जीवनमुल्यांचे शिक्षण देणारे - "वॉल्डन"
जीवनमुल्यांचे शिक्षण देणारे - "वॉल्डन"
निसर्ग आणि मानवी मूल्यांची नैतिक ढासळण होत असलेल्या काळात थोरोचे विचार आपणा सर्वांचे पथदर्शक ठरणारे आहेत. २०१७ हे या आधुनिक ऋषीचं २०० व जन्मशताब्दी वर्ष! देश-काल-भाषा-संस्कृती अशा नानाविध घटकांनी विभागाला गेला असला तरी मानवाचे मानव्य हे एकच आहे या अद्वैत विचाराचे आधुनिक रूप आपल्याला थोरोत सापडते. आधुनिक जगातील मानवी मनाचा निसर्गाप्रत असणारा हुंकार जसा आपल्याकडे तुकोबांनी मांडला तसाच तिकडे थोरोने! गांधीजींची "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" घडवण्यात थोरोचा हात मोठा आहे.
एकांत अनुभवायला म्हणून ऐन तारुण्यात हा माणूस वॉल्डन या तळ्याकाठी राहायला गेला आणि त्या २ वर्षांच्या एकांतात त्याला शांततेने दिलेला दृष्टांत त्याच्या 'वॉल्डन' या श्रेष्ठ साहित्य कृतीतून आपल्यासमोर आजही उभा आहे. इंग्लिश समाजात शेक्सपिअर किन्वा डिकिन्स, मराठीत जसे ज्ञानोबा-तुकोबा तसाच अमेरिकेत थोरो, एक आधुनिक ऋषी!
मरणाचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, असं हेन्री डेव्हिड थोरोला वाटायचं. मृत्यूबाबत थोरोची मतं चिंतनीय होती. त्याच्या मते तेव्हापर्यंत अमेरिकेत एकही माणूस मृत्यू पावला नव्हता. जो जगलाच नाही तो मरेल कसा, हा त्याचा बिनतोड सवाल! ज्याचा आपण एक अविभाज्य भाग आहोत, त्या निसर्गाच्या सान्निध्यात रसरशीत जगणं, परिपक्व होणं, समृद्ध होणं म्हणजे खरं आयुष्य अशी त्याची धारणा. म्हणूनच तो सारे पाश तोडून ‘वॉल्डन’ या तळ्याकाठी झोपडी बांधून दोन वर्षं विजनवासातलं आयुष्य जगला. एकांताचा शांततेनं भारलेला भव्य अवकाश त्यानं मेघडंबरी समजून लीलया पेलला. वृक्षवल्ली, प्राणी-पक्षी, अथांग जलसाठे, बदलते ऋतू, चांदण्या रात्री त्याचे सांगाती होते. तो जगण्याचा अनोखा उत्सव होता. असं अस्सल काही गाठीशी असल्यानंच तो म्हणायचा, ‘मी बऱ्याच जणांना ते मरणार आहेत, असं ढोंग करताना पाहतो किंवा ते मेले आहेत, असंही ऐकतो. शक्यच नाही! मी त्यांना आव्हान देतो, त्यांनी मरून दाखवावं. मरायला ते जिवंतच नाहीत, तर मरणार कोठून? माझ्या दृष्टीनं जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत केवळ सहा-सात लोक मेले असावेत. ‘मेमेंटो मोरी’ म्हणजे ‘प्रत्येकाला मेलंच पाहिजे’ या अत्यंत महत्त्वाच्या वाक्याचा खरा अर्थ अजून आपल्याला कळलेलाच नाही.’
या निसर्गवेत्त्यानं विपुल लिखाण केलं आहे. काही पुस्तकरूपांत प्रसिद्धही झालं आहे. बरंचसं त्याच्या जर्नल्समध्ये कच्च्या नोंदींच्या स्वरूपात राहिलंय. ते पक्कं करण्याएवढी सवड, आयुष्य थोरोला लाभतं, तर अजून भव्यदिव्य असं काही आपल्या हाताला लागतं. ते व्हायचं नव्हतं.
