माझी ललाटरेषा’

‘माझी ललाटरेषा’


आपली वाटणारी कादंबरी... कुठल्याही परदेशस्थ भारतीय कुटुंबाची गोष्ट तशी आपल्या जिव्हाळ्याची. चारांतील एका घरातील तरुण-तरुणी हल्ली अमेरिकेत स्थायिक झालेले ऐकत असल्यामुळे या परदेशी भारतीयांच्या कथा, व्यथा आपल्या खास परिचयाच्या असतात. भारतातील नातेवाइकांचा गोतावळा, भारतीय लग्नपद्धती आणि अमेरिकेतील मोकळी आचार-विचारसरणी यांतील विरोधाभासही त्यामुळे आपल्याला चांगला ओळखीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. नफिसा हाजी लिखित ‘द रायटिंग ऑन माय फोरहेड’ या पुस्तकातून एका परदेशस्थ भारतीय-पाकिस्तानी वंशाच्या मुस्लीम परिवाराची गोष्ट उलगडते, तेव्हादेखील हाच जिव्हाळा कायम राहतो. ‘ते आणि आपण’ यांच्यातली साम्यस्थळे वारंवार नजरेत येत राहतात आणि आपल्याच आसपासची गोष्ट असल्यासारखे आपण त्या कथेत गुंतत जातो. भारतीय-पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन लेखिका नफिसा हाजी यांच्या या पुस्तकाचा ‘माझी ललाटरेषा’ हा अनुवाद शीला कारखानीस यांनी केला आहे. नफिसा जन्माने अमेरिकन असल्या, तरीही त्यांचे कुटुंब मुळात मुंबईचे. फाळणीनंतर कराचीला स्थायिक झालेले. त्यामुळे त्यांच्या लिखाणात मुंबई आणि कराचीचे संदर्भ डोकावतात. ‘माझी ललाटरेषा’ या कादंबरीची नायिका – सायरा ही अशीच अमेरिकेत वाढलेली पण भारतीय उपखंडातील मूळचे संस्कार घरात लाभलेली तरुणी. या कथेला भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासूनचा संदर्भ आहे. फाळणी, त्यानंतरची साठोत्तरी अस्थिरता, बंडखोर तरुणाई ते थेट वल्र्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ला एवढी मोठी पार्श्वभूमी कथेला मिळाली आहे. या घटनांच्या संदर्भाने सायराच्या कुटुंबाची ही गोष्ट उलगडत जाते. सायराच्या कुटुंबाचा गोतावळाही कुठल्याही भारतीय कुटुंबाप्रमाणे मोठा आहे. तिच्या वडिलांचे वडील भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले कट्टर देशाभिमानी, तर वडील अमेरिकेतील आधुनिक वैभवशाली जीवनाकडे आकर्षिक झालेले. सायराच्या आईच्या वडिलांची तर वेगळीच कथा. आपल्या पहिल्या पत्नीला सोडून एका गोऱ्या अमेरिकन स्त्रीशी ते लग्न करतात आणि सायराला कायमचे दुरावतात. कारण तिची आईच त्यांच्याशी संबंध तोडते. त्या विस्तारित कुटुंबातील मुलांपर्यंत साऱ्यांच्या कथा सायराच्या नजरेतून कथेत उलगडत जातात. यामध्ये सायराची पाकिस्तानात राहणारी आजी, मावशी आजी, पाकिस्तानी लिप्ताळ्यात रमलेली एक मावशी, लंडनला राहणारे आजोबा, चुलते, त्यांची आंग्रजाळलेली मुलं, असे सारे जण त्यांच्या कथेसह भेटतात. अमेरिकत वाढलेल्या बहुसंख्य भारतीय मुलांप्रमाणे ‘आपले संस्कार’ आणि अमेरिकेतील वातावरण हा विरोधाभास पचवतच सायरा मोठी होते.जग बघायला लागल्यानंतर तिचे विचार स्वतंत्र होत जातात. शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून दूर जायला मिळाल्यावर ती आपल्यापेक्षा वयाने मोठ्या, वेगळ्या विचारांच्या, जग पाहिलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन प्रोफसरच्या प्रेमात पडते, घरचे पारंपरिक वळण सोडून सायरा मोकळ्या जगात शिरते आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा, कुटुंबातील व्यक्तीचा, त्यांच्या पार्श्वभूमीचा एका वेगळ्या अंगाने विचार करायला शिकते. सायराबरोबर आपणही दुसऱ्या बाजूने उलगडत जाणाऱ्या या कुटुंबाच्या कथेत गुंतून जातो, हेच या लेखनाचे यश म्हणावे लागेल. वडिलांनी पारंपरिक विचारांच्या पत्नीला सोडून एका अमेरिकन स्त्रीशी लग्न केलं म्हणून वडिलांशी कायमचे संबंध तोडलेली सायराची आई तिला योग्य वाटत असते; पण आजोबांची संपूर्ण कथा उलगडते, तेव्हा सायरा या सगळ्या घटनांचा त्रयस्थपणे विचार करू शकते. तिची पाकिस्तानातील पारंपरिक आजी (नानी माँ) आणि तिची स्वतंत्र विचारसरणीची, स्वावलंबी बहीण – म्हणजे सायराची मावशीआजी (बडी नानी माँ) यांच्या पूर्वेतिहासातून स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपासचा भारतीय उपखंडातील काळ उलगडतो. त्या वेळच्या स्थलांतरित उच्चमध्यमवर्गीच समाजापुढची आव्हाने, राष्ट्रनिर्मितीसाठी झपाटलेला तत्कालीन तरुण वर्ग आणि त्याला समांतर असा परंपराधिष्ठित समाज हे सगळे या दोघींच्या भूमिकांमधून व्यक्त होत राहते. किशोरवयीन सायराचा एका बंद, ठोकळेबाज जीवनशैलीतून नव्या, स्वतंत्र, प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाकडे होणारा हा प्रवास तिला तिच्या आधीच्या तीन पिढ्या समजून घ्यायला लावतो. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपताना या तिन्ही पिढ्यांतील सर्वांशी जुळवून घ्यायला लावतो. नानी माँ आणि बडी नानी माँ या दोन बहिणींमधील विरोधाभास सायराला तिच्या आणि तिची बहीण अमिनामधील विरोधाभासातील प्रेम समजावून देतो. या प्रवासात एक अशी घटना घडते की, हे संपूर्ण मोठे कुटुंब हादरून जाते. सायराच्या संपूर्ण उलगडलेल्या व्यक्तिमत्वाला कलाटणी देणारी ही घटना पुढच्या अस्वस्थ हाकांची चाहूल असते. रहस्यांचा गुंता हळूहळू उलगडण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. अमेरिकेसह इंग्लंड, भारत आणि पकिस्तान या चार देशांत ही कादंबरी घडते, फुलते. त्या त्या शहरांतल्या बारीक तपशिलांसह घटना चितारल्यामुळे हे चित्रण वास्तवाच्या जवळ जाणारे झाले आहे.

सौ.मनिषा राजन कडव .

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*