सांजवात

फोटो स्त्रोत गुगल -

‘सांजवात’

आनंदीबाई शिवराम शिर्के
जन्मदिनांक : ३ जून १८९२
मृत्युदिनांक : ३१ ऑक्टोबर १९८६.



     ‘सांजवात’ या आत्मचरित्रामुळे मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवणार्‍या आनंदीबाई शिवराम शिर्के या शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील एक मान्यवर लेखिका होत. ज्या काळात स्त्री-शिक्षणालाच समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध होता, त्या काळात खानदानी मराठा कुटुंबातील या स्त्रीने आपली सुधारक मते ठामपणे मांडली आणि दृढपणाने ती अमलातही आणली.

     आनंदीबाई म्हणजे पूर्वा-श्रमीच्या अनसूया गोविंदराव शिंदे. त्यांचा जन्म मुंबईतील चिंचपोकळी येथे झाला. त्यांचे मूळ गाव होते पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील रांजणी, पण आजोबा व्यापारानिमित्त चिंचपोकळीला स्थायिक झाले होते. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांचा बालविवाह झाला नव्हता. वयाच्या अठराव्या वर्षापासून त्या लेखन करू लागल्या होत्या. ‘मराठा मित्र’मध्ये त्यांची ‘बेगम आरा’ ही कथा प्रकाशित झाली, त्या वेळी ‘मराठा मित्र’चे सहसंपादक शिवराम शिर्के यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यातूनच दोघांचा पत्रव्यवहार व नंतर स्नेह वाढला. दोघांचा विवाह होण्यात दोन्ही पक्षांचा विरोध होता, तसेच कोकणातले खानदानी शिर्के व देशावरील शिंदे यांच्यातील विवाहाला तत्कालीन मराठा समाजातूनही फार मोठा विरोध झाला. अखेरीस, १८ डिसेंबर १९१३ रोजी, वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही वर्षे त्यांचे वास्तव्य जळगाव व नंतर पुणे येथे होते.

विवाहोत्तर जीवनाबद्दल लिहिताना आपल्या सहजीवनातील अनेक तपशील त्या देतात. त्या स्वतः अत्यंत थेट बोलणाऱ्या अन् परखड स्वभावाच्या होत्या .तर पती शिवराम शिर्के स्वभावाने नरम ,सरळपणे सगळ्या गोष्टींकडे बघणारे . दुसऱ्यांना नाव न ठेवता आपल्या मार्गाने जाणारे . संसारातले अनेक बरेवाईट प्रसंग यामुळे निभावले गेले . दुसऱ्यामुळे स्वतःला नुकसानीत जायची पाळी आली तरी शिर्के काहीन बोलता शांतपणे वागत .त्यामुळे आनंदीबाई चिडत .एकमेकांवरील प्रेमाने आणि विश्वासाने त्याचा संसार खूप उत्तम झाला.

     आनंदीबाईंचे वडील बडोद्याला गायकवाड सरकारच्या सेवेत नोकरी करीत असल्यामुळे आनंदीबाईंचे बालपण गुजरातमधील नवसारी, पाद्रा, बडोदा, मेहसाणा येथे गेले. तेथील विविध गुजराती शाळांमधून त्यांचे शिक्षण झाले. परंतु, कौटुंबिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडला. त्यांनी नर्सिंगचे शिक्षण घेतले; पण त्यालाही घरातून विरोध होता. त्याच काळात लेखनाची आवड उत्पन्न होऊन त्यांनी ‘कुमारी आनंदी’ या नावाने कथालेखन सुरू केले.

     १९१०मध्ये त्यांची पहिली कथा ‘शारदाबाईंचे संसारशिल्प’ ‘मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी ‘मासिक मनोरंजन’मध्येच त्यांचा ‘स्वच्छता’ हा निबंध प्रसिद्ध झाला. विवाहानंतर पती शिवरामपंत शिर्के यांच्या साहित्यक्षेत्रातील वावरामुळे आनंदीबाईंचा अनेक नामवंत साहित्यिकांशी परिचय होऊन मैत्री झाली. श्री.कृ.कोल्हटकर, प्र.श्री.कोल्हटकर, भा.ल.पाटणकर, माधवराव पटवर्धन, वि.द.घाटे, केशवराव सोनाळकर इत्यादी साहित्यिकांचे विविध प्रसंगांचे उल्लेख ‘सांजवात’मध्ये आले आहेत.

      १९२८मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘कथाकुंज’ प्रकाशित झाला. त्याला श्री.कृ.कोल्हटकरांची प्रस्तावना लाभली आहे. १९३४ मध्ये ‘कुंजविकास’ हा कथासंग्रह, १९३९ मध्ये ‘जुईच्या कळ्या’ हा कथासंग्रह, १९४३मध्ये ‘भावनांचे खेळ व इतर गोष्टी’ (कथा), १९६४मध्ये ‘साखरपुडा’ (कथा), १९५८मध्ये ‘तृणपुष्पे’, १९८१मध्ये ‘गुलाबजाम’ (कथा) याचबरोबर, ‘रूपाळी’ ही कादंबरी व बालसाहित्याच्या दालनात ‘कुरूप राजकन्या’, ‘तेरावी कळ व इतर गोष्टी’, ‘वाघाची मावशी व इतर गोष्टी’ हे त्यांचे बालकथासंग्रह प्रसिद्ध आहेत.

