दाट काळा पाऊस "

" दाट काळा पाऊस "

सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांच्या सहा दीर्घकथांचा संग्रह म्हणजे- 'दाट काळा पाऊस'. आपल्या लेखनाच्या पहिल्या टप्प्यावरच दीर्घकथेविषयी, तिच्या रचनातंत्राविषयी आपली ठोस आणि स्पष्ट भूमिका घेऊन त्यांनी अर्थपूर्ण आणि गुणवत्तायुक्त अशा दीर्घकथा लिहिल्या. केवळ कथेची लांबी वाढली की ती दीर्घकथा होते, या समजाला खोटं ठरवत दीर्घकथा हा स्वतंत्र असा वाङ्मयप्रकार आहे, अशी जाणीवपूर्वक मांडणी करीत तिची स्वायत्तता आणि स्वयंभूत्व सिद्ध करीत जवळजवळ चाळीस वर्षे त्यांनी हा वाङ्मयप्रकार सक्षमपणे हाताळला (आज मराठीत दीर्घकथेला मिळणारी पसंती हे याचे उत्तम उदाहरण सांगता येईल.). त्यांचा 'दाट काळा पाऊस' हा त्याच परंपरेतला एक सशक्त असा दीर्घकथा संग्रह. भारत सासणे म्हटले की आपल्याला आठवतो त्यांचा 'चिरदाह' हा कथासंग्रह. त्यातली डफ, एका प्रेमाची दास्तान यांसारख्या कथा. रसरशीत अनुभव आपल्या ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या आणि पूर्वसुरी कथेच्या तुलनेत आपल्या कथेची पृथगात्मता सिद्ध करणाऱ्या या त्यांच्या कथा वाचकांनी डोक्यावर घेतल्या. हा प्रवास पुढे 'अस्वस्थ विस्तीर्ण रात्र', 'अनर्थ', 'अदृष्ट', 'ऐसा दुस्तर संसाऽर', 'त्वचा' अशा दीर्घकथा संग्रहांच्या माध्यमातून अधिक सशक्तपणे घडत गेला. या परंपरेत आपली वेगळी वाट शोधणारे कथाकार म्हणून सासणे यांच्या नावाला तत्कालीन जाणकार समीक्षक-वाचकांनी पसंतीची पावती दिली, ती या कथेतील पृथगात्मता जोखूनच.आताच्या नव्या कथासंग्रहात एकूण सहा दीर्घकथा आहेत. या सहाही दीर्घकथा वाचताना एक समान सूत्र हाती येते आणि ते म्हणजे यातल्या कथानायकाच्या प्रत्यक्ष जीवनाशी या कथा कमी आणि त्याच्या भवतालाच्या वास्तवाशी अधिक संबंधित अशा आहेत. 
या कथासंग्रहातल्या सहाही कथा अनेक केंद्रबिंदू असलेल्या आहेत. त्यांत व्यक्तिरेखांच्या मनोव्यापाराचा जसा पसारा आणि पिसारा आहे, तितकंच निसर्गाला, वातावरणाला अग्रस्थान आहे. सतत रिपरिप पडणारा किंवा कोसळणारा पाऊस, अंधार, वाऱ्याच्या झोतानं खिडक्यांच्या तावदानांचे होणारे विशिष्ट आवाज हेही जणू व्यक्तिरेखा असाव्यात तसं काही सांगू पाहतात. या कथांत खूप व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे परस्परसंबंध, त्यांची आपसातली आणि शिवाय पर्यावरणीय वातावरणाशी असलेली नाती असं बरंच काही लक्षात घेत, छुपे अर्थ उलगडत वाचत जावं लागतं. बरं, या कथांतून व्यक्त होणारे जीवनानुभव सर्वसामान्य माणसाला जगताना येणारे नाहीत. म्हणजे व्यक्तिरेखा सामान्य असल्या तरी त्यांच्यात विलक्षण संवेदनशीलता, विविध प्रकारचे गंड, कसला तरी शोध असे व्यक्तिविशेष आढळतात.

त्यामुळे कथा वाचताना आपण त्याची सहअनुभूती घेऊ शकत नाही. त्या प्रसंगांशी सहजी तादात्म्य पावू शकत नाही. एखादा गूढ, अद्भुत सिनेमा बघावा तसं वाटत राहतं.

