नमस्कार.🙏🏻

नमस्कार.🙏🏻


प्रभाते करदर्शनम! म्हणत दिवसाची सुरुवात करताना आपल्या दोन हाताची ओंजळ समर्पण शिकवते त्या त्या दिवसाला समृद्ध करत सगळ्या च ऋण आदरभावाने मानत जोडले जातात हात आणि होतो नमस्कार ....!!

नमस्कार या शब्दाचा जन्म संस्कृत शब्द नमस्कारातून झाला आहे, ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे आभार मानणे आहे., एका आत्मा ने दुसऱ्या आत्म्याला  केलेले अभिवादन ...म्हणजे नमस्कार ....!!

जसे एखाद्याची  समाजमाध्यमांवर पोस्ट आपल्याला आवडली तर आपण आपल्या भावना नकळत पोहचवत आदर व्यक्त करतो..मनापासून त्या व्यक्तीप्रतीचा आदरभाव हा देखील एक मनस्वी नमस्कारच...व्यक्ती व्यक्ती नुसार बदलत जातो इतकेच भावना समान....तो ही नमस्कार उर्जेचे स्थानांतरणच....एकमेकांना दिलेले चैतन्य आँक्सिजनच....!!

आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्यामागे असतो त्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव. त्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून आपण स्वीकार केला आहे हे दर्शविणारी ती कृती असते. त्याचबरोबर आपल्या आत्मभावाचे समर्पणही त्यात असते. त्यात नम्रता असते,
. दुसऱ्याचा आदर, स्वीकार आणि स्वतःचं समर्पण, नम्रता .! ही सगळी व्यक्त करतो मनापासून केलेला एक नमस्कार. नमस्कारात एक शक्ती असते. मनापासून केलेला नमस्कार समोरच्या व्यक्तीला किंवा समूहाला सुद्धा जिंकून घेऊ शकतो. आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्याचे उत्तर म्हणून ती व्यक्ती सुद्धा आपल्याला प्रतिनमस्कार करते. ती व्यक्ती आपल्या नमस्कारातून जणू सांगते की मी तुझ्या नमस्काराचा स्वीकार केला आहे. देवासमोर उभे राहून जेव्हा आपण नमस्कार करतो, तेव्हा आपल्या मनात हीच भावना असते. मनातून आपण जणू त्याला म्हणत असतो, ' हे परमेश्वरा , माझ्या नमस्काराचा स्वीकार कर. ' देवाला नमस्कार करताना आपली मान किंचित झुकते, डोळे मिटले जातात आणि नमस्कार असतो हृदयापासून.त्यासाठी हातात हात न घेता आपलेच दोन्ही हात जोडता येतात सध्याच्या या काळात स्पर्श करणं हातात हात देणं धोक्याचच.....मग अशा वेळेस पुरातन काळापासून माहित असलेला हा नमस्कार ......!!!!

जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना नमस्कार करतात तेव्हा दोघांच्या उर्जाची नकळत देवाणघेवाण होत असते.

आपण आपल्या ला देखील आत्मचिंतन ध्यान करत असताना नकळत नमस्कार करत असतो तेव्हा ही अशाच सकारात्मक ऊर्जेची आदलाबदली होत असावी म्हणून ध्यानधारणेचे हे महत्व स्वबदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.

नमस्कार करण्यासाठी व्यक्ती नामवांतच असावी असा शिरस्ता नसावा ...तो मनातून आलेला एक भावनिकृ पडसाद असतो...एखाद्या सामान्य लोकांसाठी अनभिज्ञअसलेला ही एखाद्या उत्तम विचार देवून जातो तेव्हा त्यालाही मनस्वी नमस्कार होतो..नम्रतेचे दर्शन नमस्कार ....

दोन्ही हात जोडून ते हृदयचक्रापाशी विसावून आपण नमस्कार करतो तेव्हा नकळत डोळे मिटले जातात ..आपल्यातील परमेश्वरापुढे आपण प्रथम नतमस्तक होतो नंतर तो नमस्कार दुसऱ्या च्या हृदयातील आत्मारुपी परमेश्वराप्रती सादर होतो सविनयाने तो नमस्कार ....!

काळानुसार नमस्काराच्या अर्थात आणि कृतीत थोडा बदल काळानुसार होत गेला आहे. आता समोरच्या व्यक्तीला नमस्कार करताना वर वर्णन केलेल्या सगळ्या भावना असतीलच असे नाही. व लाचारीने, काही मिळवण्याच्या उद्देशाने केलेला नमस्कार वेगळा. कोपरापासून केलेला नमस्कार वेगळा. राजकीय पुढाऱ्यांचा नमस्कार वेगळा. त्या प्रत्येक कृतीमागे काही अर्थ असतो. पण काहीही असले तरी आदरपूर्वक आणि मनापासून केलेला नमस्कार हा आपल्या ठिकाणी श्रेष्ठच असतो. पाश्चात्य पद्धतीत समोरच्या व्यक्तीचे स्वागत हस्तांदोलन अर्थात शेकहॅण्ड करून केले जाते. त्यामागे देखील स्वीकाराची आणि आदराची भावना असतेच. पण आज काळाच्या कसोटीवर घासून पाहिले तर भारतीय नमस्कार श्रेष्ठ ठरला आहे. करोनासारख्या साथीच्या रोगाचा संसर्ग टाळायचा असेल, तर नमस्काराला पर्याय नाही....म्हणून तर हाताचे महत्वही तेवढेच कारण नमस्कार होतो तो हाताने...

हातात हात घेतला तर मैत्री होते..
दोन्ही हात जोडले तर भक्ति होते..
कुणाला हात दिला तर मदत होते..
हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले तर...
अशक्य तेही शक्य होत.
 
