पालकांसाठी बोधप्रद - घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती.
फोटो स्त्रोत गुगल -
आपण मराठी असल्याचे भाग्य मानावे व अभिमान वाटावा अशी बरीच पुस्तके मराठीत आहेत.डॉ. ह. वि. सरदेसाई लिखित व उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेल.
'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती' हे पुस्तक या यादीतील एक आहे.
बालसंगोपन हा विषय मुलांचे खाणे पिणे, शरीराचे आरोग्य, सवयी, संस्कार इतपतच फिरत राहतो. या पुस्तकात हे सर्व तर आहेच, तरीही त्या पलीकडे जाऊन बाळाच्या जन्मही होण्यापूर्वी भावी मातापित्यांनी काय काळजी घ्यावी, इथपासून सुरुवात करून ते या सर्वांमध्ये बुद्धीचे असलेले महत्त्व, बुद्ध्यांक व याबरोबरच भावनिक अंक (intellectual and emotional quotients) हे किती महत्त्वाचे आहेत आणि ते कसे वाढवायचे, याबद्दल यात माहिती आहे.
प्रत्येक भावी माता-पित्याने वाचले पाहिजे आणि वाचून आत्मसात केले पाहिजे, असे हे पुस्तक आहे.
लेखक डॉ. ह. वि. सरदेसाई एक प्रथितयश वैद्यक व्यावसायिक आहेत.
त्यांची वैयक्तिक ओळख, कर्तबगारी, त्यांनी समाजाला दिलेले योगदान आणि मानसन्मान यांच्या बद्दल लिहायचे, तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल.
दोन नामवंत अमेरिकन विद्यापिठांनी त्यांना सदस्यत्व देऊन सन्मानित केले आहे.
'घरोघरी ज्ञानेश्वर' आणि 'ज्ञानेश्वर जन्मला, पुढे …' या त्यांच्या लेखमाला 'स्त्री' आणि 'किर्लोस्कर' मासिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेल्या होत्या.
'घरोघरी ज्ञानेश्वर' या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८० मध्ये निघाली. २०१८ पर्यंत याच्या बावीस आवृत्या निघाल्या. यावरून पुस्तकाची लोकप्रियता, साधी सरळ सोपी भाषा आणि लोकांना या विषयाचे पटलेले महत्त्व लक्षात येईलच.
चाळीस वर्षे होऊन गेली तरी सुद्धा हा विषय कालबाह्य न होता उलट आजच्या काळातच खूप गरजेचा झाला आहे.
लहान वयातच नैसर्गिकरित्या होणारा बुद्धीचा विकास, समज येणे, अनेक विषयांची जाण येणे, बुद्ध्यांक, भावनिक, शारिरीक, सामाजिक अशा अनेकविध पद्धतींनी मुलांचे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने उमलणे आणि उत्तम नागरिक घडविल्याचे समाधान पालकांना मिळणे, अशी 'ज्ञानेश्वर' या शब्दामागची संकल्पना आहे, आणि हीच पुस्तकाची फलश्रुती आहे.
पुस्तका विषयी अधिक सांगण्यापेक्षा त्यातील काही वाक्ये येथे उद्धृत करणे योग्य ठरेल.
--
'विवाह बंधनात गुंतवून घेणाऱ्या स्त्री-पुरुषांना मुलांच्या संगोपनाची कितपत माहिती आहे याची परीक्षा घेतल्याशिवाय त्यांना विवाहित होण्याची अनुमती समाजाने देऊ नये'
--
शरीरशास्त्र सांगतं, की जन्मतः सगळी मुलं शहाणीच असतात. तुम्ही-आम्ही म्हणजेच पालक, शिक्षक, शेजारीपाजारी, नातेवाईक त्या मुलांची बुद्धिमत्ता, उपजत शहाणपण बीजरूपाने तिथे असलेलं ते ज्ञानेश्वरपण नाहीसं करून टाकतो.
--
'पालक होणं' आणि 'पालक बनणं' यातला फरक नीट लक्षात घ्यायला हवा.
--
'मुलांच्या बालपणाचा पाया उत्तम रचला जावा, म्हणून पालकांना आपल्या तारुण्याची काही वर्षे द्यावी लागतात'
--
दोन वर्षांच्या आतलं मूल जेवढं जिज्ञासू असतं, तेवढं ते पुढच्या आयुष्यात कधीच असत नाही.
--
'शिक्षणासाठी कोणतही वय कमी नसतं' असं नवं सुभाषित प्रचारात आणायला हवं.
--
खेळणं हा मुलाचा खेळ नसतो. गंभीरपणे केलेला तो अभ्यास असतो, कारण त्या आणि तशाच हजारो लाखो हालचालींतूनच तर त्याला जग समजणार असतं.
--
शास्त्र सांगतं, की घरातल्या अडचणी घरावर कोसळणारी छोटी मोठी संकटं, घरातल्या चिंता अशा प्रत्येक गोष्टीविषयी मुलांना जिथे चांगल्या अर्थानं चिंताक्रांत होऊ दिलं जातं, त्या घरातली मुलंच अधिक स्थिर असतात ! कारण अनिश्चितता, अकल्पित, अंधार असल्या गोष्टींशी त्यांना सामना द्यावा लागत नाही.
--
समर्थ व्हायचं असेल, प्रगत व्हायचं असेल, एवढेच काय सन्मानानं जिवंत राहायचं असेल तर समाज ज्ञानी झाला पाहिजे. तुलनेत तो इतर राष्ट्रांच्या बरोबरीने तरी आला पाहिजे. नाहीतर त्या राष्ट्राला जिवंत सुद्धा राहता येईल की नाही शंका आहे. ज्ञानवाद हाच यापुढे राष्ट्रवाद झाला पाहिजे. मानवी जीवनातील बहुतांश यश हे केवळ बुद्धीवर अवलंबून असतं.
--
गरोदर स्त्रीची मनस्थिती कशी असते यावर सुद्धा मुलाच्या मेंदूची वाढ अवलंबून असते, हे आता शास्त्राने सिद्ध केलं आहे.
आई सचिंत असेल, दुःखीकष्टी, भयग्रस्त असेल तर मुलाची वाढ नीट होत नाही. आई जर भलभलती औषध घेईल, तर मूल चमत्कारिक अवस्थेत जन्माला येतं.
--
'बोले तैसा चाले' हे मोठ्यांच्या जगात व्यवहार्य असो वा नसो, बालांच्या जगात मात्र त्याची फार गरज असते. कारण खऱ्याखोट्याचा पाया तिथे पक्का होत असतो.
--
आई वाचून दाखवू शकेल असा कोणताही मजकूर मुलाला दहाव्या महिन्यातच समजू शकतो. त्यातूनच त्याची विद्येची भूक वाढते. ते बुद्धिमान होण्याच्या मार्गाला लागतं.
--
हे आणि असे अनेक महत्त्वाचे मुद्दे पानापानांवर आहेत. प्रत्यक्ष वाचूनच त्याचा अनुभव घेतला पाहिजे.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द. फडणिस यांच्या समर्पक मुखपृष्ठातून माता व पिता दोघांचाही सहभाग आवश्यक आहे, ही गोष्ट स्पष्ट होते.
सौ.मनिषा राजन कडव .
फोटो स्त्रोत गुगल -
चाळिस वर्षांपूर्वी लिहिलेले पण आज ही उपयुक्त असे पुस्तक , छान परीक्षण केलेत .
ReplyDelete