 यातील एक कथा , पुण्याहून मुजफ्फरपूरला निघालेला नायक एका सुनसान स्टेशनवर ऐन रात्रीच्या वेळी उतरतो. पावसाची संततधार सुरू आहे… तिथून त्याचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात त्याला चित्रविचित्र अनुभव येतात. तो कब्रस्तानात रात्र काढतो. तिथे भेटलेला मुस्लीम मियॉं मृत्यू पावल्याची बातमी कळते. पुढच्या प्रवासात घोड्यांच्या पैदाशीची जागा आणि घोडेवाला भेटतो. पुढे एका देवीचा उत्सव होणारी जागा, तेथील जुना वृक्ष, सर्वत्र पसरलेलं गवत, सापांचा भयावह वावर असं वर्णन. ते ओलांडून टेकडी चढत तो ईप्सित स्थळी पोचतो, जिथे त्याला जायचं होतं- रोहिणीच्या घरी. कथेची जवळपास चाळीस पानं गूढतेच्या जंगलातून वाचकाचासुद्धा प्रवास सुरू असतो… ज्यात प्रवासाला फक्त एकमेव टांगा उपलब्ध असणं, मुक्कामाला कब्रस्तान, फिरणारे साप, टेकडी चढून जाताना आडवा जाणारा मोरांचा तांडा, झाडी आणि मग अचानक प्रतिष्ठितांचा प्रदेश, सिमेंटची घरं, पोस्ट ऑफिस… नायक असा सगळा प्रवास करून रोहिणीच्या घरी पोचतो. त्या दोघांच्या तारुण्यात घडलेल्या गोष्टींविषयी कबुलीजबाब देण्यासाठी नायक एवढं दिव्य पार करून तिथे गेलाय. तो जे सांगतो ते तिला आणि तिच्या मृत नवऱ्याला आधीच माहीत होतं. त्याच्या चुका त्यांनी पोटात घेऊन त्याच्या मैत्रीला स्वीकारलं होतं, हे कळल्यावर त्याचा अपराधगंड कमी होतो आणि तो शांतपणे परतीच्या प्रवासाला लागतो. हे झालं यातलं थोडक्यात सांगण्याजोगं कथाबीज.

