हेरगिरीचा पोरखेळ.
हेरगिरीचा पोरखेळ.
चांगल्या हेराचं लक्षण म्हणजे तो ज्यांच्यामध्ये वावरत असतो, तिथल्या सामान्य माणसांना तो कुणी तरी वेगळा वैशिष्ट्यपूर्ण माणूस न वाटता त्यांच्यामधलाच एक वाटतो. त्याच्याबद्दलच्या खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. अशा हेरांच्या विविध कथा प्रसिद्धआहेत. हेरगिरीचं विश्व इतकं गूढ आहे, की त्यामुळेच त्याचं बहुतेकांना कमालीचं आकर्षण असतं. जॉर्जिना हार्डिंग यांनी लिहिलेली ‘द स्पाय गेम’ ही कादंबरीही एका हेर स्त्रीच्या कुटुंबावरची, विशेषत: तिच्या मुलांवरची कादंबरी. १९६१ मध्ये लंडनमध्ये कॅरोलीन नावाची एक स्त्री सकाळीसकाळी दाट धुक्यामध्ये गाडी घेऊन बाहेर पडते आणि ती परत येतच नाही. तिच्या लहान मुलांना ती अपघातात मरण पावली एवढंच सांगितलं जातं. हा एवढाच तपशील घेऊन जगणारी अॅना आणि पीटर ही तिची दोन लहान मुलं नंतर कशी वाढतात, आईच्या नाहीसं होण्याचा आणि ती हेर होती, या कुजबुजीचा त्यांच्यावर नेमका काय परिणाम होतो, आपल्या आईचा इतिहास नेमका काय होता. तिचं नेमकं काय झालं याचा शोध घेण्याची प्रेरणा तिच्या मुलीमध्ये कशी निर्माण होते. या घटनेकडे फिरून पाहताना अॅनाला वाटते की, आपण त्या दिवशी घडलेल्या सगळ्या गोष्टी नीट तपशीलवार लक्षात ठेवायला हव्या होत्या. अॅनाच्या मनात तिच्या आठवणी रेंगाळू लागतात.... अॅनाचा मोठा भाऊ पीटर हेरगिरी, शीतयुद्ध काळातल्या घटना, त्यामुळे उडणारा अफवांचा धुरळा व रहस्यमयता यांकडे आकर्षित होतो. तो अॅनाला म्हणतो की, त्यांना आईचा मृत्यू झालाय असं सांगितलं गेलंय. पण ते खरं असेल कशावरून? ते तर अंत्ययात्रेलाही गेलेले नाहीत. आणि मग तो आईबद्दल एक गोष्ट रचू लागतो – पूर्व जर्मनीतली निर्वासित असलेली त्यांची आई मरण पावली नसून कदाचित ती रहस्यमयरीत्या हेरगिरी करत असावी.... अॅना तिच्या कल्पनेमध्ये आईच्या आठवणींचे तुकडे जोडत तिची प्रतिमा तयार करू लागते.... तिच्या आईचं आयुष्य गूढ आणि रहस्यांनी भरलेलं होतं का? तिची आई कोण होती? भूतकाळ, आठवणी, कल्पना आणि वास्तव यांचा कौशल्याने विणलेला रहस्यमय गोफ!
सौ.मनिषा राजन कडव.
परीक्षण वाचून पुस्तक वाचण्याची जिज्ञासा झालीय
ReplyDeleteवाचण्यास उत्सुकता निर्माण झालीआहे.
ReplyDelete