इंदिरा
इंदिरा नेहरू गांधी... आपल्या वादळी व्यक्तिमत्त्वाने भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात छाप पाडणार्या पोलादी महिला. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केले. अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त ाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच! एका महानाट्याचा, एक आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिरांजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना ’क्रांतीचे अपत्य’ म्हणून संबोधले. शरीर मनाने कणखर अशा इंदिराजींनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. हे मुळी विधिलिखितच होते. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंजिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जगातील सर्वात सामर्थ्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या. परंतु येथील समाजात धर्मांधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून गौरवण्यात आलेल्या इंदिराजींचे हे चरित्र अनेक वादळी घटनांनी भरलेले आहे.या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये श्रीमती गांधी यांचे बालपण आणि तरुणपणात त्यांनी जगण्यासाठी दिलेला लढा यांचा सविस्तर आलेखच मांडला आहे. मोतीलाला नेहरू यांच्या नातीला आणि भारतातील सर्वांत लोकप्रिय पुढारी असलेल्या जवाहरलाल नेहरू यांच्या लाडक्या कन्येला लहानपणी इतक्या समर प्रसंगांचा सामना करावा लागला असेल, याची अनेकांना कल्पनाही नसेल. आपल्या आईवर उपचार करून घेण्यासाठी तिच्या समवेत त्यांनी केलेला युरोप दौरा, त्यानंतर शिक्षणासाठी केलेले परदेशातील वास्तव्य आणि त्या काळात आलेले त्यांचे आजारपण या सर्वांचाच सविस्तर आढावा या पुस्तकात आहे. याच दरम्यान पंडित नेहरू यांनी आपल्या मुलीला लिहिलेली पत्रे आणि प्रसंगी इंदिरेने त्याला दिलेली उत्तरे यातून त्या वेळची राजकीय परिस्थती आणि नेहरूंची विचार पद्धतीही समजते. आपल्या नंतरच्या आयुष्यात पोलादी मन असलेली स्त्री असा लौकिक कमाविलेल्या इंदिराजी लहानपणी किती हळव्या होत्या. याचेही यथार्थ दर्शन या पुस्तकातून घडते. फिरोज गांधी यांच्याबरोबर त्यांची ओळख, त्यानंतर सर्वांचा विरोध पत्करून त्यांच्याशी केलेला विवाह या बाबतही या पुस्तकात सविस्तर माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या दुरावलेल्या संबंधांचाही उहापोह आहे. इंदिरा गांधीचा राजकारणातील प्रवेश, त्याची पार्श्वभूमी, लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात सामील होताना त्यांनी केलेला विचार या बाबतही या पुस्तकात चांगली माहिती आहे. त्यानंतर त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द आलेले भलेबुरे अनुभव, सभोवतालच्या सहकाऱ्याबाबत त्यांची निरीक्षणे यातून त्यांच्या प्रगल्भतेची जाणीव होते. इंदिरा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाचे पर्व मानले गेलेल्या आणीबाणीबाबत मात्र या पुस्तकात निराशा होते. हा निर्णय घेण्यामागची श्रीमती गांधी यांची नक्की मानसिक अवस्था काय होती, त्याच्या परिणामाची त्यांना पुरेशी कल्पना होती का, या प्रश्नांची समर्पक उत्तरे या पुस्तकातून मिळत नाहीत. त्याचप्रमाणे आपले पुत्र राजीव आणि संजय यांच्याशी एक आई म्हणून त्या कशा वागत होत्या, त्यांच्या भवितव्याबाबत त्या काय विचार करीत होत्या या बाबतही हे पुस्तक पुरेसा प्रकाश टाकत नाही. अर्थात कॅथरिन फ्रॅंक या मूळ भारतीय नाहीत. सहा वर्षांच्या अनुभवावर आणि अनेक व्यक्तींच्या मुलाखतींमधून त्यांनी श्रीमती गांधी यांचा जीवनप्रवास उभा केला आहे. लीना सोहोनी यांनी त्याचा मराठीत अनुवाद करताना त्यातील प्रवाहीपण कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.
सौ. मनिषा राजन कडव.
मार्मिक शब्दात परीक्षण , पुस्तक वाचावेसे वाटते .
ReplyDelete