हद्दपार" — ध्येयनिष्ठ शिक्षकाची प्रेरक कहाणी

हद्दपार" — ध्येयनिष्ठ शिक्षकाची प्रेरक कहाणी
------------------------------------------------------ 

श्री. ना. पेंडसे यांची ' हद्दपार' ही कादंबरी वाचली. लेखक प्रस्तावनेत म्हणतात आमच्या मास्तरांच्या विद्यार्थ्यांत बऱ्यापैकी लेखनकला असलेला मीच; यामुळे प्रस्तुत कथेच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर आली. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मास्तरांचा जीवनप्रवास या कादंबरीतून हळूहळू उलगडत जातो. 

मुलांना कोकणातील दुर्गेश्वर येथील गावातल्या मुलांना घासूनपुसून बाहेरच्या जगात पाठवणाऱ्या एका सज्जन आणि ध्येय प्रेरित शिक्षकाची ही कहाणी आहे. घरी अठराविश्व दारिद्र्य आणि पदरी न शिकणारा एक मुलगा आणि सुंदर बायको अशा परिस्थितीत हा मास्तर सापडलेला आहे.

या मास्तरांच्या पूर्वजांनी त्यांच्या काळात पराक्रम केलेला, आणि त्यामुळे गावात त्या घराण्याला मानमरातब होता, वचक होता, श्रीमंती होती. अशा घराण्यात मास्तरांचा जन्म झाला, पण त्यांची जन्मपत्रिका पाहून सारे चक्रावले. हा कूळ बुडवील, शुद्रपणे अर्थार्जन करील, आणि मुख्य म्हणजे घराण्याचा निर्वंश करील असं चमत्कारिक त्यांच्या पत्रिकेत होतं. खरं तर लेकाने शानशौकिने इनामदारी करावी नि सुखासीन आयुष्य जगावं असं मास्तरांच्या वडिलांना वाटत राहिलं. पण मास्तर लहानपणी कुणब्यांच्या पोरांत मिसळून खेळले, नंतर मास्तरकीची इतरांदेखी शूद्र नोकरी धरली, इतकेच काय आंतरजातीय विवाह सुद्धा केला. 

वडील गेल्यानंतर काही दिवसांतच हा श्रीमंतीचा मुलामा वरवरचा आहे हे मास्तरांना कळलं, कर्जाचा डोंगर वाढला होता, परिस्थिती बेताची बनली होती. नोकरीमुळे ते कसाबसा तग धरून होते. मास्तरांना वडिलांना अपेक्षित राजेपण वठवणं जमलं नसलं तरी त्यांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे केली. त्यांचा आपल्या विद्यार्थ्यांवर फार जीव. त्यांनी अर्थार्जन दुय्यम मानलं, पैसे कमावण्यापेक्षा माणसं कमावली. यशस्वी विद्यार्थी घडवले. एक वेगळा आदर गावात मिळवला. 
त्यामधला एक प्रसंग मला  वाचलेला आठवतो. गावात लंब्या जोशी नावाचा अभ्यासात जेमतेम असलेला एक मुलगा असतो. 

लंब्या जोशी एका पपईच्या नळीत बरेच काजवे सोडतो आणि ती नळी म्हणजेच आधुनिक बॅटरी आहे असे म्हणून गावभर फिरतो. सगळे गावकरी त्याची चेष्टा करतात. परंतु फक्त राजे मास्तरच त्याचं कौतुक करतात. 

कोणतंही मूल मूलतः चांगलं असतं यावर मास्तरांचा भारी विश्वास असतो. 
त्यांचं म्हणणं असं की, " सर्वस्वी दोषयुक्त जीवन जगात सोडायला परमेश्वराला वेड नाही लागलं. त्या मुलाच्या अंगात कोणता तरी गुण असतो. तो तुम्ही शोधा आणि त्यावर फुंकर घाला म्हणजे त्या मुलाचं तेज तुम्हाला दिसेल. "
पुढे हाच लंब्या जोशी लंडनला जातो आणि सायन्समध्ये पीएचडी मिळवतो! त्याच्या प्रबंधाचा विषय असतो " Mass in Newtonian Mechanics ". 

मास्तरांच्या साठीच्या वेळेला तो भाषणात सांगतो की " माझ्या काजव्याच्या बॅटरीचा कौतुक करणाऱ्या या प्रिय शिक्षकाने माझा आयुष्याचा पाया घातलेला आहे... " 

गाव म्हटल्यावर होतं ते जातीपातीचं राजकारण त्यांच्या वाट्यालाही आलं. प्रसंगी बायकोचे बोचरे बोल त्यांना परिस्थितीमुळे ऐकावे लागले. पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीत ते सुख मानू लागले, कष्ट आणि दारिद्र्य भोगलेल्या आयुष्याला तेवढं एक समाधान पुरेसं होतं.
अगदी शेवटी राजे मास्तर यांची बदली सूडबुद्धीने दुसऱ्या गावात केली जाते. ते देखील तपासणीसाठी आलेल्या तपासनीस मास्तरांचा मान ठेवला नाही म्हणून. 

परंतु राजे मास्तर ताठ कण्याचे असतात ते बदली स्वीकारून दुसऱ्या गावाला जायचं नाकारून राजीनामा देतात. तसेच आपली पेन्शनही त्या हट्टापायी घालवतात. 

आणि दुर्गेश्वराच्या हद्दीतून बाहेर निघून जातात. दूर कुठेतरी...
१९५० साली कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पण यातलं शेवटचं प्रकरण दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी काढून टाकलं. अशी कबुली श्री. ना. पेंडसे प्रस्तावनेत देतात. ते शेवटचं प्रकरण काय असावं याची उत्सुकता मनाला लागते. वाचकांपैकी कोणाकडे मूळ आवृत्ती आणि शेवटचे प्रकरण वाचले असल्यास नक्की कथेचा शेवट काय ? अन्यथा ही कादंबरी राजेमास्तर दुर्गेश्र्वराला अखेरचं वंदन करतात इथे संपते अशी नाईलाजाने कशीबशी समजूत करून घ्यावी लागते.
शेवटी जगाची रीत असीच आहे. चांगली माणसं दुरावतात, हद्दपार होतात असे या कादंबरीचे सूत्र आहे.
अवघ्या दीडशे पानात श्री ना पेंडसे यांनी राजे मास्तरांच्या जीवनाचा जो पट रंगवला आहे त्याला खरोखरीच काही तोड नाही.
बाकी ही कादंबरी वाचताना आपल्या आवडत्या शिक्षकांची आठवण आल्याखेरीज राहत नाही. नक्की वाचावी अशी ही कादंबरी.



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*