विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - ही श्रींची इच्छा"
"ही श्रींची इच्छा" न वाचलेले खूपच कमी वाचक असावेत. सर्वकाही गमावल्यानंतर परत जिद्दीने ते मिळवण्याची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा असलेलं ठाणेदार यांचं हे नवीन आत्मचरित्र -ही श्रींची इच्छा, पुन्हा श्रीगणेशा उद्योजक, रसायन शास्त्र तज्ज्ञ हे त्यापुढचंच एक पाऊल आहे.
बेळगावला बाराव्या वर्षी एका डॉक्टरांकडे शंभर रुपये महिना पगाराची नोकरी ते १४०० कोटी डॉलर्स उलाढाल असलेल्या बिझनेस उभा करणं, आर्थिक मंदीत तो गमावणं आणि पुनश्च हरिओम करत तो पुन्हा फिनिक्ससारखी राखेतून भरारी घेऊन उभा करणं असा त्यांचा प्रवास सामान्य माणसाला अचंबित करणारा पण प्रत्येक उद्योजकाला इंस्पायर करणारा आहे.
वडील रिटायर झालेले अन बहिणींची नुकतीच लग्न झाली असल्याने घरात आर्थिक परिस्थिती बेताची होती.श्री तरुण भारत मध्ये छोटे मोठे लेख लिहीत होता पण अजून पैशांची गरज असल्याने एका डॉक्टरांची "नोकर पाहिजे" म्हणून जाहिरात बघितली आणि तिथं जाऊन धडकला.तिथं मिळणारे पैसे भाजी, किराणा यासाठी वापरत आणि कुणी ओळखीचं भेटू नये याची तो दक्षता घेई, कारण ही नोकरी करत आहे हे घरी सांगितलेले नव्हते.
दहावीला फक्त पंचावन्न टक्के मार्क मिळालेल्या श्रीने नंतर मात्र हे पक्कं समजून घेतलं की चांगली गुणवत्ता, चांगले मार्क मिळवले नाहीत तर आपली पुढे धडगत नाही आणि त्यानंतर त्याने प्रत्येक परीक्षेत अतिशय उत्तम गुणांनी यश मिळवलं आणि तो पुढे पुढे जात राहिला. इनऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये बीएससी केल्यानंतर नोकरी लागली, थोडंफार काम केलं ,नंतर त्याला अशी इच्छा निर्माण झाली की आपण उच्च शिक्षणासाठी, रिसर्च करण्यासाठी अमेरिकेमध्ये जावं. नौशिल वाडिया नावाच्या एका मित्राबरोबर चार-पाच वेळा व्हीसा मिळवण्याचा प्रयत्न करून अखेर त्यांनी अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं.
दरम्यानच्या काळात अडचणी आल्या की फोन करणारे नाना चिकोडीकर, बी ए आर सी मध्ये असताना सतत टोचून बोलणारे परंतु पीएचडीसाठी सिलेक्शन झाल्यानंतर घरी बोलून श्रीखंड-पुरी खाऊ आणणारे सोमण साहेब अशा अनेक विचित्र माणसांचे त्यांना विचित्र अनुभव येत राहीले- जे आपल्यासारख्या सामान्य माणसांनाही काही नवीन, चांगलं काही करताना येतातच.
आपल्या आईचा, जिला ते इन्नी म्हणून संबोधत, सगळ्यात जास्त प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि जीवनावर राहिलेला आहे. तिचा त्यांनी प्रकर्षाने घेतलेला गुण म्हणजे "नेव्हर से डाय" ॲटीटयूड!
तर वडिलांकडून शांतपणाचा गुण आपण घेतला आहे असं त्यांना वाटतं.
दहावीत असल्यापासूनच वडील श्रीला मोठा समजायला लागले आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा सल्ला आणि त्याच्याशी विचारविनिमय करून आपले कुठलेही निर्णय घेऊ लागले.त्यामुळे पहिल्यापासूनच एक जबाबदार माणसासारखे वागणे आणि निर्णयक्षमता हे गुण श्री यांच्या अंगी खूप लवकर बाणले.
