‘फॉर हिअर ऑर टू गो?’
पन्नास वर्षांपूर्वी महासागर ओलांडून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांची वेधक कहाणी... अनेक गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचे मराठीत अर्थपूर्ण, सरस अनुवाद केलेल्या आणि अरुंधती रॉय यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेल्या अपर्णा वेलणकर यांचे पहिले स्वतंत्र पुस्तक ‘फॉर हिअर ऑर टू गो?’ इंग्रजी भाषा आणि संस्कृती यांचा प्रभाव पचवून आपल्या भाषेला टिकवून ठेवणे, परक्या संस्कृतीशी खुलेपणाने संवाद साधणे, परकी संस्कृती स्वीकारलेल्या भारतीय आप्तस्वकीयांशी संवादाचा सेतू बांधणे हे साध्य करून लेखिकेने प्रस्तुत पुस्तकात १९६०च्या दशकात उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांच्या देशांतराचा अध्या शतकाचा सांस्कृतिक पट समतोल आणि विवेकी पद्धतीने मांडला आहे. स्वत:ची भाषा, संस्कृती आणि मूल्यव्यवस्था यांच्याशी एक गंभीर नाते असणाऱ्या तिसऱ्या जगातील या पत्रकार स्त्रीच्या पहिल्याच ‘स्वतंत्र’ पुस्तकात तिने जागतिकीकरण आणि बहुसांस्कृतिकता यांचे भलेबुरे परिणाम अनुभवलेल्या आणि तरीही आपल्या देशाशी, संस्कृतीशी असणारी देशी नाळ टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या ‘अमेरिकन’ मराठी माणसांची गोष्ट अतिशय रोचक पद्धतीने कथन केलेली आहे. या मराठी पुस्तकाच्या इंग्रजी शीर्षकामुळे सनातनी भाषा पंडितांची भुवई नक्कीच उंचावली गेली असणार. जगभरातल्या सर्व ‘मॅकडोनल्डस्’मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे - ‘फॉर हिअर, ऑर टू गो?’ इथेच थांबून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणार की हे पदार्थ बरोबर घेऊन जाणार? लेखिकेने या प्रश्नाला विस्तृत आयाम दिलेला आहे. ४०-४५ वर्षांपूर्वी भारतातून परदेशात गेलेल्या मराठी माणसांनाच पडलेला हा प्रश्न! इथेच, परदेशात राहणार की मिळवलेल्या डॉलर्सची पुंजी घेऊन मायदेशी परत जाणार? १९६०च्या दशकात उत्तर अमेरिकेत गेलेल्या, त्या परक्या भूमीत संस्कृतीत रुजण्याकरता मराठी माणसाने दिलेल्या झुंजीची, कष्टांची, ससेहोलपटीची आणि कैक सुखांच्या देदीप्यमान वैभवशाली क्षणांची ही भुरळ पाडणारी कहाणी आहे. १९६०च्या दशकात मराठी मध्यमवर्गातील पांढरपेशी तरुणांनी स्थलांतर करून अमेरिका गाठली आणि परिचित भूमीतून उपसलेली मुळे नव्या जगात रुजवण्याचा, यशस्वी होण्याचा धडपडाट सुरू झाला. एकीकडे अमेरिकन संस्कृती, भाषा, संपूर्णत: वेगळी मूल्यव्यवस्था यांचा अंगीकार करून ‘त्यांच्यात’ मिसळून जाण्यासाठी प्रयत्न करत राहणे भाग होते; पण त्याबरोबरच आपली भाषा, संस्कृती मूल्ये टिकवण्याची, आपले ‘सत्व’ जपण्याची कसरतही करायची होती. शिवाय मुलांनी भारतीय मूल्यव्यवस्थाच स्वीकारावी, अमेरिकन खिसमसऐवजी