ऋतुचक्र'

             'फोटो स्त्रोत गुगल -

ऋतुचक्र'

ऋतू म्हणजे सृष्टीला त-हे त-हेने बदलवणारा काळाचा अगदी छोटासा भाग.
दुर्गाताई भागवतांंचे 'ऋतूचक्र' वाचल्यानंतर आजूबाजूला बघण्याची आपली दृष्टी बदलून जाते. दरवर्षी त्याच त्याच क्रमाने आसंमंतात होणारे तेच तेच बदल, केवढे विस्मयकारक असतात, हवा, पाणी, झाडे, पाने, फुले, नद्या-नाले, प्राणी, पक्षी, किटक आणि आपणसुद्धा याच निसर्गचक्राचा एक भाग आहोत हे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या लक्षात येते. 
वर्षारंभीच्या चैत्र महिन्यापासून सुरुवात करून फाल्गुन संपता संपता पुन्हा चैत्राची ओढ लागण्याच्या काळापर्यंत या कालचक्राची अतिशय सुंदर सफर लेखिकेने आपल्याला घडवली आहे.
ऋतू बघण्यासाठी रानावनात जाण्याची गरज नाही, तर सजगपणे मनाचेही डोळे सतत उघडे ठेवले, तर आपण अगदी रंगून जाऊ अशा बऱ्याच गोष्टी घडताना, बदलताना आणि या बदलातून पुढच्या ऋतूचे संकेत देताना आपल्याला समजतात. ही समज येणे फार सुखद असते.
ऊन, पाऊस, थंडी, आणि त्या त्या ऋतूमध्ये येणारी फुले, फळे, भाज्या आणि आणखी थोडेफार, यापलीकडे आपण ऋतूंच्या बाबतीत जास्त जात नाही. ऋतुचक्र हे पुस्तक वाचल्यानंतर याशिवायही कितीतरी लहान-मोठ्या गोष्टी असतात हे कळते. लेखिकेच्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती बद्दल कौतुक वाटते आणि आपल्या आसपास हे असून आपल्या कसं लक्षात नाही आलं ! असंही वाटतं. 
त्यांना फाल्गुन संपता संपता आणि चैत्राच्या सुरुवातीला आकाशात होणारा घारी आणि रानपारवे यांचा प्रणय दिसतो, त्याच वेळी चित्तूर आणि टोळ यांचे उडता उडता होणारे मिलनही त्यांच्या नजरेतून सुटत नाही.
चैत्राने सुरू केलेल्या वसंतोत्सवाला पूर्णत्व आणि विराम देण्याचे काम वैशाख करतो, म्हणून तो चैत्रसखा. वैशाखात घरटे बांधण्याची कावळ्यांची गडबड आणि या घटनेचे सर्व बारकावे, ज्येष्ठात बदललेल्या समुद्राचे रंग, मृगाचे छोटे छोटे किडे आषाढातल्या पाकोळ्या, उन्हाळा हा बीजोत्पत्तीचा ऋतू तर पावसाळा वाढीचा हे त्यांचे निरीक्षण वनस्पती आणि प्राणी सृष्टीतही दिसते.
असंच बरंच काही प्रत्येक महिन्याबद्दल त्यांनी भरभरून सांगितले आहे. ते वाचताना हे जाणवते, की वर्षाचा प्रत्येक महिना आणि प्रत्येक ऋतू या सृष्टीचा एक भाग बनून अतिशय तन्मयतेने, मनःपूर्वक, एकरूप होऊन त्यांनी अनुभवला आहे, उपभोगला आहे.
हे सगळं आपल्याला सांगतानाही महिन्यांबद्दलचं त्यांचं प्रेम लपत नाही. प्रत्येक महिन्याला अतिशय समर्पक आणि लडिवाळ अशी नावे स्वतःच्या मुलांना द्यावीत इतक्या प्रेमाने त्यांनी दिलेली दिसतात. वसंतहृदय चैत्र, चैत्रसखा वैशाख, सोनेरी अश्विन, तालबद्ध पौष, ही काही उदाहरणे. अनुक्रमणिका , तिथपासूनच हे पुस्तक वाचनीय होत जाते.
हे सगळं इतक्या सहज सोप्या ललित आणि सुंदर भाषेत लिहिले आहे, की हे छोटेसे पुस्तक हातात घेतल्यानंतर एक एक महिना करत कधी एक वर्ष संपले हे कळतही नाही. 
यानंतर निसर्गालाही पुस्तकासारखेच वाचायला आपण शिकतो.
चित्रकार पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे हीसुद्धा मजकूरामध्ये अगदी एकरूप होऊन गेली आहेत. लेखणीचा भाव उत्कट करण्याचे काम ही चित्रे अगदी चोखपणे करतात.
'ऋतुचक्र' हे दुर्गाताई भागवत यांचे हे पुस्तक १९५६ मध्ये प्रकाशित झाले.
त्यानंतर याच्या पाच आवृत्त्या आणि दोन पुनर्मुद्रणे झाली.
हे पुस्तक मराठी ललित साहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे वळण आहे. प्रत्येक मराठी पुस्तकप्रेमीच्या घरी हे संग्रही असायलाच हवे, आणि ऋतू बदलताना यांचे वारंवार वाचनही व्हायला हवे. आपले मन सुंदर आणि प्रसन्न, सजग बनवण्याची ताकद या पुस्तकात नक्कीच आहे.

सौ. मनिषा राजन कडव.

फोटो स्त्रोत गुगल -

Comments

  1. दुर्गा बाईंच्या ऋतूचक्रच छान शब्दात परीचय करवून ,दिलात ,शुभेच्छा 💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*