 'दु:खाचा अनुवाद' ही कथा मेंटल हॉस्पिटल आणि बिस्किटांचा कारखाना यांच्यासमोर या कथेतला नायक राहणारा. वयाने प्रौढ. आपल्याकडे येणार्‍या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजेनुसार सल्ले देणारा. बिस्किटांच्या कारखान्याच्या मॅनेजरचा भाचा असलेला अनिरुद्ध. याअनिरुद्धला एक पत्र आलेलं. त्यात बेचाळीस हजार तीनशे बहात्तर रुपये खाल्ल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नमू उर्फ नर्मदा नावाच्या मुलीकडे हे पैसे त्याने तेव्हा दिलेले असतात आणि तिने ते योग्य ठिकाणी पोचवलेले नसतात. काही वर्षांनी आलेल्या या पत्रानुसार अनिरुद्ध आपल्यावर कुठले किटाळ नको म्हणून या नायकाच्या सांगण्यावरून नमूचा शोध घ्यायला निघतो. नमू अंबिकाची मैत्रीण होती या सुगाव्यानुसार तो अंबिकाचा शोध घेतो. अंबिका त्याला आपल्या जाळ्यात ओढते. तिचा इतिहास आणि वर्तमानही वाईट असल्याचा आणि तीच आधीची नमू असल्याचा उलगडा अनिरुद्धला होतो. वरवर अशाप्रकारे दिसणार्‍याया कथाशयाला आणखी एक वेगळा पदर आहे. तो म्हणजे वेड्यांचं हॉस्पिटल. त्या परिसरातील वेडे, अंगावर पांढरी शाल पांघरून फिरणारा नायक, त्याला होणारे वेगळाले भास. त्याच्या वडिलांनी त्याला दिलेली रॉबर्ट फ्रॉस्टची Miles to go... ही कुणाला तरी देण्यासाठी (पण कुणाला द्यायची हे मात्र सांगितलं नाही) त्याच्याजवळ दिलेली कविता, नायकाचा सतत चाललेला बुद्धिबळाचा डाव. त्यातून उभं राहणारं त्याचं वेगळं मनोराज्य; या सगळ्यांतून ती कथा केवळ नमूच्या शोधाची कथा ठरत नाही, तर ती अखंड प्रतारणेच्या मुळांची कथा ठरते. याच प्रकृतीची आणखी एक कथा म्हणजे 'अ लाँग डिस्टन्स कॉल'. खांडव्याला जाताना रेल्वेचा अपघात झाला आहे, म्हणून मध्येच एका आडवळणाच्या स्टेशनवर गाडी थांबते. तिथून पुढे सतरा तास गाडी नाहीच. त्या आडवळणाच्या गावी असलेल्या एका सामान्य हॉटेलमध्ये नायकाला थांबावे लागते. 'विरासत' हे त्या हॉटेलचं नाव. या मुक्कामात त्याला भेटणारी माणसं आणि त्यांच्या मागे लागलेला दु:खाचा ससेमिरा, त्यातून सुटून प्रत्येकाची आपल्यासाठी नवी जागा शोधण्याची चाललेली धडपड आणि या सगळ्यातून तुकड्या-तुकड्याने नायकाच्या आयुष्यातील उभी राहणारी दु:खाची माळ, त्याचं अर्ध्या वाटेवर हरवलेलं सुख, चौथ्या मितीच्या शोधात चाललेली त्याची शोधयात्रा... यांची मांडणी या कतेत सासणे अधिक प्रभावीपणे करतात. यातील लंगडा मन्सूर, विदेशी संशोधक आणि त्याची मैत्रीण, पळून जाऊन लग्न करणारे नवे जोडपे, वेश्येसोबत लग्न करणारा मगरू बालवेश्या शर्मिला, भवरलालला कपटाने जाळ्यात अडकवून घेऊन जाणारा पोलीस आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लीलानं तिच्या बहिणीच्या मृत्यूनंतर नायकाला देऊ केलेलं आणि त्याने नाकारलेलं सुख, सहजीवन... मानवजीवनातील या सगळ्या चौथ्या सुखाच्या शोधाला ही कथा दूरस्थपणे न्याहाळत संपते आणि त्याच वेळी वाचक आपल्या जगण्यातील या चौथ्या सुखाच्या शोधात अडकून पडतो. अंतर्मुख होऊन विचार करू लागतो. 