     वि.द.घाटे यांच्या सल्ल्याने इतिहासाच्या पुस्तकांसाठी त्यांनी लेखन केले. अनेक गुजराती पुस्तकांचे अनुवादही त्यांनी केले आहेत. ‘सांजवात’ हे त्यांचे आत्मचरित्र १९७२ साली, म्हणजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी प्रकाशित झाले.वि.द.घाटे यांची प्रस्तावना त्याला लाभली आहे. हे आत्मवृत्त अत्यंत प्रांजल, हृदयस्पर्शी व वाचकाला अंतर्मुख करणारे आहे.

     निबंध, कथा, बाल-साहित्य, स्त्री-साहित्य, अनुवादित साहित्य, आत्मवृत्त अशी बहुविध साहित्यनिर्मिती आनंदीबाईंनी केली. स्त्रियांशी निगडित अशा सामाजिक समस्यांचे चित्रण, पुरोगामी विचारसरणी, मराठा समाजातील स्त्रियांची स्थिती, गुजरातमधील सामाजिक वातावरण, जुन्या मराठी भाषेतील शब्द व म्हणींचे वैपुल्य ही त्यांच्या रचनेची वैशिष्ट्ये होती.पहिल्या मराठी बालसाहित्यिका ही त्याच आहेत.

     त्यांच्या प्रारंभीच्या कथांवर वि.सी.गुर्जरांच्या प्रणयकथांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. पण, नंतर त्यांच्या शैलीत लक्षणीय बदल झालेला आढळतो. नर्मशृंगार सहजतेने कथेत आणणार्‍या त्या पहिल्या स्त्री-कथाकार होत्या हे त्यांच्या ‘दाम्पत्य जीवन’सारख्या कथेतून दिसून येते. स्वभावचित्रणावरील कौशल्य, तंत्रावरील हुकमत व स्त्रियांच्या भाषेचा परिणामकारक वापर यांमुळे समकालीन काळातील त्या महत्त्वाच्या स्त्री-लेखिका ठरतात.

     १९३६मध्ये जळगाव येथे भरलेल्या अ.भा.मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष माधवराव पटवर्धन (माधव जूलियन) होते. त्या सम्मेलनात स्वागताध्यक्षपदाचा सन्मान या स्त्री-लेखिकेला मिळाला होता. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाला वृत्तपत्रांमधून खूप प्रसिद्धी मिळाली होती. १९३८मध्ये पुणे येथे झालेल्या अ.भा. मराठा महिला परिषदेच्या अध्यक्ष म्हणून आनंदीबाईंची निवड झाली होती.

     पुणे येथे आकाशवाणीवर अनेक प्रसंगी, अनेक विषयांवरील त्यांची भाषणे गाजली. अत्यंत विचारी, संयमी, कष्टाळू, प्रगल्भ, चिंतनशील अशा आनंदीबाईंची लेखनशैली अतिशय प्रसन्न व मधुर होती.
आनंदीबाई आणि श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांच्यातील पत्रव्यवहाराचं संपादन डॉ. अंजली सोमण यांनी केलं आहे. यामध्ये १९१३ मध्ये झालेल्या वादग्रस्त विवाहात श्रीपाद कृष्णांनी या दांपत्याला दिलेल्या आशीर्वादांपासून, त्यांना दिलेला धीर आहे. तसंच एखादी हौशी लेखिका घडताना काय काय वाचलं पाहिजे याविषयी वेळोवेळी सल्ला आहे. पुढे पुढे तर हा पत्रव्यवहार फक्त आनंदीबाईंच्या लेखन चर्चेपुरता न राहता कोल्हटकरांनी आपलं लेखन शिवरामपंत आणि आनंदीबाईंना पाठवून विचारविनिमय केलेला दिसतो. तत्कालीन वाङ्मयीन वादाचं आणि प्रवाहांचं काहीसं प्रतिबिंब यात दिसतं.

आनंदीबाईंच्या वाङ्मयीन जाणिवा विकसित होण्याचा क्रम आपल्याला यात स्पष्ट दिसतो. १९१३ पासून १९३४ सालापर्यंतची पत्रं आहेत ही. मात्र सर्व प्रकाशित पत्रं ही श्रीपादकृष्ण यांच्याकडून आनंदीबाई अथवा शिवरामपंतांना आलेली आहेत. आनंदीबाईंकडून गेलेल्या उत्तराची पोच यात आपल्याला सापडते. प्रत्यक्ष पत्र नाही.

आनंदीबाईंनी जवळजवळ पन्नास  वर्षे लेखन केले. विसाव्या शतकातल्या वेगवान सुधारणांची स्थित्यंतरं त्यांनी पाहिली. अनुभवली. प्रारंभी कथांमध्ये पकडली. ‘सांजवात’ या आत्मचरित्रात त्यांच्या संयत, स्थिर आणि संवेदनशील लेखणीचा अनुभव आपण घेतो. आजही त्यांचा कथासंग्रह हाती घेतला तर कथा पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही. लेखिका म्हणून आनंदीबाईंचं हे मोठं यश आहे.

सौ.मनिषा राजन कडव.

फोटो स्त्रोत गुगल -

Comments

  1. पहिल्या मराठी बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांची ओळख आजच्या पिढीला करवून दिलीत 💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment