची जादू आज जे चाळीशीच्या पुढे आहेत, त्यांना नव्याने सांगायची गरज नाही. गदिमांच्या कथा व पटकथा असलेले मराठी मातीतले चित्रपटही भरपूर प्रसिद्ध आहेत
परंतु यांच्या गद्य लेखनाबद्दल थोडी उत्सुकता होती.
आत्मचरित्र लिहावे, अशा वयात त्यांनी हे लेखन केलेले नाही. जेमतेम ३८ ते ४० वयाच्या आसपास लिहिलेल्या या आठवणी आहेत.
पहिले प्रदीर्घ प्रकरण हे त्यांच्या बालपणातील कष्टाचा आणि अभावाचा काळ दाखवते. 
त्यानंतरची प्रकरणे ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, हातात काहीही नसताना केवळ जिद्द, आणि आत्मविश्वास यांच्या बळावर शून्यातून साकार झालेल्या यशाची कहाणी आहे.
या अवघड काळात ज्यांच्या आधारामुळे त्यांना पुढची पावले टाकता आली, त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिले आहे.
पुस्तकाच्या शीर्षकात त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या उन्हातल्या वाटेवरल्या या सावल्या आहेत 
आचार्य अत्रे, मास्टर विनायक, पांडुरंगराव नाईक, बाबुराव पेंढारकर, व्ही. शांताराम, वि. स. खांडेकर, नारायण काळे, विश्राम बेडेकर, बाबूराव पेंटर आणि आणखी काही.
अतिशय कृतज्ञपणे यांनी या सर्व व्यक्तींचे उल्लेख केले आहेत आणि हकीकती सांगितल्या आहेत. एके ठिकाणी असे म्हटले ही आहे, की योग्य वेळी मिळालेल्या या सावल्यांमुळेच आयुष्यात ते काहीतरी करु शकले.
याच प्रवासात त्यांच्यासोबत धडपड करणाऱ्या आणि पुढे सोबतीनेच दिग्गज झालेल्या दोन व्यक्ती, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांच्या बद्दलही त्यांनी लिहिले आहे. लतादिदींचाही उल्लेख आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे हेही मानकरी काही वेळ आपल्यासोबत रहातात.
कोरड्या खडखडीत तप्त वाळवंटासारखा बालपणाच्या काळातून प्रचंड कष्ट व उपासमार यांच्यातूनही प्रतिभेचे दैवी देणे सांभाळत धडपड करत यशाच्या राजमार्गावर ज्यावेळी ते आले, त्याच टप्प्यावर हे आत्मकथन त्यांनी थांबविले आहे.
या लेखनातून त्यांची गरिबीतही स्वाभिमान न सोडण्याची वृत्ती, कष्टाला न घाबरणे, सतत धडपड करीत राहणे, एवढे करूनही कौटुंबिक जबाबदारी ला सुद्धा न विसरणे, कुटुंबाला आधार देणे हे सगळे आपल्याला समजत जाते.
'शब्दकळा' याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर गदिमांचे लेखन वाचावे. काही काही वेळा जणू सरस्वतीच त्यांच्या हातून लिहून गेली आहे अशा ओळी आपल्याला भेटतात.
नवीन पेन मिळाल्यावर,
'कागदावरची अक्षरे जणू निळ्या रेशमाने विणली गेली.'
नवीन छत्री मिळाल्यावर,
'आपण छत्रहीन नाही. आपल्या माथ्यावरही कुणाचे तरी आशीर्वाद आहेत.'
आणि अशी अनेक.
पुस्तकाच्या शेवटी त्यांनी अभिनय केलेल्या, कथा, पटकथा संवाद लिहिलेल्या, गीतकार म्हणून काम केलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटांची यादी दिली आहे.
यादी वाचूनच त्या सुवर्णकाळाची आपण सफर करून येतो.
गीतरामायण रचून अजरामर झालेले आधुनिक वाल्मिकी गदिमा, हे स्वत:च शारदेचे एक लेणे आहेत. 
प्रत्येक मराठी माणसाने त्यांची जडणघडण उलगडून दाखवणारे हे छोटेखानी पुस्तक वाचायलाच हवे.

पुस्तकाचे नाव - वाटेवरल्या सावल्या.
लेखक - ग.दि. माडगूळकर.
प्रकाशक - साकेत प्रकाशन
पृष्ठे - १७५

Comments

  1. पुस्तक परीक्षण छान लिहिले 💐💐💐

    ReplyDelete
  2. अप्रतिम परीक्षण

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*