सत्यभामा
सत्यभामा
इतिहासावर आपला अमिट ठसा उमटविणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. लोकमान्य टिळक त्यापैकीच एक ,दुसरे टिळकांचे समकालीन गोपाळ गणेश आगरकर.आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई यांनी आपल्या आठवणी शब्दबध्द केल्या आहेत . टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई लिहिता येण्याएवढ्या शिकलेल्या नव्हत्या . टिळकांच्या मृत्यूनंतर स.वि.बापट यांनी "आठवणी आणि अख्यायिका " हे टिळकाच्या आठवणींचे तीन खंड प्रसिद्ध केले आहेत . यात टिळकांची मुले श्रीधर , रामचंद्र व नातू ग.वि केतकर यांनी सत्यभामाबाईंसंबधी काही आठवणी सांगितलेल्या आहेत. इतर ही त्यांच्या आठवणी विखूरलेल्या आहेत . ऑगस्ट १९४५ घ्या सह्याद्री मासिकाच्या टिळक विशेषांकात टिळकांच्या दोन कन्या पार्वतीबाई केतकर आणि मधुताई साने यांनी आपल्या आईसंबधी लिहिलेला लेख सत्यभामााबाईं
संबंधी महत्वाचा दस्तऐवज मानला जातो . यानंतर त्यांच्यावर फारसे लिखाण झालेले वाचनात येत नाही . परंतु अलिकडेच डॉ. श्रीनिवास आठल्ये लिखित , टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ,पुणे यांनी प्रकाशित केलेली सत्यभामा ही कादंबरी ही संपूर्णपणे सत्यभामाबाईंना केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेली वाचनीय अशी आहे .
एकूण ५२ प्रकरणात व १६६ पृष्ठात सत्यभामाबाईंचे शब्दचित्र ओघवत्या शब्दांत प्रभावीपणे लेखकाने उभे केले आहे. कादंबरी आटोपशीर आहे .
तो काळ त्याकाळातील भाषा , सामाजिक स्थिती पाहूनच समर्थपणे कादंबरीची मांडणी केली आहे . या कादंबरीचे मुखपृष्ठ व आतील प्रत्येक प्रकरणात असलेली रेखाचित्रे अरुण सुर्यवंशी व प्रतिक काटे यांनी आप्रतिम रेखाटली आहेत . या कादंबरीला लोकमान्य व सत्पयभामाबाईंचे पणतू डॉ.दीपक टिळक यांची प्रस्तावना लाभलेली आहे .
कादंबरीतील पहिल्या दोन प्रकरणात तापीचे बालपण वाचावयास मिळते तिसऱ्या प्रकरणापासून तापीची सत्यभामा होते. वयाच्या दहाव्या वर्षी सत्यभामाबाईंचे टिळकांनी लग्न झाले त्यावेळी टिळक १५ वर्षाचे होते.
सत्यभामाबाई स्वभावतःच अत्यंत शांत आणि संयमी असल्यामुळे आपल्या अबोल असणाऱ्या पत्नीची फारशी चाहूल टिळकांना लागत नसे टिळकांचे राजकीय आणि क्रांतिकारी जीवन सुरु झाले.या काळातही टिळक घरच्या मंडळींसह कमी आणि कामातच जास्त असत.त्यामुळे सहाजिकच पत्नीकडे दुर्लक्ष होत गेले.कालांतराने मुलं झाली. २ मुलांचा मृत्यू टिळकांनी स्वतःकडे असलेल्या धैर्याने पचवला. परंतु हे दोन्ही आघात सत्यभामाबाइंसाठी पचवायला सोपे नव्हते.सतत कामात राहणारा पती, त्याकडे कधी आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या असेही त्यांना कधी वाटले नाही.त्याचमुळे पत्नी सुशील,शांत , मेहनती आणि मुले आज्ञाधारक असल्यामुळे टिळकांना कौटुंबिक अडचणी फारशा जाणवल्या नाहीत. यांची प्रचिती कादंबरी वाचताना अनेकदा होते .
सत्यभामाबाई किती धीराच्या होत्या याबद्दल कृ. प्र. खाडिलकर टिळकांना दुसऱ्या राजद्रोहाची शिक्षा झाल्याचे वृत्त सांगण्यासाठी ते गायकवाड वाड्यात गेले त्याप्रसंगात .त्या वेळी ते दाराच्या जवळच डोळे पुसत बसले होते.रखवालदाराने ही खबर बाईंना जावून सांगितली. हे ऐकताक्षणी त्या कारण ओळखून बाहेर आल्या.खाडिलकरांची ती आवस्था बघून त्या म्हणाल्या, ‘तिकडे शिक्षा झाली हे सांगण्यासाठीच तुम्ही येथे आलात ना ? मग बायकांसारखे रडत काय बसलात ? शिक्षा काही चोरी, लबाडी सारख्या नीच गुन्ह्यासाठी झालेली नाही. लोकांच्या कल्याणासाठी झटण्याला गुन्हा ठरवून सरकारने शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे हातपाय गाळून बसण्यात काय हाशील ? उठा, रडू नका, कामाला लागा.’’
सत्यभामाबाई आपल्या पतीच्या कार्याशी किती एकरूप झाल्या होत्या. अश्या कणखर पतीच्या संगतीत राहून सत्यभामाबाईंचा स्वभावही तसाच झाला होता हे लक्षात येते. ज्याप्रमाणे टिळकांना मधुमेहाने ग्रासले होते तसेच त्यांच्या पत्नीलाही मधुमेहाची तीव्र व्यथा होती. हे टिळक जाणून असल्यामुळे ते मंडालेहून पाठवलेल्या पत्रांमध्ये सतत विचारपूस करत. टिळकांना ६ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि मंडाले येथे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले.त्यानंतर पुढची ४ वर्षे सत्यभामाबाई जगल्या.आपल्या पतीला झालेल्या हद्दपारीमुळे त्यांनी स्वतःला कोंडून घेतले होते.स्वयंपाकघर, देवघर, शयनकक्ष याच ठिकाणी त्यांचा वावर असे.एखाद्या साध्वीप्रमाणे त्या जगल्या .त्यांच्या मृत्यूची बातमी टिळकांना कळविण्यात आली . तिच्या अंतिम प्रसंगी मला जबरदस्ती दूर रहावे लागते आहे याचे सर्वाधिक दुःख होते आहे.माझ्या आयुष्यातील एक पर्व संपले आणि दुसरे संपायला वेळ लागणार नाही. हे टिळकांचे उदगार होते . कादंबरी मनाला भिडणारी आहे .
सौ.मनिषा राजन कडव
ग्रंथपाल,डी.एस.हायस्कूल,शीव
छान परीचय कादंबरीचा ..
ReplyDelete