प्रिय पहिला पाऊस ...
प्रिय पहिला पाऊस ...
माझं पहिलं प्रेम पावसावर आहे. त्यातल्या त्यात पहिल्या पावसावर आहे. पहिला पाऊस आला की एखादा लहानपणीचा बालमित्र ब-याच दिवसांनी भेटावा असं वाटतं. हवाहवासा दोस्त भेटल्यावर जो आनंद होतो, तोच आनंद मला पहिला पाऊस आल्यावर वाटतो. पहिल्या प्रेमातलं पहिलेपण आणि पहिल्या पावसातलं पहिलेपण हे जो पावसावर प्रेम करतो त्यालाच कळेल. त्यासाठी मात्र पावसावर मनापासून प्रेम करायला हवे.
कुणाला सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायची हौस असते, तर कुणाला रात्रीच्या दाट चांदण्यात फिरायची हौस असते, तर कुणाला संध्याकाळच्या गार हवेत फिरायची हौस असते. मला मात्र पहिल्याच पावसात भिजत-भिजत भटकायची हौस आहे. कारण पहिला पाऊस येतो तो कोवळ्या उन्हातल्यासारखा गारांचा अंगणात सडा घालीत.
जेव्हा पहिलाच गारांचा पाऊस अचानक येतो तेव्हा रात्रीचं आभाळ चांदण्यासकट अंगणात उतरल्याचा भास होतो. मग आनंदाच्या भरात मी वेडयासारखा ती गारांची फुलं पाऊस अंगावर झेलीत वेचत असतो, परंतु गारांच्या कळ्या फुलून त्याची मातीवर फुलं होऊन ती कधी मावळून जातील याचा नेम नसतो. म्हणून पहिल्या पावसातला आनंद गार फुलांसह मी अंगावरच झेलतो. एक लिंबू झेलूबाई, दोन लिंब झेलूसारखीच एक गार वेचू बाई दोन गारा वेचू, अशी उन्मादावस्था मला पहिल्या पावसात येते.
आपण एखाद्या मित्राची वा पाहुण्याची बराच वेळ वाट बघत असतो. पण ठरल्यावेळी ठरल्या दिवशी तो येत नाही. काही अडचण असेल, असं समजून तो उद्या येईल असं आपण आपल्या मनाचं समाधान करतो, पण तो दुस-या दिवशी पण येत नाही. मग लागोपाठ चार-पाच दिवस झाले तरी येत नाही. आपली निराशा होते. काळजी वाटते, काय झालं असेल. कळवलंसुद्धा नाही. मग आपण त्याची वाट पाहायची सोडून देतो. त्याला जवळजवळ विसरतो. पण आतल्या आत मनाची घालमेल होतच राहते. मग बहुतेक तो उशिरा येईल किंवा येणारच नाही अशी मनाची अटकळ करतो आणि आपल्या कामाच्या धबडग्यात खरंच त्याला विसरून जातो आणि मग एके दिवशी अचानक पत्र वा तार यावी असा तो येतो. अगदी ध्यानीमनी नसताना. अशा मित्रासारखाच वा अनाहूत पाहुण्यासारखाच पहिला पाऊस आपल्या दारात येतो तेव्हा आपण त्या आनंदाने सुखावून जातो आणि त्याच्या आगमनाप्रसंगी नकळत अंगणात भिजतो.
पहिल्या पावसाच्या वेळी आभाळ भरून येतं. जणू आभाळाच्या निळ्या गाभा-यात सावळं रूप साकार उभं राहतं. त्यात पांढरे शुभ्र पक्षी ओळीनं घरी परतताना तुळशी माळेसारखे जणू त्या सावळ्या रूपाच्या गळ्यात रुळल्यासारखे वाटतात. तर खाली झाडे आपले फांद्याचे हात वर करून त्याचे जणूकाही स्वागत करून ओळीनं पावसाच्या वारीत सामील झाल्यासारखे वाटतात.
मग वा-याच्या जोरदार तालावर झाडांची पाने सळसळ न करता जणूकाही मृदंग-टाळ वाजवतात, असा मला तरी भास होतो. त्यात पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा वास जणूकाही अबीर बुक्क्यासारखा मनात दरवळतो. त्यामुळे आषाढात जेव्हा एकादशी येते तेव्हा आभाळात ढगांची दाटी आणि विजेची पताका पाहून प्रत्यक्ष सावळं रूपच माझ्या भेटीला आलं आहे काय असा जणूकाही साक्षात्कार होतो.
