एका कोळीयाने

फोटो स्त्रोत गुगल -

एका कोळियाने

लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे "The old man and the sea" हे गाजलेले पुस्तक. १९५२ मध्ये प्रकाशित झाले, १९५४ सालचा पुलित्झर पुरस्कारही याला मिळाला. जगातील अनेक भाषांमधे भाषांतरे झाली. 
मराठीचे सौभाग्य असे, की मराठीत भाषांतर करण्यासाठी याला लाभले साक्षात् आपले पु. ल.
अगदी छोटेसे पुस्तक आहे. पण हातात घेतले , की संपवल्याशिवाय खाली ठेवलेच जात नाही, इतके जबरदस्त आहे. मूळ पुस्तक, त्याचा विषय, मांडणी आपल्याला खिळवून ठेवतेच, आणि भाषांतरकारालाही जागोजागी दाद देत आपले वाचन चालते.
भाषांतरित पुस्तकाचे नावच "म्हातारा आणि समुद्र" असे सरळ न ठेवता "एका कोळियाने" असे आहे. ही मराठीतली कविता ज्यांना माहित आहे, त्यांना पुस्तक वाचल्यावर पटेल, की याहून समर्पक नाव या कथेसाठी असूच शकत नाही. 
क्यूबामधील समुद्रावर मासेमारी करण्यात आयुष्य गेलेला एक खूप म्हातारा कोळी- सँटियागो, याची ही गोष्ट. 
सलग ८४ दिवस समुद्रावर जाऊनही एकही मासा न मिळाल्याने अपयशी असा शिक्का बसलेला तो, त्याच्यावर पूर्ण विश्वास असलेला, त्याची काळजी घेणारा त्याचा मदतनिस एक लहान मुलगा. या मुलाला आई वडिलांच्या सांगण्यामुळे दुसऱ्या यशस्वी मासेमारांसोबत मनाविरुद्ध जावे लागते. 
दुसऱ्या दिवशी जय्यत तयारीनिशी, आज आपली पनवती संपणारच, या विश्वासाने म्हातारा आपली होडी नेहमीपेक्षा दूरवर, खोल समुद्रात नेतो. आणि तिथे त्याचा सामना होतो मर्लिन माशाशी. म्हातार्यापेक्षा, त्याच्या शक्तीपेक्षा कितीतरी पटीने अजस्त्र असा मासा. यानंतर सुरु होते एक लढाई. म्हातार्याचा आयुष्यभराचा अनुभव, जिद्द, चिवटपणा, आणि माशाचे त्याच्याशी खेळण्यासारखे वागणे. 
यात कोण जिंकतो ? कोण जिंकूनही हारतो ?  हे सगळे प्रत्यक्षच वाचण्यासारखे आहे. 
समुद्रावरचे जीवन, समुद्राची अनेक रूपे, पक्षी, मासे आणि म्हातार्याचे या सर्वांशी एकरूप असणे फार सुंदर लिहिले आहे. 
एक वेळ अशी येते, की तो मासा आणि म्हातारा यांच्यात भावाचे नाते म्हातार्याला वाटू लागते. 
हा सगळा भागच इतक्या सहजपणे इतक्या उंचीवर नेला आहे, की वाचता वाचता आपण अवाक् होऊन जातो. जीवनाचे एक गूढ तत्वज्ञान अचानकपणे आणि तितक्याच सहज, सोपेपणाने सामोरे येते. 
मूळ पुस्तकातील रेखाटने (sketches) या पुस्तकात जशीच्या तशी घेतली आहेत, आणि ही चित्रे पण पुन्हा पुन्हा पहात रहावी अशी आहेत. (मुखपृष्ठावरुन थोडीशी कल्पना येईल.) हे एक या पुस्तकाचे बलस्थान आहे.
पद्मश्री पु. ल. देशपांडे भाषांतरकाराच्या भूमिकेतही आपली मने जिंकून जातात. नेहमीसारखीच.

फोटो स्त्रोत गुगल -
सौ. मनिषा राजन कडव.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*