वालॉंग ...एका युद्धकैद्याची बखरलेखक : श्याम चव्हाण
वालॉंग ...एका युद्धकैद्याची बखर
लेखक : श्याम चव्हाण
१९६२, याच वर्षी हिमालयातील हिमशुभ्र शांतता भंग पावली. शांतिमंत्रांचा नाद घुमणार्या हिमालयात तोफांचा गडगडात घुमू लागला. शांततेचं प्रतिकच असलेल्या हिमालयावर रक्ताचे पात वाहू लागले... चीन्यांनी आक्रमण केलं... पराक्रमाची शर्थ करूनही भारतीय जवानांच्या वाट्याला आला पराजय... माघार... कैद...
'वालॉंग ... एका युद्धकैद्याची बखर'मध्ये भारत-चीन युद्धात लढलेले लेफ्ट्नंट-कर्नल श्याम चव्हाण कथन करत आहेत एक शौर्यगाथा... आधी तुंबळ रणसंग्राम आणि नंतर कैद... एक चित्तथरारक अनुभव कथन.लेफ्टनंट कर्नल श्यामकांत चव्हाण हे एकोणीसशे बासष्टमध्ये झालेल्या चीनविरुद्धच्या युद्धात तेव्हाच्या नेफा म्हणजे आताच्या अरुणाचल प्रदेशात भारतमातेची लाज राखण्यासाठी, आणि हिमालयाच्या शिखरांचं संरक्षण करण्यासाठी लढायला गेले होते.
१९६२ चं भारत चीन युद्ध हे अतिशय विषम अशा दोन शक्तींमध्ये लढलं गेलं होतं, ज्याची भारताला प्रचंड किंमत चुकवावी लागली.
युद्धाच्या आधी हिंदी-चीनी भाई भाई अशा घोषणा देत पुर्णपणे गाफील राहीलेला भारत… युद्धाची मानसिक तयारी नसलेलं, भारताचं कमजोर राजकीय नेतृत्व, भारताकडे असलेली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी वापरली गेलेली कालबाह्य तरीही अगदी अपुरी शस्त्रं…
आपलं मोजकं, आणि प्रचंड दमलेलं सैन्यबळ… त्याविरुद्ध आक्रमक आणि युद्धखोर चीनी लोक…. त्यांचं अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांनी सज्ज असलेलं सैन्य….
त्यांना दक्षिण कोरीयामध्ये असलेला अमेरीकेविरुद्धच्या युद्धाचा अनुभव…. चीनने सीमाभागावर कित्येक वर्षांपासुन तयारी करुन बांधलेले बंकर्स, रस्ते आणि सुविधा.
ह्या पार्श्वभुमीवर हे युद्ध झालं.
युद्धखोर चीनने अनेक ठिकाणी मॅकमोहन रेषा ओलांडली, आणि चकमकींना सुरुवात झाली. युद्धाला तोंड फुटले.भारत सरकारने ज्या शिखरांपासुन चीनी सैन्याला हुसकुन लावायची जबाबदारी कुमाऊं डिव्हीजनवर सोपवली आहे, ते ठिकाण आहे, वालॉन्ग ह्या गावापासुन तब्बल चौदा हजार फुट उंचीवर.एवढं सामान घेऊन, हिमालयाच्या जीवघेण्या कड्याकपारी, चिंचोळ्या वाटा, पायात गुडघ्याएवढा बर्फ अशा बिकट परिस्थितीत कर्नल श्याम आणि त्यांचे सहकारी हे अंतर कुठेही न थांबता पार करतात.शिखरावर पोहचेपर्यंत त्यांचे अनेक हाल हाल होतात, निकृष्ट दर्जाचे बुट, हाडं गोठवुन टाकणारी थंडी, अन्न पाण्याची टंचाई, अशा अनेक अडचणींना तोंड देत जवळ पोहचले की वायरलेस वर आदेश येतो की चीनी लोकांवर हल्ला चढवा.दोन अडीच दिवस उपाशीपोटी चाललेलं, बाराशे लोकांचं आपलं भारतीय सैन्य, अत्याधुनिक शस्त्रांनी, प्रखर मारा करणाऱ्या तोफांनी, सुसज्ज असलेल्या चीनी सैन्याच्या बंदुकी आणि तोफखान्यासमोर आपल्या जीवाची आहुती द्यायला सज्ज होतं….जीवात जीव असेपर्यंत एकेक भारतीय सैनिक चीन्यांना कडवी झुंज देतो. दिवसाच्या शेवटी भारतीय सैन्याकडे असलेल्या बंदुकीच्या गोळ्या, हॅन्डग्रेनेस, तोफांचे गोळे सगळं संपतं.चीनी शिपायांची दहा हजार सैनीकांची नवी कुमक युद्धक्षेत्रावर दाखल होते. आपला गोळीबार थांबलेला पाहुन चीन्यांना चेव चढतो.चीनी सैन्य तात्काळ त्यांना घेरतं, डोक्यावर बंदुक लावतं, पण त्यांची ऑफीसरची वर्दी पाहुन त्यांचा जीव घेतला जात नाही.
त्यांना युद्धबंदी बनवलं जातं, आता हे लोक आपल्याला हाल हाल करुन मारणार, त्याआधी मरण आलं तर बरं, म्हणुन ते देवाची प्रार्थना करतात. पण ते आश्चर्यकारक रित्या अनेक जीवघेण्या संघर्षातुन वाचतात.
पुढचे तब्बल अडीच महीने शत्रुच्या ताब्यात राहुन तिथे सहन केलेल्या नरकयातनांचं वर्णन आहे, वालॉन्ग!
एक युद्धबंदी होणं, किती दुर्दैवी असतं, आपल्या परिवाराची, आपल्या देशाची आठवण येऊन व्याकुळ होणं, म्हणजे काय? ह्याचे जिवंत अनुभव शब्दांशब्दांमध्ये अनुभवणं, ह्याचं नाव आहे वालॉन्ग!…
प्रचंड आणि वाचवल्या न जाणाऱ्या शारीरीक यातना, तहानभुक सहन करुन, आपल्या मातृभुमीसाठी तडफडणं, काय असतं? त्या शब्दाच्या पलिकडील संवेदनांना जन्म देतं, वालॉन्ग!…
संख्येने आणि ताकतीने आपल्याहुन कितीतरी पट असलेल्या शत्रुला आपल्या जिद्दीने नमवता येतं, ह्याचं आपल्या रक्तानं लिहलेलं दर्शन आहे वालॉन्ग!…
सौ.मनिषा राजन कडव
फोटो स्त्रोत गुगल -
छान परीक्षण 💐💐💐
ReplyDelete