तोत्तोचान - सर्जनशील खिडकी.
या शाळेच आयुष्य अवघ आठ वर्ष मात्र आज ऐंशी वर्षांनंतरही या शाळेच आकर्षण कायम आहे.
हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला ही शाळा हवीहवीशी वाटते, आपल्याला का मिळाली नाही अशी शाळा अशी खंत वाटणे हेच कोबायाशींच्या शिक्षणपद्धतीचे यश आहे. ते स्वतः या शाळेचे मुख्याध्यापक असल्याने या शाळेत राबविलेला प्रत्येक उपक्रम विद्यार्थ्यांच बाल मानसशास्र आणि वय विचार करूच केलेला आहे.
सगळी मुलं स्वभावतः चांगलीच असतात यावर त्यांचा विश्वास आहे. मुलांमध्ये “चांगुलपणा” ची रुजुवात करणे आणि तो वाढताना त्यांची वैयक्तिकता टिकून राहणे हा मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शाळेची निर्मिती केली.
या पुस्तकाच्या लेखिका तेत्सुको कुरोयानागी ह्या याच शाळेत शिकल्या. जे घडलय ते त्यांनी लिहिलं आहे. यात कोणताही कृत्रिमपणा जाणवत नाही. पुस्तक प्रकाशानंतर पहिल्या वर्षात पस्तीस लाख प्रती खपल्या. पुढच्या तीन वर्षात तो आकडा साठ लाखावर जावून जपान मधील बेस्ट सेलर पुस्तक होण यातच या पुस्तकच महत्व अधोरेखित होत.
जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं आणि जगाच्या काना-कोपऱ्यात हे पुस्तक पोहचलेल हे पुस्तक मराठीत अनुवादित करून चेतना सरदेसाई –गोसावी यांनी मराठी वाचकांसाठी दिलेली ही अनमोल भेट आहे.
जपानी लोक छोट्या मुलींच्या नावापुढे चान हा शब्द लावतात. लेखिकेच नाव तेत्सुको. लहानपणी लेखिकेला तेत्सुकोचान हा शब्द अवघड वाटे म्हणून ती स्वतःच नाव तोत्तोचान सांगे. पुढे हेच नाव तिची ओळख बनते. जपान मधील प्रचलित शिक्षण पद्धती तोत्तोचानला पहिल्याच वर्गात म्हणजे इयत्ता पहिलीच्या वर्गातून काढून टाकले जाते तेही अतिचंचल आणि खोडकर पणाचा ठपका ठेवून.
आपल्या मुलीला शाळेतून काढून टाकणे ही वेदना जगातल्या कोणत्याही आईसाठी त्रासदायकच. आपली नेमकी चूक काय हे सुद्धा न कळणार तोत्तोचानच वय. तरीदेखील दुसऱ्या क्षणालाआपल्या चिमण्या पोरीला समजून घेणारी नवी शाळा शोधणारी तोत्तोचानची आई देखील मनाला भावणारी. शाळेतून काढून टाकले हे मुलीला विसाव्या वर्षी सांगणारी आई दुर्मिळच.
तोत्तोचानची नवी शाळा आणि शाळेतला पहिला दिवस या शाळेच वेगळेपण दाखविणारा. शाळेचे वर्ग म्हणजे आगगाडीचे डबे. पहिल्या भेटीत तुम्ही मुख्याध्यापक की स्टेशन मास्तर असा प्रश्न विचारणारी तोत्तोचानला घड्याळ कळत नव्हत पण कळल असत तर तिला स्वतःलाच धक्का बसला असता.
कारण सकाळी शाळेत आली तेव्हा आठ वाजले होते आणि आता तू या शाळेची विद्यार्थिनी झाली असे जेव्हा सांगितले तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. आजपर्यंत सलग चार तास आपलं बोलन कधीच कुणी ऐकल नव्हत.
