हाती ज्यांच्या शून्य होते’

‘हाती ज्यांच्या शून्य होते’

सामान्य अन् असामान्य!
फरक काय तो केवळ एका अक्षराचा.
मात्र हाच फरक माणसाचं कर्तृत्व अधोरेखित करतो. त्याच्यातल्या कर्तबगारीचं दर्शन घडवितो. त्यामुळं
सामान्य म्हणून जन्माला आलेल्या अन् स्वतःच्या सामर्थ्यावर असामान्य ठरलेल्या व्यक्तींच्या प्रवासाचं सर्वांनाच कुतूहल वाटत असतं. त्यांच्या वाटचालीविषयी ओैत्सुक्य असतं.
अरुण शेवते यांचं ‘हाती ज्यांच्या शून्य होते’ हे पुस्तक अशाच कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वांची कहाणी. बहुतेक शाळा-महाविद्यालयांत, ग्रंथालयांत हे पुस्तक अगदी हमखास पहावयास मिळतं. यावरून त्याचं मोल ध्यानात येतं.
अरुण शेवते हे ख्यातनाम साहित्यिक आहेत. मात्र त्यापलीकडं जात दिवाळी अंकाशी त्यांनी जोडलेलं नातं अगदीच खास ठरावं. हे सारे दिवाळी अंक पुढं पुस्तक रुपानं वाचकांसाठी पर्वणी ठरले अाहेत. प्रत्येक दिवाळीत एक थीम घेऊन त्यांचा अंक येतो. त्यातून लता मंगेशकर ते गुलजार,
सुशीलकुमार शिंदे ते यशवंतराव गडाख, रंगनाथ पठारे ते अरुण साधू
अशा जवळपास 500 हून अधिक प्रतिभावंतांना त्यांनी लिहितं बनवलं.
इतकंच नव्हे, तर अमृता प्रीतम, झाकीर हुसेन, जावेद अख्तर, हरिप्रसाद चौरसिया यासारख्या अमराठी साहित्यिक, कलावंताचे अनुभवही वाचकांपर्यंत पोचविले.
‘हाती ज्यांच्या…’ हे पुस्तक अशांपैकीच एक. ते विलक्षण प्रेरणादायी आहे. शून्य ते शिखर यातल्या यशाचा ताळेबंद मांडणारं आहे. या पुस्तकातल्या ‘ग्रेट पर्सनॅलिटीं’च्या गतकाळात डोकावताना आपण क्षणभर अचंबित होतो.
कधीकाळी पोस्टमन असणारे अब्राहम लिंकन, वर्तमानपत्र विकणारे अब्दुल कलाम, स्टुडिओत काम करणाऱ्या लता मंगेशकर, पेट्रोल पंपावर क्लर्क असणारे धीरूभाई अंबानी, मोटार गॅरेजमध्ये काम करणारे गुलजार, माळी काम करणारे निळू फुले, कोर्टात शिपाई असणारे सुशीलकुमार शिंदे,
उदबत्त्या विकणारे गदिमा, फूटपाथवर पोस्टर रंगविणारे एम. एफ. हुसेन,
बस कंडक्टर असणारे जाॅनी वाॅकर, ड्रायव्हर असणारे मेहमूद अशा कित्येक दिग्गजांचा प्रवास या पुस्तकात रेखाटलेला आहे.

कर्तृत्ववान माणसाचं वैभव
आपल्याला दिसतं. मात्र त्या
ऐश्वर्याच्या मागं दडलेला अंधार कुणाला दिसत नाही. अंधाराला छेद देऊनच ही माणसं मोठी होतात.
या माणसांचा रंजक, प्रेरणास्पद प्रवास
पाहाण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकानं आवर्जून वाचायलाच हवं
सौ.मनिषा राजन कडव .

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*