थोरो असा आहे ना, की त्याच्याविषयी कितीही लिहिलं तरी हा पठ्ठ्या दशांगुळं उरतोच. थोरोचं अल्पचरित्र आणि गाजलेल्या निबंधांचा मराठी अनुवाद (हेन्री डेव्हिड थोरो : चरित्र व निबंध) मधुश्री प्रकाशनानं प्रकाशित केला आहे. या पुस्तकांचं भाषांतर ‘वॉल्डन’ मराठीत आणणाऱ्या जयंत कुलकर्णी यांनीच केलं आहे. त्यात थोरोचं चरित्र समजून घेता येतंच, शिवाय थोरोचे गाजलेले निबंध या पुस्तकाचं आकर्षण. त्याची दिव्य विचारधारा अगदी तारुण्यात त्यानं केलेल्या वाचनाचा, चिंतनाचा, भ्रमंतीचा अर्क बनून या लिखाणात उतरली आहे. हे सारं आशयघन आणि अंतर्मनाला भिडणारं आहे.
थोरोनं पाश्चात्त्य साहित्याबरोबरच हिंदू धर्मग्रंथांचाही सखोल अभ्यास केला होता. ‘भगवद्गीते’चा तर तो अत्यंत चाहता. तो म्हणतो, ‘या अभिजात ग्रंथाच्या श्लोकांत वाळवंटात वाहणाऱ्या वाऱ्याची स्पंदनं आहेत, गंगेच्या लाटांची भरती आहे आणि उत्तुंग हिमालयाची उंची आहे. या ग्रंथातील विचारांची वीण इतकी घट्ट आहे, की मला वाटतं अनंत काळापर्यंत सगळे धक्के, ताणतणावातही ती उसवणार नाही.
हिंदू ग्रंथांमध्ये किंवा शास्त्रांमध्ये मानवाबद्दल ज्या काही कल्पना मांडल्या आहेत त्या अत्यंत उदात्त व अथांग आहेत. जगातील कुठल्याही ग्रंथात मानवाचे या जगातील कर्म काय व त्याची नियती काय याबद्दल असे दिव्य विवेचन आढळणार नाही.’
थोरोचं वाचन अफाट होतं. तरुण वयातच जगातील अभिजात
वाङ्मयाचा त्यानं फडशा पाडला. हे नुसतंच वरवरचं तरंगणं नव्हतं. त्यानं हे अक्षरधन आपल्या अंतरंगात रिचवलं होतं, पचवलं होतं, काळजाच्या कुपीत साठवलं होतं. त्यातून त्याच्या विचारांनी आकार घेतला. तो चिंतनशील बनला. विवेकी बनला. मूलभूत विचारांचा भारवाहक बनला. त्यातून झालेला अक्षर वाङ्मयाचा आविष्कार जगाचे डोळे दिपवणारा न ठरता तरच नवल! निसर्गाबाबत त्यानं मूलगामी चिंतन केलंच, पण जागतिक राजकारणाला कलाटणी देणारा आणि भारतासारख्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींचं अमोघ अस्त्र ठरलेला ‘सविनय कायदेभंगा’चा मूलभूत विचार प्रथम थोरोनंच विस्तारानं मांडला. त्यामुळं त्यानं आधुनिक राज्यशास्त्रात मानाचं पान पटकावलं. थोरोचा हा विचार जगभरातल्या राज्यशास्त्रज्ञांच्या, तत्त्ववेत्त्यांच्या अभ्यासाचा, चिंतनाचा विषय ठरला. उन्मत्त आणि बलाढ्य सत्ताधीशांना गुडघ्यावर बसायला भाग पाडणारं यांसारखं दुसरं कोणतं शस्त्र नसावं. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील भारतीय स्वातंत्र्य लढ्यानं ते सिद्धही करून दाखवलं. गंमत म्हणजे जंगलात राहणारा हा वनवासी तुटलेले जोडे दुरुस्त करायला गावातील चांभाराकडं गेला असताना निवडणूक कर न भरल्याच्या आरोपाखाली एका सरकारी अधिकाऱ्यानं त्याला तुरुंगात टाकलं. तुरुंगातल्या जीवनाचा छान आनंद घेत थोरोनं जगात क्रांतिकारी ठरलेला हा निबंध लिहिला. दमनकारी सत्ता काही वेळा क्रांतीची बीजं पेरायलाही साह्यभूत ठरते, ती अशी!
