मुसाफिर , एक प्रेरणादायीच नव्हे तर मनोरंजक नी ज्ञानवर्धक आत्मकथा.


'मुसाफिर , एक प्रेरणादायीच नव्हे तर मनोरंजक नी ज्ञानवर्धक आत्मकथा.
             
     सध्याच्या काळात आजुबाजुची परिस्थिती पाहिली कि अच्युत गोडबोलेंच्या प्रेरणादायी आयुष्याची आठवण होते! सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तिचे मनोबल खचलेले आहे . कोरोनाचा भस्मासुर आपल्या शरीरावर कधी ताबा मिळवेल काहीच सांगता येत नाही . अनेकांचे उद्योग बंद पडले . कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या . आर्थिक घडी विस्कळीत झाली . या आजारातुन आपण वाचलोच तर पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा आहे! अशा काळात गरज असते मनोबलाची आणि मनोबल वाढण्यासाठी गरज असते प्रेरणेची! या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाने अच्युत गोडबोलेंकडून प्रेरणा घ्यावी! 

     'मुसाफिर' हे माझं सर्वात आवडतं पुस्तक! तशी गोडबोले सरांची सर्वच पुस्तकं अभिरुचीसंपन्न , वाचनीय आणि नितांतसुंदर आहेत यात शंकाच नाही . 'किमयागार', 'मनात', 'गणिती', 'नादवेध' ही पुस्तकं काही एका रात्रीत तयार झाली नाहीत . या पुस्तकांमागे लेखकाची म्हणजेच अच्युत गोडबोले यांची दीर्घ तपश्चर्या आहे . म्हणूनच आपल्याला केव्हा केव्हा ही पुस्तकं वाचून प्रश्न पडतो की या पुस्तकांमधे आणि इतर पुस्तकांमध्ये इतका फरक कसा ? या प्रश्नाचं उत्तर 'मुसाफिर'मध्ये आहे! 

     गोडबोले सरांनी ज्या विषयांवर लेखन केलं ते विषय मराठीमध्ये या आधी नव्हतेच! मराठीमध्ये 'मानसशास्त्रा'वर किती लेखन झालं ? झालं असेलही पण नेहमी प्रमाणे क्लिष्ट भाषेत . गोडबोले सरांनी मानसशास्त्राप्रमाणेच इतर अनेक पाश्चात्य ज्ञानशाखांवर मराठीमध्ये सोप्या भाषेत लेखन केलं आणि हे विषय सामांन्यापर्यंत पोहचवले . हे त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे! एखाद्या विषयावर लिहीण्यासाठी त्या विषयाचा सखोल अभ्यास आवश्यक असतो . इथे तर अच्युतजींनी अनेक विषयांवर लिहीलयं . म्हणजे त्यांच्या अभ्यासाची पाळंमुळं किती खोल आहेत याचा विचार सुज्ञ माणसांनी करावा . ते लेखक आहेत पण त्यापेक्षाही ते एक 'ग्रेट' अभ्यासक आहेत . एखादा विषय स्वता:हा समजुन इतरांना तो सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे . पण हा अभ्यास वाटतो तेवढा मुळीच सोपा नाही . त्यासाठी त्या विषयामध्ये स्वता:हा झोकून द्यावे लागते . 'मुसाफिर'मध्ये हेच आहे . पण फक्त हे पुस्तक बुद्धीजीवी व्यक्तिंसाठीच आहे का ? मुळीच नाही . सामान्यातील सामान्य व्यक्तिचा या पुस्तकावर अधिकार आहे . 'मुसाफिर' हे अच्युतजींचे आत्मचरित्र आहे . हे पुस्तक वाचल्याने वाचक समृद्ध होतो . अशी आत्मचरित्रं मराठीमध्ये खुपच कमी झाली ही मराठी भाषेची खरी शोकांतिका आहे!! 