त्यामुळे तेरा वर्षांचाअसताना सत्तर वर्षांच्या मनुष्याशी वडिलांच्या आलेल्या पेन्शनमध्ये दोन जुनी पडकी घरे विकत घेण्याचा व्यवहार श्रीने स्वतः अतिशय चलाखीआणि धूर्तपणे वाजवी दरात केला आणि पुढे या दोन पडक्या घरांची डागडुजी करून त्यातलं एक स्वतः राहण्यासाठी वापरावे आणि दुसरे भाड्याने द्यावे जेणेकरून आपला घरखर्च भागेल अशी सुज्ञ कल्पना श्रीने मांडली.
त्यांची पहिली पत्नी बोर्ड स्कॉलर आणि एम डी सायकॉलॉजी होती.सगळं काही सुखात चाललं असताना, अनुवांशिक मानसिक विकार असल्याने एक दिवस मुलं लहान असताना अचानक तिने आत्महत्या करून ठाणेदार कुटुंबाला सहन न होणारा आणि न परवडणारा धक्का दिला.
जर तिच्या मानसिक आजाराबद्दल माहीत असतं, तर मी तिची अजून काळजी घेतली असती, असं श्री यांना आजही वाटतं.
नवरा म्हणून साहजिकच समाजाने त्यांना या घटनेसाठी जबाबदार धरून अक्षरशः वाळीत टाकलं, जवळचे मित्र बोलेनासे झाले, सगळ्यांशी संबंध तुटले.
पण कुठलाही अन्याय सहन न करण्याची वृत्ती अंगी असलेल्या श्रींनी कोषात न जाता, एकटे न पडता, जिद्दीने तिथल्याच मराठी मंडळाचा अध्यक्ष होऊन त्यावर मात केली.समाजाचा एक भाग बनून समाजाला त्यांना खाली पाडू द्यायला त्यांनी संधीच दिली नाही.
मुलांकडे संपूर्ण लक्ष देता यावं म्हणून बिझनेसकडे पूर्ण दुर्लक्ष केलं.स्वतःला नैराश्यातून बाहेर करण्यासाठी कौन्सेलिंग, डिप्रेशनवरची पुस्तकं वाचणे, असे उपाय केले.
तीन वर्षे एकट्याने मुलांचे संगोपन, खेळ, शिक्षण- ही तारेवरची कसरत केल्यानंतर , शशी यांच्याशी दुसरं लग्न श्री यांनी केलं आणि परत घराला घरपण आलं आणि मुलांनीही या दुसऱ्या आईला मनापासून स्वीकारलं.
एक उद्योग सुरू करायचा, तो स्थिरस्थावर झाला की कुठलातरी दुसरा नवीन उद्योग सुरू करायचा ही दर्यावर्दी सिंदबादच्या नवनवीन धाडसी सफरी काढण्याच्या सवयीप्रमाणे - नवनवीन उद्योग सुरू करण्याची सवय श्री यांना पहिल्यापासूनच होती.
पहिल्यांदा केमिर नावाची चांगली पण मालकिणीला वार्धक्यामुळे न चालवता येणारी केमिकल लॅबोरेटरी विकत घेतली आणि नंतर एक एक करत कंपन्या विकत घेऊन उद्योग वाढत गेला.साधारण चौदाशे ते पंधराशे कोटींचा बिझनेस झाल्यानंतर कर्ज खूप वाढले, त्यामानाने उत्पन्न तेवढं नव्हतं.
२००६ ते २००८ च्या दरम्यान कर्ज प्रचंड वाढल्यामुळे बँकांनी त्यांच्या सर्व मालमत्तेवर जप्ती आणण्याचा धडाका लावला आणि त्यामध्ये त्यांनी जवळजवळ सगळं काही गमावलं.
अशा परिस्थितीतही त्यांच्या पत्नीने त्यांना खंबीरपणे साथ दिली."आपण दोघांनीही गरिबीतून सुरुवात केली आहे, तुझ्याकडेही काही नव्हतं,, माझ्याकडेही काही नव्हतं, आपण परत सगळं उभं करू!"असं बोलून त्यांनी श्री यांच्या मनावरचं ओझं घालवून टाकलं.