पहिल्याच पावसानं मातीही सुखावून जाते आणि तृप्त होते. याच पहिल्या पावसात मातीची कूस भरून जाते आणि मातीतील लक्ष बिजे मनात म्हणत असतात, आम्ही झालो गर्भवासी असा आगळाच आध्यात्माचा अनुभव निदान मला पहिल्या पावसात येतो आणि पहिल्या पावसात भिजताना मोक्षप्राप्तीचा आनंद होतो.
पहिला पाऊस पडून गेल्यावर वातावरणच बदलून जाते. वा-यात गारवा येतो. माती सुखावलेली असते, त्यात वळीव आपला लहरीपणा करीत मजा करून गेलेला असतो. मग येणा-या मृगाचा पाऊस अगदी मस्त होऊन व धुंद होऊन जेव्हा बरसतो तेव्हा मात्र खरी पावसाला सुरुवात होते. त्यात मृगाचं पाणी सगळीकडे सारखं पडतं आणि मनसोक्त बरसतं.
अगदी मनात ठसेपर्यंत मृगाचं वळीवाच्या पावसासारखं नसतं. वळीव मात्र कधी आला आणि कधी गेला हे कळत नाही. बरं त्याच्या मनात सापत्न भाव या बांधावर पडतो त्या बांधावर पडत नाही. कधी कधी शेजा-याच्या वावरात पडतो, पण आपल्या शेतावर रुसतो. या गावावर मर्जी करतो, त्या गावावर नाराजी करतो. आमच्या गावावरून गेला, पण पडला नाही, अशी ओरड वळवाच्या पावसाबाबत सा-यांचीच असते.
थोडक्यात, वळवाचा पाऊस पाहुण्यासारखा येत असला तरी तो परका वाटतो. तो पाहुण्यासारखाच दारातून उभ्या-उभ्या येतो आणि भेटून जातो. म्हणजे तो इतका घाईत असतो की जणूकाही त्याला कुठेतरी अपॉयन्टमेंट असते. त्याची कुणीतरी जणूकाही वाट बघत असतं, पण अशा घाईतही जरा चहा तरी घेऊन जा असा आग्रह केला तर आता नको म्हणून पाहुण्यासारखाच तरा-तरा चालत, तो कधी गेला हे कळत नाही.
तसं मृगाच्या पावसाचं नाही. तो मनमोकळा असतो आणि मनसोक्त पडतो. कसला पंक्तीप्रपंच नाही. त्यात उदार मनानं तो ज्या मस्तीत आणि धुंदीत येतो त्यामुळे त्याला आपल्याच बेंबीतील कस्तुरीनं धुंद झालेल्या कस्तुरी-मृगाची उपमा दिल्याशिवाय राहवत नाही, पण मनात आलं तर अगदी कोरडा जाईल. घुम्या बैलासारखा कुणाकडेच बघणार नाही. तो तसाच जाऊ नये म्हणून तर मृगासाठी माती तळमळत असते, पण मृगाच्या थंडगार शिडकाव्यात ती जन्माची तृप्त होते. मृगही मग कुणालाच अतृप्त ठेवत नाही. पण मृगापेक्षाही पहिल्या पावसाच्या स्पर्शात जेवढी हरकून जाते की तिच्या सा-या वेदना थांबतात. म्हणून मला पहिल्या पावसाची अपूर्वाई वाटते.
मात्र पहिल्या पावसाची चाहूल मला कावळे-चिमण्या देतात. आमच्या घरासमोरच्या झाडावर त्यांची किलबिल सुरू झाली की मी गावाकडल्या घराच्या ओसरीवर पडून त्या पक्ष्यांच्या हालचाली एकटक बघत असायचो. त्यांनी आपल्या घरटय़ांची जुळवा जुळव सुरू केली की पाऊस महाराज लवकरच येणार असं मला कळतं. त्यात झाडावरचे कावळे घरे महागली म्हणून जेव्हा जास्तच ओरड करू लागले म्हणजे मग माणसासारखीच पक्ष्यांनाही घराची कशी गरज असते हे ध्यानात येते.
