व्यक्ती आणि वल्ली.

व्यक्ती आणि वल्ली.

वाचनाची आवड असलेला पण हे पुस्तक न वाचलेला मराठी माणूस शोधुन सापडणार नाही .
पु. ल. म्हटलं कि डोळ्यांसमोर उभा राहतो अखंड वाहणारा निर्मल हास्याचा निर्झर. त्यांच्या विनोदी कथांनी लहान मुलांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत सर्वाना वेड लावलंय.

जर एखाद्या लेखकाला त्याची शिकवण लोकांपर्यंत पोहचवायची असेल तर त्याला त्याच साहित्य ऐतिहासिक, पौराणिक, स्वातंत्र्यकथा, कविता, विनोद अशा प्रकारच्या साच्यात बसवायची गरजच पडत नाही मुळात.

एक यशस्वी लेखक तोच असतो जो कोणत्याही प्रकारच्या साहित्यातून आपले चांगले विचार लोकांपर्यंत पोहचवत असतो. पु. लंच्या व्यक्ती आणि वल्लीनी देखील असच वेड लावलं  त्यात फक्त विनोद नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला दिलेली शिकवण आहे, सामान्य व्यक्ती तर आपण सगळेच असतो, पण आपल्यातही काही माणसं अशी असतात जी कळत-नकळत आपल्याला बरच काही शिकवून जातात. जीवनाचे धडे देतात, नि अशाच व्यक्ती त्यांच्या वेगळेपणामुळे "वल्ली" म्हणून ओळखल्या जातात. अशाच काही वल्लींची शिकवण मी आज आपल्यासमोर मांडतेय. व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाची हि शिकवणमाला म्हणजे या पुस्तकाचा वेगळ्या अर्थाने मांडलेला अनुभव आहे, 


• हरितात्या - एक इतिहास वेडा माणूस

पु. लंच्या हरितात्यांना वेड होत ते इतिहासाचं. त्यांचं हे वेड आपल्याला नकळत शहाणं करून जात. आयुष्य जगण्यासाठी सुद्धा असच एक वेड असल पाहिजे, आपल्या धेय्याच वेड. आपल्या धेय्याकडे वाटचाल करताना वाटेत अनेक अडचणी येतील पण जे आपल्या सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन नि जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा आपल्या आयुष्यातील एक आवश्यक घटक मानून पुढे चालत राहणे हेच तर जास्त महत्वाचं असत नाही का? आता तुम्ही म्हणाल विरोधक कशाला, विरोधक सुद्धा तेवढेच आवश्यक असतात. आपलं कुठे चुकतंय ते समजायला, जीवनाच्या गाडीला कुठे ना कुठे गतिरोधकांची गरज पडतेच पडते त्याशिवाय जीवनाचा प्रवास सुखकर होत नाही.

हरितात्यांचे सवंगडी म्हणजे लहान मुलं, पण ते लहान मुलांतही लहान मुलं होऊन मिसळायचे. त्यांच्यावर इतिहासकालीन कथांद्वारे चांगले संस्कार करायचे. आपल्या कामातून आपण कुणाचंतरी भलं करतोय, कुणाच्यातरी आयुष्यात एक आवश्यक घटक बनून राहतोय हे का कमी आहे? हरितात्यांसारखेच पुराव्याने शाबीत करण्यासारखे जगूयात नि आपल्या चांगल्या कामाने सर्वांचे मन जिंकूयात.

• नामू परीट - एक स्थितप्रज्ञ

पु. लंच्या नामूला स्थितप्रज्ञ म्हटलंय म्हणजे तो अगदीच भावरहीत, शांत या अर्थानं नव्हे बरं. स्थितप्रज्ञ म्हणजे आल्या परिस्थितीला शांतपणे सामोर जाणारा माणूस, असा अर्थ घेतलाय इथे.

माणसाची परिस्थिती कधीच समान नसते, प्रत्येकालाच चांगल्या-वाईट, गरीब-श्रीमंत, सर्व परिस्थितीतून जावं लागत. अशा परिस्थितीतही न डगमगता उभा राहतो तो माणूस. हीच शिकवण नामू परीट वाचताना मिळते. त्याची परिस्थिती चांगली-वाईट, गरीब-श्रीमंत अशी बदलत जाते, अगदी तो जेल मध्ये सुद्धा जाऊन येतो पण शेवटी सर्व परिस्थितीवर मात करून तो या पांढरपेशा समाजात ताठ मानेन उभा राहतो.

आपल्याकडून एखादी चूक झाली तर त्या चुकीला आपण किती महत्व द्यावं हे आपल्या हातात असत, बहुतेक वेळा आपल्या हातून घडलेल्या वाईट गोष्टी आपण विसरू शकत नाही, किंबहुना कधी कधी समाज त्या गोष्टी आपल्याला विसरू देत नाही. भुतकाळातील अशा गोष्टी विसरून याच चुका परत करू नयेत नि समाजात ताठ मानेन जगायला शिकावं हेच तर सांगतो पु. लंचा नामू आपल्याला.

• नंदा प्रधान - यक्ष

पु. लंचा हा यक्ष मात्र मनावर फार मोठा आघात करून गेलाय. एखादी अशी व्यक्ती ज्यानं आयुष्यात खूप दुःख पाहिलीत, तिला नंदा प्रधान खूप जवळचा वाटेल, अगदी माझ्यासारखाच.

असं म्हणतात कि यक्ष-यक्षिणी खूप सुंदर असतात. आपल्या अस्तित्वाने ते आजूबाजूचं वातावरण देखील सुंदर बनवतात. पण ते स्वतः मात्र आतून खूप दुःखी असतात कारण त्यांच्या आयुष्याला शाप असतात. 
नंदाने सुद्धा लहानपणापासून खूपकाही सहन केलेलं असत, खूप काही भोगलेलं असत. आणि म्हणूनच कि काय छोट्या छोट्या सामान्य सुखाचं सुद्धा त्याला अप्रूप वाटत.

