तू भ्रमत आहासी वाया

तू भ्रमत आहासी वाया 


वपुंचं पुस्तक वाचन म्हणजे एक पर्वणीच. मला काही सांगायचं आहे पण मला शब्दच सापडत नाहीत आणि हे न सापडलेले शब्द म्हणजे व.पु.काळे याचे लेखन. वपुंची प्रत्येक कलाकृती वाचताना याचा प्रत्यय येतो. खरंतर वपुंनी कथेच्या तुलनेत कादंबरी कमी लिहिल्या. त्या काही कादंबरीं मधील एक म्हणजे 'तू भ्रमत आहासी वाया' 

प्रेमभंगा नंतर काय? आत्महत्या की आयुष्य निराशेच्या गर्द अंधारात ढकलून द्यायचे? की प्रेमभंग करणाऱ्या प्रियकर/प्रेयसीला गुरू मानून एक नवीन आयुष्य सुरू करायचे.
तैसी हे जाण माया|
तू भ्रमत आहासी वाया|
शस्त्री हाणीतलीया छाया|
जैसी अंगी न रूपे||
या संत ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने प्रेरित होऊन वपुंनी आपल्या आध्यात्मिक चिंतनाला लेखनीची ऐश्वर्यजोड देऊन लिहिलेली व जगण्याचे तत्वज्ञान सांगणारी ही लघु कादंबरी.

सायरा, म्हणजेच वपुंच्या लेखणीतून जन्माला आलेली कादंबरीची नायिका.‌ नायिकेला स्वत:च्या प्रेमभंगातून आलेल्या अनुभवातून ती इतरांची आयुष्य कशी बदलते याची ही गोष्ट. खरंतर सायरा ही तुमच्या माझ्यासारखीच एक सामान्य पण तरी ती एक वेगळं रसायन वाटते. तिचे अवलोकन करणारा वाचक तिच्यात विरघळून जातो. आकलनाच्या मर्यादा ओलांडून अनुभूतीच्या नव्या प्रदेशात सायरा आपल्याला घेऊन जाते.‌ तिच्या आयुष्यात जो कुणी येईल, ती त्याच्यासारखी होऊन जाते.

वपुंच्या कादंबरीतील ही नायिका आदर्शवत वाटते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करायला गेलं तर तेही शक्य होत नाही कारण आपल्याला आपल्या वर्तुळाबाहेर जाऊन विचार करायला ती भाग पाडते. बोलता बोलता ज्ञानेश्वर, कबीर, बुध्द, ओशो यांचे विचार पेरत जाते. आपल्या सोबत राहून प्रत्येक क्षणातील सौरभ गोळा करण्याचा विचार ती आपल्याला देते आणि म्हणूनच ती आपलीशी वाटते असं मला वाटतं.

बघायला गेलं तर कादंबरी छोटी, त्यातील गोष्टही छोटीच. पण मोठी आहे ती या कादंबरीतील विचारगंगा. आणि म्हणूनच प्रत्येकाने ही कादंबरी वाचावी, असं मी सांगणार नाही, पण प्रत्येक वाचणाऱ्याने ती अनुभवावी असं मी म्हणेन.

सौ.मनिषा राजन कडव

Comments

  1. मार्मिक शब्दात परीक्षण ,छान लिहिले .💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*