नमस्कार  वा नमस्ते फक्त एक औपचारिकता म्हणून केला जात नाही. त्याला एक शास्त्रीय कारण आहे. असं म्हणतात, की तुमच्या शब्दांपेक्षा तुमची बॉडी लँग्वेज, हातवारे हे तुम्हाला काय म्हणायचं आहे, ते कमी वेळात समोरच्या व्यक्तीला समजावून सांगत असतात.

ऑफिसच्या मीटिंग मध्ये कोणी टेबल वर हात मारून एखादी गोष्ट सांगितली ,की त्यावेळी सगळेजण अचानक कोणता विषय सुरू आहे हे लक्ष देऊन ऐकतात.

आता तर हे सगळं विसरायला होतंय. कारण, आता ‘दूरच रहा आणि फक्त कामाचंच बोला’ ही संस्कृती सगळीकडेच लागू होत आहे.

हाताच्या position चं महत्व आपण लोक जेव्हा ध्यान करतात तेव्हा सुद्धा बघू शकतो. काही लोक अंगठा आणि पहिलं बोट एकमेकांवर टेकवतात. काही लोक दोन्ही हात एकमेकांवर ठेवतात.
 

हात जोडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे, आपला उजवा आणि डावा हात हे आपल्या दोन मतांना किंवा दोन दिशांचं प्रतिनिधित्व करत असतात.

जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती दिसते, तेव्हा आपलं त्या व्यक्तीबद्दल एक तर सकारात्मक मत असतं किंवा नकारात्मक.

आपले दोन्ही हात जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आपण या दोन पर्यायांमध्ये विचार करणं बंद करतो आणि त्या व्यक्तीला आपल्या विचारांपर्यंत पोहोचण्यापासून लांबच ठेवतो.

याला इंग्रजी मध्ये one ness म्हणजेच एकरूपता असं म्हणतात. नमस्कार च्या position ने आपण जजमेंटल होणं नकळत बंद करत असतो.

तुमची भेट ही एक तर तुम्हाला किंवा समोरच्या व्यक्तीला आनंद देणारी किंवा काही संदेश देणारी असते. ती भेट जर तुम्हाला अगदीच औपचारिक ठेवायची असेल तर ‘दुरून नमस्कार’ हा कधीही चांगला पर्याय ठरतो.
मागच्या चार महिन्यांनी आपल्याला कोणाला भेटल्याशिवाय सुद्धा कामं होऊ शकतात हे खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं आहे. पण, भेटणं अगदीच आवश्यक असेल, तर नमस्कार करून भेटा असं आपलं शास्त्र सुद्धा सांगतं.

हिंदू मान्यता नुसार, आपण आत्म्याला मान्यता आणि नमस्कार करत असतो. एखाद्या व्यक्तीला नमस्कार करणे म्हणजे, “माझ्यातील आत्मा (spirit soul) हा तुझ्यातील आत्म्याला वंदन करतोय” असं म्हणण्यासारखं आहे.

नमस्कार किंवा नमस्ते चा उगम हा संस्कृत शब्द ‘नमः’ पासून झाला आहे. नमस्कार करणं म्हणजे अशी शारीरिक कृती ज्याने आपण हे मान्य करतो किंवा सांगतो की, “तुझ्यामध्ये माझ्यापेक्षा काही चांगल्या qualities आहेत ज्यांचा मी सन्मान करतो”.
एका अर्थाने हे समर्पण भावना अंगिकारण्यासारखं आहे.

वैदिक पद्धती किंवा हिंदू संस्कृतीने सुरू केलेला नमस्कार किंवा नमस्ते ला आता जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. या मुद्रेला “अंजली मुद्रा” किंवा “प्रणाम आसन” असं ही संबोधलं जातं.

नमस्कार करताना जेव्हा दोन्ही हात एकमेकांवर दाबले जातात, तेव्हा अॅक्युप्रेशर च्या नियमाने तुमच्या मनातील अगतिकता किंवा तणाव निघून जातो हे सुद्धा सिद्ध झालं आहे.
 
तुमच्या तळहातावर काही प्रेशर पॉईंट्स आहेत ज्यांना दाबल्यावर तुम्हाला डोकेदुखी, मान दुखणे, पोट दुखणे, श्वसन अश्या विविध समस्यांपासून सुटका मिळते.
आपण जेव्हा हात मिळवतो, तेव्हा तुमच्या अंगात नसलेली पण समोरच्या व्यक्तीत असलेली नकारात्मकता तुमच्यात येण्याची दाट शक्यता असते.

नमस्कार करताना कोणताही स्पर्श होत नाही, फक्त सकारात्मक ऊर्जा ही पसरत असते. नमस्कार हा नकळत समानतेचा सुद्धा संदेश देत असतो आणि कोणत्याही अहंकाराला कधीच जवळ येऊ देत नाही.

अशाप्रकारे, नमस्कार ही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सर्वात योग्य भेटण्याची पद्धत आहे. आजपासून “शेकहँड” सोडा आणि भेटल्यावर हेच म्हणा, “नमस्कार, कसे  आहात. 

सौ.मनिषा राजन कडव

Comments

  1. धन्यवाद 🙏 खूप चांगली माहिती सर्वांना सांगितल्याबद्दल.. बऱ्याच वेळेला लोकांना माहीत असतं परंतु विसर पडत असतो म्हणूनच असे शास्त्रशुद्ध प्रबोधन आवश्यकच असते...अभिनंदन आणि शुभेच्छा.. डॉ. अलका नाईक, मुंबई 💐💐🙏

    ReplyDelete
  2. नमस्काराविषयी छान माहिती दिलीत 💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*