‘चालणे’ या साध्यासुध्या विषयावर त्यानं लिहिलेला ‘भटकंती’ हा निबंध तर अस्सलतेचा उत्तम नमुना ठरावा. बरं हे चालणं शारीर बळकटीसाठी किंवा आरोग्यासाठी नव्हे, तर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी केलेली अमर्याद सैर! त्यात कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडं व्यवहार्य उपयुक्ततेच्या दृष्टीनं पाहणाऱ्यांसाठी हा निबंध काही कामाचा नाही. भटकंतीतला आनंद लुटण्याची असोशी बाळगणाऱ्यांसाठी मात्र हे सुरेल गाणंच! ‘तत्त्वहीन जीवन’, ‘प्रेम’, ‘थंडीतील एक भटकंती’, ‘रात्र आणि चंद्रप्रकाश’ हे या पुस्तकातले अन्य निबंधही निसर्गाचं तोंड फाटेस्तोवर कवतिक करणारेच! जगावं कसं, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात तुम्ही असाल तर हे पुस्तक तुम्हाला नक्की मदत करेल यात शंका नाही.
बहुतांश आवडत्या लेखकांची शैली आपल्याला माहिती असते. त्यांची विषयाच्या मांडणीची पद्धत आपल्या परिचयाची असते. त्यामुळं सुरू झालेल्या एखाद्या वाक्याचा शेवट काय असू शकेल याचे आडाखे बांधतच आपलं वाचन घरंगळत राहतं. थोरो वाचताना असं होत नाही. अखंड सावध राहावं लागतं. अनेक नव्या मूलगामी विचारांचा, तत्त्वज्ञानाचा खजिनाच तो आपल्यापुढं खुला करतो. मग काय घेऊ अन काय नको अशी अवस्था होऊन जाते. वाक्यावाक्याला तो आपल्याला चकित करीत राहतो. विचारांचं हे अस्सल सोनं आपल्या वैचारिक खजिन्याची शान वाढवणारं असतं. त्यामुळं ते सारं स्मृतिमंजूषेत कसं साठवता येईल, याचीच चिंता आपल्याला सतावत राहते. हे थोरोच्या बौद्धिक सामर्थ्याचं यश! आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कसलीही भीडभाड न ठेवता शेलक्या भाषेत हा आपल्याला हैराण करीत राहतो. बरं, यानं मांडलेलं नाकारायचीही सोय नसते, इतकं ते अस्सल आणि बांधीव असतं. त्यामुळं फारा दिवसांनी काही तरी अस्वस्थ करणारं, समृद्ध करणारं गवसल्याचा परमानंद घेता येतो. अर्थात, हे विचार खुलेपणानं ग्रहण करण्याची आपली तयारी असेल, मानसिकता असेल तरच!
हा जगविख्यात निसर्गवेत्ता तसा अल्पायुषीच ठरला. त्याचा मृत्यू वयाच्या अवघ्या चव्वेचाळिसाव्या वर्षी क्षयानं झाला. हा आजार तेव्हा असाध्य होता, जगभर धुमाकूळ घालत होता. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता राल्फ वाल्डो इमर्सन थोरोचा ज्येष्ठ मित्र. त्याच्या घरी रंगणाऱ्या साहित्य, तत्त्वज्ञान, राजकारण, समाजकारणावरच्या गप्पाष्टकांतला हा एक भिडू. इमर्सननं आपल्या या (आर्थिक अंगानं) दरिद्री मित्राला शेवटपर्यंत मदतीचा, सहकार्याचा हात दिला. अर्थात, थोरोनं त्याचा कधी गैरफायदा घेतला नाही. जेव्हा जेव्हा अशा वेळा आल्या, तेव्हा तेव्हा त्यानं जाणीवपूर्वक आपली मैत्री निष्कलंक राखण्याचाच प्रयत्न केला. त्या अंगानंही हा थोरच.
एका वाचकाला लिहिलेल्या पत्रामध्ये थोरोनं स्वतःविषयी अगदी प्रांजळपणानं मतप्रदर्शन केलं आहे. हा अंतर्बाह्य किती निर्मळ होता याचा बोध यावरून व्हावा. तो म्हणतो, ‘स्वतःचं अभिनंदन करावं असं फारसं काही माझ्या आयुष्यात घडलं नसेल, पण माझा माझ्या तत्त्वांवरील विश्वास आणि माझ्या प्रामाणिक इच्छा आकांक्षांबद्दल मला आदर आहे. मी जे काही बोलतो ते त्यावर आधारित असतं. प्रत्येक माणूस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. मी कुठलीही प्रतिज्ञा केलेली नाही ना कुणाच्या पायाशी माझं अंतःकरण गहाण टाकलं आहे. मी ‘मी’ आहे किंवा ‘मी’ बनण्याचा प्रयत्न मी करतो आहे.’