तिच्या आईला आणि वर्गशिक्षकांना आश्चर्य वाटावं सात वर्षाची मुलगी एवढे बोलली तरी काय असेल? ही जगावेगळी शाळा होती जपान मधील तोमोई विद्यालय आणि मुख्याद्यापक होते या शाळेचे संस्थापक सोसाकू कोबायाशी.
एका गरीब शेतकरी परिवारात जन्मलेले सोसाकू कोबायाशी यांचा जन्म टोकियो मध्ये १८९३ झाला. संगीताची पदवी घेताल्यानंतर प्राथमिक शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पाठ्यपुस्तक मुक्त शाळेची संकल्पना त्यांच्यात याच काळात रुजली आणि १९३७ साली तोमोई विद्यालयात त्यांनी ती साकारली. निसर्गातलं शिक्षण त्यांना भावलं. त्यांची संवेदन क्षमता इतकी तीव्र होती की मुलाचं चालणच काय पण त्यांच्या श्वासोच्छवासाची लय देखील कोबयाशीनां माहित होती.
प्रचलित शाळा आणि शिक्षण यापेक्षा वेगळी असलेली ही शाळा अनेक अर्थाने वेगळी होती. इथं पाठ्यपुस्तके नव्हती. इथं शिकण्याच आणि शिकविण्याच वेळापत्रक नव्हत. एकाच वेळी अनेक विषय शिकविले जात. अध्यापनाच्या इथल्या पद्धती सुद्धा वेगळ्याच. वर्गशिक्षक सकाळी वर्गात आल्यानंतर आज दिवसभरात काय काय करायचं त्याची यादी फळ्यावर लिहित आणि त्या त्या विषयांचे प्रश्न सांगायचे.
मुलांना हव्या त्या विषयांपासून सुरुवात करण्याची मुभा होती त्यामुळ एकाच वेळी कुणी निबंध लिहित, कोणी प्रयोग करीत कुणी गणित सोडवीत तर कुणी इतिहासात मग्न. सगळा अभ्यास स्वतंत्रपणे करीत. जिथ मुलांना अडचण येईल तिथ शिक्षकांनी मदत करायची. शिकण्याच्या या पद्धतीमुळे मुलाचं निरीक्षण करता यायचं. त्यांची प्रगती,आवडीनिवडी आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती जवळून समजून घेता येन शक्य व्हायचं.
जेवणाच्या सुट्टीत सभागृहात गोलाकार बसविले जायचे. समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरच काहीतरी असा वाक्प्रचार मुख्याध्यापकांनी तयार केला होता. मुलांच्या डब्यात समुद्रातल आणि डोंगरावरच काहीतरी असाव असा कटाक्ष होता. पालकांना तश्या सुचना असायच्या. ज्यांच्या डब्यात दोन्हीपैकी जे नसेल ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी दोन ताट घेवून फिरत आणि वाढत सुद्धा. मुलांच्या चौरस आहारावर बारकाईने लक्ष असे. जेवणाच्या आधी मुख्याध्यापकांनी तयार केलेलं आणि सुंदर चाल असलेल गाण म्हणत. ते गाण होत … बत्तीस वेळा चावून खावा ..आणि डबा खात असतानाच रोज एकाने समोर येवून आवडेल त्या विषयावर बोलायचं.
या शाळेला मुलांचा शाळेचा गणवेश मान्य नव्हता. उलट मुख्याध्यापक नेहमी पालकांना सांगत मुलांना शाळेत पाठवताना घरातील सगळ्यात खराब कपडे घालत जा. कपडे खराब असले की ते फाटण्याची किंवा असावं त्यांनी निष्कारण काळज्या करू नयेत अस त्याचं स्पष्ट मत होत. या शाळेत एक शेतकरी मुलांना शेतातील कामे शिकवत. स्वतःच्या हाताने लावलेल्या बियांपासून झाड होताना पहाण्याचा आनंद मुलं मनसोक्त लुटत. रानातील सहलीत मूलं स्वतः स्वयंपाक करीत तेही तीन दगडांच्या चुलीवर.
फक्त पन्नास मुलांच्या या शाळेत एक डबा ग्रंथालयाचा होता. मुलं आवडेल तेंव्हा इथ यायची आवडेल ते पुस्तक वाचायची आणि घरी सुद्धा वाचायला न्यायची. शाळेत उन्हाळ्यात मुक्कामी शिबीर व्ह्यायची. मुलांची संगीत कवायत, संगीत नाटक सादर व्हायची. गरम पाण्याची झऱ्याची सहल तर अविस्मरणीय. शाळेतील क्रीडादिनाची तर सर्व आतुरतेने वाट पहायची. असे कितीतरी उपक्रम या शाळेत होतात. सर्व उपक्रमांची इथं मांडणी करण देखील अशक्य. त्यासाठी पुस्तकच वाचाव लागेल.
दुसरे महायुद्ध चालू होते आणि एका मध्यरात्री आकाशातून बी-२९ या लढावू विमानातून असंख्य बॉम्बचा वर्षाव या शाळेवर झाला आणि क्षणार्धात हे आगगाडीचे डबे बेचिराख झाले. जिथं मुलांच्या हसण्या-गाण्याचा-खिदळण्याचा-खेळण्या-बागडण्याचा आवाज येत होता तिथं विनाशकारी ज्वाळांनी वेढलेल्या विध्वंसाचं गान ऐकू येवू लागल. सगळे शहर आगींच्या ज्वालांनी वेढल गेल. आपल्या डोळ्यांसमोर आपली स्वप्न जळताना पहान किती वेदनादायक असेल हे फक्त कोबायाशीच सांगू शकतील.
शाळेच्या पहिल्या दिवशी तोत्तोचान ‘तू फार चांगली मुलगी आहेस’ मुख्याध्यापकांच्या या वाक्याने तोत्तोचानच्या आयुष्याला केवढा अर्थ प्राप्त झाला होता. तोमोई ची शाळा भेटली नसती तर शाळेतून काढून टाकलेली वाईट मुलगी असा कायमचा शिक्का बसून एक न्यूनगंड घेवून जगावं लागलं असत.
या शाळेत शिकणारी मूलं आजही हयात आहेत. बरेच निवृत्त झाले आहे. अनेक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर पोहचले आहेत.
“तोत्तोचान” या पुस्तकाने खपाचे अनेक विश्वविक्रम केले आहेत. शालेय अभ्यासक्रमात सुद्धा यातील प्रकरणांचा सामावेश आहे. या पुस्तकाच्या विक्रमी यशाची कारणांवर प्रसार माध्यमांवर चर्चासत्र झालीत. एका प्रकाशकाने तर या यशावर एक स्वतंत्र पुस्तकच छापलं. जपानचे सम्राटांच्या घरी चहापान आणि जपानच्या पंतप्रधान यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले या पुस्तकावर अनेक टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सेरीज साठी प्रस्ताव आले मात्र त्यासाठी लेखिकेने परवानगी नाकारली. कारण वाचकांच्या मनातील छबी चित्रित करणे अशक्य. आज युनिसेफने लेखिकेची शांतीदूत म्हणून नियुक्त केलय. हे सगळ “तोत्तोचान”ने दिलय.
अवघ आठ वर्षाच आयुष्य लाभलेल्या तोमोई शाळेने तोत्तोचान ला घडवले. अजूनही अनेक तोत्तोचान असतील जे जगाला कळले नाहीत. तेत्सुको कुरोयानागी यांनी साध्या सोप्या शब्दात तोमोई आणि तोमोई ला आकार देणारया सोसाकू कोबायाशी यांना जगाच्या कानाकोपऱ्यात नेले. आजच्या प्रचलित शिक्षण व्यवस्थेला हादरा देणारे हे पुस्तक प्रत्येक शिक्षकांनी व पालकांनी वाचावे असेच आहे .
सौ.मनिषा राजन कडव
१६/ए , ओमशिवमकूपा को- हौ-सो
गुरुनानक शाळेजवळ , रामबाग -४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
तोत्तोचानचे परीक्षण 👌👌💐💐
ReplyDelete