आपण सुद्धा कधी कधी मोठं दुःख आल्यावर खचून जातो, जगण्याची उमेद हरवून बसतो, नि त्या दुःखाखालीच चिरडली जातात आपली छोटी छोटी सुख, जी आपल्याला आपल्या व्यथांपुढे दिसूनच येत नाहीत. भलेही त्यांचं अस्तित्व काही क्षणाचं असेल पण असे क्षण आपल्याला जगण्याची उमेद देऊन जात असतात.

त्यामुळे प्रत्येक मोठ्या दुःखातही आपली माणसं, आपले छोटे सुखाचे क्षण कधीच विसरू नयेत. कारण तीच आपली जगण्याची सर्वात मोठी शक्ती असते. प्रत्येक संकटात ती आपल्याला तारून नेते.

• चितळे मास्तर - एक आनंद स्रोत

काही काही माणसं जन्माला येतात तीच मुळात दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी. चितळे मास्तर म्हणजे देखील असाच सदा दुसऱ्यांना आनंद देणारा कल्पवृक्ष. त्यांचं जीवन त्यांनी फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या सेवेसाठी वाहून घेतलं होत.

ओळीत फक्त आठ शब्दच लिहायची सक्ती करणारे, वर्गातल्या मुलांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करणारे चितळे मास्तर मुकुंदाच्या पोलिओ झालेल्या मुलीला गोष्ट सांगताना मनाला हेलावून जातात.

चांगली माणसे पण अशीच असतात त्यांना फक्त दुसऱ्यांना आनंद देणं इतकंच ठाऊक असत. मग त्यासाठी त्यांना वय, स्थळ-काळ-वेळ काहीच आडवं येत नाही. चांगल्या माणसांचा चांगुलपणा त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येतो.

आपणही आपल्या चांगल्या वागण्याने इतरांच्या असच उपयोगी पडलं पाहिजे नाही का? आपल्याला कळणार सुद्धा नाही इतक्या सहजपणे आपण दुसऱ्यांना आनंद देत असतो. जगासाठी भले ती छोटी गोष्ट असो, पण ज्याला तो आनंद मिळालाय त्या माणसासाठी ती जगातली सर्वात मोठी गोष्ट असते. म्हणून नेहमी इतरांना आनंदी ठेवुयात.

• हंड्रेड परसेन्ट पेस्तन काका

पेस्तन काका वाचल्यावर समजलं कि प्रेमाला वयाच बंधन असूच शकत नाही. पेस्तन काकींची पेस्तन काका घेत असलेली काळजी पाहून वाटलं कि प्रेम असावं तर असं.

आपली प्रेमकथा पण ते ज्या दिलखुलासपणे लेखकाला सांगतात ते वाचून वाटत हल्लीच्या काळात नाही सापडायचा असा प्रांजळपणा. लग्नाला साठ वर्ष झाल्यावर सुद्धा She is a very good girl!!!! म्हणायचे ते वाचून प्रेमाची एक नवीन व्याख्या समजली. प्रेम म्हणजे लग्न, मुलं-बाळ, संसार हेच नव्हे, तर प्रेम म्हणजे एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास. उतारवयात घेतलेली आपल्या जोडीदाराची काळजी. त्यांच्या चांगल्या वाईट सवयींची असलेली जाणीव, नि त्यांना सर्व गुण-दोषांसह स्वीकारणं.

लग्न म्हणजे आपल्या जोडीदारासह आपण आयुष्याची केलेली वाटचाल, चांगल्या काळात मिळालेली त्याची साथ तर वाईट वेळेत असलेला हातात हात. पेस्तनकाकांचं प्रेम सुद्धा त्यांच्या सारखंच शंभर टक्के खरं होत. असच प्रेम आपणही आपल्या माणसांवर करूयात.

यातील अनेक व्यक्तीरेखा लोकांच्या इतक्या परिचयाच्या आहेत कि त्यांचे डायलॉग , नामु परीटाच्या भाषेत " ड्वायलाक " पण लोकांना पाठ आहेत .
पूर्वी प्रत्येक घरात एखादा तरी
 " नारायण " असायचाच मग भले तो पुलंच्या नारायणा इतका चतुरस्त्र नसेल . आजकाल तर लग्न , मुंजिची contract देण्याची पध्दत असल्याने ही नारायणाची जमात लुप्त होते आहे .या सारखी इतर सर्व व्यक्तीचित्रे आपण विसरू शकत नाही .

इतिहास जगणारे हरितात्या , प्राद्न्य मराठी बोलणारा सख्या 
गटणे, चिरतरुण नदा प्रधान , नाटक कंपनीत आयुष्य घालवून पण " बोलट "मधून " नटा " पर्याय प्रगती करु न शकलेला जनार्दन नारो शिंगणापूरकर ,जन्मजात सेक्रेटरी असलेला बापू काणे, चितळे मास्तर , पेस्तनकाका व सर्वात शेवटी सदा तिरकस बोलणारे पण फणसासारखे वरुन काटेरी पण आतून गोड असलेला अंतु बर्वा .अशा अनेक अजरामर व्यक्तीरेखां
या होत्या पु. लंच्या काही वल्ली आणि त्यांची शिकवण. ज्या आपण आत्मसात करूयात आणि आयुष्याला एक नव्या दृष्टिकोनातून बघुयात.

सौ.मनिषा राजन कडव

Comments

  1. व्यक्ती आणि वल्लीमधील व्यक्ती रेखांपासून आपणास काय शिकावयास मिळते याचे छान विवेचन केलेत .💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*