'दाट काळा पाऊस' ही शीर्षककथा वर्तमानात भूतकाळातील काही प्रमादांचा, काही आस्था-असूयेचा आणि आपल्या प्रेयसापर्यंत जाताना, त्याचा शोध घेतानाची आणि त्या शोधासाठी केलेल्या प्रवासाची एक अनवट कथा. मनोहर हा कथेचा नायक. मुज्जफरपूर, तिथली संस्कृती, लोकप्रथा, लोकसमजुती, रहमतखानच्या बहिणीला पडणारं स्वप्न, बडेमियांने पैशासाठी जपून ठेवलेलं गालीबचं साहित्य, घोड्यांचा रेतविधी, तंत्रमंत्राच्या विधीतून स्त्रीचा तिच्या नवऱ्याच्या संमतीने परपुरुषाशी पुत्रप्राप्तीसाठी घडवून आणला जाणारा धार्मिक विधी... अशा अनेकानेक पायऱ्या चढत मनोहर पोचतो तो रोहिणीच्या घरी. सुधीरच्या पुण्यतिथीला. सुधीरच्या आईने त्याला देलेल्या आणि त्याने ती त्या त्या माणसांना न दिलेल्या पत्रांच्या कबुलीजबाबासाठी. थोडक्यात पापक्षालनासाठी तो आलेला. आयुष्यभर ते ओझं मनावर बाळगून; पण रोहिणीच्या बोलण्यातून त्याने न दिलेली पत्रं, न दिलेला चेक वेळीच त्या त्या माणसांना पुन्हा मिळाला आणि त्याचं आयुष्य नीट मार्गी लागलं. त्या सगळ्या प्रवासात शेवटी आपण कसे उपरे ठरलो, या माणसांच्या आयुष्यात आपल्याला काहीही स्थान नव्हते आणि नाहीही; कशामुळेही कुणाचं जगणं थांबत नाही, ही जाणीव घेऊन परतणारा आणि आपल्या कामात स्वत:ला अडकवून घेणारा मनोहर या कथेच्या मुळाशी आहे'आय थिंक', 'देअरफोर आय्एम्…, 'ब्याण्णव दरवाजे', 'गहना कर्मणो गति:' या प्रस्तुत दीर्घकथा संग्रहातील आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण कथा. 'गहना कर्मणो गति:' ही कथा मानवी नात्यातील गुंत्याचा आणि स्वार्थीपणाच्या अंतिम टोकाचा विचार करणारी कथा म्हणता येईल. वत्सलाबाई या घटस्फोटित स्त्रीच्या आयुष्यातील घटना आणि त्या घटनांमागील तिच्या पाताळयंत्री अशा मानसिकतेची मांडणी यात येते. श्रीधरच्या मृत्यूचे रहस्य, सत्यजितच्या परत येण्याचं रहस्य, अण्णामामांच्या काळ्या चामडी बॅगचे रहस्य, गोपिकाआज्जीच्या पोटातील अखेरच्या क्षणी उलगडणारे रहस्य, कर्टुले आणि रघुनाथरावच्या वर्तनातील रहस्यकथा संपूर्ण वाचून झाल्यावर अनेक प्रश्न मनात उभे राहतात. अद्भुत वाटाव्यात अशा घटना, प्रसंग, लोकमान्य टिळकांच्या कुटुंबातल्या एका मुलीचा पुनर्जन्म झाल्याचं सांगणाऱ्या मुलीच्या बापाची व्यक्तिरेखा, आणि अशा बऱ्याच व्यक्तिरेखा- ज्या नायकाला प्रवासात भेटतात, त्यांचा मूळ कथाबीजाशी काय संबंध असेल? यातल्या गूढ व्यक्ती नेमक्या एकाच प्रवासात नायकाला भेटण्यामागचं प्रयोजन नेमकं काय असेल? यातली प्रत्येक व्यक्ती काहीतरी शोधते आहे. कुणाला मुंबईतली त्याची आप्त व्यक्ती, कुणाला पुनर्जन्माचं रहस्य. रेल्वे स्टेशनवरून तिसऱ्या टप्प्यावरच्या सिमेंटची घरं असलेल्या गावात जायला नायकाला जर असा टांग्यातून आणि नंतर टेकड्या चढून प्रवास करावा लागत असेल तर इतर त्या आधुनिक गावात कसे जातात? यासारख्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेताना त्यातली प्रतीकं शोधण्याचा खेळ करत राहावा लागतो. आणि मग मुख्य प्रश्न उभा राहतो की, आपण शोधलेला अर्थच लेखकाच्या मनात होता की काही वेगळाच? लेखकाला कथेत अभिप्रेत असलेला अर्थ कसा जाणून घेता येईल.?
 अशा अनेकविध रहस्यांनी  कथा खच्चून भरलेली आहे; तथापि ही कथा रूढार्थाने लोकप्रिय स्वरूपाची रहस्यकथा ठरत नाही. कारण या कुठल्याच रहस्यांना उत्तरे नाहीत.या सहाही कथांचा विचार करताना कथाकार म्हणून भारत सासणेंचा आलेख केवळ उंचावतच नाही, तर तो अधिक व्यापकही होत जातो....पुस्तकाचं निर्मितीमूल्य अत्यंत देखणं आहे. रविमुकुल यांच्या गूढ, गहिरं वातावरण उभं करणाऱ्या सुंदर मुखपृष्ठामुळे पुस्तक अधिकच देखणं झालंय.

सौ.मनिषा राजन कडव .
ग्रंथपाल
ओम शिवम कृपा को.आॅ.सो. गुरूनानक शाळेजवळ,रामबाग ४
कल्याण ,पश्चिम -४२१३०१
मोबा.- ९८६९७१८६५९
kadav.manisha 77@gmail.com

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*