मन में है विश्वास"
एखादे छान पुस्तक वाचून हा वेळ सत्कारणी लावण्याचे मी ठरवले."मन में हैं विश्वास" या पुस्तकाने मला खुणावले आणि मुखपृष्ठावर असलेल्या ऐटबाज,धडाडीचे पोलिस अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांनी विश्वास दिला कि हे पुस्तक वाच आणि वेळ सत्कारणी लाव.खरेच राजहंस प्रकाशन चे हे पुस्तक वाचकाला झपाटून टाकते,खिळवून ठेवते.श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या जडणघडणीचा प्रवास
अत्यंत वाचनीय आणि प्रेरक आहे.लहानपणी शाळेत दादागिरी करण्यापासून उत्कृष्ट पोलिस अधिकारी म्हणून कामगिरी करण्यापर्यंत ची ही कहाणी वाचावी अशीच आहे.हे पुस्तक वाचताना एक बाब स्पष्ट पणाने लक्षात येते की प्राथमिक शिक्षण जर चांगले मिळाले किंवा शिक्षक अभ्यासू
कठोर शिस्तीचे असतील तर भरकटलेल्या विद्यार्थ्याला योग्य मार्ग सापडू शकतो.विश्वासराव पाटील यांनी त्यांच्या बाबतीत शालेय जीवनात घडलेले असे काही प्रसंग यात सांगितले आहेत,ज्यातून त्यांच्या शिक्षकांनी कानउघाडणी करून त्यांना सावरले.विना तिकीट टुरिंग टॉकीज
मधे घुसणे,हॉटेल मधे चहा नाश्ता करून बिल न देणे,हॉटेल मालकाशी भांडण करणे,गावात भावकी
बरोबर भांडणे असे प्रकार केल्याचे ते लिहितात.घरात काकांनी त्यांना उत्कृष्ट असा वैचारिक दृष्टिकोन दिला.ते सांगायचे "दुसऱ्यात
ला चांगुलपणा स्वीकारला नाही की ती असूया बनते.आणि स्वीकारला तर प्रेरणा बनते.तसेच कोणत्याही व्यक्तीला आपण विना अट स्विकारले तर ते प्रेम बनते. अटी घातल्या तर त्या व्यक्ती बद्दल
द्वेष निर्माण होतो." मोठे झाल्यावर कोण होणार असा गुरूजींनी प्रश्न विचारला,तर विश्वासराव पाटलांनी गुरुजींना विचारले की सगळ्यात मोठा साहेब कोण असतो? गुरूजींनी कमिशनर असे सांगितले,विश्वासराव म्हणाले मी कमिशनर होणार.
यावर वर्गातील विद्यार्थी हसू लागले,पण गुरूजींनी
त्यांचे कौतुक केले.इथेच त्यांना मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळाली.
शाळेत दादागिरी करत असत.त्यातून एके दिवशी
शिक्षकाच्या खुर्चीवर बसले.शिक्षिका कदम यांनी
हुशार पण गावगुंड मुलगा अशी त्यांची संभावना केली.अंगी नम्रता नसेल तर तुझ्या हुशारीला कवडीची किंमत नाही असे त्यांना सुनावले.हा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला आणि एक हुशार
मुलगा म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीने ते पेटले.
दिग्वाडेकर सरविषयी कृतज्ञ होताना विश्वासराव पाटील लिहितात,"तारुण्य,संपत्ती,सत्ता
आणि विवेक या पैकी एक ही कारण अनर्थ घडवायला पुरेसे आहे,या अर्थाचे संस्कृत सुभाषित
गुरूजींनी शिकवून मनात पक्के बसवले होते."
रामदास स्वामींचे मनाचे श्लोक मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी साह्यभूत झाले असेही लेखकाने लिहिले आहे."सदासेवी अरण्य तारुण्य काळी" हा
रामदासस्वामी यांचा श्लोक कामवास ने पासून दूर
राहण्यासाठी जगदाळे सरांनी शिकवला होता.त्यामुळे वाईट विचारापासून दूर राहू शकलो असे विश्वासराव पाटील लिहितात.
या पुस्तकातील लक्षवेधी गोष्ट म्हणजे विश्वासराव पाटील यांनी किशोरवयात गणेशोत्सवाच्या वर्गणीतून गावा मधे वाचनालयाची उभारणी केली होती.ही अनुकरणीय बाब आहे.
आणखी एक किस्सा वाचकाला हळवा करून जातो.लेखक श्री विश्वासराव पाटील यांनी मेस चे जेवण आवडत नाही सकाळच्या बस ने डबा पाठव
असे पोस्टकार्ड आईला लिहिले,आणि भरत कांबळे
या त्यांच्या मित्राकडे ते पोस्टात टाकण्यासाठी दिले. मित्र ते पोस्टात टाकायला विसरला.ते पत्र त्याच्या शर्ट मधे तसेच राहिले.तो शर्ट धुत असताना
त्याच्या आईला ते सापडले.ते भिजलेले पोस्टकार्ड
वाचून त्या मातेचे डोळे पाणावले आणि तिने सर्व मित्रांना बोलावून त्यांच्या आवडीचे जेवण दिले.
स्त्री हृदय किती वात्सल्याने ओथंबलेले असते .
आयुष्याचा प्रत्येक क्षण शिक्षण हे तत्व विश्वासराव पाटील यांनी अमलात आणलेले दिसते.कारण आयपीएस म्हणून निवड झाल्यानंतरही ते पुढील शिक्षण घेत राहिले.पोलिस अधिकाऱ्याचे जीवन
कठीण सत्वपरीक्षा पाहणारे असते,हे त्यांनी सांगितलेल्या गडचिरोली येथील प्रशिक्षण चालू असताना चा प्रसंग वाचून लक्षात येते.जंगलात पेट्रोलिंग ला जाताना,सोबत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोबत पाणी घेवू दिले नाही.त्यावेळी
दलदलीतील चिलटे बसलेले पाणी प्यावे लागले.
तसेच 26/11 ला अतिरेक्यांशी लढताना कोणीतरी
अर्धे खावून टाकलेले सफरचंद आणि पायदळी तुडवले ले वेफर खाण्याची पाळी आली होती.
लेखक श्री विश्वासराव पाटील यांच्या मनात सकारात्मकता ठासून भरलेली होती हे या पुस्तकाच्या पानोपानी जाणवते. ही सकारात्मक ऊर्जा त्यांना प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांकडून लाभली होती.श्री विश्वासराव नांगरे पाटील हे एक धडाडीचे आणि सामाजिक भान असणारे पोलिस अधिकारी आहेत.अनेक विस्कटलेले संसार त्यांनी सावरले.पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी तरुणांना प्रेरक व्याख्याने दिली.असे अधिकारी लाभणे हे आपले भाग्यच.
"मन में है विश्वास" हे विश्वास नांगरे पाटील लिखित पुस्तक वाचून झालं. नसेल तर , नक्की वाचा...
विद्यार्थ्यांना विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या जगात वावरणाऱ्या आणि तमाम तरुणाईसाठी हे पुस्तक म्हणजे स्फूर्ती देणारं एक मोठं आणि अखंड स्त्रोत आहे.
सौ.मनिषा राजन कडव
प्रेरणादायी पुस्तकाचा छान परीचय करवून दिलात .💐💐👌
ReplyDelete