अनब्रेकेबल

अनब्रेकेबल


 राष्ट्रीय पातळीवरील १२ सुवर्ण पदकं, 

 आंतरराष्ट्रीय पातळीवर १७ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य पदके., 

५ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद.,

एक ऑलिंपिक कांस्य पदक....

अर्जुन पुरस्कार,
 
पद्मश्री पुरस्कार, 

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार.,

पद्मभूषण पुरस्कार  

आणि तसेच अनेक वेळा यूथ आयकॉन पुरस्कार विजेती ...

३ मुलांची आई ,

एक प्रेमळ पत्नी, 

आई वडिलांची एक कर्तव्यतत्पर कन्या ...

अशी 
मांग्ते चुंग्नैजांग मेरी कोम.. 
भारतीय महिला मुष्टियुद्धाला पडलेले एक सुवर्ण स्वप्नं... मेरी कोम...  यांचे आत्मचरित्र , त्याचा मराठीत अनुवाद  विदुला टोकेकर यांनी केलाय तो  वाचनात आला .

 एका स्त्रीला कुठल्याही क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी किती झगडावे लागते याची कल्पना सर्वसामान्य लोकांना येणे कठीण. 
आणि ते क्षेत्र खेळाचे असेल अजूनच कठीण. 
आणि ते क्षेत्र मुष्टियुद्धाचे असेल...कर्मकठीण
 कर्मकठीण असले तरी काही व्यक्ती त्यांचा ललाट लेख अशा प्रकारे लिहून आणतात की त्यांनी उपसलेल्या कष्टाचा हिशोब आणि भरपाई नियतीला द्यावीच लागते.
 भूमिहीन शेतमजूर वडिलांची मुलगी, इतरांच्या जमिनीत काबाडकष्ट करूनही वर्षभर खायला मिळेल का याची परिवाराला कायम काळजी , स्वतःच्या हक्काचे डोक्यावर छप्पर नाही...शाळा शिकायची म्हणजे आधी घरची जबाबदारी पूर्ण करणे आणि अनेक किमी धावत पळत वेळेत शाळेत पोहोचणे
 हा कष्टदायक नित्यक्रम खरं तर तिला तिच्या नकळत मजबूत बनवत होता . काळ जो तिला तडाखे देत होता तेच तडाखे ती भविष्यात तिच्या प्रतिस्पर्ध्यांना देणार होती...मुष्टियोद्धा म्हणुन...पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा .. मांग्ते चुंग्नैजांग मेरी कोम..
 शाळेत तिला अभ्यासात गती नव्हती पण खेळात ती कायम अव्वल असायची.
 तिला खेळात कारकीर्द करू द्यायला तिच्या पित्याने परवानगी दिली हे भारतीय क्रिडा क्षेत्राचे भाग्यच म्हणायला पाहिजे
 पित्याला वाटलेले आपली मुलगी मैदानी खेळात (अथेलिटीक्स)मध्ये करियर करेल पण एका दिवशी वर्तमानपत्रात मुष्टियुद्ध स्पर्धेत आपल्या मुलीच्या जेतेपदाची बातमी वाचून त्यांना काय करावे हेच समजेना पुरुषांच्या खेळात भाग घेण्यात कसला आला शहाणपणा आणि मुष्टियुद्धा सारख्या धसमुसळ्या खेळात चेहर्‍यावर जर मार लागला तर उद्या लग्न कोण करणार मुलीशी या विवंचनेत त्यांचा विजेतेपदाचा आनंद कुठल्या कुठे पळाला होता ...पण  कालांतराने त्यांचा हाही विरोध मावळला आणि मेरीची कारकीर्द सुरू झाली.
 कारकीर्द सुरू झाली पण अडचणी सुद्धा सुरूच राहणार होत्या. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्या पित्याने हार मानली नाही मुलीच्या प्रशिक्षण, स्पर्धा या साठी त्यांनी प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन पैसा उभा केला...आणि त्यांच्या त्यागामुळेच मेरीची मेहनत सफल होऊ शकली.
 मेरी स्वतःच्या पित्याच्या बाबतीत जशी सुदैवी होती तशीच पतीच्या बाबतीतही सुदैवी ठरली. सखा, सोबती, प्रेमी ,जीवनसाथी , मुलांचा पिता या सर्व रुपात ऑन्लर काळाच्या सर्व कसोट्यांवर शंभर टक्के खरा उतरला असे म्हणण्यास कुठलीच शंका नाही. 
वर्किंग वुमन चा पती कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठच त्याने घालून दिला . त्याची प्रेरणा आणि खंबीर साथ नसती तर मेरीची वाटचाल येवढी सोप्पी नक्कीच नसती.
 मेरीची मेहनत आताशी कुठे रंगात यायला लागली होती.प्रचंड चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने अनेक शिखरं पादाक्रांत केली. राज्य पातळी, देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ती पदके जिंकत गेली आणि स्वतःची, परिवाराची, आणि देशाची स्वप्नं पूर्ण करत गेली.
 तिच्या नेहमीच्या वजन गटात जर तिला ऑलिंपिक्स मध्ये सहभागी होता आल असत तर.....तिने सुवर्ण पदक नक्की जिंकून दाखवलंच असत.
 माणुस मोठा कधी ठरतो... त्याने यश मिळवल्यावर....
नाही. ...
तर तो तेव्हाच महान ठरतो जेव्हा तो आपल्या सारखेच यश इतरांनी मिळावे यासाठी धडपडतो...

   इतर दिग्गजांनी केले नाही पण मेरी काहीतरी भरीव करतेय...तिच्या सारख्या अनेक मेरी कोम देशाला मिळाव्यात यासाठी आता तिने निशुल्क अकॅडमी सुरू केली आहे...

मनापासून तुला वंदन मेरी 
यू आर रीयली 
अनब्रेकेबल.
सौ.मनिषा राजन कडव

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. मेरी कोमच्या आत्मचरित्राची छान ओळख करवून दिलीत ...!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*