आय डेअर
एक पोलिस अधिकारी म्हणून आपल्या संपूर्ण कारकिर्दीत डॉ. किरण बेदी यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कामाची नेहमी नवीन क्षेत्रं स्विकारण्याची हिंमत दाखवली. पोलिसांनी केवळ गुन्हा शोधून काढण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय आणि सुधारणांना सर्वाधिक महत्त्व द्यवे, या आपल्या मताचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. सरकारमधील तसेच त्याबाहेरच्याही अनेक मोठमोठ्या प्रस्थांना त्यांनी हादरा दिला. आपल्या कामाला विशाल आणि व्यापक परिमाण देण्याची किरण बेदी यांची वृत्ती सत्तेवरील लोकांनाही दिसून आलेली होती. डॉ. किरण बेदी यांची अभिनव कार्यपद्धती आणि त्यातून निर्माण झालेली वाद-वादळे यांमुळेच सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांना सतत केंद्रस्थानी ठेवले. हे त्यांना त्यांच्या कामातील पारदर्शकतेचे मूल्यमापन वाटते, तर इतर काही जणांना मात्र तो प्रसिद्धीच्या हव्यास वाटतो. सामान्य जनतेला मात्र किरण बेदी `मसिहा` वाटतात. देशात तसेच परदेशातही अनेकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवला आहे.तथापी नाण्याची दुसरी बाजू म्हणून बघता, एखाद्याला असेही वाटू शकेल की त्यांच्याबद्दल प्रसृत झालेल्या त्यांच्या मूळच्याच आत्मप्रेमी प्रवृत्तीत ही आणखी एक भर आहे. किरण बेदी कोणत्याही पदावर काम करित असोत, कामावर रुजू होण्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढताच असतो. काही काळानंतर त्या अशा काही वादळात सापडतात की त्यांचे ते पदच जाते. त्यांना दिल्लीच्या बाहेर पाठवले आले, त्यांनी मिझोराम सोडावे म्हणून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, गोव्यातून फरार म्हणून घोषित करण्यात आले आणि तिहार कारागृहाची सुरक्षिता धोक्यात आणली असा त्यांच्यावर आरोप देखील करण्यात आला. फक्त किरण बेदी `आय् डेअर!` असं म्हणू शकतात. त्या असं का म्हणू शकतात याचा शोध घेणारे परमेश डंगवाल लिखित व सुप्रिया वकिल यांनी मराठीत अनुवादित केलेले हे पुस्तक हे वाचायलाच हवं... आजच्या युवा पिढीबद्दल कोणीही बोलायला लागलं, की अगदी हमखास ऐकू येणारी वाक्य, ‘आजच्या तरुणांना कसलाही आदर्श नाही. कसलीही मूल्य नाहीत’ त्याचं सगळं आयुष्य स्वत:पुरतं पाहण्यातच जातं. ‘देशप्रेम, समाजाची बांधिलकी या गोष्टी नव्या पिढीला शिकवायला हव्यात. आमच्या वेळी, आमच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात वगैरे वगैरे वगैरे. कोणत्याही समाजाला स्वत:च्या तरुण पिढीबद्दल अगदी हेच म्हणायचं असतं आणि गमतीची गोष्ट की, त्यांच्या आधीची पिढी त्यांच्याबद्दलही अगदी हेच म्हणत असते. उदा. ‘चांगली सरकारी नोकरी सोडून त्या गांधीच्या मागे धावायला निघालेत’ किंवा ‘माझ्या हपिसात चिकटवून देतो म्हटलं तर नको म्हणताहेत चिरंजीव’ किंवा ‘पैशाची किंमत नाही’ वगैरे वगैरे वगैरे थोडक्यात काय, कोणत्याच तरुण पिढीला हे चुकलेलं नाही. आणि तरीही एका बाबतीत मात्र आपल्या आधीची पिढी आपल्यापेक्षा अधिक भाग्यवान होती हे मात्र कबूल करावंच लागेल. समोर आदर्श ठेवावी, ज्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा, ज्यांची मूल्यं, जीवननिष्ठ अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा अशी पहाडासारखी माणसं आपल्या आधीच्या पिढीला पाहायला मिळाली. आपल्याला आदर्शवत वाटतील अशी माणसं आज दुर्दैवाने फार थोडी आहेत. या अगदी हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या माणसांमध्ये एक स्वयंप्रकाशित नाव ताबडतोब उठून दिसणारं आहे डॉ. किरण बेदी. किरण बेदी यांचं नाव आपण खूप वेळा, खूप ठिकाणी आणि वेगवेगळ्या संदर्भात ऐकतो. वृत्तपत्रांमधून त्यांच्याबद्दल खूप वाचतोही त्यांच्या ठोस वागण्यामुळे निर्माण झालेले वादही आपल्या माहितीचे आहेत, परंतु हे निर्भय, कणखर व्यक्तिमत्व घडलं तरी कसं याबद्दल मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. ही उणीव भरून काढणारं पुस्तक म्हणजे ‘आय डेअर’ हे किरण बेदीचं चरित्र. आशा कर्दळे यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अतिशय सुरेख अनुवाद केला आहे. आशा कर्दळे यांना किरण बेदी यांच्याबद्दल वाटत असलेला आदर, कौतुक, अभिमान हा या सरस अनुवादाच्या पाठीशी असलेला प्रमुख आधार आहे, असं लगेच जाणवतं. किरण बेदीचं बालपण घरातली कठीण आर्थिक परिस्थती आई-वडिलांनी दिलेलं भरपूर प्रेम, मूल्यं आणि उत्तेजन, आई-वडिलांनी मुलींमध्ये संक्रमित केलेल्या जबरदस्त महत्त्वकांक्षा या सर्व गोष्टींबद्दलची सखोल माहिती मिळाली की मग किरण बेदीचं तडफदार, बाणेदार व्यक्तिमत्त्व कसं कसं घडत गेलं हे आपल्याला समजू लागतं. घरातल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे किरणनं लहानपणीच ठरवलं, की आई-वडिलांनी आपल्यासाठी गुंतवलेल्या प्रत्येक पैशाचा जास्तीत जास्त उपयोग व्हायलाच हवा आणि मग तिनं शाळा-कॉलेजमधील टेनिस, एनसीसी, वादविवाद, भाषणे, नाटक, क्रीडास्पर्धा या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या हिरीरीनं भाग घेतला. किरणच्या शालेय जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पुढच्या आयुष्याचा नीट विचार करून आवश्यक तो विषय अभ्यासाला निवडता यावा म्हणून तिनं स्वत:च्या हिमतीवर शाळा बदलण्याचा घेतलेला निर्णय यामध्ये तिची जबाबदारीची जाणीव आणि त्या लहान वयातही पुढच्या आयुष्याचा तयार केलेला आराखडा हे तर जाणवतंच; शिवाय स्वत:च्या निर्णयक्षमतेचा आणि पुढच्या परिणामांना तोंड देण्याचा आत्मविश्वास हेही जाणवतं. गणवेषाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि किरणनं पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला. १९७२मध्ये आशियाई महिला विजेतेपद टेनिसमध्ये मिळवल्यानंतर हा खेळ कायम खेळता येणार नाही याची जाणीव ठेवून आपल्या व्यवसायाकडं लक्ष केंद्रित करण्याचा शहाणपणाही किरणनं दाखवला. पोलिसांसारख्या संपूर्णतया पुरुषी क्षेत्राच्या व्यवसायात प्रवेश घेतल्यानंतरचे किरण बेदींचे बरेवाईट अनुभव आणि त्या अनुभवांशी त्यांनी दिलेला सामना हे सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. किरण बेदीचा विवाह आणि सहजीवन हेही सर्वसामान्य सहजीवनापेक्षा खूपच वेगळं आहे. त्यांच्या पोलिससेवेतील अत्युच्च पदापर्यंतचा प्रवास, मिळालेले धकके आणि पारितोषिकं त्यांच्यावर केले गेलेले आरोप, खटले आणि असंख्य मान-सन्मान, तिहार तुरुंगातील त्यांचे अनुभव आणि प्रयोग या सर्व गोष्टींबद्दलची अतिशय रंजक आणि तरीही विचारांना चालना देणारी माहिती ‘आय डेअर’ या त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळते आणि आजच्या खुज्या कोत्या समाजातील फार थोड्या उत्तुंग व्यक्तिमत्वापैकी एकाची ओळख झाल्याचा आनंद वाटतो.
सौ.मनिषा राजन कडव.
छान परीक्षण 💐💐💐
ReplyDelete