मेघदूताची मोहिनी!
आषाढाचा पहिला दिवस ! कोणाही साहित्यरसिक माणसाला,"आषाढस्य प्रथमदिवसे.." म्हणले,की पहिल्यांदा आठवते,ते मेघदूत ! मेघदूताची भारतीय मनावरची मोहिनी इतकी जबर आहे,की रवींद्रनाथ टागोर यांच्यापासून ते रिजर्व बँकेचे गव्हर्नर राहिलेल्या,सी. डी.देशमुख यांच्यापर्यंत अनेकांनी,मेघदूत आपापल्या पद्धतीने धुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे ! शांता शेळके यांनी केलेला अनुवाद तर मनाला भुरळ घालणारा ठरला आहे.
संस्कृत श्लोक शांताबाईंनी तितक्याच सुंदर आणि ताकतीने मराठी पद्यात अनुवाद केलेला आहे.हा अनुवाद समजण्यास सोपा आहे. मेघदूत वाचण्याचा आनंद ही वाढत जातो. मुळ मेघदूत वाचत आहोत असे. वाटते.
कथा
मुळात, मेघदूताला व्यापक कथावस्तू अशी नाही.इंद्राच्या शापामुळे कोणी एक यक्ष एका वर्षासाठी अलका नगरीतून, स्थानभ्रष्ट होतो आणि तेथून तो वर्षासाठी रामगिरी पर्वतावर येऊन राहतो.ज्यावेळेस, आषाढ महिना येतो,त्यावेळेला आकाशात,एक विशाल हत्तीसारखा मेघ पाहून,त्याला आपल्या प्रियेचा विरह अनावर होतो आणि त्यातच त्या मेघाला कुड्याच्या फुलांनी अभिवादन करून,तो आपल्या प्रियेला,निरोप पाठविण्याची विनंती करतो ! आपल्या धामापर्यंत जाण्याच्या मार्गाचे वर्णन करताना, प्रत्यक्ष तो यक्षच मनाने,तेथवर जाऊन पोहोचला आहे ! हेच आहे मेघदूत !!
मंदाक्रांता वृत्तात असलेल्या,मेघदूत काव्यात कथेला फारसे महत्त्व नाहीच.मेघदूत वाचायचे,ते त्यातल्या अद्भुत निसर्गवर्णनासाठी ! रामगिरीपासून अलकेपर्यंतच्या प्रवासाची, जी स्वप्नसृष्टी कालिदासाने उभारली आहे,तिला निव्वळ तोड नाही ! मग,ते गंगेचे वर्णन असो,कैलासाचे वर्णन असो वा,अलका नगरीचे वर्णन असो.प्रत्येक ठिकाणी,उपमा उत्प्रेक्षेचा वापर करीत,कालिदासाने आपल्यासमोर त्या वातावरणाचे चिरंजीव स्मारक उभे केले आहे,असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा !
वास्तविक,"पूर्वमेघात" या संपूर्ण प्रवासाचे वर्णन आहे,आणि "उत्तरमेघात" अलका नगरीचे वर्णन,तेथली शृंगारिक स्थिती,यक्षाची पत्नी, तिची पतिवियोगाने झालेली अवस्था आणि तिला द्यायचा संदेश,ही सगळी हकीकत येते ! असे,साधारण या काव्याचे, ढोबळमाने स्वरूप.
इतकी स्वप्नसृष्टी उभी करतानाही,कालिदासाचे वास्तवाचे भान सुटत नाही,हे या काव्याचे वैशिष्ट्य ! धूळ,पाणी यांनी बनलेला मेघ आपला संदेश पोहोचवण्यास असमर्थ आहे,याची यक्षास कल्पना आहे,मात्र,तो "जे कामार्त आहेत त्यांना सजीव - निर्जीव विवेक कुठून राहणार?" असे आपल्या मनाचे समाधान करून घेतो !
कालिदासाच्या अप्रतिम, हेतुमंत आणि "अनामिका सार्थवती बभूव" अशा वर्णनशक्तीचे प्रत्यंतर येण्यास,एक उदाहरण पुरेसे बोलके आहे.कैलास पर्वताचे वर्णन करताना,"ज्या पर्वतास रावणाने गदागदा हलवले,देवांच्या पत्नींसाठी ज्याने दर्पण अर्थात आरसा म्हणून काम केले,अशा पर्वताचा तू अतिथी हो.ती केवळ शिखरे नव्हेत,तर शंकराचे ते धवल हास्य आहे !"
असे वर्णन तो करतो !
कालिदासाने वर्णन केलेला शृंगार,हा बहुतांशी शारीरिक आहे. शरीरनिष्ठ शृंगारामुळे येणारी उघड वर्णने,कदाचित आजच्या दांभिक सामाजिक वास्तवात अश्लील वाटू शकतात,पण काळासारखा काळ नसतो,हे समजून घेतले आणि तत्कालीन वाङ्मय आजच्या कसोटीवर घासून त्याचा कस मापणे थांबविले,तरच त्या अभिजात साहित्याचा आपल्याला पुरेसा रसास्वाद घेता येईल,हे विसरून चालणार नाही.
वास्तविक,मला फारशा प्रेमकथा अथवा विरहकथा वाचायला आवडत नाहीत,त्यांची भुरळही पडत नाही.तथापि, कालिदासाने यक्षाकरवी, मेघास्तव केलेली,"तुला तुझ्या विद्युत्-सखीचा विरह कदापि होऊ नये", अशी प्रार्थना कोठेतरी अंगावर शहारा आणून जाते,हीच मेघदूताची मोहिनी आहे !
जाता जाता - प्रख्यात चित्रकार,रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे असलेल्या अवनींद्रनाथ टागोर यांनी आपल्या शांतिनिकेतन येथील शिष्यांना,"तुम्हाला कलावंत व्हायचे आहे ना ? मग मेघदूत जगायला शिका. मेघदूत होऊन जा." असा संदेश दिला होता.यातच सारे आले..!!
टीप: एकट्या मराठीत, मेघदूताचे जवळजवळ वीस अनुवाद आहेत,ज्यात शांताबाई शेळके,चिंतामणराव देशमुख आदींचे अनुवाद येतात.इंग्रजीत एच.एच. विल्सन या लेखकाचा गद्य अनुवाद आहे.ते ही अवश्य वाचावेत !
सौ.मनिषा राजन कडव.
अप्रतिम परीक्षण
ReplyDelete