समिधा

समिधा

समिधा हे आत्मकथा या प्रकारातील पुस्तक आहे.समाजसेवेतील हिमालय असणाऱ्या बाबा आमटे यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.बाबा आमटे यांनी आपले जीवन कुष्ठरोगींच्या सेवेला अर्पण केले.त्यासोबतच लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा (प्रकाश आमटे) याचीही मुहुर्तमेढ रोवली.  भारत जोडो अभियान ,नर्मदा बचाव अभियान ,निराधार ,अनाथ ,दिव्यांगाच्या सेवेत बाबांचे कार्य खूप थोर आहे शिवाय बाबांवर खूप लिखानही झालेले आहे.समिधा या ग्रंथात आमटे कुटुंबिय व समाजसेवेचा त्यांनी मांडलेला पट उलगडून दाखविलेला आहे.साधनाताईंचे बाबांच्या आयुष्यात आल्यानंतरचे आयुष्य व पूर्वीचे आयुष्य सांगताना त्यांनी बाबांची कृतार्थ गाथा मांडलीच शिवाय स्व मेहनतीचा संघर्षमय इतिहाससुद्धा मांडला आहे.

समिधा या ग्रंथाचे नावच मला खूप आवडले.समिधा या शब्दाचा अर्थ होतो हवनासाठी यज्ञात टाकावयची पवित्र काडी.या काड्या वड ,पिंपळ ,पळस ,आंबा अशा पवित्र वृक्षांच्या असत.यज्ञकुंड धगधगता ठेवण्यासाठी समिधा आवश्यकच असते.

बाबांनी समाजसेवेचा यज्ञकुंड मांडलेला होता.हा यज्ञकुंड तेवता ठेवण्यासाठी बाबांसह कुटुंबातला प्रत्येकजण समिधा झालेला आहे.
  समिधा या ग्रंथास लेखनी व वाणीची रसाळता लाभलेले प्रख्यात लेखक राम शेवाळकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे.