पहिल्या पावसाची चाहूल जसे कावळे-चिमण्या देतात तसे एकंदर पावसाळा कसा जाईल याचे भाकीतही हे घरटेवाले पक्षी देतात. पक्ष्यांनी घरटी बांधायला सुरुवात केली तर पावसाची चाहूल लागते, पण पक्ष्यांनी घरटी झाडाच्या शेंडयावर बांधली तर पाऊस कमी होणार असे समजायचे आणि घरटी जर झाडाच्या खालच्या फांद्यांत बांधली तर पाऊस यंदा जास्त पडणार असे समजायला काहीच हरकत नाही आणि ही पक्ष्यांची वेधशाळा पावसाचा अंदाज आपल्या तज्ज्ञ सरकारी वेधशाळेपेक्षा अचूक देते.
मला पहिला पाऊस जसा आवडतो तसाच तो जर गावाकडचा असेल, तर जास्तच आवडतो. गावात जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा गुरं-वासरं उधळत घरच्या ओढीनं येतात, तर गोठयात बांधलेली वासरं पहिल्या पावसात अशी हंबरतात की त्यांना वाटतं आता सा-या माळरानावर शेपटी वर करीत हुंदडावं आणि खूप भिजावं.
माळरानावर पहिला पाऊस आला की गुरं-वासरांची जी तारांबळ उडते ती बघण्यासारखी असते. गुराखी पोत्याची वा घोंगडीची खोळ करून गावरान छत्रीचा वापर करतात. पण जेव्हा पहिल्या पावसात भिजलेली गुरं-वासरं एखाद्या झाडाखाली जमतात तेव्हा झाडालाही आपले सगेसोयरे घरी जमलेत असं वाटतं. असा आगळा अनुभव गावाच्या माळरानावर मिळतो तोही पहिल्या पावसात!
गावी पहिल्या पावसाचं पडलेलं पाणी शेवटी गंगेला मिळतं आणि पावन होतं. पहिल्या पावसाची ही आकाशगंगा भूगंगेला मिळते आणि या दोन बहिणींचा सुरेख संगम होतो, पण शहरातील पावसाची मात्र फार परवड होते. तो लोकगंगेला भेटण्यासाठी शहरात मुद्दाम येतो, पण त्याच्या नशिबी मात्र शहरातील गटारे असतात.
एक तर शहरातले लोक उन्हाळ्याने त्रस्त झालेले असतात. देहाबरोबर मनाची तगमग होत असते. लोक हाताला लागेल त्याचा पंख्यासारखा उपयोग करतात. लोकलच्या गर्दीत लोक घामाघूम होतात, मग पेपर वाचण्याऐवजी त्याचा वारा घेण्यासाठी वापर करतात. रात्रंदिवस जिवाची काहिली होत असते. चोवीस तास पंखे चालू असतात. मग त्यात वीज गेली तर लोक मात्र बिचा-या पावसालाच शिव्या घालतात. कधी येईल म्हणून त्याची वाट बघतात.
अंगातून घामाच्या धारा निघत असतानाच अचानक पावसाच्या थंडगार धारा घेऊन जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा शहरातले लोक अक्षरश: धमाल नाचून पावसाचा आनंद घेतात. पहिल्या पावसाला छत्री वापरणारा हा एक नंबरचा अरसिक असला पाहिजे. कारण पहिल्या पावसात भिजण्याची काय गंमत असते ते त्या दुर्भाग्याला काय ठाऊक! त्यात जोडीला कोण असेल तर दुधात साखर नाही पावसात साखर!
हल्ली शहरातले लोक पावसाला घाबरायला लागले आहेत. २००५ सालच्या २६ जुलैच्या ढगफुटीच्या धुवाधार पावसाने अर्धी मुंबई बुडाल्याने लोकांनी पावसाची भीती घेतली, हे सगळ्यात मोठं नुकसान आहे. जो आल्यामुळे अबालवृद्धांना मनापासून आनंद होतो. त्याचीच भीती वाटणं हे बरोबर नाही.
पावसानं काही केलं नाही लोकांच्याच चुकीमुळे अदूरदृष्टीमुळे लोकांना पावसाचा त्रास झाला. पाऊस बिचारा पडून जातो. कधी जास्त, कधी कमी. मात्र तो आपला कोटा पूर्ण करतो. गेले चार-पाच वर्षे कमी पडला तर गेल्यावर्षी जास्त पडला. हे त्याचे अध:पतन नव्हते तर लोकांचा अध:पात होता. त्यांनी त्याच्या आगमनाची तयारीच केली. नदी-नाले, तळी अडवून ठेवली; मग तो समुद्र पंढरीला कसा भेटायला जाणार! नदीला नदीच्या मनासारखे वाहू द्यावे. पण तुम्ही तिला अडवता, तिच्यावर धरण बांधता, मग तिने तुमच्यावर राग काढला तर तिचा काय दोष!
