भोवळ

भोवळ
                                                       
देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण १९९१च्या जुलैमध्ये आल्यानंतर लगेच १९९२ मध्ये देशातील शेअर बाजारच नव्हे, बँकिंग उद्योगाला, रिर्झव्ह बँकेला आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेलाच हादरून टाकणारा रोखे घोटाळा घडला. हर्षद मेहता नावाच्या अतिहुशार शेअर दलालाने देशातील बँकिंग उद्योगतील कच्चे दुवे, नियामक यंत्रणांचा ढिसाळपणा, सरकारचा गलथानपणा आणि लालूच, लाचलुचपतीला बळी पडणारे अधिकारी, राजकीय पुढारी यांच्या 'कमजोरी'चा पुरेपूर गैरफायदा उठवून, 'सिस्टिम' पूर्णत: 'एक्स्प्लॉइट' करून 'झटपट अब्जाधीश' बनण्याचा आपला खेळ साधला. नंतर याच खेळात तो पुरता अडकून संपलाही.

या 'सिक्युरिटीज स्कॅम'च्या पार्श्वभूमीला कादंबरीचा विषय बनविण्याचे यशस्वी कसब ज्येष्ठ पत्रकार, लेखक हेमंत देसाई यांनी दाखविले आहे. 'भोवळ' ही त्यांची पहिलीच कादंबरी नेमकी याच विषयावर आहे.

या 'स्कॅम'चा सर्वाधिक फटका बसला तो सामान्य माणसालाच. देशातील बँकांचे आणि गुंतवणूकदारांचे ४ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान त्यातून झाले. गोरगरीब, मध्यमवगीर्यांनी सहकारी बँकांमध्ये ठेवलेल्या, आयुष्यभराची पुंजी असलेल्या ठेवी परत मिळणे दुरापास्त झाले. सरकारी, खासगी बँकानाही मोठा फटका बसला. शेअर बाजार गडगडले. छोट्यामोठ्या गुंतवणूकदारांनी चढ्या भावाने खरेदी केलेल्या शेअर्सचे भाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याने त्यांनाही मोठा फटका बसला.

'भोवळ' कादंबरीत इतका किचकट, गुंतागुंतीचा विषय लेखकाने सामान्य माणसाला समजेल अशा कौशल्याने मांडला आहे. तो यशस्वीही झाला आहे. दिनेश अशर हा या कादंबरीचा 'खलनायक'. कादंबरीत वास्तवातील हर्षद मेहताचाही अनेक वेळा उल्लेख येतो तो शेअर बाजारांत आधी घडून गेलेल्या गैरव्यवहारांच्या संदर्भात. मुंबईच्या मध्यमवगीर्य गुजराथी कुटुंबातून आलेला दिनेश अशर आहे शेअर दलाल. त्याची महत्त्वाकांक्षा अफाट आहे. मध्यमवगीर्य चाकोरीबद्ध जीवन त्याला मान्य नाही. तो 'थिंक बिग'वाला. शेअर्सच्या उलाढालीतून कोट्यधीश नव्हे, अब्जाधीश होण्याचे त्याचे 'लक्ष्य' आहे. नुसते कल्पनारंजन नव्हे, त्या दृष्टीने तो वेगाने पावले टाकायलाही लागतो. यशही मिळू लागते. पाहता पाहता दिनेश शेअर बाजारातील 'कल्ट' बनतो. मोठ्या उलाढाली करू लागतो.

बँकांना आपल्या-कडील ठेवींमधील विशिष्ट टक्के रक्कम सरकारी रोख्यांमध्ये गुंतवावी लागत असल्याने, त्यासाठी 'कमिशन बेसिस'वर काम करणाऱ्या दलाली कंपन्यांची मदत घ्यावी लागत असल्यामुळे दिनेश त्यासाठी वेगळी ब्रोकरेज फर्म आणि इतरही कंपन्या प्रवतिर्त करतो. माणसे आपलीशी करण्याच्या आपल्या 'पीआर' कौशल्यातून छोट्यामोठ्या बँकांपर्यंत पोहचतो. त्यांच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना 'वश' करून रोखे खरेदी करून देण्यासाठी 'रेडी फॉरवर्ड डील्स', 'बँक रिसिट्स'च्या माध्यमातून त्यांचे शेकडो कोटी रुपये आपल्या बँक खात्यात वळवतो. हा पैसा तो शेअर बाजारांत ओततो. किरकोळ कंपन्यांच्या शेअर्सचे भावही भरमसाठ वाढवून दाखवतो. बाजारात आपली 'क्रेझ' निर्माण करतो. मोठ्या, छोट्या सर्वच गुंतवणूक-दारांना कोट्यधीश बनण्याचे 'वेड' लावतो. पण, दिनेशच्या या खेळाची संपूर्ण माहिती शेअर ब्रोकरचाच व्यवसाय, पण तो सचोटीने करणाऱ्या पुण्याच्या नेहा अत्रेला असते. ती दिनेशच्या गैरव्यवहाराची सर्व माहिती 'होरायझन' साप्ताहिकाचा धाडसी पत्रकार आशिष पाटीलला पुरवते. आशिष रोखे गैरव्यवहार जगाच्या चव्हाट्यावर आणतो. स्टोरी 'ब्रेक' झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजते. दिनेशचा डाव पूर्ण उलटतो. शेवटी नेहा अत्रेचा खून होतो.कादंबरीचे सर्व कथानक सांगण्यात अर्थ नाही. आजच्या काळातील आथिर्क गैरव्यवहार, आधीच्या काळातील घटनांमध्ये असलेली त्यांची पाळेमुळे समजून घेण्यासाठी प्रत्येक सुजाण मराठी माणसाने ही कादंबरी मुळात आवर्जून वाचावी. कादंबरीचे 'भोवळ' हे शीर्षक आणि शोकान्त मात्र निराशेचा सूर लावतो.भोवळ'चा शेवट निराशाजनक असला तरी कथाविषय असलेल्या १९९२च्या 'सिक्युरिटीज स्कॅम'नंतर वास्तवात बऱ्याच सकारात्मक घटनाही घडल्या. नवे नियम, नियंत्रणे आली. सरकार खडबडून जागे झाले. परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी का असेना, नियामक यंत्रणा सुसज्ज करण्यात आल्या. त्यामुळे शेअर बाजारांत, रोखे बाजारांत आज बरीचशी शिस्त दिसते. वास्तवातल्या 'बिग बुल' हर्षद मेहतावर ७२ फौजदारी व ६०० दिवाणी खटले दाखल झाले होते. या खटल्यांची कारवाई चालू असतानाच, २००१च्या अखेरीस न्यायालयीन कोठडीत वयाच्या अवघ्या ४७ व्या वषीर् हर्षद मरण पावला. रोखे गैरव्यवहार प्रकरणी अनेक बँकांच्या अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा झाल्या. असो. ललित साहित्याच्या अंगाने पहायचे तर वर्णनशैली, कथनशैली, सर्वच बाबतीत ही एक उत्तम, वाचनीय कादंबरी असल्याने वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

सौ. मनिषा राजन कडव.

Comments

Post a Comment