चकवाचांदण - एक वनोपनिषद
अरण्यात रमलेले, झाडाझुडपात फिरलेले, प्राण्या पक्षांसोबत बोललेले महान व्यक्तिमत्व म्हणजे अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली! सहज सोप्या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या समोर जंगलच जिवंत उभे केले आहे.... प्राण्यांच्या पक्ष्यांच्या अनेक सवयी आणि आणि आश्चर्यकारक गमतीजमती त्यांनी रेखाटलेल्या आहेत. एखाद्या चित्रकाराने हुबेहूब चित्र काढावे तसे त्यांचे वर्णन! शब्द चित्र जणू! त्यांच्या संदर्भात त्यांनी लिहिलेले, अनुभव संपन्न पुस्तक म्हणजे चकवाचांदण
मराठी भाषेतील ज्येष्ठ लेखक, पक्षीतज्ञ मारुती चित्तमपल्ली यांचं हे आत्मचरित्र.चकवाचांदण हे सुरेख नाव, घुबड या खरं तर अभद्र समजल्या जाणाऱ्या पक्ष्याचे आहे.त्यांनी चुकून(चकवा लागुन)वनसेवेची वाट धरली आणि चालत चालत त्यांना ही आयुष्याची सुंदर वाट सापडली म्हणून हे नाव, चकवाचांदण!.....
हे पुस्तक आपण वाचत जातो तसतशी आपल्याला चित्तमपल्ली सर केवळ पक्षीतज्ञ, वनाधिकारीच नाहीत तर हाडाचे संशोधक आणि त्यासाठी अफाट कष्ट करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे याची साक्ष पटते.
आपल्या रोजच्या बघण्यात नसणाऱ्या अनेक अद्भुतरम्य गोष्टींची सफर हे पुस्तक वाचताना घडते.
सृष्टीमधली अनेक अज्ञात रहस्य उलगडण्यासाठी त्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं आहे.
तुम्हाला जर कुणी सांगितलं, उंदीर हा प्राणी काही लोक चोरी करताना मदत म्हणून वापरतात तर खरं वाटेल?
माकडं आणि अस्वल तहान लाडू, भूक लाडू,भाकरी करून ठेवतात, तर विश्वास बसेल?
म्हातारे हत्ती, वानर इतरांवर भार नको म्हणून आत्महत्या करतात, हे माहितेय?
चोचीवाटे रंग पाण्यात सोडणारा पक्षी पाहिलाय?
कबुतर शेकडो किलो धान्य गुहेत साठवून ठेवू शकतात, हे ऐकलय?
ही आणि अशी अनेक अद्भुत माहिती आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते.
आपल्याला सुवास आणि दुर्गंध असे वासाचे दोनच प्रकार सांगता येतात.पण घुटऱ्यान , मोयान्, मिरीगंता बोटड्यान् ही वासांची नाव आहेत, ही गम्मत इथेच कळते.
"जंगल मे मोर नाचा, किसने देखा?"असं म्हणतात.
पण मोरनाची पाहिलेले चित्तमपल्ली सर या पुस्तकात आपल्याला सापडतात.
आपल्यापैकी अनेक जण आपल्या क्षेत्रात संशोधन करतात.त्यासाठी कष्ट ही घेतात पण केवळ कुतूहल म्हणून संशोधनासाठी जीवावर संकट येईल अशा ठिकाणी जाणारे चित्तम्पल्लींसारखे संशोधक कितीसे असतील? कित्येक फूट खोल गुहेमध्ये जाणारे, 30 फुट लांब अजगर, अस्वल, बिबट्या यांचे वास्त व्य असणाऱ्या पोखरडोंगरीत जाणारे चित्तमपल्ली सर पूर्णपणे वन आणि वन्यप्राणी यांच्या जगात मिसळून गेले आहेत.इतके की त्या प्राण्यांना सुद्धा ते परके वाटत नाहीत.
संशोधकांसाठी तर ते मापदंड च आहेत.संशोधनासाठी एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी किती कष्ट घ्यावेत?
एक, दोन नव्हे तर
संस्कृत, इंग्रजी,जर्मन., रशियन, पाली, अर्धमागधी, प्राकृत, बंगाली, हिंदी, गुजराती.... इतक्या भाषा शिकून त्यांनी त्या भाषांच्या ग्रंथां मधून प्राणी, पक्षी याविषयी माहिती गोळा केली आहे.रामायण, महाभारत, अठरा पुराण,वेद, उपनिषदे असा संस्कृत साहित्याचा समुद्र त्यांनी पक्षीविषयक दृष्टिकोनातून घुसळून काढला आहे.
अनेक दुर्गम स्थानी जाऊन, स्थानिक लोकांचा विश्वास जिंकून, आदिवासी, पारधी यांच्याकडे असणारी दुर्लभ माहिती त्यांनी गोळा केली आहे.त्यासाठी कष्ट उपसताना, भुकेला कोंडा अन निजेला धोंडा याची तयारी ठेवली आहे.
मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्यांनी साहित्याचा उत्तम नमुना म्हणून, जंगलाचा अभ्यास करणाऱ्याने मार्गदर्शक ग्रंथ म्हणून, संशोधकांनी संशोधकाची वैशिष्ट्ये कळण्यासाठी जरूर वाचावा असा हा ग्रंथ नव्हे तर वनोपनिषद आहे.
सौ.मनिषा राजन कडव
छान लिहिले ...!
ReplyDelete