माणसानं निसर्गाला त्याच्या नियमानुसार वागू द्यावे. निसर्गावर तुम्ही आक्रमण केले तर निसर्ग तुमच्यावर आक्रमण करतो. त्यात पावसाचा काय दोष! तुम्ही चुका करता त्याची फळे तुम्ही भोगता. त्यामुळे पाऊस जो तुमचा सखा आहे त्याचीच तुम्हाला भीती वाटू लागली. पण माझं तर पहिल्या पावसावरचं प्रेम एका थेंबानेही कमी झालं नाही.
वास्तविक पाहता नेमेचि येणारा हा पहिला पाऊस ख-या अर्थानं पहिला पाऊस नसतो. तरी आपण दरवर्षी पहिल्या पावसाची वाट चातकासारखी बघतोच. तसे आपण आयुष्यात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले असतात. आयुष्यात सुख-दु:खाचे महापूर पाहिलेले असतात. आयुष्य सागरात त्सुनामी लाटांचा तडाखाही भोगलेला असतो. परंतु समुद्राच्या लाटांसारखेच त्या विरतात ना विरतात तसे दु:खाचे वळ आपण विसरतो आणि रागावलेल्या प्रियकराची वाट बघावी तसे आपण पहिल्या पावसाची वाट बघतो. हीच तर खरी पहिल्या पावसाची जादू आहे.
पहिलं प्रेम, पहिली कविता, पहिलं मूल किंवा पहिला वाढदिवस यात पहिलेपणाची जी अपूर्वाई आहे ती काही औरच असते. आपण रोजच नळाच्या पाण्यानं वा हौदाच्या पाण्यानं आंघोळ करतो; पण पहिल्या पावसानं घातलेल्या स्नानाची ‘सर’ त्याच्याशिवाय कुणाला नाही. म्हणून पहिल्या पावसात जो भिजत नाही त्याला म्हणावे, हाय कंबख्त तूने पीही नही’ नंतरच्या पावसात मग काही लोक भिजण्यासाठी पावसाळी सहली काढतात. पण पहिल्या पावसात जो ‘बंदूसे गयी वो हौदसे आती नही’ म्हणूनच पहिल्या पावसाचं कौतुक!
मला शहरापेक्षा गावाकडच्या पहिल्या पावसाचं फार वेड आहे. गावाकडं आपुलकीनं भरून आलेलं आभाळ पाहायला मिळतं. सावळे मेघ प्रत्यक्ष डोळे भरून पाहता येतात. झाडे पावसाची वाट बघत त्याच्या स्वागताला आतुरलेली बघता येतात. पक्षी झाडावर घरटी बांधून त्याची चाहूल देताना आपण आश्चर्याने अवाक् होतो. उन्हाळयात पोळलेला माळ त्याची तर आतुरतेने वाट बघत असतो. माणसं घरे-दारे शाकारून त्याच्या येण्याची प्रार्थना करतात.
वारा त्याच्या आगमनाची शिट्टी वाजवत असतानाच आपण गावाबाहेर उघडया माळावर भटकायला गेलो तर पहिल्या पावसात भिजण्याची लज्जत आणखी वाढते. मी तर मोरासारखा वेडा होऊन नाचते.
पहिला पाऊस माळावर पडताच दोन दिवसात माळ पोपटी शाल पांघरतो. डोंगरावर पहिला पाऊस हिरवी चादर घालतो. झाडे पाऊस पिऊन पिवळयातही हिरवेपणा गेला नाही, हे दाखवतात. तर कौलारू घरांची कौलारू छपरे स्वच्छ मुद्रेने आणि समाधानाने हसत असतात.
सारा गाव सचैल स्नान केल्यासारखा शुचिर्भूत होतो. देवळाच्या पारावरला सोन्याचा पिंपळ चैतन्याने भिजून जातो व देवळाच्या सोनेरी कळसावर पहिल्या पावसाचा अभिषेक होताना पाहून मन कसे प्रसन्न होते आणि मी पहिल्या पावसावर अधिकच प्रेम करू लागतो.
असाच तू येत जा ...
तूझी दरवेळी आठवण काढणारी मनिषा...
सौ.मनिषा राजन कडव
वय - ४४ वर्ष
ठिकाण-कल्याण,ठाणे
Email id kadav.manisha77@gmail.com
संपर्क क्रमांक - 9869718659
8169239825
पहिला पाऊस आठवणीत राहणारा..!
ReplyDelete