अशा परिस्थितीतही जिद्द न संपलेल्या श्रींनी दोनदा मिळालेल्या Ernst and Young कंपनीच्या बेस्ट आंत्रप्रेन्यर पुरस्कारांकडे बघत " मी पुन्हा हा पुरस्कार मिळवून दाखवीन" असा निश्चय केला.
सर्वोत्तम बंगला, कार, फर्निचर इत्यादी सगळं सोडून एका ट्रकमधून स्वतः पत्नीबरोबर दहा तास ड्रायव्हिंग करत थोडंफार सामान घेऊन ते मिशिगन या शहरात आले आणि कुटुंबासाठी एक छोटसं खोलीवजा घर भाड्याने घेतले.
तिथंच एक मंदीमुळे बंद पडलेली केमिकल लॅब विकत घेऊन तिथं पडलेली जुनी केमिकल्स साफ करून केमिकल ऍनालीसिसचा कन्सल्टन्सी व्यवसाय २०१० साली वयाच्या ५५ व्या वर्षी परत जोमाने सुरू करून पुन्हा श्रीगणेशा केला.
पुढच्या सहा वर्षांत आयुष्यात जेवढं काम केलं नसेल एवढं काम केलं, व्यवसाय चांगला वाढवला आणि २०१६ साली परत एकदा आंत्रप्रेन्यर ऑफ द इअर पुरस्कार मिळवला.
आधीच्या अनुभवातून शिकून नवीन व्यवसायाच्या सेवा अशा तऱ्हेने दिल्या की कन्सल्टिंग आणि आर अँड डी म्हणजे रिसर्च ह्या दोन्हींच प्रमाण समान राहील - जेणेकरून मंदीतही व्यवसायावर दुष्परिणाम होणार नाही ( आधीच्या कंपनीत ८५% व्यवसाय रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर अवलंबून होता जो मंदीत जवळजवळ बंद झाला होता)
श्रींची आणखी एक खासियत आहे- संकटाशी दोन हात करताना त्यांना कधीही खचल्यासारखं वाटत नाही किंवा डोळ्यात पाणी येत नाही.पण त्या संकटावर मात केल्यावर मात्र त्यांना भरून येतं.
सेंट लुईस इथला राजवाड्यासारखा बंगला सोडताना नव्हे तर तिथंच पुन्हा दुसरा महाल बनवला तेव्हा मात्र त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. व्यवसाय आणि सगळी मालमत्ता यांच्यावर टाच आली त्यावेळी नाही तर परत सुरू केलेला आणि सेट झालेला नवीन व्यवसाय विकून टाकल्यानंतर ते अक्षरशः हमसाहमशी रडले- आलेल्या सगळ्या अनुभवांची आणि झालेल्या त्रासाची आठवण येऊन!
कलेचा आस्वाद रसिकतेने घेणे रक्तातच असल्यानं त्यांच्या घरी कायम अनेक कलाकारांची वर्दळ असते.
अमेरिकेत मराठी USA मंडळ , ठाणेदार फाऊंडेशन स्थापन करून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम ते चालवतात.
सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने मिशिगन राज्याचा गव्हर्नर होण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं.दोन लाख मतही निवडणुकीत मिळवली.
आता त्यांना डेट्रॉईट राज्याचा गव्हर्नर व्हायचं आहे आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत राहायचं आहे.
वाचनीय आणि प्रेरणादायी "ही श्रींची इच्छा," पुन्हा श्रीगणेशा "उद्योजक, रसायनशास्त्र तज्ज्ञ अशी दोन भागात असलेली ही दोन्ही पुस्तकं संग्रही असावी अशीच आहेत.
"The glory of a man is not in never falling, but getting up every time he falls"
या वाक्याची पुरेपूर प्रचिती श्री यांच्या या जीवन-चरित्राकडे बघितलं की येते.
फोटो स्त्रोत गुगल.
सौ.मनिषा राजन कडव
छान परीक्षण 💐💐💐
ReplyDelete