बाबा व साधनाताई यांचे एकमेकांच्या आयुष्यात येणे ही एक प्रेमकथा आहे व तसेच तो ठरवून केलेला पारंपारिक विवाह सुद्धा आहे.प्रेमकथा या अर्थाने की ,सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या बाबांना सुखाची पारंपारिक पुटे बोचत होती.त्यांना समाजसेवेचे वेड होते.या अवलियाचा पिंडच वेगळा होता.त्यांनी लग्नच न करण्याचा निर्णय घेतलेला होता.ऐन तारूण्यात राखलेली दाढी ,जटाधारी वेश ,खादीचे कपडे व समाजसेवेसाठी भ्रमंती या त्यांच्या वैराग्य वेशभूषेवरून बाबा लग्न करतील असं कुणालाच वाटत नव्हतं.तरण्याबांड पोराचं हे वैराग्य बाबांच्या आईला पटत नव्हतं पण कुणाचाच ईलाज नव्हता.साधनाताई या पूर्वाश्रमीच्या इंदू घुले.गागाभट्टाच्या कुळातील वंशज असलेल्या घुले घराण्यातील कन्या.सुखवस्तु ,पारंपारिक संस्कारक्षम ब्राम्हण कुटुंबातील चौथं कन्यारत्न .घुले व आमटे परिवार जवळून नातलग लागत असल्यामुळे बाबांचे साधनाताईंच्या घरी येणे जाणे होते.साधनाताईंचं पितृछत्र त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षीच हरवलेलं.त्यांची छोटी बहीण त्यावेळी अवघ्या दोन अडीच महिन्यांची होती.ऐन चाळीशीच्या वयात त्यांच्या वडिलांनी आटोपतं घेतलं .एकुलत्या एक छोट्या भावानं वयाच्या पाचव्या वर्षीच हे जग सोडलेलं त्यामुळे रेशमी कपड्यांच्या दुकानाचं वैभव असलेल्या आर्थिकदृष्ट्या संपन्न घुले कुटुंबात कर्ता पुरूष कोणीच नव्हता.त्यामुळे विवाह प्रसंगी वा इतर कार्यक्रमावेळी बाबांची उपस्थिती घुले कुटुंबियांना आधाराची वाटत होती.बाबांनी त्यावेळी तिशी ओलांडलेली होती अन् इंदूताई अजून सोळाच्या उंबरठ्यावरच होत्या.सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य व सामर्थ्य हे पुरूषांचे सौंदर्य.हा विचार लक्षात घेतला तर बाबा व इंदूताई आपापल्या ठिकाणी सामर्थ्यवान होते.दोघात वयाचे ,रंगरूपाचे ,स्वभावाचे व जीवनदृष्टीचेही खूप मोठे अंतर होते.साधनाताई विवाहायोग्य असल्या तरी आणखी एका मोठ्या बहिणीची उजवणी बाकी होती व बाबांचे वैराग्य सगळ्या पाहुण्यांना माहीत होते.साधनाताईंच्या संपर्कात आल्यावर लग्न न करण्याचा बाबांचा विचार गळून पडला.दोघात पत्रं व्यवहार सुरू झाला.बाबांच्या जगावेगळ्या वेडामुळं साधनाताईंच्या आईचा व संपूर्ण घुले कुटुंबाचा या विवाहाला विरोध होता.कारण बाबांशी लग्न म्हणजे वादळाशी गाठ होती .पण नियतीला हेच नातं मंजूर होतं.सर्व कारणांचे अडथळे पार पडून हा विवाह संपन्न झाला.
  बाबांनी महारोग्याच्या सेवेसाठी आनंदवन येथे सेवाश्रम सुरू केला.सहा कुष्ठरोगी ,चौदा रूपये नगदी जमा पुंजी ,चारपाच गाईंसह वरोरा जवळील ओसाड जंगली जागेत त्यांचा संसार सुरू झाला.
आनंदवनची उभारणी करताना सुरूवातीच्या काळातील कष्टमय जीवनगाथा म्हणजे समिधा होय.बाबांना झालेला सर्पदंश ,माकडांनी केलेला जीवघेणा हल्ला असे प्रसंग वाचताना ,अंगावर शहारा येतो.समिधा या पुस्तकाची भाषा रसाळ या सदरात मोडत नाही पण शब्द न् शब्द प्रत्यक्ष भोगलेला व अनुभवाधिरीत असल्यामुळे ओळ न् ओळ वाचनीय आहे.
यदुनाथ थत्ते ,पु.ल. देशपांडे ,प्र.के.अत्रे ,अनिल अवचट ,गो.नी.दांडेकर अशा कैक लेखकांनी आनंदवनला वारंवार भेटी दिल्या.आर्थिक मदतही केली.या सर्वांबद्दल साधनाताईंनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ,वसंतराव नाईक ,पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबतच काही परदेशी पाहुण्यांनी आनंदवनला भरीव सहकार्य केले.
  विकास व प्रकाश आमटे यांचे संगोपन करताना आर्थिक व आजारविषयक अडचणींचा सामना साधनाताईंना करावा लागतो.साधताईंनी सुरूवातीच्या काळात पन्नास माणसांचा दोन वेळेसचा स्वयंपाक ,धुणीभांडी व नऊ गाईंची धार काढण्याचे काम स्वतः केले आहे.हेमलकसा येथील लोक बिरादरी हा प्रकल्प विद्युत सोय नसल्यामुळे तब्बल सतरा वर्षे अंधारात चालविलेला आहे.
बाबा हे हिमालय असले तरी साधनाताई हिमालयाची सावली होत्याच शिवाय त्या त्यांची माऊलीही होत्या.बाबांच्या प्रत्येक प्रकल्पात साधनाताई खांद्याला खांदा लावून इंचभर पुढंच उभ्या राहिल्या पण कधी मागे हटल्या नाहीत.सुरूवातीला सुरू केलेला श्रमाश्रम प्रकल्प ,महारोगींसाठी आनंदवन प्रकल्प ,शेतक-यांसाठी सोमनाथ प्रकल्प व आदिवासींसाठी हेमलकसा प्रकल्प असा बाबांच्या कार्याचा चढता आलेख आहे.साधनाताईंच्या सक्रीय वाहून घेण्यामुळे बाबांचा चढता आलेख कुठेही वक्र झाला नाही . साधनाताईंच्या समिधेमुळेच बाबांचा सेवाव्रती रथ चौखूर उधळू शकला.
पिडितांची सेवा करायला ममत्व लागते अन् या ममत्वाची भरभरून असलेली कासंडी म्हणजे साधनाताई होत्या.याची प्रचिती ग्रंथाच्या पानोपानी येते.

साधनाताईंचा संघर्ष ,त्यांचे कार्य ,सेवाधर्म चालविण्यासाठी स्व-जीवनाची आहुती वाचताना समिधा हे नाव सार्थ ठरते. 

प्रकाशवाटा हे प्रकाश आमटेंचे आत्मचरित्र व बाबा आमटेंवरील एका अवलियाचा प्रपंच या पूर्वीच मी वाचलेले होते.त्यामुळे साधनाताईंच्या कार्याची ओळख होतीच पण समिधाने आमटे कुटुंबियांचा श्रीगणेशा नव्याने कळला.पती-पत्नी जेव्हा एकाच पातळीवरून ,चार पावलांची दोन एकरूप पाऊले म्हणून काम करतात तेव्हा अद्वितीय इतिहास घडत असतो याचं उदाहरण सावित्रीमाई-म.ज्योतिबा या फुले दाम्पत्यानं घालून दिलेलं आहे.त्याच उदाहरणाची पुनरावृत्ती म्हणजे बाबा-साधनाताई आहेत.त्यांचाच कित्ता गिरवत पुढे डॉ.विकास आमटे-डॉ.भारती आमटे ,डॉ.प्रकाश-मंदाताई आमटे व पुढच्या पिढीतील त्यांची मुले डॉ.दिगंतसह सर्व मुले सुना ,लेकी जावई सेवेचा वसा समिधा होऊन चालवत आहे. 


सौ.मनिषा राजन कडव.

Comments

  1. प्रभावी शब्दात पुस्तकाचा परीचय करवून दिला 💐💐💐👌👌👌

    ReplyDelete
  2. वा,सुंदर परीक्षण_परीक्षण वाचून पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण केलीत

    ReplyDelete
  3. समिधा या पुस्तकाचे सुंदर परीक्षण

    ReplyDelete

Post a Comment