प्रेरणादायी :- आमचा बाप आन् आम्ही..

प्रेरणादायी :- आमचा बाप आन् आम्ही..

२०१ आवृत्त्या निघालेलं! मराठीतील सर्वाधिक खपाचे पुस्तक!आमचा बाप आणि आम्ही! प्रत्येकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे प्रेरणादायी पुस्तक! अस्मिता जागी झाल्यावर काय परिणाम होतो याचा शोध यातून लागतो! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून किती बदल घडतो हे सांगणारे पुस्तक.

सुप्रसिद्ध अर्थतज्ञ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा राज्यसभेचे विद्यमान सदस्य खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांचं हे आत्मचरित्र. दलित समाजातील एखादा व्यक्ती जेव्हा उच्चपदांपर्यंत पोहोचतो आणि त्याचं सर्वस्वी श्रेय तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देतो, तेव्हा खरंच त्या व्यक्तीबद्दल असलेला आदर तर वाढतोच; तथापि, बाबासाहेबांवरील निष्ठाही अधिक बळकट होते. अर्थातच, पुस्तकाच्या नावात वापरलेला "बाप" हा शब्द कोणाला उद्देशून आलाय, हे वेगळे सांगायला नको.

पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर डॉ.आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. 
मुंबईस्थित वडाळा येथील बी.पी.टी. (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) च्या चाळीतून लेखकाचा प्रवास सुरू झाला. त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील ओझर हे होते. मग गाव सोडून हे कुटुंब मुंबईला आले कसे? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची आजी 'राहीआई' होय. या 'राहीआई'कडे 'नेटिव्ह इंटेलिजन्स' होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कसल्याही परिस्थितीत जिंकण्याची 'विजीगीषा' (इच्छा) होती. वयाप्रमाणे मोतिबिंदूमुळे अंधत्व आलेले असले तरी आजीकडील दुरदृष्टीमुळेच जाधव कुटुंबाची गाडी व्यवस्थित मार्गाला लागल्याचे लेखक सांगतात. तिचा उल्लेख आजीऐवजी 'आई' असा का केला, तर यामुळेचं !

लेखकाचे वडील 'दामुदादा' हे बी.पी.टी.च्या रेल्वे विभागामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी होते. त्यांचा स्वभाव अतिशय कडक होता. आपल्या मुलांवर ते कधी चिडले, रागावले तर त्यांचा 'डॅमलाडी बिस्कीट' हा नेहमीचाच ओरडा सर्व भावंडांना खावा लागत असे. युरोपियन वरिष्ठांसोबत काम केल्याने 'डॅम, ब्लडी, बास्टर्ड' या शिव्यांचा सोयीस्कर उपयोग ते स्वतःच्या भाषेत आपल्या मुलांवर करत असत. कामाच्या बाबतीत मात्र त्यांना कसलीच हलगर्जी जमत नसे. एकदा तर त्यांनी थेट (त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या) बापट नावाच्या रेल्वे मॅनेजरलाच शिस्तीचे धडे दिले असल्याचा मजेशीर प्रसंग आपल्याला वाचायला मिळतो. 

लेखकाचे बालपण हे वडाळ्याला गेलेले. त्यांचा जन्म १९५३ सालचा. एकूण सहा भावंडांपैकी ते शेवटचे. सर्वात मोठे जे.डी. म्हणजे जर्नादन जाधव. जे पुढे कलेक्टर झाले. कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, परभणी, नवी मुंबई या जिल्ह्यांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांची नियुक्ती मंत्रालयात झाली. महाराष्ट्र शासनाचे सचिव म्हणून ते निवृत्त झाले. वडाळ्याच्या वसतीतील १९५०-१९७० या कालावधीतील अनेक आठवणी लेखकाने आत्मीयतेने नमूद केल्याचे दिसून येते. विशेषतः दादरच्या छबिलदास शाळेतील अनेक ध्येयवादी शिक्षकांकडून झालेले संस्कार लेखक आजही विसरलेले नाहीत.

दहावीनंतर एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश, नंतर रुइया महाविद्यालयातून संख्याशास्त्र-अर्थशास्त्र या जोडविषयातून बी.एस्सी., त्याचदरम्यान वक्तृत्व, वादविवाद या स्पर्धांमध्ये हिरीरीने घेतलेला सहभाग, पुढे १९७५ ला मुंबई विद्यापीठातून एम.ए.अर्थशास्त्र या विषयात मिळवलेला प्रथम वर्ग ही त्यांची वाटचाल वाखाणण्याजोगी आहे.