     आत्मचरित्र म्हणजे या पुस्तकात फक्त लेखकाची कथा नसुन ज्या समाजामध्ये लेखक वावरला त्या समाजाचे वर्णनही या पुस्तकामध्ये आहे . ७० - ८० च्या दशकातील त्यांनी लिहीलेले मुंबईचे वर्णन हे खरोखरच वाचनीय आहे . गरिबी , बेरोजगारी , लोकांची उद्ध्वस्त झालेली आयुष्यं ही सर्व अच्युतजींनी पाहिलेली आहेत . 
जवळुन अनुभवलेले गुन्हेगारी जगताचे वर्णनही वाचकाला खिळवून ठेवते . वेश्या-वस्तीचे नग्नसत्यही मनाला झोंबणारे आहे . शिवाय याच काळात स्वता:हा अच्युतजींना दारुचे व्यसन लागते आणि या व्यसनाच्या ते इतके खोल गर्तेत जातात की तिथुन बाहेर येणे सर्वथैव अशक्य असते! 
राज्यात १६ वा आलेला तरुण , आयआयटी मुंबईचा केमीकल इंजिनीअर असलेला हा तरुण , पंडित भीमसेन जोशी , पंडित कुमार गंधर्व , किशोरीबाई आमोणकर , विं. दा. करंदीकर यांच्या सहवासात ज्या तरुणाचे बालपण समृद्ध झाले असा हा तरुण आयुष्यातल्या एका कठिण वळणावर चक्क उद्ध्वस्त झालेला होता!! दारु , सिगारेट , गुटखा , पान अशी विविध व्यसनांनी एकाच वेळी गोडबोलेंना ग्रासलेले होते!! दुसरा कुणी या ठिकाणी असता तर त्याने आत्महत्याच केली असती! शिवाय एकुलता एक मुलगा हा 'आॅटीझम' या मनोविकाराचा बळी होता . एक एक दिवस कठीण होता . ज्यावेळी अच्युतजींना समजलं की त्यांच्या मुलाला आॅटीझम झालाय त्यावेळी खात्यात ३०० - ४०० रुपये होते! फक्त!! 

    आता मात्र कठिण वेळ आलेली होती . त्यांनी केलेल्या प्लॅनिंगनुसार किमान आपल्या मुलाला आपल्यानंतर सांभाळण्यासाठी एक मोठी रक्कम आवश्यक होती . मग व्यसनांवर केलेली मात , रोज १५-१६ तास आयटीचा अभ्यास यामधुन या असामान्य व्यक्तिने आपली परिस्थिती पालटली!हे असं करणं सोपं नव्हतं कारण जी व्यक्ती काही काळापूर्वी दिवसभर व्यसनांत बुडालेली असायची ती व्यक्ती १५ - १६ तास आयटीसारख्या कठीण विषयाचा अभ्यास कसा करेल ? पण गोडबोले हे गोडबोले होते!! ज्यांना 'कंप्युटर' क्षेत्राचा गंधही नव्हता ते गोडबोले आता 'कंप्युटर' तज्ञ होवून जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ होते . 'इंन्फोटेक', 'पटनी', 'सिंटेल' , 'अपार', 'दिशा' यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे गोडबोले सीईओ होते!! आपल्या मुलाला आॅटिझम आहे म्हणून अशाच कित्येक मुलांचा विचार करुन त्यांनी आॅटिझम झालेल्या मुलांची शाळा काढली . शिवाय आयआयटीनंतर त्यांनी आदिवासी चळवळीत भाग घेतलेला होता . एक इंजिनीअर , एक यशस्वी आयटी क्षेत्रातील अग्रगण्य , एक विज्ञाननिष्ठ , संगीतप्रेमी अशी विविध रुपं अच्युतजींची आहेत!! 

     अच्युतजींचं 'मुसाफिर' बेस्ट सेलर पुस्तक आहे . हे पुस्तक वाचून अनेकांना मार्ग मिळाला कित्येक निराश व्यक्तिंसाठी 'मुसाफिर' आधार आहे . एका तरुणाने आत्महत्या करण्याआधी हे पुस्तक वाचलं आणि त्याला स्वता:हाचीच लाज वाटली . पुढे त्याने आत्महत्या न करण्याचा निर्णय घेतला . हेच या पुस्तकाचं खरं यश आहे . प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं !

     अच्युतजी मानवतावादी आहेत . देव - धर्म या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही . पण भारत प्रगत देश व्हावा असं ज्यांना मनापासून वाटतं त्यामध्ये अच्युतजी आहेत! भारत विज्ञाननिष्ठ , सर्वधर्मसमभावी , प्रगतशील राष्ट्र व्हावं यासाठी ते प्रयत्नरत आहेत! 

     गोडबोले सरांचं आयुष्य हे भरती - ओहोटीमधुन गेलेल होतं . सुखाच्या सरींसोबतच दु:खाच्या पाऊलखुणा सोबत होत्या . पण अच्युतजी आयुष्याशी कायमच सकारात्मक राहिले! 'डिअर जिंदगी' म्हणत आयुष्याला साथ देत राहिले . ते योग्य अर्थाने जीवनयात्री /आनंदयात्री आहेत!! 

सौ.मनिषा राजन कडव.

Comments

  1. प्रेरणादायी आत्मकथा , परीक्षण छान लिहिले ..💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*