मुलांसाठी गुढकथा - रत्नाकर मतकरी लिखित ‘भूत-अद्भूत

मुलांसाठी गुढकथा  - रत्नाकर मतकरी लिखित ‘भूत-अद्भूत

रत्नाकर मतकरी लिखित ‘भूत-अद्भुत’मध्ये मुलांसाठी सहा छोटय़ा गोष्टी (कथा) आहेत. ‘गूढता’ हे या कथांचे केंद्र आहे. माणसांच्या जगातील या अद्भुत कथा आहेत. अमानवी शक्तीला ‘भूत’ म्हटले जाते. त्याचासुद्धा प्रत्यय येणे हे ‘अद्भुत’ आहे. गूढ वातावरणाच्या माध्यमातून गूढकथेतील आशय साकार होतो. मानवी संज्ञेला-बुद्धीला आकलन न होणाऱया ‘वास्तवाचे असणे’ गूढ कथेत साकार होते. त्यात मृत्यूनंतरचे जीवन नियती, योगायोग घटिते, अतिंद्रिय पातळीवरील अनुभव त्यात प्रामुख्याने असतात. भयप्रद, विनाशक स्वरूपातील अतिमानवी शक्तींची अनेक गूढ रूपे भयकथा उभी करते. उदा. नारायण धारपांच्या गूढकथा. तथापि मानवी मनातील दडपलेल्या वासना, इच्छा किंवा समूहाच्या नेणिवेतील अतर्क्य व्यापार मानसशास्त्रीयदृष्टय़ा विचारात घेऊन मानवी मनाच्या गूढ व गुंतागुंतीच्या व्यापारावर आधारलेल्या गूढकथा अधिक्याने रत्नाकर मतकरी यांनी लिहिल्या आहेत. या गूढमानस कथाच आहेत. त्यात ‘भूत-अद्भुत’ अपवाद नाहीत. त्यांच्या कथेत वास्तवाच्या पलीकडे जाणारे असे एक कल्पित वास्तव असते. फॅण्टसी, स्वप्ने, भास यामुळे त्यांच्या कथा ‘गूढ’ होतात. विज्ञान युगातही हे ‘गूढत्व’ नाकारले गेलेले नाही. ‘चमत्कृती’ ही गूढकथेची ‘लक्षणा’ आहे.
एडगर एलन पो, हॉथॉर्न, चार्ल्स विल्यम्स, हेव्हिड सेल्झर यांनी गूढकथांची पायाभरणी केली आहे. द. पा. खांबेटे यांनी फार पूर्वी ‘नकल’ मासिकातून भय वाटाव्या अशा गूढकथा लिहिल्या आहेत. जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘निरोप’, ‘लक्ष्मी’, ‘पाणमाय’ याही गूढकथाच म्हणता येतील. नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांनी मराठी कथा साहित्यात भर घालून ‘गूढकथा’ निर्मितीला प्रतिष्ठा मिळवून देऊन वाचकप्रिय केले आहे. इंद्रिये आणि बुद्धी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱया ज्ञानाच्या पलीकडे एकरूपतेच्या प्रत्यक्ष व प्रभावी अनुभूतीने सत्तेचा अंतिम गाभा माणसाला काही वेळा प्राप्त होऊ शकतो असे ‘गूढवाद’ सांगतो. जगातल्या सर्व धर्मांमध्ये बुद्धधम्मातही ‘गूढवाद’ आहे. मनाची एकाग्रता, ध्यानावस्था आणि चिंतनलक्षी समाधी हेच गूढवादाचे सार आहे. गूढवाद ही प्रतीती आहे. मराठी कवितेतही (ज्ञानेश्वर-तुकारामांपासून केशवसुत ते ग्रेस-मधुकर केचेपर्यंतच्या) गूढानुभूती साकार केली गेली आहे. गूढकथेचा आकृतीबंध संरचना लघुकथेसारखी असूनही अनेपक्षित कलाटणीने आशयाला गूढत्वाची अभिव्यक्ती दिली जाते. अतर्क्यता हे गूढकथेचे ‘सामर्थ्य’ आहे.
‘भूत-अद्भुत’मध्ये ‘टापटीप आजी’, ‘मेले तरी वाचतील!’, ‘भित्रे भूत’, ‘छबूताई भिंगे’, ‘द्रौपदीची थाळी’, ‘लाल बुटांची गोष्ट’ – अशा सहा कथा आहेत.
या संग्रहातील भूतकथांमधील भुते अक्राळविक्राळ, विद्रूप रूप, भीतिदायक नाहीत. उलट पुस्तके वाचणारी, घर स्वच्छ करणारी, स्वतःच घाबरणारी तरीही प्रेमळ अशी आहेत. कित्येक चांगली माणसे जशी असतात, तशीच ही भुते आहेत. ही सगळी भुते घरांच्या चौकटीतील आहेत हे विशेष होय. ‘द्रौपदीची थाळी’ ही गुन्हेगार कथा आहे. ‘लाल बुटाची गोष्ट’मध्ये काव्यात्मता आहे. ‘‘काव्यामध्ये वरवर खोटय़ा वाटणाऱया गोष्टी भासतात, पण त्या खरोखरच खोटय़ा नसतात. कारण खऱया गोष्टी अधिक चांगल्या रीतीने समजावून देण्यासाठी तिथे खोटेपणाचा आधार घेतलेला असतो.’’ या सहा कथा बोधकथा नाहीत, पण संस्कार कथा आहेत. प्रौढपूर्व मनाची घडण ही संस्कारक्षम असते. हेच काम रत्नाकर मतकरी यांनी येथे केले आहे. या संस्काराने आलेखन करताना त्यांनी ‘मज्जा-गंमत’ हाच निखळ उद्देश ठेवला आहे. अतिशय वाचनीय सोप्या सुलभ आकलनीय मराठी भाषेत या सहा कथा आहेत.

एका प्राध्यापकाच्या नव्या घरातील भूत घर टापटीप ठेवते. ‘‘हे माझंच तर घर आहे. मोठा आला होता इथं राहायला’’ आणि ही आजी असं काही घडवते की प्राध्यापक महाशय धूम ठोकतात. जिवंतपणी वाचनाची आवड राहून गेली म्हणून मृत्यूनंतरही वाचणारे अद्भुत भूत ‘मेले तरी वाचतील’मध्ये आहे. भूतच कसे भित्रे हे ‘भित्रे भूत’मध्ये आहे. ‘छबुताई भिंगे’ ही म्हातारी ‘उद्बत्यांचा पुडा’ वापरून चोरी पकडून देते. तर थाळीत पाहून भूत भविष्य सांगतो ती कथा आहे ‘द्रौपदीची थाळी.’ अपंगाची चालण्याची इच्छा सफर करणारी गोष्ट ‘लाल बुटाची गोष्ट’मधे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कथा मोठय़ांसाठीही मनोरंजक ठरतील अशी त्याची सुबक रचना आहे. कलाटणी तंत्राच्या माध्यमाने या कथा आकर्षक झाल्या आहेत. म्हणून त्या प्रत्येकाने वाचल्याच पाहिजेत.
सोबत पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र

सौ.मनिषा राजन कडव.
१६-ए ओमशिवमकूपा कौ-हौ-सौ
गुरुनानक शाळेजवळ ,रामबाग -४
कल्याण (पश्र्चिम ) ४२१३०१

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*