एम.ए. करत असताना त्यांना १९७४ ला स्टेट बँकेत नोकरी मिळाली. तीन वर्षे नोकरी केल्यानंतर मुंबईला रिझर्व्ह बँकेत अर्थशास्त्र विभागात सर्वात तरुण 'रिसर्च ऑफिसर' म्हणून त्यांची निवड झाली. ही प्रतिष्ठेची नोकरी करत असतानाच त्यांना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे उच्च शिक्षणासाठी नॅशनल स्कॉलरशिप मिळाली. यातूनच अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात अर्थशास्त्रातील डॉक्टरेट करण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले.

अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातील त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. परंतु, या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी' हा बहुमान प्राप्त झाला ! पुढे त्यांचे पीएच.डी. गाईड असणारे प्रा. फुरस्टनबर्ग यांच्यासोबत वांशिक शुद्धतेवरून जाधवांचा संघर्ष झाला. शेवटी प्रकरण विद्यापीठीय उच्चस्तरीय समिती नेमून निकाली काढण्यात आले. १९८६ च्या शेवटी नरेंद्र जाधव डॉक्टरेट ही मानाची पदवी प्राप्त करूनच मायदेशी परतले.

भारतात आल्यानंतर RBI मध्ये डेप्युटी डायरेक्टर पदावर कार्यरत असताना त्यांच्यावर 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी' (IMF) या जगविख्यात संस्थेबाबतची पहिली मोठी जबाबदारी आली. भारताचा 'कोटा' कसा वाढवता येईल आणि त्याद्वारे राष्ट्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त कर्ज कसे मिळवता येईल, यावर डॉ. जाधवांनी यशस्वीरीत्या काम केले. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली.

इथियोपियन राष्ट्रीय बँकेचे आर्थिक सल्लागार, अफगाणिस्तान सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार या जबाबदाऱ्या त्यांनी पुढील काळात समर्थपणे पार पाडल्याचे दिसून येते. मलेशिया आणि सिंगापूर या प्रगत राष्ट्रांच्या बँकिंग आणि वित्त संस्थांचा अभ्यास करून त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला विस्तृत अहवाल सादर केले. सध्या चर्चिल्या जाणाऱ्या 'फिस्कल डेफिसिट' (आर्थिक तूट) या अर्थशास्त्रीय संकल्पनेवरील डॉ. जाधवांच्या रिसर्च पेपरचे तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी विशेष कौतुक केलेले आहे. पुढे ऑक्टोबर,१९९२ मध्ये बढती मिळून RBI च्या केंद्रीय संचालक मंडळाच्या सचिवपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. डिसेंबर, १९९७ ते नोव्हेंबर, २००१ या कालावधीमध्ये त्यांनी 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी' (IMF) या संस्थेमध्ये भारत, श्रीलंका, बांग्लादेश आणि भूतान या राष्ट्रांचे कार्यकारी संचालक या नात्याने प्रतिनिधित्व केले. 

यशाची ही सर्व शिखरे पादाक्रांत करत असताना जातीव्यवस्थेमुळे आलेले वाईट अनुभव यांचेही कथन लेखकाने या पुस्तकात केलेले आहे. त्यामुळे भारतीय समाजाचे किती नुकसान झाले आहे, ते लेखक आपल्याला उदाहरणासहित पटवून देतात.उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी यावर मात करणे गरजेचे आहे, असे लेखक ठासून सांगतात.

शेवटी एक आशादायी चित्र आपल्या सर्वांसमोर उभे करताना ते लिहितात,"भारतीय समाजाच्या सर्व थरांमध्ये जाती-वंश-धर्म-प्रांत-वर्ण-लिंगभेद यांचा विचार न करता स्वतःमधला राजहंस शोधण्यासाठी परिपूर्ण आणि पोषक वातावरण निर्माण होईल. त्यावेळी या देशाचा आर्थिक उष:काल झालेला असेल. डॉ. आंबेडकरप्रणीत आर्थिक लोकशाहीचे गमक नेमके त्यामध्ये आहे!"

पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे विशेष प्रकाशन तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते प्रधानमंत्रांच्या दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी पार पडले. त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार असे होते, " ... डॉ. नरेंद्र जाधव यांचे आयुष्य हे सुद्धा बदलाची, असीम शौर्याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे. यामधून आपल्या देशातील लाखो-करोडो लोकांना नवे, सुखासमाधानाचे जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची मला खात्री आहे..."

डॉ. नरेंद्र जाधव यांचं आत्मचरित्र हे उद्याच्या भारताचे भविष्य असणाऱ्या तुम्हा-आम्हासारख्या तरुणांना निश्चितच दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे.

सौ.मनिषा राजन कडव

Comments

  1. प्रेरणादायी पुस्तक.💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खरच,पुस्तका ईतके परीक्शण सुंदर लिहीलेत

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*