दिवाळी, दसऱ्याचा आनंद मानावा आणि ‘शुभंकरोती’ म्हणावे, याकरता त्यांच्यावर सक्ती करण्याची केविलवाणी धडपड करण्याचा प्रचंड ताण होता तो वेगळाच! जगातल्या कुठल्याही स्थलांतरित माणसांना सोसावी लागणारी ही ‘सँडविच’ अवस्था लेखिकेने अत्यंत नेमकेपणाने या पुस्तकात अधोरेखित केलेली आहे. यापूर्वीही अनेक मराठी लेखकांनी अमेरिकेवर पुस्तके लिहिली. त्यातील काही पुस्तकांचा खरपूस समाचार लेखिकेने या पुस्तकात घेतला आहे. अमेरिका म्हणजे भूतलावरील साक्षात स्वर्ग किंवा अमेरिका म्हणजे निव्वळ नरक! अशा कुठल्याही टोकाच्या भूमिका न घेता, कुठलेही ‘इझम’ मनाशी न बाळगता, कसलेही अभिनिवेष न ठेवता कलात्मक तटस्थता राखून अत्यंत गांभीर्याने समतोल विचारसरणीतून लिहिले गेलेले मराठीतले हे कदाचित पहिलेच आणि म्हणून महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. कॅनडा, अमेरिकेचा प्रदीर्घ प्रवास, तेथील अनेक शहरांना भेटी, शेकडो कुटुंबांमधून केलेले वास्तव्य, त्यांच्यासह केलेले हितगुज आणि चर्चा, अमेरिकेतील स्थलांतरितांच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी कोलंबिया, प्रिन्स्टन यासारख्या विख्यात विद्यापीठांच्या ग्रंथालयात जमवलेली बैठक, संशोधन, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांशी पुन:पुन्हा चर्चा, वाचन, चिंतन या अथक मेहनतीतून ही ग्रंथमिर्निती झालेली आहे. टुरिस्ट म्हणून अमेरिका भेट, वरवरचे निरीक्षण, विकृत कुतूहलातून केलेली सवंग चित्रणे किंवा दिपून जाऊन केलेली रसभरीत वर्णने असे धोके पूर्णत: टाळलेले असणे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. माणसांच्या जगण्याबद्दल अदम्य कुतूहल असणाऱ्या, इतरांच्या अनुभवाच्या तळ्यात सहज उतरून सहअनुभूती घेऊ शकणाऱ्या तरुण पत्रकार मनाने टिपलेली आणि ताज्या टवटवीत शैलीत आपल्याशी नुसताच संवाद नव्हे, तर गप्पा मारत सांगितलेली ही एक वास्तववादी तरीही सुरस कहाणी आहे. उत्तर अमेरिकेत मुळे रुजवलेल्या आणि मायभूमीशी बंध टिकवून धरलेल्या मराठी माणसांची कहाणी. उत्तर अमेरिकेतील भौगोलिक स्थळे, माणसे आणि मराठी सांस्कृतिक संस्था यांची नुसती जंत्री देणारे, थंड शैलीतून रिपोर्ट करणारे हे टुरिस्ट गाईड अथवा प्रवासवर्णन नव्हे. व्यक्तिगत मतमतांतरे आणि राजकीय रंग येऊ न देता, आत्मीयतेच्या धाग्याने रंजक गुंफण करणाऱ्या
प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनातून उलगडणारी एका पत्रकाराची ही शोधक भ्रमंती आहे. गेली चाळीस वर्षे अमेरिकेत स्थायिक असणाऱ्या दिलीप चित्रेंनी (कवी दिलीप चित्रे नव्हे) पुस्तकाच्या प्रस्तावनेत नेमकेपणाने म्हटले आहे. ‘हे पुस्तक म्हणजे ललित लेखनाच्या शैलीत लिहिलेला, देशांतरितांच्या एका पिढीच्या जीवनाचा एक ऐतिहासिक ‘दस्तावेज’ आहे. भविष्यात याला शैक्षणिक मूल्य प्राप्त होणार आहे आणि या विषयाच्या अभ्यासकांच्या पिढ्या या ग्रंथाचा शिडीसारखा उपयोग करणार आहेत.’ एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशींपासून पोट भरायला परदेशात गेलेल्या पंजाबातील अशिक्षित मजुरांपर्यंतचे ऐतिहासिक संदर्भ लेखिकेने धुंडाळले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतातील स्वप्नभारले दिवस संपल्यावर देशउभारणीच्या कामाकडे पाठ फिरवून परदेशी चालते होण्याची मानसिकता, त्यावेळची उलाघाल आणि नंतर दुभंगलेले जीणे सावरताना झालेली तारांबळ याचे तपशील मुळातून वाचावे असेच. लेखिकेने म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक हा एका समूहाचा अभ्यास आहे; पण तरीही यातील अनेक माणसं आपल्या मनात घर करतात. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्टस्, आयआयटीयन्स्, शास्त्रज्ञ आणि त्यांच्याशी लग्न करून नवऱ्यामागून परदेशगमन केलेल्या एका मुशीतून काढल्यासारख्या दिसणाऱ्या त्यांच्या देखण्या अर्धांगीनी, त्यांचे मैत्रीगट... संसाराचा गाडा ओढताना झालेली त्यांची तारांबळ, अस्तित्वासाठीचे तुंबळ संघर्ष, मराठी मंडळींचे गट व गटबाजीचे राजकारण, परदेशात गेल्यावर उफाळून आलेली धार्मिकता आणि उत्सवप्रियता याचे नेमके चित्रण इथे केलेले आहे. अमेरिकेत या स्थलांतरित भारतीय माणसांना येणारे दोन महत्त्वाचे प्रश्नही या पुस्तकात चर्चिले गेले आहेत- ग्लाससिलिंग आणि डिस्क्रिमिनेशन-वर्णभेद! ‘दे नीड अस, बट दे डोन्ट वॉन्ट अस!’चा भेदक अनुभव! तब्बल तीन पिढ्या आजी आजोबा, आई-बाबा आणि तरुण नातवंडं यांच्यातील संघर्ष व सामंजस्य! मुलांवर संस्कार करण्याचा, अमेरिकन मातीतून ‘इंडियन मडके’ घडवण्याचा मागील पिढीचा प्रयत्न व त्यातून उडणाऱ्या ठिणग्या! मागच्या पिढीच्या- एबीसीडीजच्या (अमेरिका बॉर्न, कॉन्फिडंट देसीज) अनोख्या भावविश्वातही फेरफटका करून येते. यशस्वी, चकचकीत वैभवशाली समृद्ध घरांबरोबर अपयशी, थकलेली, रखडलेली काही घरेही इथे भेटतात. तसेच सधन, सुशिक्षित अमेरिकन भारतीयांच्या घरातही काही स्त्रियांच्या वाट्याला आलेली मारहाण, पन्नाशीत घटस्फोट घेऊन वेगळी होणारी तेथली मराठी जोडपी यांचे जगणे अंतर्मुख करून जाते. ही गोष्ट फक्त भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या समूहाची रहात नाही तर अनादीकाळापासून स्थलांतर करणाऱ्या अखिल मानवजातीची होते. या स्थलांतरित माणसांची सामूहिक व व्यक्तिगत पातळीवरील सुख-दु:खं, आशा-निराशा-संघर्ष- जिथे जाऊ तिथल्या संस्कृतीत विलीन होण्याचा अट्टाहास; पण त्याचबरोबर स्वत:चा चेहरा टिकवण्याची धडपड आणि यातून घडत जाणारे मानवी नातेसंबंध... या साऱ्याचा हा विस्मयकारक असा समग्र शोध आहे.
सौ.मनिषा राजन कडव.
छान परीक्षण लिहिले 💐💐💐
ReplyDelete