थोरोच्या काही अवतरणांचा उल्लेख करण्याचा मोह टाळता येण्यासारखा नाही. या पत्रातच तो पुढे म्हणतो, ‘माणसानं शंकांचा आदर करायला हवा. शंकांमध्येही दैवी शक्ती असते. विश्वास असणं वाईट नाही, पण शंकाच नसणं मात्र घातक आहे. त्याचबरोबर एखाद्या माणसाला तो चुकतोय हे सांगणं चांगुलपणाचंच लक्षण आहे, पण त्याची खात्री पटविण्यास जाऊ नका. त्याची चूक त्याला अनुभवानंच कळेल आणि तेव्हाच त्याला ती मान्य होईल.’
भोगवादी जीवनपद्धतीची थोरोला कमालीची चीड यायची. ‘तत्त्वहीन जीवन’ या पुस्तकात माणसाच्या दुटप्पीपणाबद्दल त्यानं म्हटलंय, ‘सध्या ज्या प्रकारचं जीवन आपण जगतो ते तिरस्करणीय आहे. काव्य, साहित्य, तत्त्वज्ञान जे जे जगात चांगलं आहे त्याच्या विरुद्ध ही जीवनरीत आहे. एखादा माणूस जंगलात भटकतो त्याला तुम्ही उडाणटप्पू म्हणता, वाया गेलाय असं म्हणता. मात्र एखाद्यानं जंगलतोड केली, या पृथ्वीला बोडकं केलं तर तुम्ही त्याला उद्योगपती समजता हे योग्य नाही. ऋतुचक्रातील प्रत्येक ऋतूवर मनापासून प्रेम करा, उत्कटपणे तो ऋतू जगा. प्रत्येक ऋतूत हवा वेगळी असते, फळे वेगळी असतात. या सगळ्यांचा आस्वाद घ्या. त्या त्या ऋतूत मिळणारी फळे, हवा, पाणी हाच तुमचा आहार असू देत. तीच तुमची पेयं आणि तीच तुमची औषधं असू देत. अंगावर जरा वारा घ्या. शरीरातील रंध्रे उघडू द्या आणि निसर्गाच्या लाटांमध्ये, झऱ्यांच्या पाण्यामध्ये, महासागरांच्या लाटांवर स्वार होत त्यात स्नान करा.’
६ मे १८६२ या दिवशी थोरो क्षयाला शरण गेला, त्यानं अखेरचे डोळे मिटले. दफनभूमीत त्याला श्रद्धांजली वाहताना त्याचा मित्र इमर्सन म्हणाला, ‘थोरोएवढा सच्चा अमेरिकन आजवर झाला नाही आणि पुढे होईल असं वाटत नाही. आपण किती महान माणूस गमावला आहे याची कल्पना आपल्या देशवासीयांना नाही. त्यानं जे काम सुरू केलं आहे ते पूर्ण करणं कोणाला शक्य होईल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. मला खात्री आहे तो समाधानानंच गेला असणार. त्याचं हृदय विशाल, प्रेमळ आणि सदा अनुकंपेनं भरलेलं असायचं. जेथे सद्गुण आहेत, सौंदर्य आहे, निसर्ग आहे तेथे त्याला त्याचं घर सापडो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!’
समृद्ध, समाधानी आयुष्य जगायचं असेल, तर ऊर फाटेस्तोवर पैशाच्या मागं धावण्यापेक्षा निसर्गाशी जोडलं जाणं आवश्यक आहे, हे थोरोच्या लिखाणाचं सार. तो स्वतः निसर्गस्नेही जीवनशैलीतून गवसलेल्या आनंदाच्या डोहात मनमुराद तरंगला. त्याच्या जगण्यातलं ओंजळभर तरी आपल्याला स्वीकारता येईलच की! निसर्गाच्या सान्निध्याबाबत शेतकरी तसे नशीबवान. इतरांचे काय? सांगा बरं, तारकांनी गच्च भरलेलं आकाश पाहून किती दिवस झाले?... थोडं आठवा. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आणि त्या मंद प्रकाशात भारलेलं रान न्याहाळून किती वर्षं लोटली? गर्द जंगलात आपण कधी हरवलोय का? निर्झराचा खळाळ किती वर्षांपूर्वी आपल्या कानांवर पडला होता? की हा परमानंद आपण कधीच घेतलेला नाही? निसर्गाशी तुटणं म्हणजे स्वतःशीच तुटणं हे आपल्याला केव्हा कळणार आहे आणि कळलं तरी केव्हा वळणार आहे?
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment