संस्कृतीच्या पाऊलखुणा

संस्कृतीच्या पाऊलखुणा 


संस्कृतीच्या पाऊलखुणा - महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अत्यंत सुंदर आणि रसाळ मेवा आहे हे पुस्तक.. लेखक डॉ. द. ता. भोसले यांची लेखनशैली इतकी विलक्षण ओघवती आहे की वाचताना एक क्षणदेखील कंटाळा येत नाही.. ज्येष्ठ साहित्यिक श्री. रा. चिं. ढेरे यांची प्रस्तावना तर अवश्य वाचायला हवी
आणि डॉ. भोसले यांचे मनोगत देखील.
 आपली लोकसंस्कृती ही फक्त यात्रा उत्सवा पुरती मर्यादित नाही,वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणाच्या निमित्ताने, प्रथा परंपरा म्हणून ती जपली जात असली तरी आजच्या झपाट्याने बदलत चाललेल्या जगात त्या संस्कृती ची रुपं ही अंधुक होत चालली आहेत त्यामुळे जून्या प्रथा परंपरांची माहिती लिहून ठेवणं गरजेचं झालं आहे.
   अशीच बरीचशी रंजक माहिती लोकसाहित्याच्या पाऊलखुणा या पुस्तक रुपात लोकसाहित्याचे अभ्यासक द.ता.भोसले यांनी संकलित केली आहे. या पुस्तकात दिवाळीची कृषिसंस्कृतीचा सण म्हणून जशी ओळख करुन दिली आहे तशीच हादगा, जोगती- जोगीण, चिंध्यादेवीची उपासना , नवस इ. अशा स्वरुपाच्या परंपरेची माहिती दिली आहे, तसेच आपल्याला आजही धकाधकीच्या जगण्यात कधीतरीच दिसणारा पोतराज असो वा देवस्थानांमधे दिसणारी अंगात येणारी लोकं, हलगी वाजवणारे, वेगवेगळ्या प्रकारांनी देवाची प्रार्थना करणारे, यांचीही विस्तृत माहिती काही प्रकरणांमधे आली आहे.

       हे पुस्तक महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती अलगद उलगडून दाखवते. कित्येक रूढी, चालीरीती, ज्या  जन्मापासून शहरात वाढलेल्या व्यक्तीला कधी कळल्याच नसत्या.. त्यांचे अतिशय रोचक वर्णन केलेले आहे. दीपावली, हादगा, यांसारखे सण-उत्सव, बहुरूपी, पोतराज, आराधी यांसारखे लोकधर्माचे उपासक, रेडा या लोकसंस्कृतीतील उपेक्षित पशूचे वर्णन, पखाल या लेखात घरोघरी पाणीवाटप करणारा पखालवाला, गावाच्या वेशीवरली गावातल्या वीरांची चित्ररूप कहाणी सांगणारी वीरगळ, जातं.. मडकं.. सूप.. शिंकाळं यांसारख्या फक्त ऐकून माहीत असलेल्या गोष्टींचं ग्रामीण संस्कृतीतील आणि जीवनातील महत्व, अलंकार आणि संस्कृती, काजळ आणि लोकमानस.. आणि इतरही अनेक.. सगळे लेख इतके अभ्यासपूर्ण आणि तरीही अजिबात कंटाळा न येणारे.. परत परत वाचावेसे वाटणारे.. 
       यज्ञोपवीत, बगाड, नवस, पागोटे आणि पगडी, शेलकट, मंगळसूत्र... सगळेच लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण..
        स्वर्गवासी झालेले पदार्थ हा लेख तर कितीतरी सोपे परंतु आज काळाच्या उदरात गडप झालेले ग्रामीण पदार्थ दाखवतो..
        एकूण ४९  लेख.. निव्वळ अप्रतिम!!!
   हे पुस्तक वाचताना आज यातील अनेक गोष्टी नवीन वाटण्याची शक्यता आहे परंतु आजही ग्रामीण भागात काही प्रमाणात बदलत्या स्वरुपात का होईना अनेक प्रथा परंपरा जपल्या जात आहेत त्यांची ओळख आपल्या पूर्वजांची परंपरा म्हणून बघण्यापेक्षा त्या परंपरांमागील समकालीन उद्देश शोधून त्या परंपरा समजून घेणं गरजेचं आहे.त्यामुळे सदर पुस्तक संग्रही ठेवावं असंच आहे.द.ता.भोसले हे लोकसंस्कृती विषयातील नावाजलेले अभ्यासक आणि लेखक असून याच विषयांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहे.हे पुस्तक पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

सौ.मनिषा राजन कडव

Comments

  1. छान परीक्षण लिहिले , पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली 👌👌💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*